Showing posts with label Luxury. Show all posts
Showing posts with label Luxury. Show all posts

Friday, June 6, 2025

३ बी. एच. के. लक्झरीयस

गेल्या दोन तीन वर्षात नागपुरात सर्वच भागांमध्ये बांधकामांवर "३ बी. एच. के. लक्झरीयस फ़्लॅटस" च्या जाहिराती दिसतात. एकेकाळी वाड्यांमधल्या दोन दोन खोल्यांमधले संसार पुढल्या पिढीत सिमेंटचा गिलावा केलेल्या किंवा टाईल्स बसविलेल्या ३ खोल्यांच्या ब्लॉक्समध्ये आलेत. त्याचा पुढल्या पिढीने मार्बोनाईट आणि तत्सम गुळगुळीत टाईल्स लावलेली २ बी एच के घरे बांधलीत. फ़्लॅट सिस्टीमची घरे नागपूरात गेल्या ४० - ५० वर्षांपासून असली तरी  तसा नागपूरकरांचा कल हा अशा फ़्लॅट सिस्टीममध्ये राहण्याचा कधीच नव्हता. मस्त ऐसपैस प्लॉटस घेऊन घरे बांधू, आजूबाजूला छान झाडे लावू हा नागपूरकर माणसाचा खाक्या पण आताशा बदलत्या काळानुसार सर्वत्र फ़्लॅट सिस्टीम्स बनायला लागलेल्या आहेत आणि सर्वच फ़्लॅट सिस्टीमची जाहिरात "३ बी. एच. के. लक्झरीयस" अशीच असते.


मला कायम प्रश्न पडतो या जाहिरातीतील लक्झरीची व्याख्या ही त्या बिल्डरने ठरवल्याप्रमाणे आहे ? की गि-हाईकांच्या कल्पनेप्रमाणे आहे ? जी गोष्ट एखाद्या नागपूरकर बिल्डरला लक्झरी वाटते ती इतर भारत भ्रमण करून इतर अनेक ठिकाणी राहून आलेल्या नागपूरकर माणसाला लक्झरी वाटेलच असे नाही. मग अशावेळी तोडगा कसा निघत असेल ? कारण टिपीकल नागपूरकर बिल्डर म्हणजे पुलंच्या भाषेत सांगायचे झाले तर धुळे - सांगली - रत्नागिरी - सोलापूर - सातारा ही सगळी शहरे मुंबई - पुण्यापासून २०० - २२५ किमोमीटर्सच्या परिघात आहेत असे समजणारा. आणि सध्या या बांधकाम क्षेत्रात कायकाय बदल चाललेले आहेत ते केवळ इंटरनेटवरून समजून घेणारा. अर्थात याला (एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच) काही सन्माननीय अपवाद आहेत पण नागपूरात मोठे मोठे नाव असलेली बिल्डर्स मंडळी आपल्या कल्पनादारिद्र्यासाठी आणि नागपूरकर ग्राहक हे त्यांच्याइतकेच कल्पनादरिद्री आहेत असे गृहीत धरण्यासाठी प्रसिद्ध आहेत. "कोन करते बे मुंबई - पुण्यासारखं नागपुरात ?" किंवा एखादी नवीन कल्पना ग्राहकाने सुचविल्यानंतर "नागपुरात चालते का बे ह्ये ?" अशी त्याची संभावना करणारी आहेत. "धोपटमार्गा सोडू नको" हे तत्व त्या सगळ्या बिल्डर्सनी फ़ारच मनावर घेतलेले दिसते.


शिरपूर जिल्हा धुळे इथे नरसी मोनजी इंस्टिट्यूटस चे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. त्या महाविद्यालय परिसरातच प्राध्यापकांची अतिशय सुंदर अशी निवासस्थाने आहेत. तिथे दोन वर्षे काढून आम्ही नागपुरात आलोत. एका अत्यंत नावाजलेल्या आणि नागपूरात खूप वेगवेगळ्या भागात भरपूर फ़्लॅट स्कीम्स असलेल्या एका प्रथितयश असलेल्या बिल्डरची निर्माणाधीन असलेली स्कीम खूप उत्साहाने आणि खूप अपेक्षेने बघायला गेलो. जाहिरातीत त्यांनी इतके वर्णन केले होते की त्यात एखादे घर घेण्याचा विचार आम्ही खरोखर केलेला होता.


त्यांनी त्यांचा सॅंपल फ़्लॅट आम्हाला दाखवायला नेले. अशा सगळ्या स्कीम्समध्ये असे सॅंपल फ़्लॅटस खूप छान तयार करून फ़र्निचरने सजविलेले वगैरे असतात पण पहिल्याच खोलीत आम्ही गेलोत आणि माझ्या छोट्याशा मुलीच्या तोंडून उदगार निघाले "बाबा, ये तो शुरु होतेही खत्म हो गया." वास्तविक आम्हा नवराबायकोंनाही तसेच वाटले होते पण छोट्या मुलांइतका स्पष्टवक्तेपणा आणि धैर्य आपल्यात नसते ना. "लक्झरीयस" अशी जाहिरात केलेल्या त्या फ़्लॅटमध्ये प्लॅस्टरींग, प्लंबिंग आणि पेंटिंग सामान्य दर्जाचे सुद्धा नव्हते हे माझ्यातल्या स्थापत्य अभियंत्याच्या चटकन लक्षात आले. पण अभियंता नसलेली इतर मंडळी त्यातल्या चकाचक फ़र्निचरला, त्यांच्या ब्रॉशरला आणि विकण्याआधीच्या अनेक भूलथापांना किती बळी पडत असतील ?असा विचार आमच्या मनात येऊन गेला. 


म्हणूनच त्यानंतरच्या ३ बी. एच. के. लक्झरीयस अशी जाहिरात वाचली की त्या "लक्झरी"त तथ्य किती ? आणि त्या बिल्डरचे ग्राहकांना गृहीत धरणे किती ? असा विचार मनात दाटून येतोच येतो. पण यात सगळ्याच शहरांमधले ग्राहकसुद्धा काही कमी नाहीत हं. बिल्डरने कितीही सुंदर एलेव्हेशनचा फ़्लॅट बांधला आणि तेच एलेव्हेशन बघून आपण फ़्लॅट घेतला असला तरी घेतल्यानंतर त्याच्या दर्शनी भागाच्या गॅलरीतच कपडे वाळत घालण्याचा झुला टांगणे, त्या गॅलरीला कुठलीतरी लोकल मेड ग्रील लावून त्या संपूर्ण फ़्लॅट सिस्टीमचेच सौंदर्य घालवणे असले प्रकार बहुतांश रहिवासी मंडळी करीत असतात. अर्थात याबद्दल त्या बिल्डरला कितीही वाईट वाटले तरी एकदा ग्राहकांची सोसायटी करून त्यांना ती फ़्लॅटसिस्टीम हस्तांतरीत केली की त्याच्याही अधिकारावर मर्यादा येते. काल नागपूरातल्या गांधीनगर भागात फ़िरताना एक अशीच सुंदर एलेव्हेशनची एक फ़्लॅट स्कीम बघण्यात आली आणि तिच्या दर्शनी भागात कुठल्याही रहिवाश्याने त्या बिल्डींगला विद्रूप करतील असे बद्ल केलेले दिसले नाहीत तेव्हा त्या बिल्डरचे आणि तिथल्या सुजाण रहिवाशांचेही कौतुक करावेसे वाटले.


"अरे काय जाताना घर सोबत नेणार आहात काय़ ?", "वर जाताना सगळे इथेच टाकून जायचे आहे बरे" वगैरे कितीही अध्यात्म ऐकले तरी भाड्याने घेऊन राहिलेल्या मातीच्या घरांपासून ते स्वतःचा छान बंगला बांधेपर्यंत ज्या व्यक्तींनी मेहेनतीने, स्वकर्तृत्वाने प्रगती साधली आहे त्यांना या ३ बी. एच. के. लक्झरीयस चे खरोखर कौतुक असेल आणि त्यांचा आदर्श घेऊन मार्गक्रमण करणा-या इतर अनेकांना या ३ बी. एच. के. लक्झरीयस चे खरोखरच अप्रूप असेल. तोपर्यंत हा बिल्डरांचा स्वप्ने विकण्याचा व्यवसाय नक्कीच भरभराटीने सुरू राहणार.


- स्थापत्य अभियंता असलेला पण बिल्डर बनण्याचे स्वप्न कधीही न पाहिलेला अभियंता, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


शुक्रवार, ६ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५