Thursday, March 23, 2023

करूणाष्टक - २

 


भजनरहित रामा सर्वही जन्म गेला ।


स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ॥


रघुपति मति माझी आपुलीशी करावी ।


सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी ॥ २ ॥


हे रामराया, तुझ्या भजनाशिवाय हा सगळा माझा जन्म चालला आहे. तुझे भजन, गुणगान करण्यापेक्षाही माझे कुटुंबिय नातेवाईक, माझी धनसंपदा याचाच स्वार्थी विचार मी आजवर केला. हे रघुपती, माझे मन तू आपलेसे कर (आपल्याकडे ओढून घे) ज्यायोगे मी या सकळ स्वार्थी गोष्टींचा त्याग करून फ़क्त तुझ्याच प्राप्तीचा विचार करेन.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर


(या श्लोकाचा व्हिडीयो इथे)


Wednesday, March 22, 2023

करूणाष्टक - १

 



अनुदिनिं अनुतापें तापलो रामराया ।

परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ॥

अचपळ मन माझें नावरे आवरीता ।

तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥ १ ॥


हे रामराया, रोजरोजच्या त्याच त्याच तापांनी मी त्रासून गेलेलो आहे. हे दीनदयाळा, तुला या साधकाची करूणा येऊ दे आणि ते ताप देणारी मोह माया तू निरसन कर. हे रामा, माझे अत्यंत चंचल मन मला आवरता आवरत नाही तेव्हा तू लवकर धाव घे. (कारण ही मोह माया तुझ्याच अधीन असल्याने तू येताक्षणी तिचे निरसन होईल. इथे समर्थ वर्णन करीत असलेले ताप हे साधकाला आलेले मोह मायारूप त्रास आहेत. साधनेपासून विचलित करू इच्छिणारे अनंत आध्यात्मिक ताप. याठिकाणी श्रीसमर्थ सर्वसामान्यांना होत असलेल्या आधिभौतिक तापांबद्द्ल बोलत नाही आहेत.) 


 - प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(या श्लोकाचा व्हिडीयो इथे)

समय होत बलवान....

माझी मुलगी आणि मी. अगदी तिच्या बालपणापासूनच आम्ही दोघे बापलेक कमी आणि थोरली बहीण - धाकटा भाऊ या नात्यानेच जास्त राहतो. अगदी अजूनही मस्त बरोबरीने भांडतोही.

आमच्याच या नात्याचा प्रवास "समय होत बलवान" या व्हिडीओद्वारे आपल्यासमोर सादर करतोय.
- अजूनही शैशवात असलेला सर्व बाळगोपाळांचा वृध्द बालमित्र, वैभवीराम किन्हीकर.



Saturday, March 11, 2023

मर्मबंधातली ठेव ही...

 माझ्या आयुष्यात ७ फेब्रुवारी, १२ मार्च आणि २ डिसेंबर हे दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. ७ फेब्रुवारीला माझी आणि माझ्या प्रिय पत्नीची लग्ननिश्चिती झाली, १२ मार्चला आमचा वाङनिश्चय झाला आणि २ डिसेंबरला आमचे लग्न झाले. हे तीन दिवस माझ्या मनावर जन्मोजन्मींसाठी कोरल्या गेलले आहेत. जणू हे दिवस म्हणजे मर्मबंधातल्या ठेवीच होऊन राहिलेले आहेत.

७ फेब्रुवारीला लग्ननिश्चिती झाल्यानंतर (त्यासंबंधी सविस्तर कथा इथे आणि इथे) आमच्यात मोजून दोन तीनदा फोनवर बोलणे झाले. त्यावर्षी १४ फेब्रुवारीला तिने मला ग्रीटिंग पाठवले पण सविस्तर पत्र वगैरे लिहीण्याइतका मोकळेपणा नात्यात अजूनही आलेला नव्हता. ते ही साहजिकच होते म्हणा. वैभवी तर स्वभावतःच अत्यंत लाजरीबुजरी आणि मी वरवर कितीही धिटाई दाखवत असलो तरी अशा गोष्टीत पुढाकार घेण्यासाठी कायम शेवटल्या रांगेत पळणारा.

लग्ननिश्चिती झाली. तत्कालीन प्रथेप्रमाणे लग्नसमारंभाविषयी उभय घरांमध्ये देण्याघेण्याच्या बाबी ठरल्यात. अर्थात या बाबींमध्ये माझा सहभाग नव्हताच. मी लग्ननिश्चिती करून मुंबईला नोकरीवर रूजू झालो होतो. पण याबाबतीत माझ्या आकांक्षा मी त्या बोलणीत सहभागी होणार्‍या माझ्या आईला आणि माझ्या मामांना फोनवरून स्पष्टपणे कळवलेल्या होत्या. त्यानुसारच अजिबात काही तणातणी किंवा ताणाताणी न होता लग्नाची बोलणी वगैरे छान पार पडलीत आणि वाङनिश्चय रविवार, १२ मार्च २००० रोजी करण्याचे ठरले.

आमचा वाङनिश्चय समारंभ चंद्रपूरला देशपांडेंच्या रहात्या घरी,  वाड्यात तर लग्न नागपूरला करण्याचे ठरले होते. किन्हीकरांकडे मी म्हणजे थोरल्या पातीची थोरली पाती. तर देशपांडेंकडेही वैभवी म्हणजे तिच्या बहिणींमधली सगळ्यात मोठी. त्यामुळे दोन्ही घरात फार उत्साह होता. मी १० मार्च रोजीच नागपूर मुक्कामी दाखल झालो. समारंभासाठी चंद्रपूरला जाण्यासाठी निमंत्रितांची यादी करायला लागलो आणि लक्षात आले की माझ्यावर प्रेम करणारी नातेवाईक, सुहृद, मित्रमंडळी इतकी होती की सगळ्यांना चंद्रपूरला समारंभासाठी घेऊन जाण्यासाठी चार ते पाच बसेस कराव्या लागल्या  असत्या. आमच्यासाठी अव्यवहार्य तर होतेच शिवाय वैभवीच्या घरच्यांच्या व्यवस्थापनाची परीक्षा बघण्यासारखे आणि त्यांच्याकडल्या व्यवस्थेवर अकारण असह्य ताण टाकणारे होते. म्हणून मग प्रत्येक कुटुंबातून एक प्रतिनिधी असे आम्ही निश्चित केले आणि तशी निमंत्रणे केलीत.

त्याकाळी नागपूर ते चंद्रपूर प्रवासासाठी "गणराज ट्रॅव्हल्स" ही सर्वोत्कृष्ट सेवा उपलब्ध होती. (त्याविषयीचा एक लेख इथे) त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन १२ तारखेची सकाळची ८ ची नागपूर - चंद्रपूर फेरी आम्ही पूर्णपणे आरक्षित केली. परतीसाठी त्यांचीच संध्याकाळी ६ ची फेरी आरक्षित केली. अशावेळी गणराज वाले त्यांची बस त्या 'पार्टी' च्या घरापर्यंत पाठवीत असत आणि गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवूनही देत असत. फार सोयीची अशी ही सेवा होती.

१२ मार्च उजाडला. मी मनात खूप हरखून गेलेलो होतो. बाहेरगावाहून घरी पाहुणे राहुणे मंडळी आलेलीच होती. सगळ्यांनी भराभर आवरले. ठरल्याप्रमाणे पावणेआठच्या सुमारास गणराज घरासमोर उभी झाली. माझे सदगुरू परम पूजनीय बापुराव महाराज आणि परम पूजनीय मायबाई महाराज यांचे चिरंजीव आणि मला गुरूतुल्य असलेले श्री. बाबाकाका यांच्या हस्ते नारळ वाढवून आम्ही सगळे बसमध्ये बसलोत. बस अगदी वेळेवर निघाली. गंमतीची बाब म्हणजे यावेळीही मी माझ्या आवडत्या आसनावर, ड्रायव्हर केबिनमध्येच बसलेलो होतो. माझ्यासोबत माझा बंधूवर्ग आणि मित्रवर्गपण केबिनमध्येच बसलेला होता. मौजमजेचा, उत्सुकतेचा प्रवास सुरू झाला.




प्रवासात गाणी, अंताक्षरी सगळेच सुरू होते. वाटेत जांब स्थानकावर चहापानासाठी अल्प विश्रांती घेऊन आमचा प्रवास सुरूच होता. ठरल्या वेळेनुसार साधारण सव्वातीन तासांनी, सकाळी ११.१५ ला आम्ही चंद्रपूरला पोहोचलो. पूर्ण बस आम्हीच आरक्षित केलेली असल्याने बस थेट बालाजी वाॅर्डात देशपांडेंच्या घराजवळ पोहोचली.



बसमधून उतरून आम्ही सगळे माझ्या आजोळी जाणार होतो. तिथे थोडावेळ थांबून चहापाणी वगैरे झाले की आम्ही देशपांडेंकडे कार्यक्रमस्थळी दाखल होणार होतो. चंद्रपूरातले माझे आजोळ आणि देशपांडेंचा वाडा अगदी जवळजवळ. मध्ये फक्त १ गल्ली आणि एक घर. बालपणी उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या सुट्टयांमध्ये माझा मुक्काम महिनोनमहिने माझ्या आजोळीच असायचा. समवयस्क मामेभावंडे, खूप प्रेम करणारी आजोळची प्रेमळ मंडळी. त्यामुळे मी आजोळी खूप रमत असे. पण इतकी  वर्षे आम्ही दोघे इतक्या जवळ वावरत असूनही आमचा एकमेकांशी कसलाही संपर्क मात्र कधीच आला नाही ही एक अत्यंत आश्चर्याची गोष्ट होती. एकेमकांचा उल्लेखही कधी एकमेकांसमोर झाल्याचे आम्हा दोघांनाही कधीच स्मरत नव्हते. माझ्या काही नातेवाईकांना मात्र माझे आजवरचे वारंवार चंद्रपूरला जाणे आणि वैभवीचे घर माझ्या आजोळच्या इतक्या जवळ असणे यावरून आमचा हा प्रेमविवाह असावा अशी दाट शंका आली होती. ती त्यांनी तशी बोलूनही दाखवली होती पण आतली प्रामाणिक गोष्ट आम्हा दोघांना आणि दोघांच्याही घरच्यांना माहिती होती. 


बसमधून उतरताना कुठेतरी वैभवी आपल्याला घ्यायला आली असेल अशी मनात वेडी आशा होती. ते तसे शक्य नाही, ती  नवरी मुलगी आहे, आज ती तिच्याच तयारीत, घाईत असेल हे डोक्याने स्वीकारले होते पण वेडे मन मात्र तिचीच वाट बघता होते. बसमधून उतरताना V for Victory (or V for Vaibhavi) अशी खूण करत आम्ही सगळे उतरलो. आजोळच्या गल्लीत शिरताना एक नजर देशपांडेंच्या गल्लीकडे गेलीच. ना जाणो चुकूनमाकून वैभवी तिथे आली असली तर ? पण तसे काही झाले नाही. आम्ही सगळे निमूटपणे आजोळच्या वाड्यात दाखल झालोत.


आजोळच्या जवळपास ३०० वर्षे जुन्या वाड्यात माझी वृद्ध आजी, लाडके मामा - मामी, बरोबरीची मामे भावंडे सगळे नागपूरकडच्या वऱ्हाडाची वाट बघत होते. चहापाणी वगैरे झाले आणि देशपांडेंकडे जेवण तयार असल्याची वर्दी घेऊन त्यांच्याकडली मंडळी आलीत. आम्हा सगळ्यांची तयार होण्याची एकच घाई सुरू झाली. जुना वाडा, त्यातले एकुलते एक बाथरूम (न्हाणीघर किंवा अंगधुणे हा त्यासाठी वापरला जात असलेला शब्द.). पन्नासाच्या गणसंख्येच्या आसपास असलेल्या वऱ्हाडी मंडळींसाठी कसे पुरे पडणार ? शेवटी खुद्द नवऱ्या मुलाने एका भांड्यात पाणी घेऊन परसदाराच्या अंगणात आपला मुखचंद्रमा धुतला. आणि प्रवासातले कपडे बदलून त्यातल्यात्यात बरे कपडे लेऊन आम्ही तयार झालो. मेकअप वगैरेंचा प्रश्नच नव्हता. चेहेऱ्याला विको टर्मरिक चोपडले आणि वरून एक पावडरचा (बहुतेक Ponds Dreamflower Talk च) थर फासला की झाले काम.

आजकालची पिढी (अगदी नवरे मुलगे सुद्धा) वाङनिश्चय, लग्न आदी समारंभात किती  नट्टापट्टा करतात हे पाहिले की अतिशय विस्मय वाटतो, हेवाही वाटतो. पण तेव्हा आम्ही उपलब्ध असलेल्या साधनांचाच वापर करून देशपांडेंकडे मांडवात दाखल झालोत.


आता मला इथे आधीच नमूद करायला हवे की बालपणापासून अंघोळ झाली की डोईवर खोबरेल तेल थापल्याशिवाय आम्ही कधीही कुठेही गेलो नाही. केशभूषा करण्याइतके केस कधीच डोईवर नव्हते आणि तेव्हा असे तेल ना लावता भुरकट केसांनी वावरणे आमच्या घरच्या व्यवहारात तरी नामंजूर होते. तसे तेल आजही माझ्या डोक्यावर होतेच. त्या तेलाचा संदर्भ आमच्या लग्नानंतर काही महिन्यांनी आमच्या बोलण्यात आला . आपल्या साक्षगंधाच्या दिवशी तू किती रे तेल चोपडले होते ? या वैभवीच्या चिडवण्याने. "अगं, ती आमची बालपणापासूनची सवय." वगैरे माझ्या सबबी तिने ऐकून घेतल्याचं नाहीत. 

मांडवात प्रवेश करताक्षणी आमच्या वऱ्हाडातल्या प्रत्येकाला वैभवीच्या दर्शनाची आस लागलेली होती. मला तर फारच. पण इतर बऱ्याच जणांनी आतापर्यंत तिचा फक्त फोटोच बघितलेला होता त्यामुळे ती प्रत्यक्ष कशी दिसते ? याचे औत्सुक्य प्रत्येकाच्या मनात होते आणि त्यांच्या चेहेऱ्यावरून ते ओसंडून वाहात होते. आणि सगळ्यांच्या उत्सुक्याची अशी सीमा गाठल्या गेल्यावर माझ्या प्रियतमेचे आगमन झाले. त्यांच्याच वाड्यात कार्यक्रम त्यामुळे तिच्या घरातून निघून ती  मांडवात  दाखल झाली तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या होत्या. रामसारख्या व्यक्तिमत्वाला असेच  सात्विक, सोज्वळ सौंदर्य हवे होते यावर आमच्याकडल्या सगळ्यांचे एकमत झाले. 

दुपारच्या जेवणाला सुरुवात झाली. मध्ये माझी आई आणि आजूबाजूला आम्ही दोघे असे जेवायला बसलोत. मला आता कुठली भूक आणि कुठली तहान ? तिच्या माझ्या जीवनातल्या आगमनाने सगळी भूक तहान मी विसरलेलो होतो. जनरीत म्हणून कसेबसे दोन घास पोटात ढकललेत. वारंवार तिच्याकडेच बघण्याचा अनावर मोह होत होता पण ते चांगले दिसेल का ? या भीडेपोटी मी तो मोह टाळत होतो.



दुपारचे जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे पुन्हा माझ्या आजोळी परतलो. आणि थोड्या वेळाने पुन्हा सगळे तयार होऊन संध्याकाळच्या वाङनिश्चय समारंभासाठी देशपांडेंच्या वाड्यात दाखल झालोत. वाङनिश्चय समारंभ अगदी पारंपारिक आणि धार्मिक पद्धतीप्रमाणे सुरू झाल्या. प्रथम नियोजित वराची पूजा. त्याला नवे कपडे देणे वगैरे. 



नंतर मग वधूपूजेसाठी वैभवीचे मंडपात पुनरागमन झाले त्याक्षणी किन्हीकरांकडल्या सगळ्या मंडळींच्या डोळ्यातले ओसंडून वाहणारे तिच्याविषयीचे कौतुक अभावितपणे केमेऱ्यात कैद झाले होते. माझ्या आजीचे, मावस आजीचे थकलेले  वृद्ध नेत्र तिला ओवाळत होते. तिचे सात्विक सौंदर्य सगळ्यांचेच  मन मोहून घेत होते. "एका लग्नाची गोष्ट" हे नाटक आम्ही आमच्या लग्नानंतर बघितले. त्यातले "ती  परी अस्मानीची." हे गाणे या प्रसंगात अगदी चपखल बसत होते.















या वाङनिश्चय समारंभात वर पूजनामध्ये तिच्या काकाकाकूंनी मला अंगठी घातली आणि वधू पूजेत माझ्या काकाकाकूंनी तिला अंगठी घातली. आजवरच्या अनेक वाङनिश्चय समारंभात वधू आणि वर एकमेकांना अंगठी घालतात हे मी बघितलेले होते. हा प्रसंग आज कधी येईल ? याची मी चातकासारखी वाट बघत होतो. अजूनही तिच्याशी फारसे बोलणे झालेलेच नव्हते. मी माझ्या धाकट्या भावाला सांगून हा एकमेकांना अंगठी प्रदान करण्याचा एक वेगळा प्रसंग त्यांच्याच वाड्यात एका बाजूला घडवून आणला. साक्षीला केवळ दोन्हीकडली तरुण मंडळी. अशा प्रसंगी दोन्ही बाजूंनी थट्टा मस्करी रंगली आणि ती झकास लाजली. अहाहा ! माझे हृदय तिथे अगदी खल्लास. "हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे ? हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे." या ओळींची आठवण झाली. फक्त हे दुःख अतिशय सुखद संवेदनेचे दुःख होते. तो क्षण आपल्या आयुष्यात "फ्रीझ " होऊन कायमचा राहावा असा तो एक दुर्मिळ क्षण.







कधीही संपू नये असा वाटणारा तो दिवस संपला. आमच्याकडली नागपूरला परत जाण्यासाठी तयारी करू लागली. मला मात्र तिला भेटण्याची, तिच्याशी बोलण्याची इतकी ओढा लागलेली होती की मी दोन दिवसांनी नागपूरला परतण्याचा माझा निश्चय जाहीर केला. आमच्याकडल्या सगळ्यांनी त्याला हसत हसत मान्यता दिली. आणि माझा चंद्रपूरचा मुक्काम दोन दिवसांनी वाढला.

त्या दिवशी संध्याकाळी देशपांडेंकडून सहज बोलावणे आले. तिला पुन्हा भेटण्याचे निमित्त मला हवेच होते. मी त्यांच्या वाड्यात पुन्हा गेलो. तिथे त्यांच्याकडली सगळी मंडळी जमून थट्टामस्करीचा माहौल होता. मला गाणे म्हणून दाखवण्याचा आग्रह झाला. मी ही लाजत लाजत अतिशय मध्यममार्ग स्वीकारून "गुरू महाराज गुरू" हे भजन सादर केले. तिच्या चेहे-यावर आनंद, कौतुक वगैरे काहीही दिसेना. माझे गाणे तिला आवडले आहे की नाही ? काहीच कळायला मार्ग नव्हता.


ती रात्र मी माझ्या मामांच्या घरी नेहेमीप्रमाणे मामे भावंडांशी गप्पा, मस्करीत काढली. झोप अशी फ़ारशी झालीच नाही. दुस-या दिवसाची मी वाटच बघत होतो. मामांच्या घरून सकाळीच मी तिला तिच्या घरी फ़ोन लावला आणि भीत भीतच विचारले "अगं, मी आज इथे तुझ्यासाठीच थांबलोय. आपण दुपारी भेटूयात का ?" ती पण याचीच वाट बघत होती बहुतेक कारण ती लगेच "हो" म्हणाली. दोघांमधले Ice Breaking कुणी करायचे यासाठीच दोघेही संकोचत होते हे आम्हा दोघांनाही कळले. थोड्या वेळाने आमच्या सासुबाईंचा मला त्यादिवशी दुपारी जेवणाला बोलावण्याचा फ़ोन आला. त्या माऊलीने मला आवडतात म्हणून त्यादिवशी स्वतःच्या शाळेत सुटी घेऊन घरी पुरणपोळीचा घाट घातला होता. 


दुपारी माझ्या आवडत्या पुरणपोळीचे जेवण करून आम्ही दोघे चंद्रपुरातल्या जयंत सिनेमात "कहो ना प्यार है" बघायला गेलो. सिनेमा बघितला कमी आणि मनमुराद गप्पा फ़ार मारल्या. ती अबोल असली तरी गप्पांची तिला ॲलर्जी नाही हे कळले आणि ती मनमोकळी आहे हे ही कळले. तो दिवस म्हणजे आयुष्यातल्या सर्वोत्तम दिवसांपैकी एक दिवस.


आमचे लग्न पार अगदी २ डिसेंबर ला ठरले. मधला आठ नऊ महिन्यांचा कालावधी आम्हाला एकमेकांना समजून घ्यायला मिळाला. एकमेकांना आम्ही जवळपास शंभरावर पत्रे या काळात लिहीलीत. (अर्थातच सगळी पत्रे माझ्या आणि तिच्याही संग्रहात जपून ठेवलेली आहेत.) दरवेळी मी मुंबईवरून सुट्ट्यांमध्ये नागपूरला आलो की वैभवीही चंद्रपूरवरून नागपूरला यायची. मग आम्ही खूप भटकायचो. एकमेकांशी खूप बोलायचोत. भविष्याचे खूप नियोजन करायचोत. कधीकधी लांब सुटी असली की मीच चंद्रपूरला जायचो. राहण्याचा प्रश्नच नव्हता. आजोळी रहायचो आणि आम्ही दोघे चंद्रपुरातही खूप भटकायचोत, खूप संवाद साधायचोत. नंतरच्या बावीस वर्षातल्या आमच्या संसारतले आमच्यातले अद्वैत, ऐक्य साधण्यासाठी या कोर्टशिप पिरीयड्चा फ़ार उपयोग झाला. तेव्हा कळला नाही तो पण संसारात मुरल्यावर मात्र दोघांनाही त्या दिवसांच्या या उपकारांची जाणीव झाली.


आम्हा दोघांच्याही हृदयात हे दिवस म्हणजे जन्मोजन्मीच्या मर्मबंधांची ठेव होऊन कायमचे राहिले हे काय वेगळे नमूद करायला पाहिजे ?


- वैभवीच्या स्वभावाचा, सौंदर्याचा आणि साधेपणाचा एक आशिक, राम किन्हीकर.





Friday, March 10, 2023

कवी आणि कविता.

आयुष्यात काव्य खूप उशीरा सामील झाले. बालपणी कविता होत्या पण त्या अभ्यासापुरत्याच. गद्य आणि पद्य म्हणून. पुलं नी लिहील्याप्रमाणे शाळेत "गद्य नाही ते पद्य आणि पद्य नाही ते गद्य." असेच आम्ही गद्य पद्य शिकलो. अभ्यासक्रमातल्या कवितेचा अभ्यास म्हणजे या कवितेवर नेमका कुठला प्रश्न परीक्षेत येईल. कुठले "संदर्भासह स्पष्टीकरण" या कवितेवर येईल ? याचाच सतत विचार. एखाद्या कवितेच्या रसग्रहणापेक्षाही तिच्यावर किती मार्क्स मिळतील ? हाच विचार आम्ही सगळे "मार्क्सवादी" विद्यार्थी कायम करीत आलो. 


अभियांत्रिकी महाविद्यालयात गेल्यानंतर कवितांचा अभ्यास नव्हता म्हणूनच मग नवनवीन कविता गाण्यांच्या रूपात कानावर पडू लागल्यात. त्यातल्या सुंदर सुरावटींइतकेच शब्दही आवडू लागलेत. इतके सुंदर शब्द कुठल्या कवीने लिहीलेत ? या उत्सुकतेपोटी त्या कवितेचा, कवीचा आणि त्या कविच्या इतरही रचनांचा शोध सुरू झाला. त्यात महाविद्यालयातली समविचारी मित्रमंडळी मिळालीत. चांगल्या कविता ऐकायला, वाचायला मिळू लागल्यात. आपसूकच त्यांचे रसग्रहण होत गेले. कविता कळायला लागली.


याच प्रक्रियेद्वारे मंगेश पाडगावकर मनात ठसलेत. २० - २१ वर्षांचे स्वप्नाळू वय. सकाळी हाॅस्टेलमधून काॅलेजबाहेरच्या टपरीवर चहा पिताना चाललेलो असताना हाॅस्टेलच्या एका खोलीत लागलेल्या सांगली आकाशवाणी केंद्राच्या कार्यक्रमात


"लाजून हासणे अन

हासून हे पहाणे

मी ओळखून आहे

सारे तुझे बहाणे" 


हे गाणे कानी पडताच आमची पावले तिथेच थबकलीत. पाडगावकरांच्या इतर कवितांचा शोध सुरू झाला. त्यात आमच्या मैत्रिणीच्या (शारदा गाडगीळ - आता शारदा तानवडे) वडिलांचे कोल्हापूरात पुस्तकांचे साक्षात दुकान. पाडगावकरांच्याच "बोलगाणी" सह नवनवीन कवितासंग्रह प्रकाशित झाल्याझाल्या (कधीकधी प्रकाशनपूर्वही) आम्हाला वाचायला मिळू लागलेत.  आम्ही काव्यात रमलोत.


चांगली कविता म्हणजे तरी काय ? माझ्या मते वाचकाला त्याच्या आसपास घडणार्‍या अनंत घटना कवीच्या कल्पनेतून आलेल्या नव्या शब्दांच्या अनुभूतीद्वारे भेटायला येतात. "अरे, ही तर आपलीच अनुभूती. कवीने किती सुंदर शब्दांद्वारे आपल्यापुढे मांडलीय." ही  सर्वसामान्य वाचकांची भावना झाली की कवी जिंकला. असाच माझा एक अनुभव.


असाच एकदा मुंबईवरून कोल्हापूरकडे निघालो होतो. ठाण्यावरून सकाळची कोयना एक्सप्रेस पकडलेली होती. पावसाळी दिवस. एसी चेअर कार. खिडकीची जागा. माझ्यासारख्या एका प्रवासी पक्षाला अजून काय पाहिजे ?


कर्जतनंतर गाडीने बोरघाट चढायला सुरूवात केली. दरी डोंगरांच्या रांगेतून, बोगद्याबोगद्यातून गाडी लोणावळ्याकडे धावत होती. कर्जतपासूनच मी खिडकीला नाक आणि कॅमेरा लावून सरसावून बसलो होतो.


एका बोगद्यातून गाडी बाहेर पडली आणि समोरचे दृश्य पाहून पाडगावकरांचीच एक ओळ अनुभूतीला आली. ठाण्यापासून कर्जतपर्यंत येताना डोक्यावर असलेले ढग आता पायाशी आलेले होते. ढगांच्या छायेतला आमचा आत्तापर्यंतचा प्रवास त्याच ढगांना भेदून आता ढगांवर आरूढ होण्यापर्यंत येऊन पोहोचला होता.  पुढ्यातल्या हिरव्यागार दरीत मस्त पिवळेधम्म ऊन पसरले होते. 



"पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले." या ओळींची याहून उत्तम अनुभूती आणखी कुठे आली असती ? पाडगावकरांना, त्यांच्या अभिव्यक्तीला ताबडतोब सलाम केला.


आता अशीच अनुभूती एखाद्या निळ्याशार तळ्याकाठी, नदीच्या संथ प्रवाहात पावसाच्या हलक्या शिरव्याचे थेंब तळ्याच्या, नदीच्या पाण्यात नाचत असताना 

"निळ्या रेशमी पानांवरती थेंबबावरी नक्षी" या ओळींची घ्यायला मिळेल अशी आस आहे.


तुमच्या माझ्या सर्वसामान्य माणसांच्या मनांना आपल्या अत्यंत प्रभावी अभिव्यक्तिद्वारे साद घालण्याचे आणि स्तिमित करण्याचे सामर्थ्य ज्याच्या कवितेत असते तोच खरा उत्तम कवी, नाही का ?


- उत्तमोत्तम कवींना आदर्श मानणारा एक सर्वसामान्य वाचक, आस्वादक वैभवीराम किन्हीकर.


{शालेय जीवनात विडंबन म्हणून केलेल्या काही (च्या) काही कविता इथे.}

Wednesday, March 8, 2023

एका समृद्ध महाविद्यालयीन जीवनातल्या मजेमजेच्या आणि टारगटपणाच्या आठवणी

 मागे एकदा होळीच्या निमित्ताने महाविद्यालयीन जीवनात केलेल्या एका कवितेची आठवण मी आपल्यासमोर मांडली. 


आठवणींचे काय असते ? एक निघाली की की एकापाठोपाठ एक अशा अनंत निघतच जातात. सगळ्याच सुखद आणि रम्य आठवणी. 


मग आज या आठवणी या व्हिडीओ द्वारे आपल्यासमोर मांडण्याचा विचार मनात आला आणि तो पूर्णत्वास गेला.


- स्मरणरंजनात रमणारा प्रा. राम किन्हीकर.




Tuesday, March 7, 2023

एक थरारक आणि स्मरणीय प्रवास.

 गेली काही वर्षे मी बघतोय की धुळवडीच्या दिवशी नागपूर आणि विदर्भात रंग खेळण्याचा "माहौल" दुपारनंतर एकदमच कमी होऊन जातो. अनेक व्यापारी प्रतिष्ठाने वगैरे दुपारनंतर उघडतात. लोकांचे नित्यव्यवहार सुरू होतात. पूर्वी तसे नसे. धुळवडीचा दिवस म्हटला की घरातल्या लेकी सुनांना अघोषित संचारबंदी असल्यासारखी त्या घराबाहेर निघू शकत नसत. घरातल्या घरात, वाड्यातल्या वाड्यात किंवा परिसरातल्या परिसरात त्या सर्व जणी रंग खेळत असत पण यादिवशी घराबाहेर सहसा पडत नसत. अशाच एका धुळवडीच्या दिवशी केलेल्या (कराव्या लागलेल्या) प्रवासाची ही थरारक आठवण.


सौभाग्यवती वैभवीच्या एल एल बी च्या अंतिम वर्षाच्या परिक्षेची तोंडी परीक्षा चंद्रपूरला 11 मार्च 2001 पासून सुरू होणार असल्याची "सुवार्ता" आम्हाला 8 मार्च 2001ला सकाळी मुंबईत कळली. 9 मार्च 2001ला होळी आणि 10 मार्च 2001 ला धुळवड. मुंबईवरून नागपूरला आणि चंद्रपूरला पोहोचायचे कसे ? हा मोठाच यक्षप्रश्न होता. इतक्या ऐनवेळेवर रेल्वेची आरक्षणे मिळणे कठीण होते. शिवाय 8 मार्च रोजी मला माझ्या मुंबईतील महाविद्यालयात उपस्थित राहणे अत्यावश्यक होते. मग रेल्वे स्टेशनवर जाऊन आरक्षण आणायचे कसे ? हा प्रश्नच होता. तेव्हा ऑनलाईन आरक्षण प्रणाली सर्वत्र रूढ नव्ह्ती. महाविद्यालय आटोपून संध्याकाळी नागपूरसाठी बसने निघायचे आणि दुस-या दिवशी (होळीच्या दिवशी संध्याकाळी) चंद्रपूरला पोहोचायचेच असा आमचा निर्धार झाला. माझी धाकटी मेव्हणी तेव्हा अकोला येथे वैद्यकीय शिक्षण घेत होती. वाटेत अकोला ते चंद्रपूर या प्रवासात ती सुद्धा आमच्या सोबत चंद्रपूरपर्यंत येणार होती. म्हणजे ठाणे ते अकोला आणि अकोला ते चंद्रपूर अशा दोन टप्प्यात हा प्रवास करण्याचे ठरले. त्यावेळी आई आणि माझा नागपूरचा धाकटा भाऊ मुंबईतच मुक्कामाला होते. नागपूरच्या आमच्या घरी कुणीच नव्हते. तसेही आमच्या प्रवासाच्या कार्यक्रमात आम्ही नागपूरचा टप्पा घेणारही नव्हतो, म्हणा.



8 मार्च रात्री ठाण्यावरून यवतमाळला जाणा-या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या आरामबसचे आम्हा दोघांचे आरक्षण आम्ही केले. या आरामबसने अकोल्यापर्यंत जाऊन पुढे माझ्या मेव्हणीला घेऊन 9 मार्चला संध्याकाळपर्यंत चंद्रपुरात असायचे हा आमचा बेत होता.

आरामबसमध्ये तेव्हा 2 बाय 2 पुशबॅक आणि फ़ारफ़ारतर पाय लांब पसरून बसण्यासाठी पायांना खालून आधार देणा-या सेमी स्लीपर बसेस एव्हढीच प्रगती होती. स्लीपर कोच बसेस फ़ारशा रूढ झालेल्या नव्हत्या. आमची चिंतामणी ट्रॅव्हलची बसही अशीच साधी 2 बाय 2 आसनी बस होती.


ठाण्यातल्या तीन हात नाक्यावरून आम्ही साधारण तासभर उशीरा प्रवास सुरू केला. तेव्हा ठाण्यावरून कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक वगैरेकडे जाणा-या बहुतांश बसेसना ठाण्याला पोहोचे पोहोचेपर्यंत कायम एक तास उशीर ठरलेला असायचा. मग त्या बसेस लाल बहादूर शास्त्री रोडने येवोत किंवा ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून येवोत. आमच्या सौभाग्यवतींसोबतचा कुठलाच प्रवास मला कधीच बोअर झाला नाही. दोघांच्याच गप्पा मस्त रंगायच्यात. किती किलोमीटर प्रवास झाला हे अजिबात कळत नसे. तसाच हा ही प्रवास. नाशिक मार्गे आपण पुढे निघालोय एव्हढे मला कळले आणि थोड्याच वेळात आम्ही एकमेकांच्या खांद्यांवर, डोईवर डोई ठेऊन निद्रादेवीच्या अधीन झालेलो होतो.

रात्री उशीरा गाडी एकाच ठिकाणी खूप वेळ थांबलीय हे लक्षात आले आणि आमची झोप उघडली. बघतोय तो बस येवल्याच्या बाजारात थांबलेली होती. येवल्याला नगर - मनमाड राज्य मार्गाला नाशिक येवला मार्ग येऊन मिळण्याचा जो तिठा आहे अगदी तिथे. ड्रायव्हर कंडक्टर मंडळींकडे चौकशी केली तर एकदम धक्कादायक बातमी कळली. आमच्या गाडीत मोठा बिघाड झालेला होता. दुस-या दिवशी सकाळी 9 च्या सुमारास औरंगाबादवरून बदली गाडी येऊन आमचा पुढचा प्रवास होणार होता. बापरे ! त्यावेळी रात्री फ़क्त दीड वाजला होता. अजून किमान 8 तास असेच एकाजागी बसून रहावे लागणार होते. आम्हाला तर लवकर पुढे जाण्याची त्वरा होती. काय बरे करावे ? त्यातल्या त्यात समाधानाची बाब इतकीच होती की आमची बस भरवस्तीत बंद पडलेली होती. आडबाजूला, एखाद्या निर्जन माळरानावर, जंगलात वगैरे बंद पडली असती तर मात्र कठीण मामला होता.आम्ही विचार करत बसलो. 

विचारात असतानाच मुंबईवरून औरंगाबादकडे जाणा-या विविध ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसेस आमच्या बसच्या बाजूने येवल्याला आम्हाला ओव्हरटेक करून जाताना दिसल्या. रात्री 2 वाजता मी एक धाडसी निर्णय घेतला आणि सौभाग्यवतींसकट चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या आमच्या बसमधून मी उतरलो आणि मागून येणा-या मुंबई - औरंगाबाद आराम बसला हात केला. ती बस थांबली. ती नेमकी स्लीपर कोच बस होती आणि आमच्या सुदैवाने तिच्यात शेवटले का होईना दोन बर्थस रिकामे होते. मग येवला ते औरंगाबाद हा तीन साडेतीन तासांचा प्रवास बर्थवर पडून झोपेत गेला. शेवटले बर्थस आणि मराठवाड्यातले "दिव्य" रस्ते त्यामुळे गाढ झोप अशी लागली नाही तरी पाय लांब करून थोडावेळ पडता आले त्यामुळे आंबलेले अंग मोकळे झाले, एव्हढेच.




औरंगाबादला सकाळी 6.30 ला पोचलो खरे पण औरंगाबादला माझ्या काकांकडे किंवा मावशीकडे शहरात गेलो असतो तर नक्कीच तीन, चार तास मोडले असते. जवळच्या नातेवाईकांचा मुक्कामाचा, खाण्यापिण्याचा प्रेमळ आग्रह मोडणे मला कायमच अशक्य जड गेलेले आहे. मग अशावेळी हा आग्रह न मोडवणे आमच्या एकूण वेळेच्या नियोजनावर पाणी फ़िरवण्यासारखे होते. त्यामुळे औरंगाबादला बसस्टॅण्डवर दात वगैरे घासून आणि तिथेच हातपाय वगैरे धूवून आम्ही दोघेही सकाळी 8 वाजता निघणा-या औरंगाबाद - यवतमाळ एस. टी. त बसलेलो होतो. काल दिवसभराचे कॉलेज, रात्रभर असा अडचणीचा प्रवास त्यामुळे एस. टी. तही आम्ही गाढ झोपी गेलो. बरे तेव्हा मोबाईल फ़ोन्स आम्हा कुणाकडेच नव्हते. त्यामुळे आमच्या प्रवासाबद्दल माझ्या मेव्हणीला काही कळवणे शक्यच नव्हते. तरीही चिखलीला चहापानासाठी तिथल्या ढाब्यावर बस थांबली असताना आम्ही तिथल्या सार्वजनिक फ़ोन बूथवरून मेव्हणीच्या घरमालकांकडे फ़ोन करून आमची येण्याची शक्य वेळ कळवून दिलेली होती आणि आमच्या जेवणासाठी दुपारी जादाचे डबे आणून ठेव असा तिला निरोप दिलेला होता.




अकोल्याला पोहोचेपर्यंत दुपारचे 2.30 झालेत. औरंगाबाद ते अकोला या 240 किमी प्रवासासाठी तेव्हा 6 तास सहज लागायचेत. म्हणूनच समृद्धी महामार्गाने अक्षरश: 6 तासात नागपूर ते औरंगाबाद अंतर कापता येतेय म्हटल्यावर मी गहिवरून गेलेलो होतो. लगोलग रिक्शा करून मेव्हणीच्या मुक्कामावर गेलो. छान आंघोळी वगैरे केल्यात, तिच्या मेसचे जेवण केले आणि तिला घेऊन पुढल्या प्रवासाला निघालोत. दुपारी 4 वाजताची नंदन ट्रॅव्हल्सची अकोला - जबलपूर बस आम्हाला प्रवासासाठी मिळाली. ट्रॅव्हल्सच्या बसने प्रवास करण्याचा फ़ायदा असा होता की एस. टी. च्या अकोला - नागपूर प्रवासाला आम्हाला 6 तास लागले असते आणि रात्री 10 वाजता आम्ही नागपूरला पोहोचलो असतो. रात्री 10 वाजता नागपूरवरून चंद्रपूरसाठी शेवटची बस सुटत होती. ती बस आम्हाला कशीही करून पकडायची होती. एकदा त्या बसने रात्री 1, 1.30 च्या सुमारास चंद्रपूरला पोहोचलो आणि घरी गेलो की पुढच्या (धुळवडीच्या) दिवशीचे प्रवासाचे आम्हाला टेंशन नव्हते. रात्री 1 वाजता चंद्रपूर म्हणजे अगदी स्वगृहच होते. चिंता नव्हती.

नंदनची बस अकोल्यावरून निघाली आणि अमरावती शहरही झपाझप मागे टाकून कोंढाळीला साधारण 7.30 च्या सुमारास आलेली होती. आता फ़क्त तासाभरात नागपूर. म्हणजे कदाचित नागपूर बसस्टॅण्डवरून आम्हाला रात्री 9.00 ची बससुद्धा मिळू शकत होती. आम्ही आनंदलो पण हाय रे दैवा...




कोंढाळीजवळ "काठीयावाड ढाब्या" वर बस जेवणासाठी थांबली ती चक्क 1 तासभर. वेग हा खाजगी बसचा प्लस पॉइंट असला तरी असे अवांछित थांबे कधीकधी त्रासदायकच ठरतात याचा अनुभव आम्ही तेव्हा घेतला. रात्री 8.30 ला त्या ढाब्यावरून निघून नागपूर गाठेपर्यंत आम्हाला रात्रीचे 10.00 वाजलेत. बसस्टॅण्डवर जाऊन बघितले पण रात्री 10.00 ची नागपूर - चंद्रपूर ही बस नुकतीच निघून गेल्याचे कळले. त्याच रिक्षाने रेशीमबागेतल्या आमच्या घरी पोहोचलो आणि अंग टाकले.

10/03/2001. धुळवडीचा दिवस. सकाळी लवकरच उठलो आणि आवरले. धुळवडीचा माहौल सुरू होण्याआधी स्टॅण्डवर जाऊन चंद्रपूरकडे एखादी तरी चुकार बस जायला निघतेय का ? याचा शोध आम्ही घेण्याचे ठरवले. एस. टी. च्या बसेस तर आज दिवसभर बंद असतात हा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव होता. हातात सामानसुमान घेऊन रेशीमबागेतल्या घरून आम्ही पायी पायीच बसस्टॅण्डकडे कूच केले. मध्ये रेशीमबाग चौकात एक चुकार रिक्षावाला मिळाला. त्याने आम्हाला नागपूरवरून चंद्रपूरकडे जाणा-या खाजगी बसेस सुटण्याच्या ठिकाणापर्यंत पोहोचवले. 

तिथे एक बस उभी होती खरी. पण ती चंद्रपूरकडे जाणार की नाही ? गेलीच तर किती वाजता निघणार ? याची खात्री तिच्या ड्रायव्हर - कंडक्टरसकट कुणीही देऊ शकत नव्हते. आम्ही गाडीत बसून इतर तिला प्रवासी मिळण्याची वाट ( तिच्या ड्रायव्हर - कंडक्टर इतकीच) बघू लागलो. कारण पूर्ण प्रवासी मिळाल्याशिवाय ती बस नागपूरवरून निघणार नव्हती आणि धुळवडीच्या दिवशी प्रवासाचा बेत असलेले आमच्यासारखे चुकार प्रवासी आज तुरळक असणार हे उघड होते. दरम्यान 6.30 ते 8.00 या वेळेत मधेमधे ती बस सुरू व्हायची. बैद्यनाथ चौक, डालडा फ़ॅक्टरी आणि पुन्हा श्री कॉम्प्लेक्स असा प्रवाशांचा शोध घेत पुन्हा मूळस्थानी यायची. समाधानाची बाब इतकीच होती की दरवेळी तिच्या फ़ेरीत 4 - 5 प्रवासी वाढत होते आणि ही बस नक्की चंद्रपूरला जाईल ही आमची आशा पल्लवीत होत होती.




शेवटी सकाळी 8.00 वाजता त्या बसने नागपूर सोडले आणि आमच्या त्रिदिवसीय प्रवासाचा शेवटचा टप्पा सुरू झाला. चंद्रपूरला आम्हाला स्टॅण्डवरून घरापर्यंत कारने न्यायला येण्याचे सौ वैभवीच्या एका चुलत भावाने कबूल केले होते त्यामुळे तो प्रश्न नव्हता फ़क्त त्याला बिचा-याला आमची वाट बघत सकाळी 9 पासून स्टॅण्डवर ताटकळत बसावे लागले होते. त्याकाळी मोबाईल फ़ोन्स सर्वत्र इतके प्रचलित नसल्याने संदेशवहनाची परिणामकारकता तेव्हढी नव्हती. अर्थात त्याचे तेव्हा कुणाला फ़ारसे वाईट वाटत नव्हते म्हणा.

सकाळी 11.15 च्या सुमारास आमचा हा थरारक, नाट्यपूर्ण घटनांनी भरलेला प्रवास संपला. कायम लक्षात राहणारा एक अनुभव.

- नेहमीच आखीव रेखीव प्रवास करणारा पण अशा आडमार्गी प्रवासांच्या आठवणीही आवडणारा प्रवासी पक्षी वैभवीराम किन्हीकर.