Tuesday, July 20, 2021

मध्य रेल्वेः नागपूर विभाग, एक गरीब बिच्चारा विभाग.

 अरे वा ! शेवटी महाराष्ट्र एक्सप्रेस मध्यप्रदेशमधल्या रीवापर्यंत वाढवण्याचा निर्णय मागे घेतला तर.

मला वाटलं होतं की या गतीने आणि गाड्या पळविण्याच्या वृत्तीने ही गाडी
२०२१ मध्ये रीवा,
२०२२ मध्ये प्रयागराज,
२०२३ मध्ये मंडुआडीह,
२०२४ मध्ये मालदा टाऊन,
२०२५ पर्यंत कामाख्या
आणि
२०२६ मध्ये आगरताळ्यापर्यंत ही गाडी नेऊनच रेल्वेवाले स्वस्थ बसताहेत की काय ?
तरी बरं, इकडे कोल्हापूरला dead end आहे म्हणून. उद्या कोल्हापूर - रत्नागिरी रेल्वे मार्ग झालाच तर ही गाडी रत्नागिरी, कणकवली, करमाळी, मडगाव, मंगलोर, शोरनूर, एर्नाकुलम, थिरूवनंतपुरम मार्गे कन्याकुमारीपर्यंत वाढवली असती.
मध्य रेल्वेचा नागपूर विभाग हा "मुकी बिचारी कुणीही हाका" असा आहे ? की यांनाच आपल्या गाड्यांचा maintenance करण्याचा कंटाळा येतो ? हे कळण्यापलिकडचे आहे.
नागपूर - कोल्हापूर दीक्षाभूमी एक्सप्रेस पार धनबादपर्यंत पळवली.
नागपूरकर चाकरमान्यांना नागपूरवरून रविवारी संध्याकाळी ६.०० वाजता निघून सोमवारी सकाळी ७.३० पर्यंत मुंबईत पोहोचवणारी, अत्यंत सोयीची, समरसता एक्सप्रेस पार हावड्यापर्यंत (ती पण चक्रधरपूर - पुरूलिया या आडमार्गाने) पळवली.
सिकंदराबाद - नागपूर एक्सप्रेस रायपूरपर्यंत पळवली.
विदर्भ आणि महाराष्ट्र एक्सप्रेस या गाड्या गोंदियाच्या तत्कालीन खासदारांच्या दबावाखाली उगाचच गोंदियापर्यंत वाढवल्या.



Computerised ticketing system च्या आजच्या काळात खरेतर गेल्या १५ वर्षांपासून आजवर किती प्रवाशांनी गोंदिया / तुमसर / भंडारा येथून थेट मुंबईपर्यंत प्रवास केलाय ह्या माहितीचे विश्लेषण काही मिनीटांत होईल आणि ९५ % प्रवासी नागपूरवरून प्रवास करताहेत हे लक्षात येईल. (कामठी ते मुंबई प्रवास करणारे प्रवासीही नागपूरचेच पकडायला हवेत कारण नागपूर - मुंबई प्रवासासाठी pooled quota waiting list लागल्यावर त्यात तिकीट घेऊन वाट बघत बसण्यापेक्षा सरळ ४० - ५० ₹ जास्त दराने उपलब्ध असलेले कामठी ते मुंबई boarding at Nagpur असे तिकीट सगळे काढतात हे उघड गुपीत आहे.)
मग विदर्भ आणि महाराष्ट्र पुन्हा नागपूरवरूनच सोडून त्या गाड्यांच्या वेळात गोंदिया - नागपूर - गोंदिया या मार्गावर सर्व अप डाऊन करणार्‍यांना सोयीची, सर्व स्टेशनांवर थांबणारी, झपकन वेग घेणारी, चढ उतार करायला सोयीची अशी "मेमू" (Mainline Electric Multiple Unit) लोकल सुरू करायला हवी.
मध्येच सेवाग्राम एक्सप्रेसलाही रामटेकपर्यंत वाढवण्याची एक अशीच हास्यास्पद मागणी पुढे आली होती. आतासुध्दा सेवाग्राम एक्सप्रेस नवीनच रूंदीकरण केलेल्या मार्गाने छिंदवाड्यापर्यंत वाढविण्याचीही चर्चा सुरू आहेच.
आता नागपूर दुरांतो भोपाळपर्यंत वाढवा म्हणजे सुटलात सगळे.
नागपूरच्याच सगळ्या गाड्या यांना बरोबर सापडतात ते. इतके वर्षांपासून सुरू असलेली गोंदिया - बरौनी एक्सप्रेस कधी नागपूरपर्यंत (मध्य रेल्वेची एव्हढीच allergy असेल तर तुमच्या हद्दीत असलेल्या इतवारीपर्यंत तरी ?) वाढवण्याची साधी मागणीही होत नाही.
गोंदिया - रायगड जनशताब्दी, गोंदिया - झारसुगडा पॅसेंजर कम एक्सप्रेस, उन्हाळी मौसमात सुरू होत असलेली गोंदिया - हावडा उन्हाळी विशेष या गाड्यांच्या मार्ग विस्तारावर नागपूरकरांचे कधीच लक्ष जात नाही. इथल्या प्रवासी संघटनांमध्येही सगळ्या अमराठी लोकांचे वर्चस्व असल्याने ते पण नागपूरच्या गाड्या मध्यप्रदेशात, छत्तीसगढमध्ये वाढवायला विरोध करीत नाहीत.
हैद्राबाद - तिरूपती एक्सप्रेसचा विस्तार पहिल्यांदा निजामाबाद आणि नंतर आदिलाबादपर्यंत होतो. पण आदिलाबादवरून १८० किमी दूर असलेल्या नागपूरपर्यंत होत नाही. याउलट नंदिग्राम एक्सप्रेसचा नागपूर ते नांदेड मार्ग रद्द करून ही गाडी नांदेडपर्यंतच धावते.
आता गरज आहे नागपूरच्या लोकप्रतिनिधींनी यावर ठाम भूमिका घेण्याची. नागपूरकरांनी एक गब्बर शेर खासदार म्हणून संसदेत पाठवलाय हे दाखवून देण्याची.
याबाबत चंद्रपूरचे माजी खासदार हंसराजभैय्या अहिर यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. चंद्रपूर / बल्लारशहाला रेक मेन्टेनन्स सोयी नाहीत म्हणून मुंबई - बल्लारशहा, पुणे - बल्लारशहा या गाड्या त्यांनी काजीपेठ पर्यंत वाढवायला परवानगी दिली पण या दोन्ही गाड्यांना वर्धेपर्यंत आरक्षणाचा जनरल कोटा ठेवायला त्यांनी आग्रह धरला आणि तसे करून घेतले. म्हणजे काजीपेठ - मुंबई किंवा पुणे प्रवासा इतकीच तिकीटे बल्लारशहा / चंद्रपूर / वरोरा / हिंगणघाट / वर्धा ते मुंबई किंवा पुणे या प्रवासासाठी उपलब्ध असतात आणि प्रवाशांची गैरसोय होत नाही.
पण अशी उदाहरणे विरळा आहेत.
- नागपूर विभागावर रेल्वेतर्फे होत असलेल्या घोर अन्यायाचा एक मूक दर्शक , रेल्वेफॅन राम.

Monday, July 19, 2021

बर्शेनच्या आठवणी

आमची आजी गॅस सिलींडरला "बर्शेन" म्हणत असे. आजोळी, चंद्रपूरला, सोवळेओवळे अगदी कडक असल्याने सोवळ्याचा स्वयंपाक हा खास घातलेल्या आणि दररोज दुपारी स्वयंपाकानंतर शेणाने सारवलेल्या चुलींवर होत असे आणि ओवळ्याचा स्वयंपाक गॅसवर. आमच्या आजोळच्या वाड्यातल्या त्या स्वयंपाकघराचे क्षेत्रफळच मुळी १००० ते १२०० चौरस फूट असेल. (आणि बाथरूमचे २५० चौरस फूट. त्यात पाण्याचे मोठ्ठे टाके, पाणी तापवायला लागणारी लाकडे ठेवण्याची जागा आणि पाणी तापविण्याचा बंब.)

जुन्या काळची ही मंडळी (आमची मातामही, तिच्या बहिणी, तिचे भाऊ) गॅसला "बर्शेन" म्हणण्याचे कारण काय ? याचा आम्ही बरेच वर्षे विचार केला.
आत्ता आत्ता समजतय. सध्याच्या Bharat Peroleum Corporation Limited या कंपनीचे जुने (१९७६ च्या राष्ट्रीयीकरणापूर्वीचे) नाव "बर्मा शेल कंपनी" असे होते. ब्रिटीशकालीन भारतात पेट्रोलियम पदार्थांचे उत्खनन प्रामुख्याने ब्रम्हदेशात होत असावे. म्हणून "बर्मा शेल"
त्या "बर्मा शेल" चा अपभ्रंश "बर्शेन" असा झाला असावा आणि जुन्या मंडळींच्या तोंडात "स्वयंपाकाचा गॅस" म्हणजे "बर्शेन" हे नाव दृढ झाले असावे. (जसे वनस्पती तूपाला डालडा)
- जुने ते सगळेच टाकावू नसते या मतावर दृढ विश्वास असणारा आणि आताही गीझरच्या जमान्यात तांब्याच्या बंबामध्ये तापवलेल्या पाण्याची ऊब, लाकडांचा जळका वास वगैरे शोधणारा पुरातन माणूस रामशास्त्री.

Sunday, July 18, 2021

प्रतिक्रिया आणि प्रतिसाद

 "इतरांनी माझ्याविषयी काय समज, गैरसमज करून घ्यायचेत तो त्यांच्या दृष्टीकोनाचा आणि थोडा खोलवर विचार केला तर त्यांच्या प्रारब्धाचाही भाग आहे.

पण त्यावर react होत बसण्यापेक्षा माझा responce हा केव्हाही positive वागणुकीचाच राहील हा माझ्या आजच्या कर्माच्या आणि पुढे तयार होणार्‍या प्रारब्धाचा भाग आहे."
हे ज्या व्यक्तिच्या लक्षात आणि आचरणात आले ती व्यक्ति अजिंक्य ठरते.

- "मनुष्य जीवनविषयक स्वानुभवात्मक तत्वज्ञान" या माझ्याच आगामी ग्रंथातून साभार.

Thursday, July 8, 2021

Gaunleted Tracks : काही जुन्या आठवणी.

 भारतीय रेल्वेवर आजवर तीन वेगवेगळ्या मितींचे लोहमार्ग होऊन गेलेत. आजकाल मेट्रोचा धरला तर चार.


१. ब्रॉड गेज : रूंदी १६७६ मिमी. (किंवा १.६७६ मी) आता हा असा अडनिडा आकडा ब्रॉड गेजसाठी का निवडला असेल ? याचे कुतुहल मला बरेच वर्षे होते.  मग लक्षात आले की ५ फ़ूट ६ इंचाला जर आजकालच्या मिमी मध्ये बदलले तर १६७६ मिमी होतात. ब्रिटीश शासित देशांमध्ये हाच रेल्वेमार्ग प्रामुख्याने आढळतो.


२. मीटर गेज : रूंदी १००० मिमी (१ मीटर) ज्या ठिकाणी भौगोलिक रचना जरा कठीण आहेत, जिथे ब्रॉड गेज शक्य नाही तिथे हा मार्ग वापरलाय. ब्रॉड गेजची वळणे अधिक अंतराची असतात. म्हणून ज्या पहाडी प्रदेशात तितकी जागा उपलब्ध नाही, तिथे हा गेज वापरलाय. इंदूर - महू - पाताळपाणी - ओंकारेश्वर - खांडवा - तुकईथड - अकोट - अकोला. हा मार्ग विंध्य आणि सातपुडा पर्वतांमधून जायचा आणि त्याकाळात आजच्या एव्हढ्या रेल्वे बांधकामाच्या सोयी / यंत्रे उपलब्ध नसायची म्हणून आत्ता आत्तापर्यंत हा मार्गे मीटर गेज होता. आता याच्या बदलाचे काम सुरू आहे.


३. नॅरो गेज : यात दोन प्रकार आहेत. 

अ. : रूंदी ७६२ मिमी (पुन्हा अडनिडा आकडा. अहो हे अंतर बरोबर २ फ़ूट ६ इंचाचे आहे. मोबाईल फ़ोनवर distance converter वरून करून बघताय ना ?)


आ : रूंदी ६१० मिमी (म्हणजे बरोब्बर २ फ़ूट अंतर)

४. स्टॅण्डर्ड गेज : आजकाल मेट्रोच्या निमित्ताने भारतात शिरकाव झालेली ही गेज. तसही जगभरात ५५ % गेजेस याच प्रकारातल्या आहेत म्हणा. "ब्रिटीश साम्राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता" वगैरे कितीही वल्गना ब्रिटीशांनी केल्यात तरी जगाच्या फ़ार थोड्या भूभागावर त्यांनी राज्य केलेय ही वस्तूस्थिती आहे. ब्रिटीशांच्या राज्यांशिवाय इतर सर्व जगात ही गेज वापरली जाते. 

रूंदी : १४३५ मिमी (४ फ़ूट साडेआठ इंच) कलकत्ता मेट्रो आणि इतर मेट्रोंसाठी याच रूंदीचा लोहमार्ग वापरला गेलाय. 


भारतात जुन्या छोट्या गेजेसचे मोठ्या गेजेसमध्ये परिवर्तन करताना, कठीण भूप्रदेशातून मार्ग काढताना, बहुतांशी वेळा रेल्वेने पूर्णतः नवीन आखणीचा रेल्वेमार्ग तयार केला. त्यामुळे काही काही ठिकाणी जुना मार्ग पूर्णपणे बंद न करताही नवा मार्ग टाकला गेला. महत्वाच्या स्टेशन्सवर दोन्ही रेल्वे मार्ग एकत्र यायचेत. अशावेळी जो रेल्वे मार्ग टाकायचे त्याला इंग्रजीत Gaunleted Track म्हणतात. (याचा मराठी प्रतिशब्द मी शोधण्याचा प्रयत्न केला, पण नाही मिळाला.)


२०११ मधील मथुरा ते इंदूर प्रवासात उज्जैन जवळ हा अशा प्रकारचा रेल्वेमार्ग सापडला. रतलाम ते इंदूर हा मीटर गेज आणि नागदा ते उज्जैन हा ब्रॉडगेज मार्ग असे एकत्र आलेले होते. दोन्हीही रेल्वेमार्गासाठी एक रूळ कॉमन आणि इतर दोन रूळ दोन प्रकारच्या रेल्वे मार्गांसाठी. खर्चात बचत. या प्रकारच्या रेल्वे मार्गांसाठी खाली आधारासाठी असलेले स्लीपर्स पण विशिष्टच प्रकारचे लागतात.

दोन्हीही लोहमार्ग एकत्र.


काही अंतर एकत्र चालल्यानंतर उज्जैन जवळ दोन्हीही मार्ग आपापल्या वेगळ्या वाटा चोखाळताना.

एकेकाळी मनमाड - औरंगाबाद - परभणी - पूर्णा मार्गाच्या रूंदीकरणातही अशा प्रकारचा Gaunleted Track वापरण्याचा तत्कालीन रेल्वेमंत्री सी के जाफ़र "शरीफ़" (शरीफ़ तरी कसे म्हणावे ?) यांचा बेत होता. मनमाड ते अंकाई किल्ला स्थानकापर्यंत तसा लोहमार्ग टाकून पण झाला होता. पण नंतर रेल्वेमंत्र्यांच्या त्या आग्रहामागचे कारण उघडकीस आले. मंत्रीमहोदयांच्या जावयाचा असे विशिष्ट स्लीपर्स तयार करण्याचा कारखाना होता म्हणे. हे अशा प्रकारचे लोहमार्ग भारतात कमी ठिकाणीच आणि फ़क्त काही किलोमीटर्ससाठीच असल्याने त्यांच्या कारखान्यातला मालाला पाहिजे तसा उठाव नसावा. म्हणून काचीगुडा (हैद्राबाद) पर्यंत हा पूर्ण ६८० किमीचा मार्ग, असा अभिनव पध्दतीचा बांधून जावयाला मोठ्ठे कंत्राट मिळवून देण्याचा हा मंत्रीमहोदयांचा विचार असावा. काही सामाजिक संस्थांच्या आक्षेपामुळे हा बेत बारगळला आणि मराठवाड्यातले प्रवासी मोठ्ठया त्रासातून वाचलेत. मीटर गेज डब्यांच्या उंचीनुसार फ़लाट कमी उंचीचे बांधावे लागले असते आणि त्यावर ब्रॉडगेज प्रवाशांना चढायला आणि उतरायला त्रास झाला असता. आणि एकेरी मार्गावरून जाणा-या मीटर गेज गाडीच्या कमी वेगामुळे त्याच मार्गावरून पाठीमागून येणा-या किंवा पुढून येणा-या ब्रॉडगेज गाड्यांचा खोळंबा झाला असता तो निराळाच. म्हणजे ब्रॉडगेज बांधल्याचा म्हणावा तसा फ़ायदा झाला नसताच.


तर अशी ही Gaunleted Tracks ची कथा.


- Railfan Ram


Wednesday, June 30, 2021

खाणा-याने खात जावे...

     ३० जून २००९.

बरोब्बर १२ वर्षांपूर्वीची गोष्ट.

Indo - US Collaboration of Engineering Education आयोजित "Effective Engineering Teaching" च्या एका कार्यशाळेसाठी म्हैसूरला होतो. Infosys campus मध्ये रहाण्याची जरी व्यवस्था होती तरी मी सहकुटुंब गेलेलो असल्याने म्हैसूर गावात आमचा मुक्काम होता. रोज मुक्कामाच्या ठिकाणाहून सकाळी निघून Infi च्या कॅम्पसपर्यंत जाणे आणि कार्यशाळा आटोपून संध्याकाळी परतणे हा दिनक्रम.

पहिल्याच दिवशी तिथल्या स्थानिक सहकार्‍यांशी गप्पाटप्पा रंगल्यात. माझे राहण्याचे ठिकाण कळल्यावर एकाने या हाॅटेलबाबतची "टिप" दिली. माझ्यासारख्या foodie माणसाला आणि काय हवं होतं ? (बाकी "खादाड" या मराठी विशेषणाला "Foodie" वगैरे इंग्रजी साज चढवला की ते विशेषण एकदम मिरवण्याजोगे वगैरे होते, नाही ?)

दुसर्‍याच दिवशी सकाळी ७ वाजता या हाॅटेलात प्रवेश केला. नागपूरच्या सदर भागातल्या "वीरास्वामी" पेक्षा अर्धी जागा. साधारण १०० चौरस फुटाच्या आसपासचा मामला. जेमतेम ३ टेबल्स, इतर ८ - १० ग्राहकांसाठी उभ्यानेच खाता यावे अशी भिंतीतल्या टेबलवजा फळ्यांची व्यवस्था. मी गेलो तेव्हा गर्दी नव्हती. टेबल, शेअरींगमध्ये का होईना, मिळाले. पण खाणे संपल्यावर बाहेर पडताना हाॅटेलमध्ये रांग लागलेली होती.




मेन्यू फार नाही. चित्रात दिसतोय तो "म्हैसूर मायलारी डोसाई" आणि "ओनियन उत्तपम". मागवल्यानंतर लगेच केळीच्या पानात हे दक्षिण भारतीय पूर्णान्न, पूर्णब्रम्ह पुढ्यात आले. आपल्या नेहमीच्या डोस्यापेक्षा जरा जाड डोसा आणि खोबर्‍याची अमर्यादित चटणी. सांभाराची गरजच नव्हती. एकेक घास अप्रतिम चवीचा. तोंडात आपोआप विरघळून पोटात जात होता. मेंदूत ती चव कायमसाठी नोंदल्या जात होती.

यावर तिथली "फिल्टर कापी" प्यायलो नसतो तर त्या संस्कृतीचा अपमान करण्याचे पातक घडले असते. एकच डोसाई आणि एक फिल्टर कापी पिऊन अंतरात्मा सकाळी सकाळी तृप्त करून बाहेर पडलो. कार्यशाळे दरम्यान Infi ने आम्हाला अगदी Apetizer, Salad, Soup, Main Course, Dessert असे Five course lunch उपलब्ध करून दिले होते पण ही चव तिथे नव्हती.

उगाच नाही महानायक बच्चन साहेब आणि जगसुंदरी ऐश्वर्या म्हैसूरला असले की इथे आवर्जून येतात.

अप्रतिम चव अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देणार्‍या त्या "कानडाऊ विठ्ठलू" चे खरोखर कौतुक.

- स्थानिक खाद्यपदार्थांचा कायमच चाहता आणि असल्या बल्लवाचार्यांचे (आणि अन्नपूर्णांचे)

"खाता खाता खाणार्‍यांने

बनवणार्‍यांचे हात घ्यावे"

या वृत्तीचा  विद्यार्थी 

Saturday, June 19, 2021

Lets celebrate small bundles of joys.

 तसेही नागपूर हे हिरवेगार शहर आहे. आणि त्यातही आमचे महाविद्यालय शहरापासून १५ किमी दूर, एका टेकडीवर आहे.

हमरस्ता सोडून काॅलेजकडे जाण्यासाठी गाडीने टेकडी चढताना रस्त्याच्या आजुबाजूचे अनाघ्रात जंगल एकदम खूप सारा प्राणवायू हृदयात भरून टाकते आणि तिथूनच आमची आनंदवारी सुरू होते.
महाविद्यालयीन परिसरात तर अनेक प्रकारच्या फळझाडांचे आणि फुलझाडांचे स्नेहसंमेलनच आहे. आणि अर्थातच महाविद्यालराच्या शिरस्त्याप्रमाणे त्यातही शिस्त आणि सौंदर्यदृष्टी जोपासली गेलेली आहे. उगाच आपलं दिसले रोप की कर खड्डा आणि लाव झाड, असा मामलाच नाही. सगळे काही विचारपूर्वक आणि याबाबतचा पारंपारिक शहाणपणा लक्षात घेऊनच.
आमच्या गाड्यांचे पार्किंगही घनदाट वनराईत असते. जुन्या काळी राजे महाराजांच्या राजवाड्याबाहेर "उपवने" असायची असे वर्णन आपण पुराण कथांमध्ये वाचतो, ऐकतो. तशी अनेक "उपवने" आमच्या महाविद्यालयीन परिसरात आहेत. त्यातलेच एक "उपवन" आमच्या गाड्यांच्या पार्किंग साठी पण राखीव आहे.
आज महाविद्यालयीन वेळानंतर घरी जाण्यासाठी निघालो तर ज्या वृक्षाच्या सावलीत गाडी ठेवली होती त्या वृक्षाने आपल्या छोट्याछोट्या फुलांनी गाडीचा पुढला काच, बाॅनेट आणि छत सजवून टाकले होते. माझ्या हर्षाला पारावारच उरला नाही. लगेच फोटो काढलेत.




महाविद्यालयीन सहकार्‍यांनी "सर, आपकी गाडी तो आज दुल्हे की गाडी लग रही है." अशा compliments पण दिल्यात.
परतीच्या प्रवासात, मनात एकेक आठवणी हळूहळू येतात आणि कालौघात उडून विरत जातात ना, तसे वार्‍यामुळे "एकेक फूल लागले उडावया" असे रस्ताभर होत होते. एक नवाच अनुभव, वाहनचालनाचा आणि निसर्गाने दिलेल्या दानाच्या उपभोगाचा.
बर्‍याचदा आपण छोट्याछोट्या गोष्टी मनाला लावून घेतो, व्यथित होतो. त्यापेक्षा असे छोटेछोटे आनंद साजरे करून जास्तीत जास्त वेळ आपण आनंदी रहायला शिकलो तर ?
दुःख मनात ठेवण्याची खूप मोठी किंमत आपण कळत, नकळत मोजत असतो. आनंद हा तर फुकट असतो आणि त्याचवेळी तो अमूल्यही असतो. So lets celebrate these small packets of joys.
- उत्कृष्ट ड्रायव्हर आणि उमलता तत्ववेत्ता अशा मिश्रणाचा राम किन्हीकर.

Saturday, June 12, 2021

शिरा पुराण

 



आमच्या बालपणी शिरा बशीतूनच खाण्यासाठी पुढ्यात यायचा हो. स्टेनलेस स्टीलच्या ताटलीतून शिरा खाणे म्हणजे एखादा पदार्थ नुसताच पोटात ढकलल्यासारखा वाटतो.  म्हणूनच

१९९५  मध्ये मुंबईतल्या उडपी हाॅटेलमध्ये शिरा असा स्टेनलेस स्टीलच्या प्लेटमधून खाताना माझ्या अंगावर निळा एप्रन वगैरे आलाय की काय अशी माझी भावना सतत होत होती. बाकी उडपी हाॅटेलमधला "केशरी शिरा" म्हणजे जिलेबीचा रंग घातलेला शिरा. इतका केशरी रंग अस्स्सल केशर घालून शिर्‍याला आणायला त्या उडप्याला काश्मीरातून आठवड्याच्या आठवड्याला ट्रकभर केशर मागवावे लागेल आणि त्याचे दिवाळे निघेल.

साधारण बशीभर शिर्‍यात एखादा बेदाणा आणि अर्धाच काजूचा तुकडा त्याची लज्जत वाढवतात. बचकभर बेदाणे आणि भरपूर काजू म्हणजे अन्नू मलिकचा भरपूर वाद्यमेळ असलेला वाद्यवृंद. पोट भरेल पण मजा नाही.

 याउलट प्रमाणात काजू बेदाणे प्रमाणात घातलेला शिरा म्हणजे तानपुरा, संवादिनी आणि तबल्याच्या संगतीने वसंतराव देशपांड्यांनी जमवलेली मैफिल. मन तृप्त होईलच होईल.

बरे, इतक्या एकाच बशीभर शिर्‍यावर खाणे आटोपावे. आणखी शिरा खाण्याची इच्छा असतानाच शिरा खाणे थांबवले म्हणजे पुढच्या वेळेची शिरा खाण्याची आस कायम असते. हा मनभरून खाण्याचा पदार्थ, पोटभरून नव्हे हे कायम लक्षात ठेवावे. "स्वप्नातल्या कळ्यांनो, उमलू नकाच केव्हा" या गाण्यातला भाव लक्षात ठेवावा आणि "विरहात चिंब भिजूनी, प्रीति फुलोनि यावी" असा विरह शिर्‍याचा आणि आपला झाला असेल तरच तो चविष्ट लागतो हे ही लक्षात ठेवावे. दर आठवड्यात एकदा शिरा खात असणे म्हणजे नुसते उदरभरण. एकूण पावसाळ्यात चारपाचदा आणि वर्षभरात आणखी चारपाचदा शिरा खाल्ला तरच ही प्रीत फुलून येते. (स्वतःकडल्या आणि इतरांकडल्या सत्यनारायणातला प्रसादाचा शिरा यात धरायचा नाही. ते वेगळे. हा शिरा म्हणजे हृदयस्थ आत्मनारायणाला खुश करण्यासाठी गृहलक्ष्मीने केलेला शिरा.)

रोजच्या खाण्यातल्या लोणच्याची (याठिकाणी लिंबाचे लोणचे सर्वोत्तम. मग इतरांचा क्रमांक) अनोखी चव अनुभवायची असेल तर लोणच्याची एखादीच फोड शिर्‍यासोबत बशीत असावी. सोबत दीड ते दोन मिलीलीटर त्याच लोणच्याचा खार. अशावेळी प्रत्यक्ष भगवंत जरी पुढे उभे राहिलेत तरी "देवा हा शिरा पहिल्यांदा संपवतो आणि मग मुक्तिविषयी वगैरे बोलू." अशी भक्ताची भावना झालीच पाहिजे.

शिरा कणकेचा श्रेष्ठ की रव्याचा या विषयांवरून गृहिणींचे एक मिनी महायुध्दही संभवू शकते. पण साखरेऐवजी गूळ घालून केलेल्या शिर्‍याला तोड नाही. ६ वर्षांपूर्वी मुंबई - आग्रा महामार्गावर मालेगावनजिकच्या साई कार ढाब्यावर एके दिवशी सकाळी नाश्त्यात खाल्लेल्या गुळाच्या शिर्‍याची चव नुसतीच माझ्या जिभेवर आहे असे नाही तर त्या चवीने आपले फुटप्रिंट थेट माझ्या मेंदूत तयार केलेले आहे. या जन्मात काय, पुढल्या कित्येक जन्मात ती अप्रतिम चव मी विसरू शकत नाही.

शिरा खाण्यासाठी चिनीमातीच्या बशीसोबत मात्र चकाकता, स्टेनलेस स्टीलचा चमचाच हवा. इतर वेळी उदरभरणासाठी पाच बोटांचा उपयोग कितीही उपयुक्त असला तरी त्या चमच्याची आणि बशीची सुंदर किणकिण कानावर पडली की शिरा पंचेंद्रिये तृप्त करून जातो. हो, नाहीतर कानांना त्याचा आस्वाद कसा मिळणार होता ना ?

आणि एक सांगू का. त्या चमचा आणि बशीच्या किणकिणीवरून आपल्या नारायणाला अजून अर्धी बशी शिरा दिला तर चालेल हे जिला ओळखता येत ना, ती खरी गृहलक्ष्मी. त्यांचा संसार रवा आणि साखरेसारखा एकजीव होऊन शिर्‍यासारखा खमंग झालाय हे ओळखावे.

- शिर्‍यातला गोड बेदाणा, राम किन्हीकर.

इतर लेखांसारखाच हा लेखही माझ्या नावाशिवाय (कधीकधी कुठल्यातरी भलत्याच उपटसुंभ नावाने) बर्‍याच व्हाॅटसॅप ग्रूप्समधून माझ्यापर्यंत येईल याची खात्री बाळगू का ?