Sunday, May 24, 2026

जननीजनक माया लेकरू काय जाणे ?

आपल्या बालपणी आपण एखाद्या परिचितांकडे, नातेवाईकांकडे जातो. तिथे गेल्यानंतर आपल्या बालसुलभ मनाला तिथल्या एखाद्या वस्तूची, तिथे आपल्याला मिळालेल्या वागणुकीची किंवा तिथल्या एकूणच वातावरणाची खूप भुरळ पडलेली असते. तिथे पुन्हापुन्हा यावेसे वाटते. तिथून परतताना आपला पाय अगदी निघत नसतो.


काही कालावधीनंतर आपण आपल्या पालकांकडे त्याठिकाणी पुन्हा जाण्याचा प्रस्ताव मांडतो, हट्ट करतो. पण आपली पालकमंडळी आपल्याला काही ना काही कारण सांगून तो प्रस्ताव लांबणीवर टाकतात. त्या ठिकाणच्या वातावरणाची जबर मोहिनी आपल्या मनावर असल्याने आपण पुन्हा काही कालावधीनंतर तोच प्रस्ताव, हट्ट पुन्हा करतो पण आपली पालक मंडळी तो प्रस्ताव पुन्हा लांबणीवर टाकतात, क्वचितप्रसंगी धुडकावून पण लावतात. आपल्याला मनोमन दुःख होते. आपले पालक उगाचच आपल्याला त्या ठिकाणी जायला मनाई करत आहेत, आपण आता त्या ठिकाणी जाऊन मागच्या भेटीत अनुभवलेले वातावरण पुन्हा अनुभवू शकणार नाही याची दुःखद जाणीव आपल्याला अगदी बालवयातही झालेली असते. पण असे का ? याचा उलगडा आपल्याला होत नाही. 


आपले पालकही खरोखर अशा मोठ्या मनाचे आणि थोर असतात की मागील भेटीत त्या ठिकाणी गेलेले असताना त्यांच्या मनावर तिथे गेल्यामुळे काय ओरखडा उमटला आहे, तिथे त्यांचा काय अपमान झाले किंवा काय वेदना झालेल्या आहेत, ह्या बाबी ते आपल्याला कळू देत नाहीत. लहान मुलांना या गोष्टी कशाला कळायला हव्यात ? हा एक दृष्टीकोन किंवा लहान लहान मुलांना या गोष्टी सांगून त्यांच्या बालमनात तिथल्या लोकांविषयी नकारात्मक भावना आपण कशाला निर्माण करायची ? हा आणखी एक दृष्टीकोन त्यांचा असतो.


यथावकाश आपण मोठे होतो. ती घटना, तो हट्ट आणि आपल्या पालकांनी त्यावेळी दिलेला नकार अजूनही आपल्या स्मरणात असतो. त्यामागे असलेल्या कारणांचा आपण धूसर अंदाज घेऊ शकतो. पण आता आपले पालकच अस्तित्वात नसतात. आपले जीवन जगून स्वतःचे अस्तित्व अनंतात विलीन करून ते कधीचेच फ़ोटोंमध्ये जाऊन बसलेले असतात. 


आपण आता पालक झालेले असतो आणि क्वचित असाच प्रसंग आपण व आपल्या पाल्यांबाबत घडतो. अशावेळी आपली मुले आपल्याला अशा घटनेचा जाब, कारणमीमांसा विचारतात. एकेकाळी आपले पालक झाले होते तसेच आपण निरूत्तर होतो, घटना लपवून ठेवतो, त्या अपमानाची, उपेक्षेची झळ आपापल्या पाल्यांना पोहोचू देत नाही.


आणि मग आपल्याला आपले आईबाप आठवतात. त्यांची माया आठवते आणि श्रीसमर्थांची उक्तीही आठवते.


जननीजनक माया लेकरू काय जाणे

पय न धरत मुखी हाणिता वत्स नेणे


- प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर 

अधिक ज्येष्ठ शके १९४८, 

२४ / ५ / २०२६

 

No comments:

Post a Comment