Thursday, June 11, 2026

साधा सरळ निष्कपटीपणा म्हणजे बावळटपणा नव्हे

परम पूजनीय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात "माणसाने जगात वावरताना स्वच्छ मनाने, सरळ वर्तणुकीने आणि निष्कपट वागणे ठेऊन जगावे." 

पण महाराज पुढे असाही उपदेश करतात "माणसाने निष्कपटी वागताना इतरांचे आपल्याबाबत असलेले कपट लक्षात घेऊन त्यामुळे आपले नुकसान होऊ न देण्याइतपत व्यवहारी व चोख असावे."

एखादा साधा, सरळ व निष्कपटी माणूस म्हणजे व्यवहारात बावळटच असणार, त्याला आपले डावपेच, कपट कळणार नाही अशा समजूतीने ज्या व्यक्ती साध्या सरळ व्यक्तींना जोखायला जातात आणि त्याच्या सावध, चतुर वागण्याने तोंडघशी पडतात त्या व्यक्तींची चिडचिड, क्षोभ, शिव्याशाप आणि अंतिमतः त्या सरळ व्यक्तीची बदनामी (अरे, तो / ती दिसतो तेवढा साधा नाही बरं. दाखवतो भोळा पण आहे बदमाश" ) ही सगळी प्रक्रिया अनुभवण्यासारखी असते.

अर्थात एखाद्या साध्या, सरळ, सज्जन व्यक्तीला कुणाही जीवाचे असे कुढणे, अस्वस्थ होणे मनापासून आवडणारे नसतेच पण समोरच्या व्यक्तीचा एकंदर स्वभावधर्म पाहून ती सज्जन व्यक्ती फक्त "जे खळांची व्यंकटी सांडो" एव्हढीच प्रार्थना त्या जगन्नियंत्याकडे करू शकते.

माझ्या परिचयातल्या सहवासातल्या अनेक मित्र, सुहृद नातेवाईकांचा त्यांना त्यांना आलेला असाच अनुभव आहे ना  आजवर?

- As you write more and more personal, it becomes more and more universal यावर दृढ विश्वास असलेला, साधा सरळ पण जगाचे कपट लक्षात येऊन त्याप्रमाणे व्यवहारी वागणारा,

"भले तरी देऊ

कासेची लंगोटी

नाठाळाचे माथी

हाणू काठी"

या श्रीतुकोबाउक्तीचा कट्टर पालनकर्ता, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


No comments:

Post a Comment