Showing posts with label Samruddhi Expressway. Show all posts
Showing posts with label Samruddhi Expressway. Show all posts

Saturday, June 7, 2025

समृद्धीचा समृद्धी महामार्ग

दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोजी बहुचर्चित नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले आणि परवा ५ जून २०२५ रोजी संपूर्ण महामार्गे वाहतुकीसाठी सर्व जनतेला उपलब्ध झाला. समृद्धी महामार्ग, त्यात आलेल्या अडचणी, त्यामागचे राजकारण हे आपण बाजूला ठेवूयात कारण त्यातला एक एक मुद्दा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. या समृद्धी महामार्गाने जोडल्या गेलेल्या भूभागात रहाणा-या सर्वसामान्य जनतेचा विशेषतः शेतक-यांचा नक्की काय आणि कसा फ़ायदा होऊ शकतो ? या गोष्टीवर आपण आज विचार करूयात.


कुठल्याही दोन बिंदूंमधले कमीत कमी अंतर त्या बिंदूंना जोडणारी सरळ रेषा असते हे भूमितीय तत्व ध्यानात ठेऊन महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर असा सरळ मार्गाने जोडण्याचा प्रयत्न २० वर्षांपूर्वी झालेला होता. नागपूर - बुटीबोरी - वर्धा - पुलगाव - कारंजा (लाड) - मालेगाव (जहॉंगीर) - मेहेकर - सुलतानपूर -न्हावा - जालना - छत्रपती संभाजीनगर - वेरूळ - कोपरगाव - सिन्नर - घोटी  असा सरळ रेषेतला एक राज्य महामार्ग बांधला गेला होता. घोटीनंतर मात्र इगतपुरी - कसारा - शहापूर - पडघा या राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ (तत्कालीन आग्रा - मुंबई महामार्ग) मार्गे हा राज्यमार्ग मुंबई - ठाण्यात पोहोचत होता. समृद्धी महामार्ग येणार आणि तो सुद्धा या जुन्या महामार्गाला जवळपास समांतर जाणार असे वाचण्यात आल्यानंतर मनात उगाचच काही शंका येऊन गेल्यात पण दिनांक ३० डिसेंबर २०२२ रोजी समृद्धी महामार्गावरून पहिला प्रवास घडला आणि सगळ्या शंकांचे निरसन झाले.


समृद्धी महामार्गाची काही ठळक वैशिष्ट्ये


अ) हा महामार्ग हा सगळ्या एक्सप्रेस वें सारखा नियंत्रित प्रवेश असलेला महामार्ग आहे. या महामार्गावर अतिशय हळू चालणारी वाहने म्हणजे बैलगाड्या, ट्रॅक्टर्स, सायकली, दुचाकी वाहने यांना प्रवेश नाही. संपूर्ण महामार्गावर बाजूने कुंपण घातलेले आहे आणि या महामार्गावर प्रवेश किंवा निर्गमन त्यासाठी निर्माण केलेल्या मार्गानेच होऊ शकते. अशा प्रवेश किंवा निर्गमन ठिकाणांवर शासनाचे नियंत्रण आहे त्यामुळे अनधिकृत घुसखोरी नियंत्रित केल्या जाते.


आ) या महामार्गावर मध्ये मध्ये कुठेही टोल नाके नाहीत. जो काही टोल घ्यायचा तो हा महामार्ग सोडल्यानंतर त्या त्या गावांमध्ये प्रवेश करताना असलेल्या टोल नाक्यावर घेतला जातो. त्यामुळे मुंबई - पुणे एक्सप्रेस वे सारखे मुंबईवरून बंगलोरला जाणा-या प्रत्येक वाहनाला सुद्धा खालापूर, उर्से अशा सगळ्या टोलनाक्यांवर थांबावे लागते आणि इतर वाहनांचा उगाचच खोळंबा होतो तशी वेळ इथे येत नाही. टोलनाक्यावरची ती संपूर्ण वाहतूक प्रत्येक गावागावात शिरताना विभाजित होत जाते. प्रत्येकाचाच वेळ वाचतो.


इ) हा महामार्ग संपूर्ण उंचावलेला आहे. त्यासाठी जवळपास ३ ते ५ मीटर्सचा भराव सर्वत्र आहे. आणि इथेच जुन्या राज्यमार्गाचे आणि समृद्धी महामार्गाचे वेगळेपण अधोरेखित होते. जुना राज्यमार्ग समृद्धीला समांतर जरी असला तरी तिथला प्रवास जमिनीच्याच स्तरावर होत असतो आणि त्यामुळे मार्गातली गावे, तिथली वाहतूक, तिथले स्पीडब्रेकर्स यांचा सामना करीत प्रवास करावा लागतो. मला आठवतंय जुन्या राज्य महामार्गावर मेहेकर शहरात बाह्य वळण मार्ग तयार होण्यापूर्वी मेहेकर शहर पार करायला वाहनांना जवळपास २५ ते ३० मिनीटे लागायचीत. मेहेकर शहरातली वाहतूक, तिथल्या छोट्याचा नदीवरचा अरूंद पूल ही सगळी कारणे त्याला होती. थोड्याफ़ार फ़रकाने प्रत्येक शहरात हीच अवस्था व्हायची. पण समृद्धी हा मार्गावरच्या कुठल्याही गावातून किंवा त्यांच्या बाह्य वळण मार्गांवरून जात नाही. प्रत्येक गावातून जाताना त्याचे आपले स्वतंत्र आणि उच्चस्तरीय अस्तित्व आहे. त्यामुळे संपूर्ण महामार्गावर एका विशिष्ट वेगाने आपला प्रवास होऊ शकतो. सुरूवातीला समृद्धी महामार्गावर स्पीड ब्रेकर्स पण नव्हते पण काही अपघातांनानंतर काही ठिकाणी तिथे रंबल पट्टी बसवल्या गेली. तरीही समृद्धीवर प्रवास करताना जर आपण आपल्या गाडीचा वेग ताशी ८० किलोमीटर्स ठेवला तरी ४, ५ तासांच्या सलग प्रवासानंतर आपला सरासरी वेग ७७ ते ७८ किलोमीटर्स प्रतितास इतका येऊ शकतो. मुंबई - पुणे एक्सप्रेस वे सकट इतर कुठल्याही रस्त्यांवर जर आपण ताशी ८० किलोमीटर्स वेग ठेवला तर इतर अनेक अडथळ्यांमुळे आपला सरासरी वेग फ़क्त ५० किलोमीटर्स प्रतितास इतकाच येतो. समृद्धीचा हा सगळ्यात मोठ्ठा फ़ायदा आहे. 


अर्थात सलग किती वेळ गाडी चालवायची ? या मुद्याला अनेक पदर आहेत आणि अनेक मतांतरे आहेत. माझ्या मतानुसार प्रत्येक ड्रायव्हरची सलग एखादी गाडी चालवण्याची क्षमता वेगवेगळी असते आणि ती प्रत्येकाने ओळखून आपापली गाडी चालवली पाहिजे आणि त्याच्या या क्षमतेचा इतर प्रवाशांनी, मालकांनी आदर केला पाहिजे.


या महामार्गावर ट्रक्ससुद्धा जर ताशी ८० किलोमीटर्स या वेगाने चालवलेत तर साधारण ८०० किलोमीटर्स चे अंतर साधारण १२ तासांत ते सहज आणि आरामात कापू शकतात (प्रवासाला १० तास आणि जर मध्ये दोन वेळा अर्ध्या ते पाऊण तासाची विश्रांती, भोजन, अल्पोपहार करावा लागला तर त्यासाठी २ तास). इतर कुठल्याही महामार्गाने हेच ८०० किलोमीटर्स चे अंतर कापायला ट्रक्सना २० ते २४ तास लागतील. कारण प्रत्येक गावात शिरताना, बाहेर पडताना अनंत अडथळ्यांमुळे ट्रक्सचा वेग जो कमी होतो तो पुन्हा गाठायला त्यांना फ़ार वेळ लागतो आणि प्रवासाचा वेळ वाढला की विश्रांतीचा वेळ वाढतो, एकाऐवजी २ भोजने, अल्पोपहार यासाठी वेळ द्यावा लागतो. समृद्धी महामार्गाची ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. आणि म्हणूनच समृद्धी महामार्गावर वेग नियंत्रक (स्पीड ब्रेकर्स) लावण्याची मागणी पुढे आली की त्या सगळ्यांच्या अज्ञानाची कीव करावीशी वाटते. नाही, अपघात कमी व्हावेत ही सगळ्यांचीच प्रामाणिक इच्छा आहे पण त्यासाठी इतर मार्ग सुद्धा आहेत. त्यावर उअपाय म्हणून समृद्धी महामार्गावर वाहनांचा वेग हे असे वेग नियंत्रक लावून कमी करणे हे म्हणजे रोगापेक्षा उपाय भयंकर झाले. समृद्धी महामार्गाच्या मूळ हेतूलाच नख लावणे झाले.


पण सुरूवातीपासून बहुतेक सगळ्यांनी समृद्धी महामार्गाचा हा पैलू दुर्लक्षित केला आणि समृद्धी महामार्ग "बे काय कार चालवली बे, १२० च्या स्पीडनी. बस्स ४ तासात शिर्डीले गेलो नागपूरवरून." अशा फ़ुशारक्या, नागपुरी भाषेत फ़ोकनाड्या मारण्यातच आपली तरूण आणि मध्यमवयीन पिढी रमली. समृद्धी महामार्गाने कमी वेळात आणि त्यामुळे अर्थातच कमी खर्चात मालवाहतूक करून आपण समृद्ध पश्चिम महाराष्ट्र, खान्देशशी जोडल्या जाऊ शकतो हे फ़ार कमी शेतक-यांच्या ध्यानात आले.


त्यानंतर समृद्धी महामार्गावरून माझे १०, १२ प्रवास झालेत. दरवेळी त्यावर प्रवास करणा-या ट्रक्सच्या नंबर्सवरून आणि ट्रक्समध्ये भरलेल्या मालावरून माझ्या लक्षात आले की नगर, नाशिक जिल्यातला कांदा आणि तत्सम शेतमाल नागपूर आणि पुढे छत्त्तीसगढला मोठ्या प्रमाणात पाठवला जातोय पण त्याप्रमाणात नागपूर, वर्धा, अमरावती इथला कापूस, संत्री इत्यादी शेतमाल मात्र नाशिक, पुणे, मुंबई इथे पाठविण्यात येत नाही. खरेतर नागपूर ते मुंबई या मालाच्या प्रवासाला १५ तास जरी लागलेत तरीही हा प्रवास रेल्वेपेक्षाही वेगवान आहे. विदर्भ मराठवाड्यातल्या तथाकथित मागास भागातला शेतमाल फ़ळे असा लवकर मुंबईत किंवा मुंबई बंदरातून परदेशात रवाना व्हायला लागला की इथल्या शेतक-यांकडे, सर्वसामान्य नागरिकांकडे, व्यापा-यांकडे या समृद्धी महामार्गाचा खरा फ़ायदा पोहोचेल.चा


या महामार्गावर होणा-या अनेक अपघातांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की ९० टक्के अपघात केवळ खालील तीनच कारणांमुळे झालेले आहेत.


१. अतिशय वेगात गाडी (विशेषतः कार्स) चालविल्यामुळे वेग अनियंत्रित होऊन.

२. रात्रीच्या वेळेत पुरेशा विश्रांती अभावी गाडी चालविल्याने गाडीच्या चालकाला झोप लागल्याने.   

३. हा मार्ग काही काही ठिकाणी वन्यप्राण्यांच्या अधिवासातून जात असल्याने अचानक वन्य प्राणी वाहनासमोर आल्याने व त्या गडबडीत वाहन अनियंत्रित झाल्याने.


यातल्या पहिल्या कारणासाठी आजकाल उपाय योजना सुरू झाल्याचे कळते आहे. एका ठिकाणावरून दुस-या ठिकाणी पोहोचताना जर सरासरी वेग १२० किलोमीटर्स प्रतितास पेक्षा जास्त आढळला असेल आणि वाहन १२० किलोमीटर्स प्रतितास या वेगाने लागणा-या वेळापेक्षा कमी वेळात गंतव्य स्थानी पोहोचले असेल तर उरलेला वेळ ते वाहन त्या टोलनाक्यावरून पार जाऊ शकत नाही. म्हणजे उगाचच गाडी १५० - २०० वेगाने चालवूनही जर शेवटी थांबावेच लागणार असेल, वेळ वाचणारच नसेल तर असे प्रताप करण्याकडे लोकांचा कल कमी होईल.


दुस-या कारणासाठी आपण कृत्रिम बुद्धीमत्त्तेचा वापर करू शकतो. महामार्गावर प्रत्येक १०० - १५० मीटर्सवर असे कृत्रिम बुद्धीमत्त्तेने युक्त (A. I. Enabled) कॅमेरे लावून त्यात आपण त्या वाहनाच्या चालकाचे विश्लेषण करू शकतो आणि त्यावर उपाय म्हणून ते वाहन जर झोपाळू अवस्थेतला चालक चालवित असेल तर ते वाहन त्या त्या कॅमे-यासमोरून जात असताना प्रत्येक १०० - १५० मीटर्सवर अलार्म, हूटर वाजेल अशी व्यवस्था असावी. त्यात तो चालक, गाडीतले इतर सहप्रवासी, आसपास धावणारी वाहने आणि महामार्ग पोलीसही सतर्क होतील आणि अशा वाहनाला थांबवून दुसरा चालक किंवा असलेल्या चालकाची विश्रांती पूर्ण होईपर्यंत हे वाहन महामार्गावर धावणार नाही याची व्यवस्था करता येईल.


तिसरा प्रकार टाळण्यासाठी या रस्त्यावर जागोजागी वन्य प्राण्यासांठी पूल बांधलेले आहेत. तरीही वन्य प्राण्यांच्या अधिवास क्षेत्रातून वाहन चालवताना सगळ्याच चालकांनी आपापल्या वाहनांचे वेग थोडे स्वनियंत्रित केलेलेच बरे. वन्य प्राण्यांना कळत नाही पण बुद्धीमान प्राणी म्हणून मनुष्यमात्रांनीच आपली आणि त्यांची थोडी काळजी घ्यायला हवी.


समृद्धी महामार्ग हा विदर्भ, मराठवाडा आणि छत्त्तीसगढमधल्या मागास भागासाठी खरोखर समृद्धीचा मार्ग बनू शकेल जर या महामार्गाद्वारे शेतमालाची, खनिजांची वाहतूक विकसित पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईतल्या कारखान्यांपर्यंत जलद होऊ शकेल. त्यासाठी महामार्गातल्या सगळ्या प्रवेश आणि निर्गमन द्वारांजवळ कच्च्या मालाची कोठारे (गोडाऊन्स) तसेच त्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे छोटे छोटे कारखाने उभे राहिलेत आणि त्यात तिथल्या स्थानिक कुशल, अकुशल आणि अर्धकुशल मनुष्यबळाचा वापर झाला तर समृद्धीची ही गंगा खरोखर खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचेल. सर्वांचेच जीवन समृद्ध होईल.


या महामार्गावर एस. टी. ने सुद्धा आपल्या नवनवीन कल्पनांद्वारे प्रवाशांचा प्रवास सुखकर करणारे मार्ग शोधून काढायला हवेत आणि स्वतःचीही समृद्धी साधायला हवी. आज खाजगी गाड्या या महामार्गाचा पाहिजे तसा उपयोग करू शकत नाहीत पण एस. टी. ला जर शासनाने या महामार्गावरून जाण्यासाठी टोल मध्ये आणि इतर काही सवलती दिल्यात तर एस. टी. साठी हा महामार्ग खरोखर समृद्धीचा ठरू शकेल.


उदाहरणार्थ नागपूर ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गावर एस. टी. ने आपली शयनयान सेवा सुरू केली आणि नागपूरवरून रात्री १०, १०:३० वाजता निघालेल्या एस. टी. ने वर्धा येथील महामार्गावरील निर्गमन थांब्याजवळ रात्री ११, ११:३० वाजता थांबून तिथले प्रवासी घेऊन पहाटे पहाटे ५ च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर गाठले तर ते सगळ्याच प्रवाशांना फ़ार सुखकर होईल. तशीच सेवा थेट नागपूर ते नाशिक ठाणे / मुंबई दरम्यान सुरू केल्या जाऊ शकेल. एस. टी. च्या गाड्या ८० किलोमीटर्स प्रतितास या वेगावर लॉक्ड असल्या तरी समृद्धीवर त्यांचा सरासरी वेग ७५ किलोमीटर्स प्रतितास गाठल्या जाऊ शकतो. नागपूर ते मुंबई हा प्रवास १४ ते १५ तासात पूर्ण होऊ शकतो. रेल्वेने प्रवास करणारे काही काही प्रवासी इकडे वळविल्या जाऊ शकतात. फ़क्त एस. टी. अधिका-यांनी "सामर्थ्य आहे चळवळीच, जो जे करील तयाचे" ही उक्ती लक्षात ठेऊन प्रामाणिकपणे प्रयत्न करणे जरूरीचे आहे. 



सध्या या महामार्गावर पुरेशा ठिकाणी अल्पोपहार, भोजन, विश्रांती यासाठी व्यवस्था नाहीत हीच एक मोठी अव्यवस्था आहे. अर्थात त्याची पण काहीतरी सोय होईल आणि केवळ वेगाने गाडी चालवता येते म्हणून धनदांडग्यांच्या गाड्या वेगाने चालविता येणारा महामार्ग ही त्याची सध्याची प्रतिमा पुसून टाकून हा महामार्ग ख-या अर्थाने विदर्भ आणि मराठवाड्यासाठी समृद्धीची गंगा ठरेल असा मला विश्वास आहे.





- समृद्धी महामार्गावर, त्याच्यातल्या स्थापत्य अभियांत्रिकी कौशल्यांवर अपार प्रेम असलेला, आणि विदर्भाच्या समृद्धीची अपार कळकळ असला, एक विदर्भप्रेमी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


शनिवार, ७ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५


Saturday, December 31, 2022

समृद्धी महामार्गावरची पहिली सफ़र : नागपूर - कारंजा - नागपूर

कारंजा (लाड) हे परम पूजनीय श्रीनृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांचे जन्मस्थान. जन्मानंतर ८ व्या वर्षी महाराजांची मुंज इथेच झाली आणि त्यांनी आयुष्याच्या सुरूवातीची एकूण ११ वर्षे इथे सलग वास्तव्य केले असा उल्लेख आहे. किन्हीकरांचेही हेच मूळ गाव.

दरवर्षी षौष शुध्द द्वितीया ते माघ वद्य प्रतिपदा या साधारण ४० दिवसांमध्ये कारंजाला परम पूजनीय श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांचा श्रीशैलगमन यात्रा उत्सव इथे पार पडत असतो. कोरोना निर्बंधाची मधली २ वर्षे सोडलीत तर यात्रेदरम्यान दर्शनाचा आमचा परिपाठ महाराजांच्याच कृपेने चाललेला आहे.
यावर्षी समृध्दी एक्सप्रेसवे वरून नागपूरवरून कारंजा अवघ्या २ तास १५ मिनीटांवर आलेय. समृध्दी महामार्गावरचा गाडीचालनाचा पहिलाच अनुभव या व्लाॅगमध्ये चित्रित करण्यात आलेला आहे.