आजवर मी इथे आणि अनेक समाजमाध्यमांवर माझ्या लाडक्या एस. टी. बसेसचे अनेक वैशिष्ट्यपूर्ण फ़ोटो टाकलेत. पण ह्या एका साध्या एस. टी. बसचा फ़ोटो फ़क्त एकदाच आणि एकाच समाज माध्यमावर टाकला. मला एकदम पुलंच्या असा मी असामी मधले त्या बेंबट्या जोश्याचे दिगंबर काकाच आठवले.
"की राजहंसाचे चालणे, जगी झालीया शहाणे
म्हणूनी काय कवणे, चालूची नये ?"
ही ज्ञानदेवांची ओवी आपल्या कीर्तनात सांगणारे ते दिगंबर काका. त्याच धर्तीवर मला आज जाणवले की खूप सुंदर सुंदर आणि एकेक वैशिष्ट्यपूर्ण बसेसचे फ़ोटो मी आजवर टाकले हे जरी खरे असले तरी कधीकधी एखाद्या साध्याच बसचा फ़ोटो सुद्धा टाकला पाहिजे आणि तिच्यावर काही लिहीले गेले पाहिजे.
आणि २००८ साली काढलेल्या या फ़ोटोला आज अगदी ॲंटिक व्हॅल्यु आहे. साधारण १९९३ - १९९४ च्या आसपास आपल्या एस. टी. चे प्रवासी चढ उतार करण्याचे दार एस. टी. च्या मागल्या बाजूकडून पुढल्या बाजूला आले. आणि मला आठवतय़ आपल्या एस. टी. च्या मध्यवर्ती कार्यशाळा नागपूरने बांधलेल्या MH -31 / W 9251 या बसपासून बसच्या खिडक्यांचाही पॅटर्न बदलला. त्यापूर्वी जवळपास ४० वर्षांपासून चालत आलेला वरखाली होणारा खिडक्यांचा पॅटर्न जाऊन आता पुढे मागे होणा-या सरकत्या खिडक्यांचा पॅटर्न आलेला होता.
तशीच ही आपली एक साधी बस. नागपूर जलद हिंगणघाट. बसच्या मार्गफ़लकावर फ़क्त "हिंगणघाट" असेच जरी लिहीलेले असले तरी ती नागपूर जलद हिंगणघाट बस आहे हे आम्हा बसप्रेमी मंडळींना चांगलेच ठाऊक असायचे. काहीकाही डेपो मॅनेजर्स लोकांना असा मार्गफ़लकाचा पॅटर्न मध्येच बदलावा वाटे आणि तसा ते बदलत असत. पूर्ण मार्गफ़लक लिहीण्यापेक्षा फ़क्त गंतव्यस्थानाचाच उल्लेख त्या मार्गफ़लकावर मोठ्या अक्षरांमध्ये केलेला असे. त्यातलाच हा मार्गफ़लक.
वर्धा विभागातल्या हिंगणघाट डेपोची ही बस. वर्धा विभागाचे तत्कालीन व्यवच्छेदक लक्षण म्हणजे बसच्या काळ्या ग्रीलला पिवळी बॉर्डर. भंडारा विभागातल्या बसेसना ही बॉर्डर पांढ-या रंगातली असायची. चंद्रपूर विभागातल्या बसेसचे हे ग्रील्स हिरव्या रंगातले असायचेत तर यवतमाळ विभाग हे ग्रील्स आकाशी निळ्या रंगाने रंगवायचा. दूरवरूनच बस ओळखू यायची.
या बसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चालक केबिनवर असलेल्या टपाला लावलेला प्रेशर हॉर्नचा भोपू. त्याकाळी टाटा किंवा लेलॅण्ड कंपन्यांनी त्यांच्या बसेससोबत दिलेले मूळ हॉर्नस थोड्याच दिवसात निकामी व्हायचेत. (किंवा केले जायचेत) मग त्यांना सगळ्यांना ते साधे पोंगे मिळत असत. फ़ार थोड्या आणि अगदी स्पेशल बसेसना प्रेशर हॉर्नस असायचेत. किंबहुना प्रेशर हॉर्न बसला असणे हे म्हणजे ती बस त्या डेपोची अगदी लाडकी बस असल्याचे लक्षण होते.
ही बस सुद्धा सुरूवातीला हिंगणघाट डेपोत आली तेव्हा पहिले काही महिने त्या डेपोच्या प्रतिष्ठित मार्गावर (हिंगणघाट जलद शेगाव) धावली असेल. म्हणून तिला असा प्रेशर हॉर्न मिळाला असेल. काहीकाही डेपोंची आपल्या डेपोंना आलेल्या नव्या गाड्या एका विशिष्ट मार्गावरच पाठवण्याची रीत असते. चंद्रपूर डेपोच्या नवीन बसेस कायम चंद्रपूर जलद शिर्डी, चंद्रपूर सुपर नागपूर किंवा चंद्रपूर जलद शेगाव मार्गावर पाठवल्या जायच्यात. सावनेर, चांदूरबाजार, परतवाडा, मोर्शी या आणि अशा अनेक डेपोंची ही अशीच त-हा. तुमच्या आसपास असलेल्या डेपोंची अशी काही व्यवस्था असेल तर नक्की कळवा.
तर अशी ही त्याकाळी अगदी साधी आणि आता एक ॲंटिक व्हॅल्यु प्राप्त झालेली साधीसुधी बस.
MH - 31 / AP 9687 (चार सलग अंक उलटसुलट क्रमाने या आकड्यात आहेत. हे या बसचे आणखी एक वैशिष्ट्य.)
TATA 1512 Cummins
मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर ने बांधलेली साधी बस.
3 x 2 आसनव्यवस्था. एकूण ५४ आसने.
नागपूर जलद हिंगणघाट (मार्गे बुटीबोरी - जांब)
हिंगणघाट आगार, वर्धा विभाग.
एकूण अंतर ७५ किलोमीटर्स.
@ जांब बस स्थानक
१८ / ५ / २००८. सकाळी ९.३० वाजता.

मला आठवते ती पिवळा फटकारा असलेली लाल परी. आणि 'शांत तारा खा' वगैरे पाट्या आत असलेली. मागे दरवाजा असलेली. ७०-८०च्या दशकातली! एक वेगळीच मजा होती. आणि रातराणी. आमच्या वालचंदनगरहून एकच रात्री साडेआठला निघून बारामती लोणी, सासवड मार्गे सकाळी मुंबईला नेणारी. तिचा एक वेगळाच थाट होता. प्रवास रात्रीचा असल्यानं आत दिवे निळे असायचे. मग आली एशियाड. मर्यादित थांबे. वेगवान प्रवास. ऐट! धमाल!! आणि महाग. :) मजा येते आपलं लिखाण वाचून. त्या आठवणी जागतात. धन्यवाद. - आपला चाहता, -मिलिंद.
ReplyDeleteमनःपूर्वक आभार मिलिंदजी. आपल्यासारखे विचक्षण वाचक लाभणे हेच कुणाही लेखकाचे लेखनसार्थक असते.
DeleteI think you are referring to these types of buses, right Milind Ji ?
Deletehttps://railandbusfanning-ram.blogspot.com/2011/02/blog-post_08.html
https://railandbusfanning-ram.blogspot.com/2011/02/blog-post_14.html
हो. दुसऱ्या लिंक मधली. १२/९/१९९५ ची. पुण्याला खडकीला बनायच्या. आमच्या शाळेच्या सहलीत एकदा ते दाखवून आणलंवतं! दिवसाला एक एक यष्टी बनायची म्हणे!! आता 'जिजाऊ' आमच्या रत्नागिरी आगारालाही आल्यात. बाकी, खरी मजा 'खडखडत्या, खड्ड्यातून उडणाऱ्या, दारे आपटणाऱ्या आणि हात दाखवेल तिथं थांबणाऱ्या' लालपरीतच येते!! <3 गप्पा ऐकतांना मजा येते. आपण त्या साऱ्या प्रवासांची आठवण करून देता. फोटू देता. म्हणूनच आवर्जून मागोवा घेत असतो. पुनश्च आभार. आपला चाहता -मिलिंद. या एकदा, हापूस चाखायला. समुद्रावर सूर्यास्त पाहायला!!
Deleteअजून एक. आपण नागपूर, विदर्भांतले अनुभव मांडता. एक वेगळाच पट समोर येतो. मिऱ्या - नागपूर जोडलं जातं. आता भावनेनं. सारखेपणा चकित करतो. आपलेपणा वाटतो. गेल्या पावसाळ्यात खड्डे जोडले असते तर मिऱ्या - नागपूर जलमार्गानं जोडले गेले असतो! :) :) धन्यवाद. ( मिऱ्या - रत्नागिरीचं बंदर, मि-ना हायवे व्हताय. म्हणजे पंचवीस वर्षं बनतोय.)
Deleteअगदी नक्की मिलींदजी. मुंबईला असताना आणि नंतरही रत्नागिरीला दोन तीन वेळा येऊन गेलेलो आहे. आता आलो की नक्की भेटूच.
Deleteमहाराष्ट्रातल्या तीनही कार्यशाळांनी अशा बसेस त्याकाळात बांधल्या होत्या. नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि दापोडी सुद्धा.
Deleteदापोडीला दररोज अडीच बसेस तयार व्हायच्यात. वर्षाला हजार बसेस. चारशे लेलॅण्ड आणि सहाशे टाटा.
छत्रपती संभाजीनगरला दररोज दोन बसेस तयार व्हायच्यात. वर्षाला सरासरी सहाशे. साडेपाचशे लेलॅण्ड आणि पन्नासेक टाटा.
नागपूरला रोज एक बस तयार व्हायची. वर्षाला साधारण तीनशे पन्नास. तीनशे चाळीस टाटा आणि दहा एक लेलॅण्ड.
नागपूर - वर्धा - यवतमाळ - आर्णी - नांदेड - लातूर - तुळजापूर - सोलापूर - सांगोला - मिरज - कोल्हापूर - रत्नागिरी ते मि-या बंदर हा बराच काळ प्रमुख राज्य महामार्ग क्र. 3 होता. गेल्या 10 वर्षांत त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालाय. मी कोल्हापूरपर्यंत या महामार्गाने आलोय. तोपर्यंत रस्ता अगदी छान आहे. कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही हे वाचून आश्चर्यच वाटले. असो. लवकर पूर्ण होईल असा आशावाद बाळगूयात.