आजकाल लग्नाचे फोटो काढण्यापेक्षा विविध फोटोंसाठी लग्न करतात की काय ? अशी शंका मला यायला लागली आहे.
अरे, तो दिवस, ते क्षण नवरा नवरीच्या आयुष्यातले अत्यंत अलवार असतात रे. त्या चोरट्या नजरा, चोरटे कटाक्ष, एकमेकांचे हळुवार, अल्लाद स्पर्श, त्यातून मनांचे शहारणे, हरखणे. असे ते सगळे क्षण संपूच नयेत असे मनोमन वाटत असते.
पण आजकाल फोटोग्राफर म्हणतोय म्हणून एकमेकांकडे बघा, स्मितहास्य करा, आनंदी दिसा. अरे आहे ते आनंदी क्षण कॅमेर्यात पकडा नं. ते पकडण्याची कला तुमच्यात नाही म्हणून वधूवरांना कृत्रिम आनंदाच्या पोझेस द्यायला सांगताय का ? अतिशय कृत्रिम व अनैसर्गिक दिसतं ते.
आपण सगळ्यांनीच आजकाल घरातले लग्न समारंभ हे लोकांना दाखवण्यासाठी, लोकांच्या अभिप्रायासाठी करणे थांबवले तर कदाचित हे थांबेल. हा त्या नवरा नवरीच्या आणि दोन्हीही कुटुंबांच्या आयुष्यातला परमोच्च आनंद सोहळा असतो. तो आनंद आपल्या आयुष्यभर मनात जपूयात, फोटोग्राफर ला जमले तर काही आनंदी क्षण फोटोत सुध्दा कैद करून ठेवूयात. फोटोग्राफर साठी, त्या फोटोपुरते आनंदी होणे हे काही खरे नव्हे.
- बूर्झ्वा, प्रतिगामी पण खरा आनंद आणि कृत्रिम आनंद यातला फरक कळणारा प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
आयुष्यातील एक टप्पा, किमान दोन कुटुंबांचे नाते संबंध , व इतर ही अनेक आठवणी जपुन ठेवायला फोटो हवेतच. पण फोटोग्राफर ने सर्व कार्यक्रम डायरेक्ट करुन रि टेक मागणे हे जरा अतीच होतें
ReplyDeleteएकुणात समाजातील विवाह सोहळ्याचे गांभीर्य कमीच झाले आहे.
आपले पारंपारीक पदार्थ पंगतीतुन गायब होऊन पंजाबी व इतर व्यंजन तोर्यात मिरवतात.
संपत्तीचे प्रदर्शन केले जाते आणि बरीच लग्ने तर टिकत ही नाहीत.
कालाय तस्मै नम: म्हणायचे का अंतर्मुख होऊन विचार करायचा?
अलबत. लग्नाचे फ़ोटो हवेतच यात दुमत नाही. पण आजकाल फोटोग्राफ़रसाठीच लग्ने करतात की काय ? इतपत त्या फ़ोटोग्राफ़रचा हस्तक्षेप समारंभांमध्ये वाढलाय त्याला आक्षेप आहे.
ReplyDeleteआणि आजकाल लग्ने हे समारंभ झालेत. तो एक संस्कार आहे हे आपण विसरत चाललोय म्हणून लग्ने टिकण्याचे प्रमाण कमी होत चाललेय.
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद, सर.