फ़ेब्रुवारी २०१५, धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर येथे नरसी मोनजी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात विभागप्रमुख म्हणून रुजू झालेलो होतो. अगदी पंचतारांकित, सप्ततारांकित सुविधा आणि तितकी फ़ी देणारे श्रीमंत, अतिश्रीमंत विद्यार्थी असलेल्या आमच्या महाविद्यालयात फ़ेब्रुवारी महिन्यात वार्षिक स्नेहसंमेलनाचे वारे वाहायला सुरूवात झाली होती. सहयोगी प्राध्यापक, सहकारी विभागप्रमुख आणि विद्यार्थ्यांच्या चर्चेमधून आपल्या महाविद्यालयात यावर्षी "सनबर्न" होणार असल्याच्या चर्चा कानांवर पडत होत्या.
आता इथे हे कबूल केलेच पाहिजे की जगाविषयी माहितीचा कण आणि कण आपल्याला ठाऊक असायला हवा ही आमची बालपणापासून वृत्ती असल्याने जगाविषयी बाकी सगळी माहिती असली तरी फ़ॅशन, डी. जे. आणि तत्सम गोष्टींच्या माहितीबाबत कधी मनात उत्सुकता निर्माण झालीच नाही आणि त्या व तत्सम गोष्टींबाबतचे आमचे (अ)ज्ञान अगदी अगाध होते आणि आहे ही. सनबर्न हे नाव ऐकून मला वाटले महाराष्ट्राच्या इतर भागापेक्षा शिरपूर हे थोडे कर्कवृत्ताजवळ आहे त्यामुळे कदाचित २१ मार्चला होणा-या विषुवदिनानिमित्त सूर्यकिरणे अगदी लंब पडत असतील आणि त्यामुळे सूर्यकिरणे अंगावर घेऊन त्यातले जास्तीत जास्त ड जीवनसत्व शोषून घेण्याचा उत्सव "सनबर्न" या नावाने या भागात साजरा होत असेल. आपल्या संस्कृतीतल्या निसर्गाशी जोडल्या गेलेल्या आणि ऋतूमानावर आधारित उत्सवांविषयी मला अपार आदर आहे आणि त्या त्या प्रदेशातल्या अशा अनोख्या उत्सव परंपरांबाबत जाणून घेण्याची मला कायम अपार उत्कंठा असते. म्हणून मी अगदी उत्साहाने "सनबर्न" ची वाट बघत बसलो.
पण तसला काही चमत्कार मला बघायला मिळायला नाही. काही दिवसांनी कळले की "सनबर्न" नावाचा एक फ़ार प्रसिद्ध बॅंड आहे म्हणे. ("प्रसिद्ध आहे पण फ़ारसा कुणाला माहिती नाहीये" या paradox सारखाच.) तो बॅंड शिरपूरला येऊन आमच्या वार्षिक स्नेहसंमेलनात त्यावर्षी आपला कार्यक्रम सादर करणार होता. काही कारणास्तव त्या बॅंडचा दौराच रद्द झाला आणि सरतेशेवटी तो कार्यक्रम आमच्या महाविद्यालयात सादर झालाच नाही. मुले हळहळली. मला मात्र काहीच वाटले नाही.
तोपर्यंत माझी समजून म्हणजे बॅंड म्हणजे लग्न मुंजींमध्ये वरातीत वाजणारा वाद्यसमूह. आमच्या बालपणी बडकस चौक ते इतवारी रस्त्यावर अनेक बॅंड पार्टींची ऑफ़िसेस होती. जगदीश बॅंड, चाळीसगाव बॅंड आणि बरेचसे इतर. लग्नसराईचा मौसम नसताना सगळी वादक मंडळी आपापल्या ऑफ़िसेसमधे बसून छानपैकी वादनाची तालीम करीत असत. त्या मौसमात लागलेल्या सिनेमांमधले कुठले गाणे लोकप्रिय झाले आहे याचा अंदाज घेऊन ते वाजवण्याचा सराव करीत असत. त्या धुंदीत आपण लग्नाच्या वरातीत वधू वरांच्या बग्गीसमोर "तू मूह ना मोड वादा न तोड" हे गाणे सुद्धा वाजवतो आहे याचेसुद्धा भान या बॅंडपार्टींना नसे. "हे गीत लोकप्रिय चित्रपटगीत आहे ना मग वाजवा" असा यांचा खाक्या असे. पण बॅंड म्हणजे असे लाखो रूपये घेऊन एखाद्या समूहासमोर आपले गायन वादन कौशल्य सादर करण्याचा प्रकार असतो हे मला शिरपूरला त्या "सनबर्न"मुळे कळले. नंतर वर्षा दोन वर्षांनंतर हाच बॅंड काहीतरी चुकीच्या गोष्टींसाठी गोवा पोलिसांनी कारवाई केली म्हणून पुन्हा एकदा (चुकीच्या कारणांसाठी) प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर त्याचे नाव आजतागायत ऐकले नाही.
आज या "सनबर्न" ची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवा रविवारी नागपूरच्या या भर उन्हात काही कारणांसाठी भर दुपारी बराच वेळ बाहेर पडणे झाले. त्यादिवशी चारचाकी न काढता दुचाकीवरून भ्रमण झाले. बर्डी, इतवारीच्या गर्दीत चारचाकी नेणे म्हणजे आतल्या एसी मधे बसून घाम फ़ुटण्याचा अनुभव घेणे. म्हणून तास दीड तासांसाठी दुचाकीवरून भर दुपारी उन्हात भ्रमण झाले. बरे सकाळी निघालो तेव्हा हवेचे तापमान जरा आल्हाददायक होते. ते तसेच राहील या आशेने निघालो पण नंतर नागपुरी उन्हाळ्याने आपला उखडेल खाक्या दाखवायला सुरूवात केली ती केलीच. बरे नेमके त्यादिवशी हाफ़ शर्ट घालून मस्त मोकळा गेलेलो होतो. ऊन भाजतेय, आपल्याला "सनबर्न" होतय हे जाणवेपर्यंत उशीर झाला होता. कसाबसा घरी परतलो.
शर्ट काढला तो काय ! हात अगदी दोन भागात विभागला गेला होता. युरोप आणि आफ़्रिका. मध्ये जिब्राल्टरची सामुद्रधुनी आणि तो भूमध्यसमुद्र तेव्हढा नव्हता. मग काय घरी लेकीने चांगलीच हजेरी घेतली. कसली कसली लोशन्स वगैरे लावून दिलीत पण हे सगळे वरातीमागून घोडे होते. हातांचा मूळ रंग प्राप्त व्हायला अजून महिनाभर तरी लागणार हे नक्की होते.
गेल्या ११ वर्षांमध्ये आलेले "सनबर्न" हे दोन अगदी निराळे अनुभव माझ्या एका लेखाचा विषय होऊन गेलेत.
- आजवरच्या आयुष्यात कधीही "वर्णद्वेष" न मानणारा पण सनबर्न मुळे हात अक्षरशः भाजून निघाल्यानंतर होणा-या वेदना सोसताना नको हा रंग म्हणून आजकाल त्या काळ्या रंगाकडे तिरस्काराने बघणारा प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


No comments:
Post a Comment