आजकालच्या गाड्यांचे (मोटारसायकल, बाईक्स वगैरेही) Projector Headlamps, halogen lights वगैरे पाहिले आणि आम्हाला आमच्या तारूण्यातली Luna आठवली हो.
उण्यापुऱ्या ४८ सीसी ची ती गाडी. तिच्या दिव्याचा प्रकाश तो किती पडणार ? त्यातही High Beam आणि Low Beam प्रकाशात काही फरक असतो हे लुनाच्या बाबतीत तरी आमच्या लक्षात येत नसे. उगाचच काहीतरी प्रथा म्हणून ते High Beam / Low Beam चे बटण त्या गाडीच्या हँडलवर दिलेले आहे असे आम्हाला वाटे. ते बटणही प्रचंड तकलादू असायचे. हमखास तुटायचे. गाडी नवीन असताना पहिल्या दोन वर्षात वर्कशाॅपमधून ते बटण नवीन बसवून आणण्याचा उरक असे. (गाडी नवीन असताना पहिल्या आठवड्यात आपण उत्साहाच्या भरात चाकांचे स्पोक्स तर चकाचक पुसतोच पण कधीकधी टायरही पुसून घेतो तसेच हे.)
त्या काळी आपल्या वाहनाच्या High Beam चा रस्त्याने जाणार्या इतर वाहनांना त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक स्वयंचलित वाहनांच्या हेडलाईटसचा वरचा अर्धा भाग काळ्या रंगाने रंगवला पाहिजे असा तत्कालीन RTO चा दंडक होता. सगळे ट्रक्स, बसेस, कार्स तसे हेडलाईटस झाकून असत. लुनाच्या लाईटसचा मूळचाच प्रकाश इतका पिंगट, धुवट आणि क्षीण असे की पुन्हा तो हेडलाईट अर्धा काळा रंगवणे म्हणजे एक निरर्थक कवायत वाटे. पण RTO च्या दंडाच्या भीतीने ते करावे लागे. आताशा तो नियम अस्तित्वात नसावा असे वाटते कारण आजकाल कुठलीच गाडी अशी दिसत नाही. ज्या कुणा अधिकार्याच्या लक्षात या नियमाचा फोलपणा लक्षात येऊन त्याने तो नियम मागे घेण्यासाठी हालचाल केली असेल तो खरोखरच बुध्दिमान आणि इतरांविषय सहसंवेदनाधारक वृत्तीचा असला पाहिजे. त्याला / तिला सलाम.
- रात्री रस्त्यावर दिवे असताना आपण आपल्या लुनाचा लाईट लावलाय खरा पण तो सुरू झालाय की नाही याची खात्री करायला उजवा हात त्या छोट्याशा accelarator वर आणि डावा हात लाईटसमोर धरून त्या मिणमिणत्या प्रकाशाची खात्री करणारा (आपल्याला रस्ता दिसण्यासाठी त्या लाईटचा फारसा उपयोग नसला तरी पुढून येणार्या वाहनांना आपले अस्तित्व कळले पाहिजे म्हणून तो लाईट उपयोगी आहे हे मानणारा) लुनाचालक तरूण, रामभाऊ.
No comments:
Post a Comment