१९७० च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत आपल्या महाराष्ट्र एस. टी. ला लाल रंगासोबत पिवळ्या रंगाचा असा गोलाकार वाढत जाणारा आणि बसच्या चाकांवर संपणारा पट्टा असायचा. या प्रकाशचित्रातला बसला जसा पांढरा पट्टा आहे ना तसाच पण पिवळ्या रंगातला. १९९० च्या दशकात आपल्या एस. टी. ने पुन्हा आपल्या काही बसेसवर तसाच प्रयोग करून बघितला होता पण तो अल्पजिवी ठरला होता.
या बसचे वैशिष्ट्य म्हणजे ही बस १९७० च्या दशकातली आहे. खरेतर हे प्रकाशचित्र घेतले तेव्हा या बसचे वय ४६ वर्षे होते. आणि इतकी वर्षे एखादी बस सेवेत ठेवत नाहीत. पण ह्या बसमध्ये वेळोवेळी बदल करून करून तिच्या एंजिनामध्ये वारंवार मॉडिफ़िकेशन करून ही बस आपल्या एस. टी. ने वापरात ठेवलेली आहे. खरेतर ही बस TATA 1210 D मॉडेलची. या मॉडेलचे समोरचे काऊल असे असायचे.
टाटा 1210 D मॉडेलचे समोरचे काऊल
मूळ टाटा 1210 D मॉडेलला टाटा 1210 E मॉडेलचे काऊल लावलेली बस.
पण एस. टी. ने त्या काऊलमध्ये बदल करून तिला TATA 1210 E मॉडेलचे काऊल बसविलेले होते. ड्रायव्हर साहेबांसमोरची विंडशिल्ड सुद्धा बदलून नव्या प्रकारची लावलेली होती.
आधुनिक बांधणीच्या बसेसनुसार एस. टी. ने या बसला टपावर दोन्ही बाजूला छोटे लाईटस दिलेले होते. अर्थात मूळ गाडीला असे लाईटस असणे शक्यच नव्हते. तेव्हा ती पद्धतच नव्हती.
पण या गाडीचे मूळ टेल लाईटस मात्र तसेच्या तसेच ठेवलेले होते. इतक्या बदलांमध्ये तेव्हढीच आपली मूळ गाडीची आठवण कारण TATA 1210 D आणि सुरूवातीच्या काळातल्या TATA 1210 E मॉडेल्सना छोटेसेच टेल लाईटस असायचेत.
मोठ्ठे, धब्बाडे टेल लाईटस साधारण १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात बसेसमध्ये आलेत. तोवर असे छोटेसेच टेल लाईटस. त्या जुन्या टेल लाईटसमध्ये टेल लाईट, ब्रेक लाईट आणि इंडिकेटर लाईट असायचेत. आजच्यासारखे रिव्हर्स मूव्हमेंट लाईटस नसायचेत. तितकी वाहतूक नव्हती त्यामुळे तशी तितकीशी गरज भासत नसेल. यातल्या इंडिकेटर लाईटसचा तरी किती वापर त्याकाळी होत असेल याबद्दल मला शंकाच आहे. वळायचे असले तर ड्रायव्हर साहेब आपला हात खिडकीबाहेर काढून तसा इशारा करायचेत किंवा त्यांच्या बाजूला एक लोखंडी इंडिकेटर आर्म असायचा. तो तसा इंडिकेटर आर्म मी १९९० च्या दशकात मुंबईत बेस्ट बसेसमध्ये बघितलेला आहे.
माझ्या माहितीप्रमाणे ही बस मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी इथे बांधल्या गेलेली होती. हिची प्रवासी सेवा वर्षे संपल्यानंतर मग मध्यवर्ती कार्यशाळा नागपूरने या बसमध्ये बरेच बदल केलेत. दापोडीवाले आपल्या बसेसना पुढच्या बाजूला एक वैशिष्ट्यपूर्ण गोलाकार असा डोम द्यायचेत. त्या डोममध्ये बसचा मार्गफ़लक असायचा. चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर कार्यशाळा ही दापोडीनंतर सुरू झाली पण त्यांनी दापोडीवाल्यांच्या डोम आकाराऐवजी समोर चपटा आकार द्यायला सुरूवात केली आणि नागपूरच्या कार्यशाळेने दापोडीचा कित्ता गिरवण्याऐवजी चिकलठाणा वाल्यांचाच कित्ता गिरवीत चपट्या आकाराचे दर्शनी भाग आपापल्या गाड्यांना द्यायला सुरूवात केली होती.
ही बस एस. टी. ने आपल्या विभागीय कार्यांसाठी विशेष तयार करून जपलेली होती. आणि म्हणूनच साधी दिसत असली तरी ही बस अगदी खास, अगदी विशेष होती.
MHO 5483
TATA 1210 D
मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी ने बांधलेली साधी बस. मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर येथे पुनर्बांधणी झालेली बस.
नागपूर विभागीय कार्यशाळेच्या तैनातीत असलेली मालवाहक बस.
@ खडकी हनुमान मंदीर
११/ ६ / २०१६.








No comments:
Post a Comment