Showing posts with label कंसवध. Show all posts
Showing posts with label कंसवध. Show all posts

Wednesday, August 5, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ३६ कंसवध

जगातल्या अकारण संतापाचे आणि अहंकारचे नाव कंस. मनाने तो चांगला होता पण मनावर एकदा अहंकाराचे साम्राज्य प्रस्थापित झाले की इतरांनी केलेली कुठलीही कृती ही माझ्याविरूद्धच आहे, माझ्याविरूद्ध कट कारस्थाने रचण्यात येत आहेत अशी मनाची भावना होऊन मनाला अनावर संताप होतो. आणि अशावेळी जर हातात सत्ता असेल तर काय उत्पात होऊ शकतात याचे उदाहरण म्हणजे कंस. श्रीकृष्ण आणि बलराम गोकुळात सुखेनैव वाढताहेत ही आकाशवाणी झाल्यानंतर त्याने वसुदेवांना आणि देवकीला पुन्हा तुरूंगात टाकले होते आणि अक्रूराला या दोन भावंडांना मथुरेत आणण्यासाठी गोकुळात धाडले होते.


अक्रूर या दोन भावंडांना घेऊन गोकुळाहून निघाला. मथुरेच्या बाहेर या सर्वांनी आपला रथ थांबवला. श्रीकृष्ण आणि बलरामदादा मथुरेच्या सुंदर आणि मधूर पाण्यात स्नान करून आपला थकवा दूर करू लागलेत. अक्रूरानेही त्या जलात एक बुडी मारली तर जलात त्याला शेषशायी नारायणाचे दर्शन झाले. प्रत्यक्ष श्रीकृष्ण नारायण म्हणून आपल्या सर्व अलंकारांनिशी आणि गणांनिशी जलात विराजमान होते आणि मंदमंद हसत होते. अक्रूराने पाण्याबाहेर डोके काढले तर त्याला रथावर हे दोन्हीही बंधू दिसेनाता आणि जलात बुडी मारून बघतो तर शेषावतार बलरामदादा आणि नारायणावतार श्रीकृष्ण हे दोघेही त्याला दिसलेत. भगवंतांच्या साक्षात दर्शनाने अक्रूराचे मन अगदी निर्मळ झालेत आणि बाहेर येऊन त्याने भगवंतांची स्तुती आरंभिली. श्रीमदभागवताच्या दशम स्कंधातल्या चाळीसाव्या अध्यायातील ही स्तुती मूळ संस्कृतातूनच वाचण्यासारखी आणि कायम वाचनात ठेवण्यासारखी आहे. अक्रूराला जसे प्रत्यक्ष दर्शन भगवंतांनी दिले तसे ते आपल्यालाही आयुष्यात एकदा तरी व्हावे ही आस आपल्या मनात सदैव जागृत ठेवणारी ही अक्रूरस्तुती आहे.


अक्रूरासोबत ही दोन्हीही भावंडे मथुरेत प्रवेशकर्ती झालीत. भगवंत मथुरेचे वैभव बघतच राहिलेत. अत्यंत सुंदर घरे, गोपुरे, सोन्या, रूप्यांनी मढवलेले घरांचे दरवाजे, कौले, अनेक सुंदर उपवने, प्रशस्त रस्ते यांनी ते नगर अत्यंत सुशोभित झालेले होते. मथुरेवर राज्य करणा-या आजवरच्या अनेक राज्यकर्त्यांच्या नियोजनाचे, दूरदृष्टीचे आणि पुण्याईचे फ़ळ म्हणजे ते सुंदर नगर होते. आपल्या हिंदू संस्कृतीत मथुरेचा उल्लेख आजही मोक्षदायिनी असलेल्या सात नगरींमध्ये केला जातो.



श्रीकृष्ण आणि बलराम मथुरेच्या मार्गांमधून मार्गक्रमण करीत असताना मथुरेतल्या लोकांची त्यांना पाहण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. गोकुळातले श्रीकृष्णाचे पराक्रम माहिती असलेल्या, त्याचे लोभसवाणे रूप ऐकून आसुसलेल्या आणि कंसाच्या अहंकारी आणि संतापी राजवटीला कंटाळलेल्या प्रजाजनांना आपला तारणकर्ता बघण्यासाठी अतिशय उत्कंठा लागणे स्वाभाविक होते. मार्गातून चालत असताना त्यांना एक अतिशय सुंदर मुखाची पण शरीराने तीन जागी वक्र असलेली कुब्जा नावाची कंसाची दासी दिसली. तिच्या हातात नुकतेच उगाळलेले चंदन होते. तिने उगाळलेले चंदन ती रोज कंसाच्या अंगाला लावून द्यायची. ते चंदन कंसाला अतिशय प्रिय होते. श्रीकृष्णांनी कुब्जेला ते चंदन त्यांना आणि बलरामदादांना लावण्याची आज्ञा दिली. कुब्जेने अतिशय आनंदाने श्रीकृष्णाला आणि बलरामदादांना ते चंदन समर्पित केले. भगवंतांना चंदन फ़ार आवडले आणि त्यांनी कुब्जेवर कृपा करण्यासाठी एका हाताने तिचे दोन्हीही पाय दाबून ठेवले आणि दुस-या हाताने तिच्या हनुवटीवर खालून प्रहार केला. त्यासरशी कुब्जेच्या शरीराचा वाकडेपणा दूर झाला आणि मुळातच अतिशय सुंदर असलेली ती आता सुंदर शरीरामुळे अतिशय सुंदर दिसू लागली. मनाचा वाकडेपणा आपल्याला भगवंताच्या निकट जाऊ देत नाही पण बाह्य शरीराचा सरळपणा किंवा वाकडेपणा याची तमा भगवंतांना आणि त्यांच्या भक्तांनाही नसते.


यापुढील मार्गात भगवंतांना कंसाचा सेवक असलेला एक धोबी राजवस्त्रे घेऊन कंसाच्या महालाकडे जाताना दिसला. भगवंतांना  प्रवासातली मलिन वत्रे टाकून प्रसंगाला उचित अशी राजवस्त्रे परिधान करण्याची इच्छा झाली. त्यांनी त्या धोब्याला तशी आज्ञा केली. पण कंसाच्या पाठिंब्यामुळे उद्दाम झालेल्या त्या धोब्याने तसे करण्यास साफ़ नकार दिला. भगवंतांनी त्याला क्षणार्धात ठार केले आणि त्याच्या जवळील वस्त्रांचा गठ्ठा घेऊन, तो उलगडून त्यातली पाहिजे ती वस्त्रे स्वतः परिधान केलीत, बलरामदादांना परिधान करविलीत आणि इतर वस्त्रे तशीच मार्गात टाकून देऊन भगवंत पुढे निघालेत.


कंसाने ज्या धनुर्यज्ञाच्या आयोजनासाठी श्रीकृष्ण आणि बलरामांना बोलाविले होते त्या यज्ञस्थळी हे दोघेही बंधू जाऊन ठाकलेत. तिथे इंद्रधनुष्यासारखे एक प्रचंड आणि सुंदर धनुष्य़ ठेवण्यात आलेले होते. त्यावर अनेक आभुषणे लावून त्याची पूजा करून ते धनुष्य तिथे ठेवलेले होते. त्याच्या रक्षणार्था आजुबाजूला अनेक राक्षस कंसाने उभे केलेले होते. श्रीकृष्ण आणि बलराम हे दोघेही बंधू तिथे पोहोचले आणि त्यांनी क्षणार्धात ते धनुष्य हाताने तोडले. त्या तुटण्यामुळे मथुरेत सर्वत्र भयंकर असा ध्वनी निर्माण झाला आणि कंसाच्या कानी तो ध्वनी गेल्यानंतर त्याला धडकीच भरली. त्या धनुष्याचे रक्षण करण्यासाठी ठेवलेल्या राक्षसांनी श्रीकृष्ण आणि बलरामदादांवर हल्ला केला. पण त्या धनुष्याच्या झालेल्या तुकड्यांचीच शस्त्रे करून त्यांनी त्या सर्व राक्षसंचा वध केला. कंसाच्या कानी हा अतुलनीय पराक्रम जाताच त्याची झोप उडाली. तो मनोमन भयंकर अस्वस्थ झाला, युद्धापूर्वीच मनाने खचला. त्याला स्वतःचा मृत्यू जागेपणीच डोळ्यांसमोर दिसू लागला.


कंसाने दुस-या दिवशी सकाळी मल्लोत्सवाचे आयोजन केले होते. तिथे कंसाचे अंगरक्षक असलेले चाणूर आणि मुष्टिकासारखे अनेक मल्ल असणार होते. दुस-या दिवशी सकाळी उठून भगवान श्रीकृष्ण आणि बलरामदादा त्या मल्लोत्सवाच्या स्थळी जाण्यास निघाले. वाटेत कंसाच्या कुवलयापीड हत्तीने त्यांना अडविले. या दोन बंधूंनी माहुताला त्या हत्तीला मार्गातून हटविण्याची आज्ञा केली पण माहूताने ते ऐकले नाही उलट त्या हत्तीलाच या दोन बंधूंना चिरडून टाकण्यासाठी यांच्या अंगावर सोडले. आता मात्र श्रीकृष्ण संतापले. त्यांनी अत्यंत चपळाईने त्या हत्तीची युद्ध केले आणि दोन्हीही बंधूंनी त्या हत्तीचे दोन्हीही दात उपटून त्याला धराशायी केले त्या दातांनीच त्या हत्तीचा आणि माहूताचा वध करून हे दोघेही बंधू त्या मल्लोत्सवाच्या ठिकाणी प्रवेशकर्ते झालेत.


मल्लोत्सवानिमित्त मोठ्या पटांगणात एका आखाड्यात अनेक मल्ल आलेले होते. त्या पटांगणाभोवती अनेक राजांची आणि प्रजाजनांचीही बसण्याची व मल्लयुद्ध अवलोकन करण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. तिथे कंसासोबत अनेक राजे महाराजे आणि मथुरेतील मंडळी बसलेली होती. खांद्यावर नुकतेच उपटलेले रक्तबंबाळ हस्तीदंत घेऊन श्रीकृष्ण आणि बलराम त्या मल्लोत्सवाच्या ठिकाणी आलेत. त्यांना तिथे आलेले बघितल्यानंतर पहेलवानांना दोन वज्रकठोर शरीरे दिसलीत, सर्वसामान्य प्रजाजनांना दोन नररत्ने दिसलीत, मथुरेतील स्त्रियांना मूर्तिमंत कामदेव दिसलेत, गोपांना आपले स्वजन दिसलेत, तिथे असलेल्या दुष्ट राजांना ते क्रूर शासक दिसलेत, वयोवृद्ध नागरिकांना हे दोन अत्यंत गोड असे शिशू दिसलेत तर कंसाला हे दोघे प्रत्यक्ष मृत्यू दिसू लागलेत. जसा ज्याचा भाव तसा तसा त्या जीवाला भगवंत दिसत असतो. सर्व जीवांना आपापल्या मनातल्या भावानुरूप नवरसांचा साक्षात्कार या दोन भावांच्या दर्शनाने झाला होता.


कंसाच्या दुष्ट योजनेजुसार मुष्टिक आणि चाणूरांनी या भावांना मल्लयुद्धासाठी ललकारले. श्रीकृष्णासोबत चाणूर आणि बलरामदादांसोबत मुष्टिक मल्लयुद्ध खेळू लागलेत. दैवी शक्तीसमोर त्यांच्या आसुरी शक्तीचा अजिबात पाड लागला नाही. दोन्हीही बंधूंनी कंसाच्या या दुष्ट मल्लांचा पाडाव केला. आपले अंगरक्षक मल्ल असे मारले गेलेले पाहिल्यावर आता मात्र कंस बावचळला, वेड्यासारखा बडबडू लागला, आपला पिता उग्रसेन आणि वसुदेव देवकी यांना ठार मारण्याची आज्ञा देऊ लागला. श्रीकृष्णाने आखाड्यातून थेट कंसासमोर उडी मारली. कंसाने श्रीकृष्णाला मारण्यासाठी आपली तलवार उपसली आणि त्याच्यावर वार करू लागला. श्रीकृष्णाने मोठ्या चपळाईने तो वार चुकवला आणि कंसावर हवेतून उडीच मारली. ती उडी अंगावर पडताक्षणी कंसाने आपले प्राण सोडले. पृथ्वीचा रागाचा आणि दुष्टपणाचा भार हलका झाला. "परित्राणाय साधुनाम, विनाशायच दुष्कृताम" हे वचन भगवंतांनी खरे केले.



श्रीकृष्ण जन्माच्या आधीपासूनच द्वेषभावनेने का होईना पण सतत त्याचाच ध्यास घेतल्याने कंसाच्या शरीरातून त्याच्या मृत्यूपश्चात एक दिव्य ज्योत निघाली आणि ती भगवंतांच्या हृदयात जाऊन स्थिरावली. कुठल्याही भावनेने का होईना पण सतत आपला ध्यास घेतलेल्या एका दुष्टालाही भगवंतांनी मुक्ती दिली.


भगवंताचे सतत अनुसंधान ठेवा, त्याचे सतत स्मरण करीत रहा, त्याच्याशी कुठले ना कुठले नाते सतत जोडून ठेवा, त्याचा सदैव आठव करीत रहा असे अनेक संतमंडळी आपल्याला सांगत असतात ते याचसाठी. अहो, त्याने सतत ध्यास घेणा-या शत्रूला आपल्यापासून अंतिम समयी दूर केले नाही मग आपल्या भक्तांना तो त्यांच्या अंतिम समयी कसा बरे सोडेल ? आपणा सर्व भक्तमंडळींच्या अंतिम समयी आपली जीवनज्योत त्या भगवंताच्या चरणी विलीन होऊन आपल्या आजवरच्या अनेक जन्मांचे सार्थक व्हावे हीच प्रार्थना आज त्या भगवंताच्या चरणी करतो आणि विरमतो.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण सप्तमी शके १९४८ दिनांक  ५ / ८ / २०२६


५ ऑगस्ट २०२६