माझ्यातल्या बसफ़ॅनला माझ्या वडिलांनी खतपाणी घालून वाढविले. अगदी १० - ११ वर्षांचा असताना घरी आलेल्या कुणा पाहुण्याला निरोप द्यायला बसस्थानकावर गेलेलो असताना त्यांनी आपल्या एस. टी. बसवरील म.का.ना., म.का.दा., म.का.चि. वगैरे गोष्टींचा अर्थ मला स्वतःहून समजावून सांगितला होता आणि स्थानकात उभ्या असलेल्या इतर एस. टी. बसेस या तीन ठिकाणांपैकी कुठे बांधल्या गेल्या आहेत हे मला ओळखता येतेय का ? यावर आम्ही एक छोटे प्रात्यक्षिक पण करून बघितले होते. आपल्या महाराष्ट्र एस. टी. च्या नागपूर मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी (पुणे) मध्यवर्ती कार्यशाळा आणि चिकलठाणा (छत्रपती संभाजीनगर) मध्यवर्ती कार्यशाळा आपल्या बसेसची बांधणी करीत असत. बांधणीचे स्पेसिफ़िकेशन्स जरी सारखे असले तरी त्यांच्या बांधणीत थोडा फ़रक असे. तो बसफ़ॅन्सना लगेच ओळखू यायचा. तिथून माझ्यातल्या बसफ़ॅनची सुरूवात झाली.
आजोळी चंद्रपूरला उन्हाळ्याच्या सुटीत, दिवाळीच्या सुटीत कायम मुक्काम असे. त्यानिमित्त चक्क महिना महिना तिथे राहणे व्हायचे. तेव्हा सकाळी उठल्या उठल्या एक चक्कर तिथल्या आमच्या भावंडांसोबत चंद्रपूर बसस्थानकात होतच असे. नवीन आलेल्या बसेस, कुठली बस कुठल्या वेळांवर नागपूर, शेगाव, शिर्डी यामार्गावर दिली आहे ? याची पडताळणी होत असे. आजोळी आलेल्या इतर पाव्हण्या राव्हण्यांना बसस्टॅण्डवर सोडणे ,आणणे या उपदव्यापात आम्ही आघाडीवर असू किंबहुना आमचे हे बसप्रेम माहिती असल्यानेच आमच्या घरातली, आजोळची वडिल मंडळी आम्हाला ही कार्ये सांगत असत आणि आम्हीही अगदी आनंदाने ही सगळी करीत असू. त्यानिमित्त बसस्थानकाची भेट, नवनवीन बसेस, नवनवीन मार्ग बघायला मिळत.
शिवाय चंद्रपूरला किंवा मावशीकडे यवतमाळला जाताना येताना आम्ही कायम चालक केबिनमागच्या आडव्या मोठया उलट्या बाकावर चालकाकडे तोंड आणि प्रवाशांकडे पाय करून तो तीन साडेतीन तासांचा प्रवास अक्षरशः आमच्या गुडघ्यांवर करीत असू. चालकाचे वाहनचालनकौशल्य आणि पुढून येणा-या बसेस या दोन्हीहीमुळे आमचे नेत्र तृप्त आणि प्रवास सफ़ल होत असत. मग पुढून येणारी बस आपल्या बसला कुठे भेटतेय यावरून ती बस समोरून कधी निघाली असावी याचे अगदी ९९. ९९ टक्के अचूक अंदाज बांधले जात. "आज छे बजे की चंद्रपूर - नागपूर सुपर थोडी लेटच हुई नई." किंवा "बाप्पा रे, MWY 9987 जैसी नयी गाडी आज ५.३० के एक्सप्रेसको मिली और ६.०० का सुपर वही पुराना वाला MTQ 6630 ? क्या चल क्या रहा है चंद्रपूर डेपोमे ?" असे आमचे एस. टी. चालक वाहकांबरोबरचे संवाद आमच्याविषयी त्यांच्या मनात आदर वाढवायला कारणीभूत होत असत. बहुतांशी वेळा मधल्या कुठल्या तरी थांब्यांवर झालेल्या या संवादांनंतर चालकातर्फ़े आम्हाला त्याच्या केबिनमध्ये येऊन गप्पा मारत प्रवास करण्याचे निमंत्रण मिळत असे. मोठाच बहुमान. केबिनमधल्या त्या लाकडी खोक्यावर बसून असा विशेष प्रवास करताना आपण कुणीतरी "Privileged" असल्यासारखे वाटत असे.
मग १९८३ च्या सुमारास शाळा, ट्युशन्स या निमित्ताने रोज नागपूर शहर बसचा प्रवास सुरू झाला. मग रोजची तिकीटे जमवून ठेवण्याचा छंद लागला. बरे नुसती तिकीटे जमवणे नाही तर त्या तिकीटांमागे दिनांक, बस नंबर, आपला प्रवास, बसचा रूट नंबर आणि बसचा रूट, बस टाटाची की लेलॅण्डची, बसचे मॉडेल आणि जमलाच तर बसचा चेसिस नंबर (त्याकाळी सर्व एस. टी. बसेसबाहेर डाव्या बाजूला हा चेसिस नंबर लिहीलेला असायचाच.) हे लिहीणे सुरू झाले. बरे ही तिकीटे फ़ार दीर्घ काळ सांभाळली तरच या छंदाला काही किंमत आहे हे त्याकाळी कळत होते. आणि त्या दीर्घकाळाचे नियोजन म्हणून दर महिनाअखेर ही तिकीटे एका पाकिटात व्यवस्थित रचून ठेवली जात आणि त्या त्या वर्षाअखेर एका मोठ्ठ्या पाकिटात ही सगळी पाकिटे जतन करून ठेवली जात.
{Month wise: Month wise arrangement of travel tickets in envelopes. These were used and
obsolete envelopes recycled. It starts from January 1983. }
१९८९ पासून कराड येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्नातक शिक्षण सुरू झाले आणि नागपूर ते कराड हा महाराष्ट्र एक्सप्रेसचा २५ तास घेणारा मोठ्ठा प्रवास सुरू झाला. त्यापूर्वी रेल्वे प्रवास घडले नाहीत असे नाही पण ते अगदी तुरळक असायचेत पण हा प्रवास म्हणजे वर्षातून ८ - ९ वेळा आणि अपरिहार्य. त्यामुळे मग रेल्वेफ़ॅनिंग सुरू झाले. त्यात बसेसप्रमाणे रेल्वे प्रवासाची तिकीटे, रिझर्वेशन्स, आमचे विद्यार्थी सवलतीचे फ़ॉर्म्स आणि तिकीट, सुपरफ़ास्ट दर्जाचे अतिरिक्त भार असलेले तिकीट जमविणे व सांभाळून ठेवणे सुरू होतेच. पण त्यात भर म्हणून आणखी काही गोष्टी आल्यातच.

{Concession Ticket: This was the concession letter issued by our institute for our travel to and
from home to institute. Nagpur to Karad in our case.
Full fare used to be Rs. 110 + 20 (Berth charges for one night travel). We used
to pay Rs. 55 (Concessional fare) + 20 (berth charges for one night travel).
Ram Kinhikar, Pushkaraj Kale,
Vinay Thute and Anamol Mudholkar were the passengers on this concession form
approved by institute authorities and railway officials.}
{SF Ticket: 2701 NZM - VSG (NZM - MRJ B.G. and MRJ - VSG M.G.) Goa Express was inaugurated
on 01/07/1990. Four digit numbering system was also started on IR on the same
date.
Decided to travel by this train from STR to BSL as an alternative to
Maharashtra Express. Maharashtra Express covered Pune to Manmad in dark while
travelling in both directions. First time got the chance to explore DD-MMR
section in broad daylight by Goa Express. MRJ departure used to be at 07.00,
STR at 09.20, MMR at 17.30 and BSL at 20.40. (Just ahead of Sewagram Express at
BSL)
Supplementary charge for Super Fast train. Rs. 2 each for 2 passengers.
14/07/1990. }
त्याकाळी आमचे (आणि तत्कालीन मध्यमवर्गाचे) सगळे प्रवास म्हणजे द्वितीय श्रेणी शयनयान वर्गानेच होत असत. मग एखाद्या शयनयानात त्याच्या वरच्या बर्थवर बसल्यानंतर पुरेशी हेडरूम आणि एखाद्यात थोडे असहज करणारी थोडी कमी हेडरूम का ? याचा शोध त्या २५ तासांच्या प्रवासात सुरू झाला. मग लक्षात आले की चेन्नईला इंटिग्रल कोच फ़ॅक्टरीत बांधलेल्या शयनयान कोचेसची उंची थोडी जास्त असते तर बंगलूरू ला भारत अर्थ मूवर्स लिमीटेड ने बांधलेल्या कोचेसना हेडरूम कमी असते. (ही परंपरा अजूनही सुरू आहे बर का ! बी.इ.एम.एल. बंगलूरू ने बांधलेल्या पहिल्या वहिल्या वंदे भारत स्लीपर रेकची गुणवत्ता तितकी नव्हती म्हणून तो रेक ट्रायल्सनंतर वर्ष दीड वर्ष तसाच ठेऊन देण्यात आला आणि चेन्नई ला आय.सी.एफ़. ने बांधलेला नवा रेक आल्यानंतर कलकत्ता ते गौहत्ती शयनयान वंदे भारतचा शुभारंभ झाला.) १९९१ - १९९२ च्या आसपास कपूरथळ्याला रेल्वे कोच फ़ॅक्टरी सुरू झाली आणि तिथे बनलेले कोचेस येऊ लागलेत. वरवर बघता हे कोचेस चेन्नईच्या आय.सी.एफ़. शी साधर्म्य साधणारे असले तरी आतली बर्थसची बांधणी, दर्जा मात्र एकदम "चालू" दर्जा असायचा. आजही कुठल्याही वर्गाचे कोच बांधणीच्या दर्जाच्या बाबतीत आय.सी.एफ़. चेन्नई अव्वल क्रमांकावर आहे.
मग या मोठ्ठ्या रेल्वे प्रवासात आपल्या गाडीला एकूण डबे किती ?, कुठल्या कुठल्या वर्गाचे ?, त्यात कुठल्या कुठल्या स्टेशन्सचा किती किती कोटा असतो ?, गाडीला मधल्या मधल्या स्टेशन्सवर किती किती डब्यांची काढघाल होते ?, गाडी कुठल्या स्टेशनवर किती वेळ थांबते ?, उशीर झालेला असताना किती पळते ? हा सगळा डेटा जमा करणे सुरू झाले. गाडीचा कोच कुठे आणि कधी बांधला गेलाय ? कोचचा डेपो कुठला ? कोचचे मेण्टेनन्स कुठे आणि किती कालावधीने होते ? ही सगळी माहिती सुद्धा जमवणे व नीट लिहून ठेवणे सुरू झाले.
त्याचबरोबर आज आपल्या गाडीला कुठले एंजिन लागले ? त्याचा नंबर किती ? गाडीचे एंजिन कुठे आणि केव्हा तयार झाले ? गाडीला कुठेकुठे एंजिन बदलले ? याचीही माहिती जमविणे आणि योग्य रितीने लिहून ठेवणे सुरू झाले. वर्षाअखेर आपण कुठल्या कुठल्या साधनांनी (बस / रेल्वे / विमान / कार) किती प्रवास केला ? प्रत्येकाची टक्केवारी किती ? याचाही हिशेब मांडणे सुरू झाले. मला आठवतेय मधली काही वर्षे साधारण २७ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हे चार पाच दिवस माझे वर्षाअखेरच्या हिशेबातच जायचेत. बॅंक वाल्यांना, ऑडिटर्सना जशी इयर एण्डची लगबग आणि धुंदी असते तशी मला दरवर्षी वर्ष संपताना असायची.

साधारण २००६ - २००७ च्या सुमाराला हातात कॅमेरेवाला मोबाईल आला आणि घरी छान कॅमेरा सुद्धा आला. मग रेल्वे फ़ॅनिंग आणि बस फ़ॅनिंगच्या इतर अंगांबरोबर प्रवासाचे, कोचेसचे, एंजिनाचे, स्टेशन्सचे फ़ोटो काढणे सुद्धा सुरू झाले. ते फ़ोटो नीट जपून ठेवणे ही.
२००९ ला कार घेतली आणि धाडसी प्रवासी असल्याने कारने लांबलांबचे प्रवास सुरू झालेत. साहजिकच बसचे, रेल्वेचे प्रवास कमी झालेत. कार प्रवासासाठी पण किती वाजता निघालो ? कारच्या टॅकोमीटरचे रिडींग किती ? कुठे थांबलोत ? ती वेळ, ते रिडींग ह्या सगळ्या नोंदी सुरू झाल्यात. अगदी एखाद्या शासकीय वाहनात असते तसे लॉगबुक. कार प्रवासांचा अचूक मागोवा घ्यायला.
आणि त्या सगळ्या कार प्रवासांमध्येही माझ्या बाजूच्या सीटवर बसून हातात कॅमेरा सज्ज ठेवत समोरून येणा-या बसेसचे फ़ोटो काढण्याचे काम माझी सहधर्मचारिणी करायची. ते फ़ोटोजसुद्धा आज माझ्या संग्रही आहेत. बसच्या आणि रेल्वेच्या मी काढलेल्या अशा जवळपास ५०,००० फ़ोटोंचा संग्रह माझ्याकडे आहे. या छंदात अगदी मन रमून जाते.
आता अगदी अत्यंत खाजगी गोष्ट तुम्हाला मी सांगतो. लग्नानंतर मधुचंद्रासाठी आम्ही उभयता गोव्याला गेलेलो होतो. नागपूर ते कोल्हापूर हा जवळपास २८ तासांचा प्रवास महाराष्ट्र एक्सप्रेसच्या द्विस्तरीय वातानुकूल शयनयानातून (सेकंड एसी) केल्यामुळे आम्ही थकलेलो नव्हतो. कोल्हापूरवरून गोव्याला आम्ही त्याच रात्री बसने जाणार होतो. बसस्टॅण्डजवळच एक हॉटेल आम्ही आमच्या तात्पुरत्या मुक्कामाला घेतले आणि २८ तासांच्या प्रवासानंतर आम्ही आंघोळी वगैरे आटोपून हॉटेलबाहेर पडलो ते माझ्या आवडत्या कोल्हापूर बस स्थानकावर गेलो. माझ्या सहधर्मचारिणीला माझ्या बस नामक प्रेयसीची भेट घडवण्याचा तो प्रसंग. त्यापूर्वी तिला या २८ तासांच्या प्रवासात माझ्या रेल्वे नामक प्रेयसीची भेट झालेली होतीच पण नवपरिणित दांपत्याने मधुचंद्राला जाताना सुद्धा बसफ़ॅनिंग करावे ही घटना दुर्मिळ होती.
गोव्याला पोहोचल्यानंतर सुद्धा त्या संध्याकाळी आम्ही पणजी बस स्थानकावर काही काळ माझ्या बसफ़ॅनिंगमध्ये घालवला हे सुद्धा इथे नमूद केले पाहिजे. बस आणि रेल्वेवरची अव्यभिचारी निष्ठा मी अशी सिद्ध केली होती. मधुचंद्रावरून परतल्यानंतर या सगळ्या बाबींसाठी माझ्या सहधर्मचारिणीने कधी कधी माझी या गोष्टींवरून चेष्टा मस्करी सुद्धा केली होती. पण नंतर सगळ्या प्रवासात हा छंद जोपासायला मला तिची अत्यंत मोलाची मदत झाली होती हे सुद्धा तितकेच महत्वाचे.
आज डेटा सायन्स, डेटा ॲनालिटिक्स शिकल्यानंतर हा इतका सगळा डेटा कसा विश्लेषण करायचा ? त्यातून काय काय आणि कशी कशी माहिती मिळवायची याबाबत माझ्या अभियांत्रिकी डोक्यात चक्रे सुरू झालीत. पण छंद म्हणून जोपासलेल्या या तिकीटांकडे, माहितीकडे बघितल्यानंतर मला मिळणा-या समाधानाची, मी त्यात रमून त्या त्या काळात जाऊन तो काळ जगण्याची अनुभूती कुठलेही डेटा सायन्स किंवा डेटा ॲनालिटिक्स मला देऊ शकणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे.
आवडला माझा अनोखा छंद ? नक्की कळवा.
- बसफ़ॅन आणि रेल्वेफ़ॅन क्लबमध्ये व्हेटेरन होत चाललेला, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
(माझ्या विमान फ़ॅनिंगच्या छंदाविषयी एका वेगळ्या लेखात सविस्तर लिहेन.)
{Bag: Bag full of travel tickets arranged month wise in envelopes. }
{BEST Ticket, H 9047. Anik depot bus. I have a few tickets for MMK and MRL series buses, too. Journey time 1 hour between Mankhurd and Airoli. Ticket Rs. 6. (Rs.5.5 ticket and Rs. 0.5 Toll Tax for Vashi Bridge)}
{Railway Pass. Another integral part of being a Mumbaikar. Having suburban train pass. I had
it between Airoli and Mulund since we need to visit Thane and Mulund almost
daily for most of our purchases.}
No comments:
Post a Comment