Monday, January 23, 2023

एका लग्नाच्या जमण्याची पुढची गोष्ट.

उपवर मुलीला एक स्थळ सुचवल्या गेले. मुलाचे कुटुंब  परगावाचे  आणि मुलगा महानगरीत काम करणारा. मुलगा फेब्रूवारीत अमूक एका तारखेला येणार असल्याचे वर्तमान मुलाची आई, मुलीच्या आईला कळवते. मुलगा आणि मुलगी दोघांनाही पितृवियोग झालेला आहे. मुलगाही आता उपवधू झालाय. त्याच्यासाठीही मुलींचा शोध सुरू आहेच. फेब्रूवारीत सुटी  घेऊन घरी आला की दोन तीन वधूपरीक्षांचा कार्यक्रम एकत्र ठरवता येईल असा मुलाच्या आईचा बेत.

ठरल्याप्रमाणे सुटी घेऊन मुलगा शनिवारी सकाळी मुंबईवरून नागपूरला येतोय. पुढल्याच आठवड्यात दोन दिवसांनंतर (सोमवारी) मुलाच्या गुरूघरी नाथाबीजेचा उत्सव आहे त्यानिमित्तानेही आणि वधूसंशोधनासाठीही त्याने दोन दिवस (सोमवार आणि मंगळवार) सुटी  घेतलीय. घरी आल्याआल्या त्याची आई त्याला आलेली स्थळे, त्यांचे तपशील दाखवते. पहिल्या मुलीकडचे काही नातेवाईकही या गुरूघराण्याशी संबंधित असल्याने ते पण उत्सवाला येणार असतीलच म्हणून मग  उत्सवाच्यादिवशीच ही मुलगी बघू असा बेत ठरतो. त्यादरम्यान दुसरे आणखीही एक स्थळ आलेले असते. त्यांना मग मंगळवारी बोलावू असा विचार पक्का होतो.

शनिवार नेहमीच्या घाईत जातो. रविवार पण संध्याकाळ पर्यंत नेहमीच्या कामाकामांमध्येच दिवस जातो. मुलीच्या घरी चंद्रपूरला मुलाकडून येणाऱ्या फोनची आतुरतेने वाट पाहणे सुरू असते. मुलगा नागपूरला आला की नागपूरवरून तसा फोन येईल अशी मुलीकडच्यांची समजूत. तर मुलगा शनिवारी येणार आहे हे मुलीकडल्यांना नक्की कळवलेले आहे त्यामुळे मुलीकडली मंडळी सोमवारी नक्की येणार आहेत ही मुलाच्या आईची समजूत. त्यात दस्तुरखुद्द नवऱ्या मुलाला ह्यातले काहीही माहिती नसल्याने तो अनभिज्ञ. असा मोठाच मजेशीर गोंधळ.


रविवारी संध्याकाळी ७. ७. ३० झालेत तशी मुलीच्या घरच्यांची चलबिचल सुरू झाली. साहजिकच आहे हो. उद्याच्या कार्यक्रमाविषयी (त्यांच्या दृष्टीने) अनिश्चितता असताना उद्या सकाळी नागपूरसाठी निघायचे की नाही ? इतर तयारी वगैरे प्रश्न त्यांच्यासमोर पडलेले होते. "मुलगा आलाय की नाही ? आम्ही उद्या कधी येऊ ?" वगैरे प्रश्नांच्या उत्तरासाठी नागपूरला फोन करायला मुलीची आई जवळच्या पी सी ओ  कडे जायला निघाली खरी पण "आई, तूच कशाला फोन करतेयस गं ? गरज काय फक्त आपल्यालाच आहे का ? त्यांच्याकडच्यांचे काहीच कर्तव्य नाही का कळवण्याचे ?" असा दस्तुरखुद्द नवऱ्या मुलीचा प्रश्न तिला बिचारीला ऐकून घ्यावा लागला होता.


पण त्या शुभक्षणी त्यांना हा फोन करण्याचा विचार सुचला हे बरे झाले कारण फोनवरून एकमेकांचे गैरसमज दूर  झालेत.  नागपूरकडची मंडळी आपण येणार हे गृहीत धरूनच बसलेली होती हे चंद्रपूरकरांना कळले आणि चंद्रपूरकर आपल्या फोनची वाट बघत होते हे नागपूरकरांनाही कळले. चंद्रपूरकरांनी दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता निघणाऱ्या बसचे नागपूरचे रिझर्वेशन केले.


मुलगी, तिची आई आणि तिची एक धाकटी बहीण सकाळी नागपूरला आले आणि गुरूघरच्या उत्सवासाठी थेट गुरूघरी पोहोचले. त्यांनी अशा वधूपरीक्षा प्रसंगी परिधान करण्याचा रिवाज असलेली साडी वगैरे जामानिमा मुलीसाठी आणला होता खरा पण उत्सव, त्याला जमलेली भक्तमंडळी या गडबडीत मुलीने तिच्या पोशाखात बदल केलेलाच नव्हता. ती आपली निळ्या रंगाच्या सलवार सुटावरच होती. ना कपडे वगैरे बदलण्यासाठी वेळ ना मेकअप वगैरेंसाठी वेळ.


नवरा मुलगा तर त्यादिवशी  उत्सवाच्या तयारीत आणि व्यवस्थापनात असल्याने अशा प्रसंगी तो कायम परिधान करीत असलेल्या धोतर - झबा अशा मंगलवेशात. त्याने शर्ट पॅन्ट असा पोशाख करावा हा त्याच्या आईचा आग्रह त्याने न जुमानलेला. उत्सवाच्या भोजनाच्या पंक्ती सुरू असतानाच शेजारच्याच घरी (नवऱ्या  मुलाच्या) मुलगी दाखवण्याचा पारंपारिक कार्यक्रम अत्यंत साधेपणाने पार पडला. नवरी मुलगी साडी ऐवजी पंजाबी सुटावर तर नवरा मुलगा शर्ट पॅन्ट ऐवजी धोतर - झबा या पोशाखात.



तिचा साधेपणा, सोज्वळपणा आणि निरागसता नवऱ्या  मुलाला फारच भावली आणि दोन्हीकडच्या घरी परवानगी घेऊन त्याच दिवशी तासाभराने दोघे अगदी जवळच असलेल्या एका उपाहारगृहात भेटलेत. आज हा शिरस्ता झालेला असेल पण २३ वर्षांपूर्वी नागपुरात हे एक धाडस होते. पण दोन्ही घरच्यांनी कोतेपणा न दाखवता परवानगी दिली हे महत्वाचे. तास दीडतासापूर्वीच गुरूघरी प्रसाद घेतलेला असल्याने दोघांनाही भुका तशा नव्हत्या. एक शीतपेय मागवून दोघेही बोलत बसलेत. मुलाने कसलाही आडपडदा ना ठेवता त्याचा (तत्कालीन ) तुटपुंजा पगार, इतर सांपत्तिक परिस्थिती (नागपूर आणि मुंबई दोन्हीकडे स्वतःचे घर नसणे वगैरे) मुलीला सांगितली. तिनेही तिच्या घराच्या मंडळींविषयी, तिच्या जबाबदाऱ्या याविषयी नवऱ्या  मुलाला प्रांजळपणे सांगितले. दोघेही पुन्हा गुरूघरी परतलेत.




साधारण अर्ध्या तासाने मुलीची आई मुलीला मुलगा पसंत असल्याची शुभवार्ता घेऊन मुलाकडे आली. मुलाकडून तर होकार होताच. लगेच लग्न निश्चिती झाली. संध्याकाळी गुरूघरीच उत्सवात मुलीला श्रीफळ व खण देऊन आणि मुलाला श्रीफळ व दक्षिणा देऊन सदगुरूंसमोर लग्न पक्के करायचे ठरले. त्याप्रमाणे त्याच संध्याकाळी लग्न ठरले. त्याचदिवशी संध्याकाळी नवऱ्या मुलाचे गुरूघरीच उत्सवानिमित्त प्रवचन होते. त्या प्रवचनासाठी मात्र मुलगी साडी वगैरे नेसून आणि मुलगा नवे धोतर वगैरे घालून आलेले होते. लग्न ठरल्या दिवशीच  होणाऱ्या नवऱ्याचे "प्रवचन" वगैरे ऐकावे लागण्याचा प्रसंग हा भारतीय विवाहसंस्थेच्या इतिहासात अत्यंत विरळा असेल.

२३ वर्षांपूर्वीच्या नाथबीजेचा हा ऐतिहासिक प्रसंग. लग्नानंतर त्याने तिला अनेकदा विचारले "त्यादिवशी नेमके काय पाहून तू मला होकार दिलासा ग ?" तिने त्याचे उत्तर देणे कायमच  टाळले. दोघांचे अत्यंत अद्वैत स्वरूपाचे अंतरंग संबंध असतानाही  काहीतरी गंमतीशीर बोलून, थातूरमातूर बोलून ती तो प्रश्न टाळायची. आज ती नवरीच काळाच्या पडद्याआड गेलीय त्यामुळे याचे  उत्तर कधीही मिळणार नाही. आणि तो नवरा मुलगा तिच्या आठवणीत लेख लिहीत बसलाय.



- २२ वर्षात वैभवीशी पुरता एकरूप झालेला तरूण, वैभवीराम.

No comments:

Post a Comment