Thursday, January 19, 2023

कोविड चा आणखी एक बळी. : होता होता राहिलेले एक रेक शेअरींग.

साधारण ९० च्या दशकाच्या मध्यापर्यंत दरवर्षी रेल्वे बजेटमध्ये घोषणा झालेल्या ९० % गाड्या त्याचवर्षी १ जुलै ला सुरू व्हायच्यात. तशी शिस्त रेल्वे बोर्ड आणि विभागीय मंडळे पाळायचीतच. मध्यंतरीच्या काळात लालू, नितीश, ममता सारखी समाजवादी मंडळी रेल्वे मंत्री बनलीत आणि त्यांच्या भोंगळ कारभारात रेल्वेची एकंदरीतच शिस्त लयाला गेली. रेल्वे बजेटमध्ये घोषणा केलेल्या गाड्या त्या वर्षभरात कधीही सुरू होऊ लागल्यात. काहीकाही गाड्या तर पुढल्या वर्षी, त्याच्या पुढल्या वर्षी कधीही सुरू होऊ लागल्यात. काहीकाही गाड्या तर संसदेच्या पटलावर घोषणा होऊनही कधीच सुरू झालेल्या नाहीत. उदाहरणार्थ २०११ मध्ये ममता बॅनर्जी बाईंनी रेल्वे बजेटनंतर संसदेत विशेष घोषणा केलेली नागपूर - नवी दिल्ली सुपरफास्ट आज १२ वर्षानंतरही सुरू झालेली नाही. (त्यासंबंधीचा लेख इथे आणि इथे.)

१ जुलैला नवीन गाड्या सुरू होत असल्याने आम्हा सर्व रेल्वेप्रेमींचे लक्ष जूनच्या शेवटल्या आठवड्यात रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या रेल्वे वेळापत्रकांवर असे. असे वेळापत्रक आल्याची बातमी आमच्या रेल्वेप्रेमी याहू मेल लिस्टवर आली रे आली की त्यादिवशी लगोलग रेल्वे स्टेशन गाठणे, ते रेल्वे वेळापत्रक हस्तगत करणे, त्याचा सखोल अभ्यास करणे (म्हणजे एखाद्या मार्गावर धावणाऱ्या जुन्या गाड्यांपैकी कुणाच्या वेळापत्रकात कुठे काही क्रान्तिकारी बदल झालाय का ? यावर्षी नव्याने येणाऱ्या गाडयांसाठी कुठली नवीन वेळ रेल्वेने ठरवलीय वगैरे वगैरे.) या सर्व अखिल भारतीय अभ्यासाला एखाद्या तज्ञ रेल्वेप्रेमीला ३ ते ४ तास पुरत असत. 


नंतर मग इंटरनेटचा प्रसार झपाट्याने झाला. वेळापत्रके ऑनलाईन उपलब्ध होऊ लागलीत. याहू मेल लिस्ट जुनी ठरून रेल्वे प्रेमींचे अड्डे व्हॉटसएप वर जमू लागलेत. अशाच एका अत्यंत विश्वासार्ह रेल्वेप्रेमींच्या व्हॉटसएप ग्रुपवर २०१९ संपता संपता  एक बातमी आली की १ एप्रिल २०२० पासून मुंबई - हावडा गीतांजली एक्सप्रेस आणि मुंबई - हावडा मेल यांचे आरक्षित तिकिटांचे बुकिंग तात्पुरते थांबवणार आहेत. रेल्वे आरक्षणे १२० दिवस आधी उघडतात मग आमच्यापैकी प्रत्येक उत्साही रेल्वेप्रेमीने १ जानेवारी २०२० रोजी १ एप्रिल २०२० ची रेल्वे आरक्षणे उघडल्या उघडल्या या बातमीची पुष्टी करण्याकरिता उगाचच मेल आणि गीतांजलीचे आरक्षण करून पाहण्याचा प्रयत्न केला. पण खरोखर या दोन गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध नव्हत्याच. काहीतरी मोठा घोळ होता हे नक्की.

शेरलॉक होम्स म्हणतो त्याप्रमाणे "When you have eliminated all which is impossible, then whatever remains, however improbable, must be the truth" या अचानकच्या बदलामागे एकच शक्यता उरत होती. ती  म्हणजे या दोन गाड्यांचे रेकी शेअरींग. मेल आणि गीतांजलीचे रेकी शेअरींग अशक्य कोटीतले का वाटतं होते याबद्दलचे विवेचन परिशिष्ट १ मध्ये केलेले आहे.



सध्याची १२८०९ डाऊन / १२८१० अप मेल (ब्रिटीश काळापासूनची १ डाऊन/ २ अप, १९९० मध्ये गाड्यांचे चार अक्षरी नंबर आल्यानंतर ८००१ डाऊन / ८००२ अप आणि नंतर सुपरफास्ट दर्जा मिळाल्यानंतर २८०९ डाऊन / २८१० अप ) मुंबईवरून रोज रात्री ९ वाजून १० मिनिटांनी निघते आणि भुसावळ - वर्धा - नागपूर - दुर्ग - बिलासपूर - टाटानगर मार्गे हावड्याला तिसऱ्या दिवशी सकाळी ६.०० वाजता पोहोचते. परतीच्या प्रवासात तीच गाडी रोज संध्याकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी हावड्यावरून निघून पुन्हा तिसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून २५ मिनिटांनी मुंबईला येते. म्हणजे या गाडीसाठी दक्षिण - पूर्व रेल्वेला ४ रेक्स कायमचे द्यावे लागणार. (उदाहरणार्थ : मुंबईवरून सोमवारी निघालेला एक रेक  बुधवारी सकाळी हावडा आणि बुधवारी संध्याकाळी तोच रेक परत निघून शुक्रवारी सकाळी मुंबई. म्हणजे सोमवारचा रेक परत शुक्रवारी वापरता येणार. म्हणजे एकूण सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे चार रेक्स लागणार. मंगळवारचा रे्क शनिवारी, बुधवारचा रविवारी तर गुरुवारचा पुढल्या सोमवारी असे त्या रेक्सचे संचालन असणार.)

तसेच आजकालची १२८५९ डाऊन / १२८६० अप गीतांजली एक्सप्रेस (जुन्या काळाची ५९ डाऊन / ६० अप किंवा १९९० मध्ये चार आकडी नंबर गाड्यांना दिल्यावर २८५९ डाऊन / २८६० अप) ही मुंबईवरून दररोज सकाळी ६.०० वाजता निघते आणि मेलच्याच मार्गाने १९६२ किमी चे अंतर ३० तास ३० मिनिटांत पार पाडून दुसऱ्याच दिवशी दुपारी १२.३० ला हावड्याला पोहोचते. परतीच्या प्रवासात हीच गाडी हावड्यावरून दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी निघून दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजून २० मिनिटांनी मुंबईला येते. म्हणजे या गाडीसाठी दक्षिण - पूर्व रेल्वेला ४ रेक्स कायमचे द्यावे लागत असणार. (उदाहरणार्थ : मुंबईवरून सोमवारी निघालेला एक रेक  मंगळवारी दुपारी  हावडा. पण हावड्याला दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी पोहोचून हा रेक लगेच २ वाजून ५ मिनिटांनी परतीच्या प्रवासाला निघणे जवळपास अशक्य आणि अवांछित सुद्धा. हा रेक दक्षिण पूर्व रेल्वेच्या हावडा विभागाचा असतो. याची  प्राथमिक देखभाल  हावड्याला होत असते. दुय्यम देखभाल मुंबईतल्या वाडी बंदर यार्डात. केवळ दीड  तासात प्राथमिक देखभाल पूर्ण होऊन हा रेक परत धावणे केवळ अशक्य. म्हणून मंगळवारी पोहोचलेला हा रेक तब्बल २५ तासांच्या विश्रांती नंतर  बुधवारी दुपारीच परतीच्या प्रवासाला निघणार हे नक्की. बुधवारी दुपारी  तोच रेक परत निघून गुरुवारी रात्री  मुंबई. म्हणजे सोमवारचा रेक परत शुक्रवारीच  वापरता येणार. म्हणजे मेलच्या रेक्ससारखेच एकूण सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे चार रेक्स लागणार.)



थोडक्यात म्हणजे २०१९ ला (आणि आत्तासुद्धा) या  दोन गाड्या मिळून दक्षिण पूर्व रेल्वेला ८ डेडिकेटेड रेक्स लागत असणार. त्याऐवजी.... 

.... या दोन्हीही गाड्यांच्या धाववेळेत थोडी बचत करून यांचे रेक शेअरींग केले तर एक किंवा दोन रेक्सची  बचत होऊ शकते हा विचार २०१९ मध्ये रेल्वे बोर्डाच्या कुठल्यातरी अधिकाऱ्याच्या मनात आला आणि पुढील विचार पक्का होऊन दोन्हीही गाड्यांचे वेळापत्रक ठरेपर्यंत या दोन्हीही गाड्यांचे आरक्षण प्रलंबित ठेवण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतलेला असण्याची शक्यता होती.

विचार १.  दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी हावड्याला पोहोचलेली गीतांजली त्याच रात्री ७ वाजून ५० मिनिटांनी मेल म्हणून हावड्यासाठी सोडायची. म्हणजे सोमवारी मुंबईवरून निघालेला रेक मंगळवारी हावडा आणि परत गुरुवारी सकाळी मुंबई. म्हणजे तोच रेक गुरुवारी संध्याकाळी मेल म्हणून पाठवला तर शनिवारी सकाळी हावडा आणि तोच रेक शनिवारी दुपारी २ वाजता हावड्यावरून गीतांजली म्हणून निघून रविवारी रात्री मुंबई. म्हणजे या रचनेत या दोन्हीही गाड्या मिळून रेल्वेला ७ च रेक्स वापरावे लागणार होते.

प्राथमिक देखभालीसाठी प्रत्येक रेक ला ७ ते ८ तास हावड्याला मिळत होते तेव्हढे पुरेसे होते. (सकाळी ६. ०० ते दुपारी २. ०० आणि दुपारी १२. ०० ते संध्याकाळी ७. ००)

विचार २. दोन्हीही गाड्यांच्या वेळापत्रकात  बदल करून (धाववेळ कमी करून) फक्त ६ रेक्स मध्ये दोन्हीही गाड्या चालवता येतील. मुंबईवरून अगदी ब्रिटीश काळापासून संध्याकाळी ७ ते ९ च्या मध्ये निघणारी मेल रात्री १०.३० च्या आसपास मुंबईवरून काढून जवळपास त्याच वेळेत हावड्याला पोहोचवता आली तर मुंबईत येणारी गीतांजली तशीच प्लॅटफॉर्मला लावून त्याच दिवशी मेल म्हणून पाठवता येईल. इकडे गीतांजलीलाही थोडी वेगवान करून मुंबईत पोहोचण्याची तिची वेळ ही संध्याकाळी ७.३० च्या आसपास करता येईल. तिकडे हावड्याला सकाळी पोहोचलेली मेल दुपारी गीतांजली आणि दुपारी पोहोचलेली गीतांजली संध्याकाळी मेल म्हणून पाठवावी लागेल. त्या वेळेस फक्त ६ रेक्समध्ये दोन्हीही गाड्या चालवता येतील.

तसेच सध्या मुंबईवरून सकाळी ६. ०० वाजता निघणारी गीतांजली थोडा  वेग वाढवून सकाळी ८. ०० च्या आसपास मुंबईवरून निघाली तरी सध्याच्याच वेळेत हावड्याला पोहोचू शकते. म्हणजे मुंबईत पहाटे येणाऱ्या मेलला  गीतांजली म्हणून रवाना करता येईल. या रचनेत फक्त ६ रेक्समध्ये दोन्हीही गाड्या चालवता येतील.

एक रेक सोमवार सकाळ गीतांजली म्हणून मुंबईवरून निघेल मंगळवार दुपारी हावड्याला पोहोचेल. मंगळवारी संध्याकाळी हावड्यावरून मेल म्हणून निघेल आणि गुरुवारी पहाटे  मुंबईत परतेल. गुरुवारी सकाळी तोच रेक पुन्हा गीतांजली म्हणून निघू शकेल. म्हणजे सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीन रेक  या गाडीसाठी लागतील. तसेच सोमवारी रात्री मुंबईवरून निघालेली मेल बुधवारी सकाळी हावडा आणि बुधवारी दुपारी तोच रेक गीतांजली म्हणून निघून गुरुवारी संध्याकाळी मुंबईत येईल. त्याच दिवशी रात्री तोच रेक पुन्हा मेल म्हणून रवाना होऊ शकेल. म्हणजे इथेही सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीनच  रेक लागतील. एकूण ६ रेक्स.

पण फ़ेब्रुवारी २०२० मध्ये कोविडची गडबड सुरू झाली. मार्च २०२० मध्ये देशभर लागलेल्या लॉकडाऊनमध्ये भारतीय रेल्वेने सगळ्याच गाड्या रद्द केल्यात. काही महिन्यांनी हळूहळू एक एक रेल्वे गाड्या सुरू झाल्यात ख-या पण नंतर हा रेक शेअर शेअरींग चा विचार बारगळला असे दिसते.

परिशिष्ट १ : ४ नोव्हेंबर १९७९ रोजी सुरू झालेली गीतांजली एक्सप्रेस ही तत्कालीन रेल्वेमंत्री प्रा, मधू दंडवते यांच्या कल्पनेतून आलेल्या "वर्गविरहीत" रेल्वे गाड्यांपैकी पहिली गाडी होती. या गाडीला आजपर्यंत प्रथम वर्गाचा डबा लागलेला नाही. जरी प्रथम वर्गापेक्षा जास्त ऐशोआरामी आणि महाग तिकीट असलेले त्रिस्तरीय शयनयान आणि द्विस्तरीय शयनयान (सामान्य भाषेत थर्ड एसी आणि सेकंड एसी) हे डबे या गाडीला लागत आलेले आहेत. नावात "सेकंड" आहे ना, मग ठीक आहे असा निव्वळ समाजवादी ढोंगीपणा इथे दिसतो. पण प्रथम वर्ग विना वातानुकूल किंवा प्रथम वर्ग वातानुकूल हे डबे या गाडीच्या रेकमध्ये कधीही नसतात.

याउलट मेल ला पहिल्यापासून प्रथम वर्ग आणि आता तर वातानुकूल प्रथम वर्गाचा डबा लागत आलेला आहे. या दोन गाड्यांचे रेक शेअरींग करायचे असेल तर एक तर मेलचा प्रथम वर्ग वातानुकूल डबा काढावा लागेल किंवा गीतांजलीच्या रेकमध्ये प्रथम वर्ग वातानुकूल वर्गाचा डबा स्वीकारावा लागेल. यातला दुसरा पर्याय प्रत्यक्षात येण्याची शक्यता जास्त होती. जवळपास ४५ वर्षांनी गीतांजलीला प्रथम वर्गाची ओळख झाली असती.




- मुख्य लेखात इतर माहितीचा फ़ापटपसारा नको म्हणून आपल्या प्रतिपादनात परिशिष्टामागून परिशिष्ट जोडणारा, एक रेल्वेप्रेमी लेखक प्राध्यापक, वैभवीराम.

(संबंधित इतर लेख इथेइथे आणि  इथे .)

http://railandbusfanning-ram.blogspot.com/2013/12/blog-post.html

http://railandbusfanning-ram.blogspot.com/2021/05/blog-post_06.html

http://railandbusfanning-ram.blogspot.com/2020/10/blog-post_13.html




No comments:

Post a Comment