विदर्भ एक्सप्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोडले तेव्हा भुरभुरत्या पावसाला सुरूवात झाली होती. वीणाताईंनी सुटकेचा मोठ्ठा निःश्वास सोडला खूप मोकळं मोकळं वाटत होतं. त्यांनी त्याच मूडमध्ये खिडकीबाहेर बघायला सुरूवात केली. मुंबई गोदीतल्या अजस्त्र क्रेन्स, नुकत्याच होऊन गेलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी खास प्रकारची रोषणाई केलेल्या रेल्वेमार्गालगतच्या गगनचुंबी इमारती, सोनेरी प्रकाशाने त्या मोहमयी नगरीला सुवर्णसाज चढवून अधिकच मोहक बनविणारे ते रस्त्यांवरचे सोनेरी दिवे या सगळ्या झगमगाटात वीणाताईंच्या दृष्टीला पडल्यात त्या रेल्वेमार्गालगतच्या काळोख्या झोपड्या. स्वातंत्र्याच्या या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा चाललेला जल्लोष जणू त्यांच्यासाठी नव्हताच. कमालीचे दैन्य, दुःख, आपदा तिथे एकवटून राहिल्या होत्या आणि उरलेल्या जगाला त्याची साधी दखलही घ्यावीशी वाटत नव्हती.
"कुठे स्वातंत्र्य ? कुणा स्वातंत्र्य ?" ही ओळ ताईंच्या मनात आली. अंधा-या रूळमार्गांवरचे सांधे पकडून गाडीने आता आपला नेमका मार्ग अवलंबलेला होता. गाडीच्या वेगाबरोबरच ताईंच्या विचारांचाही वेग वाढत होता. "वयाच्या ७५ व्या वर्षी आपण पहिल्यांदा मुंबईत येतो काय ? आणि वयाला झेपत नसतानाही सकाळी येऊन संध्याकाळी परत निघालो काय ?" त्यांना स्वतःचच आश्चर्य वाटलं. तशी आपली राहण्याची व्यवस्था दिनेश नं आमदार निवासात केली होती. दोन दिवस आपल्या सगळ्यांसाठी सरकारी मेजवान्या, सरकारी इतमामात मुंबई दर्शन वगैरे कार्यक्रमांची रेलचेलही होती. पण आपण अचानकच परत फ़िरलो. एकदम तडकाफ़डकी निर्णय घेतला आणि तो अंमलात आणलासुद्धा. आपण एकदम ५० -५५ वर्षे लहान झालोत का ? गाडीचा वेग मंदावल्याने त्यांची विचाश्रृंखला तुटली. बहुधा दादर स्टेशन आलं असावं.
गाडी हलली आणि बारकीबारकी उपनगरीय स्टेशन्स मागे टाकताना गाडीने आता ब-यापैकी वेग घेतला होता. थंड हवेच्या झोतामुळे म्हणा की गेल्या अठ्ठेचाळीस तासांमधील मानसिक, शारिरीक थकव्यामुळे म्हणा वीणाताईंचे डोळे जडावले होते. मिटलेल्या डोळ्यांसमोरून भूतकाळ भराभर पुढे सरकत होता.
९ ऑगस्ट १९४२. गांधीजींचा "चले जाव" आणि "करेंगे या मरेंगे" हा संदेश घराघरात पोहोचला होता. चिमूरच्या बाबासाहेब इनामदारांच्या वाड्यावर गुप्त खलबतं चाललेली. बाबासाहेब गावातल्या प्रतिष्ठित मंडळींबरोबर पुढल्या लढ्याची आखणी करीत बसलेले. त्यात आपला पोरसवदा वाटणारा थोरला भाऊ सुद्धा. मधल्या त्या कोठीघरात कुणालाही प्रवेश नाही. फ़क्त आपली आई तेव्हढी मधनंमधनं आत जाऊन काय हवं, नको ते बघतेय. आपण मात्र त्या खोलीच्या दाराबाहेर घुटमळत काही विचार कानी पडतोय का ? हा कानोसा घेत. मधेच एखादा विचार एव्हढा आवडायचा की जुलुमी गो-या सरकारविरूद्ध मुठी आवळल्या जायच्यात, नेत्रात अंगार फ़ुलायचेत आणि स्वातंत्र्ययुद्धाच्या कल्पनेने अंगावर रोमांच उभे रहायचेत. स्वयश, स्वार्थ यापेक्षाही विभिन्न गोष्टींमुळे रोमांचित होण्याचाच तो काळ होता.
दुस-या दिवशी स्थानिक कचेरीवर भव्य मोर्चा निघालेला. मोर्चाचे नेतृत्व आपले बाबा, आपला दादा आणि कालची इतर मंडळी करताहेत. त्यावेळी नेतृत्वासाठी, श्रेय उपटण्यासाठी लठ्ठालठ्ठी नव्हती तर जुलुमाचा विरोध करण्यासाठी हिरीरी होती. अपेक्षेप्रमाणेच पोलीसांनी लाठ्या, काठ्या बंदुका घेऊन मोर्चा कचेरीसमोरच अडवलेला. पोलीस सर्वांना परत जाण्याचं आवाहन करताहेत इतक्यात "वंदेमातरम" चा सामूहिक जयघोष निनादतो आणि हातात तिरंगी झेंडा घेतलेला दादा मुसंडी मारत पुढे शिरतो. त्याच्या नजरेत फ़क्त ते कचेरीवरचे ’युनियन जॅक’ चे ब्रिटीश जुलुमी राजवटीचे चिन्ह. तिथे त्याला तिरंगा फ़डकावायचाय. तो पुढे पुढे सरकत असतानाच सोजीरांच्या बंदुकीतून सणसणत आलेली गोळी त्याचा वेध घेते आणि लाठीमार व बेधुंद गोळीबाराला सुरूवात होते. आपण आई, बाबांना न सांगता मोर्चात आलेलो होतो. दादाच्या हातातला तिरंगा आता दुस-याच कुणीतरी हाती घेतलेला. त्याला गोळी लागल्यावर तिस-याच कुणीतरी तो सांभाळलेला.
कुठूनतरी आपल्याही पायात बळ येतंय. अंगात शक्ती संचारतेय. आपणही मुसंडी मारत त्या गर्दीत शिरतोय. तिरंगा मोठ्या प्रयत्नाने आपण आपल्या हाती घेतोय. तोवर मोर्चा कचेरीच्या आणखी जवळ गेलेला. भराभर खिडक्यांवरून धडपडत, कौलांना ठेचकाळत आपण कचेरीच्या छतावर जातोय आणि क्षणार्धात तिथला युनियन जॅक उखडून तिरंगा तिथे बसवतोय. कर्तव्यपूर्तीच्या आनंदात असतानाच एक गोळी आपल्या डाव्या हातात बसतेय आणि आपली शुद्ध हरवतेय.
"ए चॅ गरम" खिडकीपाशीच कुणीतरी विक्रेता जोरात ओरडल्याने खिडकीवर डोके टेकवून झोपलेल्या वीणाताईंना एकदम जाग आली. गाडी कल्याण स्टेशनवर थांबलेली होती. कल्याणला तर तो डबा गर्दीने अगदी ठेचून भरला गेला. पण त्या गर्दीचा, माणसांचा वैताग येण्याऐवजी वीणाताईंना दया आली. खरं म्हणजे हा लग्नसराईचा, सुट्ट्यांचा मौसम नाही. तरीही एव्हढी गर्दी या डब्यात ? या स्टेशनात चढणारे लोक कसेबसे चढलेत बिचारे पण पुढल्या स्टेशनवरून बसणा-यांचे काय ? आणि आत्ता हे हाल तर ऐन गर्दीच्या दिवसात काय हाल होत असतील ? त्यांनी आपसूकच थोडे सरकून कडेवर मूल घेतलेल्या एका आदिवासी स्त्री ला स्वतःच्या शेजारी बसण्यास खुणावले. आत्तापर्यंत त्यांच्या शेजारी बसलेला दुस-या स्त्रीच्या चेहे-यावरचा त्रासिक भाव आणि तिने मुरडलेले नाक वीणाताईंच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नाही. ती आदिवासी स्त्री मात्र दोन बाकड्यांमधल्या मोकळ्या जागेत फ़तकल मारून खालीच बसली आणि स्वतःच्या पदराने मांडीवरच्या तान्हुल्याला आणि स्वतःलाही वारा घालू लागली.
गाडी कल्याणवरून हलली आणि एवढ्या गर्दीतही मंडळींना थोडं स्थैर्य आलं. वीणाताई मात्र अजूनही अस्वस्थ. स्वतःच्याच विचारात हरवलेल्या.
चांगली दोन वर्षे आपल्याला तुरूंगात काढावी लागली होती. ब्रिटीश सत्तेविरूद्ध राजद्रोहाचा आरोप आपल्यावर होता. मधे बाबा गेल्यानंतर आपली पॅरोलवर सुटका झाली होती. आपल्या तरूण मुलाच्या, दादाच्या, मृत्यूचा धसका घेत आपले बाबा हळूहळू खंगत गेले होते. त्यातच तुरूंगातल्या हालअपेष्टांची, निकृष्ट जेवणाची भर पडली होती. त्यांची प्रकृती हाताबाहेर गेली तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली. पण बाबांची जीवनयात्रा संपलीच. घरी आता फ़क्त आपण आणि आईच उरलेलो होतो.
तुरूंगातून सुटल्यानंतर मात्र आपण चळवळीत फ़ारसा भाग घेतला नाही. स्वातंत्र्याचा मार्ग दृष्टीपथात येतच होता. गोरं सरकार हळूहळू माघार घेत होतं. पण देश सोडून जाताना फ़ाळणीच विष देशाच्या मुखी देऊन, देशाच्या हृदयाय कायमची एक जखम करून गोरे निघून गेले होते. किती विषण्णता आली होती आपल्याला तेव्हा ?
गावात परतल्यानंतर हळूहळू सगळ्या गोष्टी आपल्याला स्पष्ट व्हायला लागल्या होत्या. आपल्या घरी येणारे झुंबरशेठ लखनमल तुरूंगात गेल्यानंतर पोलीसांची माफ़ी मागून मोकळे झाले होते. लवकर सुटल्यानंतर गावात परतून त्यांनी प्राप्त परिस्थितीचा पुरेपूर फ़ायदा घेतला होता. गावातले बहुतेक कर्ते पुरूष तुरूंगात असल्याचा फ़ायदा घेत झुंबरशेठानं सरकारी मदतीने गावातल्या गोरगरीबांच्या चांगल्या कसदार जमिनी घशात घालायला सुरूवात केली होती. आपल्या आईशीही गोड बोलून, फ़सवून सात एकरांची धानाची जमीन त्याने लाटली होती. अनेकांना धाकदपटशा दाखवत, क्वचित गोड बोलून कार्य साधत तो मोठा जमीनदार झाला होता आणि साधारण १९५० च्या सुमाराला सर्व जमिनी लठ्ठ किंमतीला विकून तो आणि त्याचे कुटुंब नागपूरला कायमचे स्थायिक व्हायला निघून गेले होते.
आपण मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आदिवासींमध्ये काम करायला सुरूवात केली होती. त्यांच्या दुःखाची जाणीव, त्यांचे अज्ञान, अंधश्रद्धा, त्यांच्याविषयी तथाकथित सुजाण समाजाची अनास्था या सर्व गोष्टी टोकदारपणे आपल्या मनाला भिडल्या होत्या. घरी आईने मात्र आपल्यामागे लग्नाची भुणभुण लावली होती. पंचक्रोशीतल्या एकदोन नातेवाईकांकडे तिने मुले सुचवण्यासंबंधी सांगूनही पाहिले होते. पण आपल्याला ती रूढ वाट चोखाळायचीच नव्हती. आत्ता ५० वर्षांनंतर स्त्रिया थोड्याफ़ार हक्काने, अधिकारवाणीने बोलू शकताहेत. पण त्याकाळी ती सोय होती ? माझी स्वप्नं, माझी ध्येयं काही निराळीच होती. आईनंही मग ५ , ६ वर्षे वाट पाहिली आणि मग कंटाळून तो नाद सोडला.
आदिवासींमध्ये काम करायला सुरूवात केल्यानंतर आपण इतके गुंतून गेलो की क्वचितच बाह्य जगाची आठवण यायची. स्वयंपूर्ण असलेल्या त्यांच्या जीवनात बाह्य मदतीचे संदर्भ क्वचितच यायचेत आणि आपला समाज या उपेक्षित असलेल्या घटकाची किती अधिक उपेक्षा करू शकतो याचा प्रत्यय यायचा. आज स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही भामरागडला जाण्यासाठी चंद्रपूरवरून बारमाही रस्ता नाही. काही वर्षांपूर्वी हा रस्ता व्हावा म्हणून आपण आमदार, खासदारांपासून तहसिलदारांपर्यंत सगळ्यांना भेटलो होतो आणि वाटाण्याच्या अक्षता लावून परतलो होतो. चंद्रपूरच्या परप्रांतीय आणि काळा इंग्रजच असलेल्या कलेक्टरनं तर अतिशय तुच्छतापूर्वक शब्दात आपला अपमान केला होता. वीणाताईंची गाडीतल्या प्रवासात विचारतंद्री लागलेली होती.
आदिवासींना माणूस म्हणून जगण्याचा हक्कच नाही ? त्यांच्या अंधश्रद्धा, वाईट चालीरीती यांच्याबाबत वातानुकूलीत खोलीत बसून, सर्वेक्षण, चर्चा, लेख लिहून काम भागणार आहे ? त्या अंधश्रद्धा निवारण्यासाठीची माणुसकी आपण कधी जागवणार ? दरवर्षी हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला आल्यानंतर एखाद्या शनिवार - रविवारी "श्रमपरिहारार्थ" ताडोब्याला येणा-या एखाद्या मंत्र्याच्या एका दिवसाच्या खर्चात एखाद्या ’अडलेल्या’ आदिवासी स्त्रीला तत्परतेने चंद्रपूर - नागपूरला मोठ्या दवाखान्यात हलवता येऊ शकेल अशी रूग्णवाहिका विकत घेता येईल पण लक्षात कोण घेतो ? पन्नास वर्षात लोकशाहीची, इथल्या ख-या राजाची, मतदार राजाची घसरलेली पत वीणाताईंनी हताशपणे बघितलेली होती.
पण त्यासोबतच शिक्षण प्रसाराचे विधायक कार्य त्यांनी सोडलेले नव्हते. भामरागडमध्ये ताई शिक्षक होत्या, सुईण होत्या, डॉक्टर होत्या, आई होत्या नेत्या होत्या. इंग्रज सरकारविरूद्ध लढताना त्यांनी त्यांनी दाखवलेली लढाऊ जिद्दच आता निश्चयी जिद्द बनून त्यांना मार्ग दाखवत होती. आपल्याच समाजाच्या एका घटकाविषयीचे संपूर्ण समाजाचे औदासिन्य त्यांना अस्वस्थ करून जायचं पण तेवढ्यापुरतच. पुन्हा नव्या जिद्दीने त्या आपल्या कार्याला जुंपून घ्यायच्यात.
या पन्नास वर्षात सरकारतर्फ़े आलेले अनेक मानसन्मान त्यांनी नाकारले होते. "स्वातंत्र्य संग्राम सैनिक" म्हणून मिळणा-या सर्व सवलती ताठ मानेने आणि कणखरपणे नाकारल्या होत्या. प्रत्येक नवी सवलत त्यांना जाहीर झाल्याचं पत्र आलं की त्या उलटटपाली पत्र पाठवायच्यात. मुख्यमंत्र्यांपासून मामलेदारांपर्यंतच्या त्या पत्रात आदिवासींच्या उपेक्षेची कथा आणि व्यथा असायची. सोबतच आदिवासींना माणूस म्हणून जगण्यासाठी मूलभूत सोयीसवलतींची मागणी त्या पत्रात केलेली असायची.
आणि त्या दिवशी दिनेश धोंडी गोंडाचे पत्र आले. दिनेश आपला विद्यार्थी. कॉलेजला शिकण्यासाठी म्हणून आपणच त्याला नागपूरला पाठवले. त्याच्या कुशाग्र बुद्धीमुळे पोरगा चक्क आय. ए. एस. झाला. पोरातली चमक पाहून मुख्यमंत्र्यांनी त्याला "Officer on Special Duty" म्हणून थेट त्यांच्या हाताखाली नेमून टाकला होता. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सर्व स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा मुंबईत जंगी सत्कार होता. दिनूनं लिहीलं होतं "ताई, तुम्ही मुंबईला नक्की या. सध्याचे मुख्यमंत्री फ़ार चांगले आहेत. तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटा. पण ताई एकदा तरी तुमचा गौरव होताना मला बघायचय. ताई आतातरी नाही म्हणू नका. तुम्हाला माझी आण आहे, बघा."
दिनूच्या अकृत्रिम पत्रातल्या आणेपेक्षाही आपल्या विभागतली काही कामे थेट मुख्यमंत्र्यांशी बोलून काही ठोस करता आले तर बघावे म्हणून ताई मुंबईला गेल्या होत्या. दिनेशला "येते" म्हणून कळवल्यावर त्याने चंद्रपूर ते मुंबई अशी ए सी ची दोन रिटर्न तिकीटे पाठवून दिली होती. त्या वातानुकुलीत शयनयानातून मुंबईपर्यंत जाताना ताईंचा जीव अगदी गुदमरून गेला होता. तोंडाची कुलुपं न उघडणारी ती परीटघडीची माणसं, त्यांचे ते एकमेकांकडे बघताना टाकलेले अकारण हिणकस दृष्टीक्षेप यामुळे मऊ सुखशय्येवरही वीणाताईंना झोप कशी ती आली नव्हती.
मुंबईत आल्याआल्या त्यांना न्यायला अगदी सरकारी मोटार सज्ज होती. आमदार निवासातल्या त्यांच्यासाठीच्या राखीव खोल्यांमध्ये थोडी विश्रांती होतेय न होतेय तोच राजभवनावरील सत्कार समारंभासाठी तयार राहण्याची वर्दी घेऊन दिनेश स्वतः ताईंना भेटायला आला होता. मुख्यमंत्र्यांची उद्याची वेळ आपल्याला चर्चेसाठी मिळाली असल्याचा संदेशही त्याने आणला होता. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी फ़क्त १० मिनीटांचा वेळ दिलेला बघून वीणाताई हिरमुसल्या ख-या, पण त्यांच्या वेळेची निकड समजून दहा मिनीटांमध्ये त्यांच्यासमोर मांडण्याच्या मुद्द्यांची त्या मनातल्या मनात उजळणी करू लागल्यात.
राजभवनावरील भव्य हिरवळीवर सुंदर असा सभामंडप टाकलेला होता. त्या मंडपात स्वातंत्र्य संग्राम सैनिकांसाठी बसण्याची वेगळी व्यवस्था होती. शासनाचे बडेबडे अधिकारी आणि मंत्रीगण या व्यवस्थेकडे जातीने लक्ष देऊन होते. इतक्यात वीणाताईंच सहजच समोरच्या रांगेत लक्ष गेलं. त्यांच्या कपाळावरची शीर तडतडली, डोळ्यात अंगार फ़ुलला, पन्नास वर्षांपूर्वी वळल्या होत्या तशाच मुठी पुन्हा वळल्यात. व्यासपीठावर मुख्यमंत्री, राज्यपाल आदि मान्यवरांची वाट बघत असलेल्या दिनेशला त्यांनी जवळ बोलावून घेतले.
"दिनेश, हे गृहस्थ कोण आहेत ?" आवाजात संयम आणण्याचा प्रयत्न करीत त्यांनी समोरच्या रांगेत बसलेल्या एका गृहस्थांकडे अंगुलीनिर्देश केला.
"ताई ते नागपूरचे झुंबरशेठ लखनमल." दिनेशने सहज उत्तर दिले.
"दिनेश, त्यांचा स्वातंत्र्यलढ्यातला इतिहास तुला ठाऊक आहे ?" ताईंचा आवाज त्यांच्याही नकळत करडा झाला होता. "ब्रिटीश सरकारला फ़ितूर होऊन आपल्याच देशबांधवांना नागवणा-या माणसाला आज हे मानाचं पान ?"
"ताई, प्लीज. अहो ते बडं प्रस्थ आहे. त्यांचा मुलगा आज आमदार आहे. प्लीज हळू." ताईंचा संताप आवरण्यासाठी दिनेश बिचारा पराकाष्ठा करीत होता.
"माझ्या लेखी तो फ़क्त एक गद्दार आहे आणि अशा गद्दारांचा सत्कार ज्या व्यासपीठावरून होतो तिथून मला सत्कार स्वीकारायचा नाही." कुणालाही कळण्याआधी ताई झपाझप चालू लागल्यात. सभामंडपातल्या इतर निमंत्रितांना, वृत्तपत्र प्रतिनिधींना मात्र रागावून परतत असलेली एक वृद्धा स्वातंत्र्यसैनिक आणि तिची असहाय्यपणे विनवणी करीत असलेले मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव हेच दृश्य दिसत होते.
वीणाताईंना पुन्हा जाग आली. गाडी धिम्या गतीने कसा-याचा घाट चढत होती. बाहेर सर्वत्र अंधाराचे साम्राज्य होते. नाही म्हणायला सिग्नलचे हिरवे तांबडे दिवे आणि घाटातून जाणा-या मोटारींचे दिवे त्या अंधाराला छेद देऊन जात होते. त्या विलक्षण विषण्ण झाल्यात. स्वातंत्र्याच्या पहाटे किती लोभसवाणी स्वप्नं आपल्या डोळ्यात होती ! आज त्या बहुतेकांचा चक्काचूर झाल्याचे बघणे आपल्या नशिबात आलेय. सिंधूपासून कावेरीपर्यंतच्या भागात्ले स्वातंत्र्यसैनिक लढले ते काय केवळ राजकीय स्वार्थापोटी ? नद्यांचे पाणीवाटप झगडे आणण्यासाठी ? चंद्रपूरच्या तुरूंगात शेजारच्या कोठडीत माझ्यासारखीच राजकीय बंदी असलेली शकीला बानू. पठ्ठीला संपूर्ण वंदेमातरम पाठ होतं आणि रोज उठल्याबरोबर आणि झोपण्यापूर्वी ती ते उच्चरवात म्हणायची सुद्धा. त्यात कधी तिचा ’मजहब’ आडवा आला नव्हता. त्यावेळी एकच मजहब होता "आझादी" आज संपूर्ण वंदेमातरमची नेमकी कडवी किती ? हे सुद्धा तरूणांना माहिती नाही मग केवळ राजकीय स्वार्थापोटी "आम्ही वंदेमातरम म्हणणार नाही. ते आमच्या धर्माविरूद्ध आहे." असे म्हणणा-या निर्लज्ज पुढा-यांना कोण आवरणार ? हे सगळं ऐकण्यासाठी का शकीला ’वंदेमातरम’ म्हणून तुरूंगात आली होती ? हे दिवस दिसण्यासाठीच का आपल्या दादाने आणि त्याच्यासारख्या असंख्यांनी आपल्या छाताडावर गोळ्या झेलल्या होत्या ? स्वातंत्र्याचा उषःकाल होण्यापूर्वीच क्षुद्र स्वार्थाचा अंधार भारत वर्षाला व्यापून पुन्हा दशांगुळे उरला होता.
वीणाताईंच्या पायापाशी बसलेल्या त्या स्त्रीच्या तान्हुल्याने रडायला सुरूवात केली होती. त्याची आई त्याचे रडे थांबवण्याचे सगळे उपाय करून थकली होती. त्याला कदाचित तहान लागली असावी. वीणाताईंनी खांद्यावरच्या शबनम बॅगमधून वॉटरबॅग काढून त्याच्या आईला दिली. तिनं त्या तान्हुल्याला त्यातलं थोडं थोडं पाणी पाजायला सुरूवात केली. त्याचं रडं थांबलं. त्या बाईच्या चेह-याकडे बघताना तिलाही भूक लागली असावी असं वीणाताईंना जाणवलं. त्यांनी घरून आणलेला चिवडा पिशवीतून काढला, तिच्यासमोर धरला. आढेवेढे घेत अखेर ती तो चिवडा खाऊ लागली. वीणाताईही तिला सामील झाल्यात. एव्हाना तो तान्हुला आपल्या आईच्या मांडीत शांत झोपी गेला होता.
त्या काळ्याबेंद्र्या चेह-यात वीणाताईंना आशेचा किरण दिसू लागला. त्या मुंबईला यायला निघाल्यावर त्यांच्या निरोप घेताना तोंडे सुकून गेलेले मारत्या, लख्या, वेंक्या, भुंज्या ही पोरे त्यांच्या डोळ्यासमोर दोसू लागलीत. "अरे, फ़क्त दोन तीन दिवसात मी परत येतेय, कायमची तिथे जात नाही." हे त्यांना समजावून सांगता सांगता त्यांची झालेली पुरेवाट त्यांना आठवली. किती आशेने ती मुले आपल्याकडे बघत होती, नाही ? त्यांच्यासाठी आता आपण आपलं आयुष्य पुन्हा नव्या जोमानं जगायचं, नव्याने उभारायचं. स्वातंत्र्याच्या उषेला आजजरी हे स्वार्थाचं ग्रहण लागलेलं आहे तरी उद्याची आशा मात्र जिवंत ठेवायलाच हवी आहे हे त्यांचा मनानं पक्कं घेतलं.
बाबांना नमस्कार करताना ते नेहमी "शतायुषी भव" असा आशिर्वाद द्यायचेत. वीणाताई तेव्हा गमतीने म्हणायच्यात सुद्धा "एवढं आयुष्य काय करायचय बाबा ? पन्नास वर्षे पुरेत." आता मात्र त्यांना वाटलं की बाबांचा हा आशिर्वाद खरा ठरायला हवा. आपण पंचाहत्तरी तर गाठलीच आहे. आयुष्याची मशाल जाळण्यासाठी अजून पंचवीस वर्षे मिळतील. त्या कालावधीत पुन्हा नव्या जोमानं काम करू आणि संपताना आणखी एकाला त्याचं आयुष्य मशालीसारखं करण्याची स्फ़ूर्ती देऊन जाऊ. वीणाताईंचा थकवा आता पार पळाला होता. बाहेरच्या भयाण अंधारातून त्या भविष्यातल्या कार्यांचे वेध घेत दूर अनंतात बघत होत्या. विदर्भ एक्सप्रेस मात्र भरधाव नागपूरकडे धावत होती.
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर.
(ही कथा दै. तरूण भारत नागपूरच्या आसमंत पुरवणीत रविवार दिनांक ३० ऑगस्ट १९९८ रोजी प्रकाशित झालेली आहे.)
या कथेसाठीचे हे चित्र तरूण भारत नागपूरमधील तत्कालीन कलाकार श्री हेमंतजी मानमोडे यांनी तयार करून दिले त्याबद्दल त्यांचे आभार.
No comments:
Post a Comment