Tuesday, March 7, 2023

एक थरारक आणि स्मरणीय प्रवास.

 गेली काही वर्षे मी बघतोय की धुळवडीच्या दिवशी नागपूर आणि विदर्भात रंग खेळण्याचा "माहौल" दुपारनंतर एकदमच कमी होऊन जातो. अनेक व्यापारी प्रतिष्ठाने वगैरे दुपारनंतर उघडतात. लोकांचे नित्यव्यवहार सुरू होतात. पूर्वी तसे नसे. धुळवडीचा दिवस म्हटला की घरातल्या लेकी सुनांना अघोषित संचारबंदी असल्यासारखी त्या घराबाहेर निघू शकत नसत. घरातल्या घरात, वाड्यातल्या वाड्यात किंवा परिसरातल्या परिसरात त्या सर्व जणी रंग खेळत असत पण यादिवशी घराबाहेर सहसा पडत नसत. अशाच एका धुळवडीच्या दिवशी केलेल्या (कराव्या लागलेल्या) प्रवासाची ही थरारक आठवण.


सौभाग्यवती वैभवीच्या एल एल बी च्या अंतिम वर्षाच्या परिक्षेची तोंडी परीक्षा चंद्रपूरला 11 मार्च 2001 पासून सुरू होणार असल्याची "सुवार्ता" आम्हाला 8 मार्च 2001ला सकाळी मुंबईत कळली. 9 मार्च 2001ला होळी आणि 10 मार्च 2001 ला धुळवड. मुंबईवरून नागपूरला आणि चंद्रपूरला पोहोचायचे कसे ? हा मोठाच यक्षप्रश्न होता. इतक्या ऐनवेळेवर रेल्वेची आरक्षणे मिळणे कठीण होते. शिवाय 8 मार्च रोजी मला माझ्या मुंबईतील महाविद्यालयात उपस्थित राहणे अत्यावश्यक होते. मग रेल्वे स्टेशनवर जाऊन आरक्षण आणायचे कसे ? हा प्रश्नच होता. तेव्हा ऑनलाईन आरक्षण प्रणाली सर्वत्र रूढ नव्ह्ती. महाविद्यालय आटोपून संध्याकाळी नागपूरसाठी बसने निघायचे आणि दुस-या दिवशी (होळीच्या दिवशी संध्याकाळी) चंद्रपूरला पोहोचायचेच असा आमचा निर्धार झाला. माझी धाकटी मेव्हणी तेव्हा अकोला येथे वैद्यकीय शिक्षण घेत होती. वाटेत अकोला ते चंद्रपूर या प्रवासात ती सुद्धा आमच्या सोबत चंद्रपूरपर्यंत येणार होती. म्हणजे ठाणे ते अकोला आणि अकोला ते चंद्रपूर अशा दोन टप्प्यात हा प्रवास करण्याचे ठरले. त्यावेळी आई आणि माझा नागपूरचा धाकटा भाऊ मुंबईतच मुक्कामाला होते. नागपूरच्या आमच्या घरी कुणीच नव्हते. तसेही आमच्या प्रवासाच्या कार्यक्रमात आम्ही नागपूरचा टप्पा घेणारही नव्हतो, म्हणा.



8 मार्च रात्री ठाण्यावरून यवतमाळला जाणा-या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या आरामबसचे आम्हा दोघांचे आरक्षण आम्ही केले. या आरामबसने अकोल्यापर्यंत जाऊन पुढे माझ्या मेव्हणीला घेऊन 9 मार्चला संध्याकाळपर्यंत चंद्रपुरात असायचे हा आमचा बेत होता.

आरामबसमध्ये तेव्हा 2 बाय 2 पुशबॅक आणि फ़ारफ़ारतर पाय लांब पसरून बसण्यासाठी पायांना खालून आधार देणा-या सेमी स्लीपर बसेस एव्हढीच प्रगती होती. स्लीपर कोच बसेस फ़ारशा रूढ झालेल्या नव्हत्या. आमची चिंतामणी ट्रॅव्हलची बसही अशीच साधी 2 बाय 2 आसनी बस होती.


ठाण्यातल्या तीन हात नाक्यावरून आम्ही साधारण तासभर उशीरा प्रवास सुरू केला. तेव्हा ठाण्यावरून कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक वगैरेकडे जाणा-या बहुतांश बसेसना ठाण्याला पोहोचे पोहोचेपर्यंत कायम एक तास उशीर ठरलेला असायचा. मग त्या बसेस लाल बहादूर शास्त्री रोडने येवोत किंवा ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून येवोत. आमच्या सौभाग्यवतींसोबतचा कुठलाच प्रवास मला कधीच बोअर झाला नाही. दोघांच्याच गप्पा मस्त रंगायच्यात. किती किलोमीटर प्रवास झाला हे अजिबात कळत नसे. तसाच हा ही प्रवास. नाशिक मार्गे आपण पुढे निघालोय एव्हढे मला कळले आणि थोड्याच वेळात आम्ही एकमेकांच्या खांद्यांवर, डोईवर डोई ठेऊन निद्रादेवीच्या अधीन झालेलो होतो.

रात्री उशीरा गाडी एकाच ठिकाणी खूप वेळ थांबलीय हे लक्षात आले आणि आमची झोप उघडली. बघतोय तो बस येवल्याच्या बाजारात थांबलेली होती. येवल्याला नगर - मनमाड राज्य मार्गाला नाशिक येवला मार्ग येऊन मिळण्याचा जो तिठा आहे अगदी तिथे. ड्रायव्हर कंडक्टर मंडळींकडे चौकशी केली तर एकदम धक्कादायक बातमी कळली. आमच्या गाडीत मोठा बिघाड झालेला होता. दुस-या दिवशी सकाळी 9 च्या सुमारास औरंगाबादवरून बदली गाडी येऊन आमचा पुढचा प्रवास होणार होता. बापरे ! त्यावेळी रात्री फ़क्त दीड वाजला होता. अजून किमान 8 तास असेच एकाजागी बसून रहावे लागणार होते. आम्हाला तर लवकर पुढे जाण्याची त्वरा होती. काय बरे करावे ? त्यातल्या त्यात समाधानाची बाब इतकीच होती की आमची बस भरवस्तीत बंद पडलेली होती. आडबाजूला, एखाद्या निर्जन माळरानावर, जंगलात वगैरे बंद पडली असती तर मात्र कठीण मामला होता.आम्ही विचार करत बसलो. 

विचारात असतानाच मुंबईवरून औरंगाबादकडे जाणा-या विविध ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसेस आमच्या बसच्या बाजूने येवल्याला आम्हाला ओव्हरटेक करून जाताना दिसल्या. रात्री 2 वाजता मी एक धाडसी निर्णय घेतला आणि सौभाग्यवतींसकट चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या आमच्या बसमधून मी उतरलो आणि मागून येणा-या मुंबई - औरंगाबाद आराम बसला हात केला. ती बस थांबली. ती नेमकी स्लीपर कोच बस होती आणि आमच्या सुदैवाने तिच्यात शेवटले का होईना दोन बर्थस रिकामे होते. मग येवला ते औरंगाबाद हा तीन साडेतीन तासांचा प्रवास बर्थवर पडून झोपेत गेला. शेवटले बर्थस आणि मराठवाड्यातले "दिव्य" रस्ते त्यामुळे गाढ झोप अशी लागली नाही तरी पाय लांब करून थोडावेळ पडता आले त्यामुळे आंबलेले अंग मोकळे झाले, एव्हढेच.




औरंगाबादला सकाळी 6.30 ला पोचलो खरे पण औरंगाबादला माझ्या काकांकडे किंवा मावशीकडे शहरात गेलो असतो तर नक्कीच तीन, चार तास मोडले असते. जवळच्या नातेवाईकांचा मुक्कामाचा, खाण्यापिण्याचा प्रेमळ आग्रह मोडणे मला कायमच अशक्य जड गेलेले आहे. मग अशावेळी हा आग्रह न मोडवणे आमच्या एकूण वेळेच्या नियोजनावर पाणी फ़िरवण्यासारखे होते. त्यामुळे औरंगाबादला बसस्टॅण्डवर दात वगैरे घासून आणि तिथेच हातपाय वगैरे धूवून आम्ही दोघेही सकाळी 8 वाजता निघणा-या औरंगाबाद - यवतमाळ एस. टी. त बसलेलो होतो. काल दिवसभराचे कॉलेज, रात्रभर असा अडचणीचा प्रवास त्यामुळे एस. टी. तही आम्ही गाढ झोपी गेलो. बरे तेव्हा मोबाईल फ़ोन्स आम्हा कुणाकडेच नव्हते. त्यामुळे आमच्या प्रवासाबद्दल माझ्या मेव्हणीला काही कळवणे शक्यच नव्हते. तरीही चिखलीला चहापानासाठी तिथल्या ढाब्यावर बस थांबली असताना आम्ही तिथल्या सार्वजनिक फ़ोन बूथवरून मेव्हणीच्या घरमालकांकडे फ़ोन करून आमची येण्याची शक्य वेळ कळवून दिलेली होती आणि आमच्या जेवणासाठी दुपारी जादाचे डबे आणून ठेव असा तिला निरोप दिलेला होता.




अकोल्याला पोहोचेपर्यंत दुपारचे 2.30 झालेत. औरंगाबाद ते अकोला या 240 किमी प्रवासासाठी तेव्हा 6 तास सहज लागायचेत. म्हणूनच समृद्धी महामार्गाने अक्षरश: 6 तासात नागपूर ते औरंगाबाद अंतर कापता येतेय म्हटल्यावर मी गहिवरून गेलेलो होतो. लगोलग रिक्शा करून मेव्हणीच्या मुक्कामावर गेलो. छान आंघोळी वगैरे केल्यात, तिच्या मेसचे जेवण केले आणि तिला घेऊन पुढल्या प्रवासाला निघालोत. दुपारी 4 वाजताची नंदन ट्रॅव्हल्सची अकोला - जबलपूर बस आम्हाला प्रवासासाठी मिळाली. ट्रॅव्हल्सच्या बसने प्रवास करण्याचा फ़ायदा असा होता की एस. टी. च्या अकोला - नागपूर प्रवासाला आम्हाला 6 तास लागले असते आणि रात्री 10 वाजता आम्ही नागपूरला पोहोचलो असतो. रात्री 10 वाजता नागपूरवरून चंद्रपूरसाठी शेवटची बस सुटत होती. ती बस आम्हाला कशीही करून पकडायची होती. एकदा त्या बसने रात्री 1, 1.30 च्या सुमारास चंद्रपूरला पोहोचलो आणि घरी गेलो की पुढच्या (धुळवडीच्या) दिवशीचे प्रवासाचे आम्हाला टेंशन नव्हते. रात्री 1 वाजता चंद्रपूर म्हणजे अगदी स्वगृहच होते. चिंता नव्हती.

नंदनची बस अकोल्यावरून निघाली आणि अमरावती शहरही झपाझप मागे टाकून कोंढाळीला साधारण 7.30 च्या सुमारास आलेली होती. आता फ़क्त तासाभरात नागपूर. म्हणजे कदाचित नागपूर बसस्टॅण्डवरून आम्हाला रात्री 9.00 ची बससुद्धा मिळू शकत होती. आम्ही आनंदलो पण हाय रे दैवा...




कोंढाळीजवळ "काठीयावाड ढाब्या" वर बस जेवणासाठी थांबली ती चक्क 1 तासभर. वेग हा खाजगी बसचा प्लस पॉइंट असला तरी असे अवांछित थांबे कधीकधी त्रासदायकच ठरतात याचा अनुभव आम्ही तेव्हा घेतला. रात्री 8.30 ला त्या ढाब्यावरून निघून नागपूर गाठेपर्यंत आम्हाला रात्रीचे 10.00 वाजलेत. बसस्टॅण्डवर जाऊन बघितले पण रात्री 10.00 ची नागपूर - चंद्रपूर ही बस नुकतीच निघून गेल्याचे कळले. त्याच रिक्षाने रेशीमबागेतल्या आमच्या घरी पोहोचलो आणि अंग टाकले.

10/03/2001. धुळवडीचा दिवस. सकाळी लवकरच उठलो आणि आवरले. धुळवडीचा माहौल सुरू होण्याआधी स्टॅण्डवर जाऊन चंद्रपूरकडे एखादी तरी चुकार बस जायला निघतेय का ? याचा शोध आम्ही घेण्याचे ठरवले. एस. टी. च्या बसेस तर आज दिवसभर बंद असतात हा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव होता. हातात सामानसुमान घेऊन रेशीमबागेतल्या घरून आम्ही पायी पायीच बसस्टॅण्डकडे कूच केले. मध्ये रेशीमबाग चौकात एक चुकार रिक्षावाला मिळाला. त्याने आम्हाला नागपूरवरून चंद्रपूरकडे जाणा-या खाजगी बसेस सुटण्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचवले. 

तिथे एक बस उभी होती खरी. पण ती चंद्रपूरकडे जाणार की नाही ? गेलीच तर किती वाजता निघणार ? याची खात्री तिच्या ड्रायव्हर - कंडक्टरसकट कुणीही देऊ शकत नव्हते. आम्ही गाडीत बसून इतर तिला प्रवासी मिळण्याची वाट ( तिच्या ड्रायव्हर - कंडक्टर इतकीच) बघू लागलो. कारण पूर्ण प्रवासी मिळाल्याशिवाय ती बस नागपूरवरून निघणार नव्हती आणि धुळवडीच्या दिवशी प्रवासाचा बेत असलेले आमच्यासारखे चुकार प्रवासी आज तुरळक असणार हे उघड होते. दरम्यान 6.30 ते 8.00 या वेळेत मधेमधे ती बस सुरू व्हायची. बैद्यनाथ चौक, डालडा फ़ॅक्टरी आणि पुन्हा श्री कॉम्प्लेक्स असा प्रवाशांचा शोध घेत पुन्हा मूळस्थानी यायची. समाधानाची बाब इतकीच होती की दरवेळी तिच्या फ़ेरीत 4 - 5 प्रवासी वाढत होते आणि ही बस नक्की चंद्रपूरला जाईल ही आमची आशा पल्लवीत होत होती.




शेवटी सकाळी 8.00 वाजता त्या बसने नागपूर सोडले आणि आमच्या त्रिदिवसीय प्रवासाचा शेवटचा टप्पा सुरू झाला. चंद्रपूरला आम्हाला स्टॅण्डवरून घरापर्यंत कारने न्यायला येण्याचे सौ वैभवीच्या एका चुलत भावाने कबूल केले होते त्यामुळे तो प्रश्न नव्हता फ़क्त त्याला बिचा-याला आमची वाट बघत सकाळी 9 पासून स्टॅण्डवर ताटकळत बसावे लागले होते. त्याकाळी मोबाईल फ़ोन्स सर्वत्र इतके प्रचलित नसल्याने संदेशवहनाची परिणामकारकता तेव्हढी नव्हती. अर्थात त्याचे तेव्हा कुणाला फ़ारसे वाईट वाटत नव्हते म्हणा.

सकाळी 11.15 च्या सुमारास आमचा हा थरारक, नाट्यपूर्ण घटनांनी भरलेला प्रवास संपला. कायम लक्षात राहणारा एक अनुभव.

- नेहमीच आखीव रेखीव प्रवास करणारा पण अशा आडमार्गी प्रवासांच्या आठवणीही आवडणारा प्रवासी पक्षी वैभवीराम किन्हीकर. 

No comments:

Post a Comment