Showing posts with label Rarest of the rare. Show all posts
Showing posts with label Rarest of the rare. Show all posts

Tuesday, March 26, 2024

दुर्मिळ ते काही - (७)

 यापूर्वीचे लेख


दुर्मिळ ते काही ... (१)

दुर्मिळ ते काही ... (२)

दुर्मिळ ते काही ... (३)

दुर्मिळ ते काही ... (४)

दुर्मिळ ते काही ... (५)

दुर्मिळ ते काही ... (६)


२०/०६/१९९९. नेहेमीप्रमाणे उन्हाळी सुटी नागपूरला घालवून मुंबईला परत निघालेलो होतो. यावेळी तत्काळ कोट्यामधून रिझर्वेशन केलेले होते. दरवेळी माझा प्रवास हा अत्यंत नियोजनबद्ध असतो. प्रवासाची आरक्षणे दोन महिने / चार महिने आधीच काढून प्रवास करायला मला आवडते पण यावेळी महाविद्यालयानेच उन्हाळी सुट्यांचा काहीतरी घोळ घातला होता त्यामुळे नियोजित आरक्षण रद्द करून ऐनवेळी तत्काळ तिकीट काढून प्रवास करावा लागला होता.


१९९७ मध्ये नितीशकुमार रेल्वेमंत्री असताना त्यांनी ही तत्काळ तिकीट योजना रेल्वेत आणली. तेव्हा ही तिकीटे इंटरनेटवर उपलब्ध नसत. रेल्वेच्या रिझर्वेशन काऊंटरवर जाऊनच ही तिकीटे बुक करता येत. (आजही इंटरनेटवरून तत्काळ तिकीट काढण्यातला यशापेक्षा जास्त यश रेल्वेच्या तिकीट काढण्यात मिळते हा अनुभव आहे.) त्यासाठी पहाटे अगदी ४ वाजता नागपूर रेल्वे स्टेशन किंवा अजनी रेल्वे रिझर्वेशन काऊंटर इथे जाऊन रांगेत पहिला नंबर मिळवावा लागे. सकाळी ८ वाजता काऊंटर उघडले रे उघडले की प्रत्येक रांगेतल्या फ़क्त पहिल्या एक किंवा दोन क्रमांकांना कन्फ़र्म रिझर्वेशन्स मिळायचीत. म्हणून मग ही धडपड.


तेव्हा विदर्भ एक्सप्रेसला तत्काळचा वेगळाच कोच लागायचा. त्या कोचचा नंबर TS - 1 असा असे. त्या कोचमध्येही अगदी सुरूवातीला कोचमधले अगदी मधोमध असलेले बर्थ क्र. 33 ते 40 मिळायचेत आणि नंतर नंतर दोन्ही बाजूंकडले बर्थस मिळून शेवट शेवटच्या क्रमांकाला बर्थ क्र. 1 ते 8 किंवा बर्थ क्र. 65 ते 72 मिळायचेत. आपल्याला अगदी 68,70 क्रमांकाचा किंवा 3,4 क्रमांकाचा बर्थ मिळाला की आपण फ़ार भाग्यवान असा समज व्हायचा कारण काही सेकंदातच तत्काळ तिकीट बंद व्हायचे. बहुतेक रांगेत उभा असलेला आपल्या मागचा माणूसच तत्काळ तिकीटाविना परतायचा.



त्याकाळी नागपूर मुंबई विदर्भ एक्सप्रेसला अजनी शेडचे WAM 4, 6P एंजिन मिळायचे. अजनी लोकोमोटिव्ह शेडकडे मधली फ़ार थोडी वर्षे  WAM 4 या जातीची एंजिने होती. नंतर ही सर्व एंजिने भुसावळ शेडकडे बदली झाली आणी अजनी शेडकडे फ़क्त WAG 7 या प्रकाराची मालगाड्यांची एंजिने उरलीत. WAP 4 या जातीची प्रवासी गाड्यांची एंजिने अजनी शेडकडे आलीच नाहीत. पण मग नंतर आलीत ती WAP 7 या जातीची थ्री फ़ेज पॉवर ची अत्याधुनिक प्रवासी गाड्यांची एंजिने आणि आता तर भारतातली सगळ्यात आधुनिक म्हणून गणल्या गेलेल्या WAG 12 या मालगाड्यांच्या एंजिनांचा सगळ्यात मोठा ताफ़ा अजनी शेडकडे आहे. 


अजनी शेडच्या WAM 4 या जातीच्या एंजिनांची रंगसंगती अजनी ज्या झोनमध्ये आहे त्या मध्य रेल्वेच्या अजनीला सिनीयर असणा-या भुसावळ शेडच्या WAM 4 एंजिनांसारखी नसायची. भुसावळ शेडची एंजिने टिपीकल काळपट लाल रंगात असायचीत. १९९५ पूर्वीच्या सगळ्या काळपट लाल कोचेसला मॅचिंग अशी रंगसंगती. नंतर नंतर भुसावळ शेडने आपल्या एंजिनांना लाल आणि पिवळ्या रंगसंगतीत रंगवायला सुरूवात केली खरी पण तोपर्यंत अशा WAM 4 या जातीच्या एंजिनांचे आयुष्य संपत आलेले होते. आता एकही WAM 4 या जातीचे एंजिन भारतीय रेल्वेवर सक्रियरित्या सेवेत नाही. रेल्वे संग्रहालयात जाऊन बसली असतीलही कदाचित. अजनी शेडची WAM 4 एंजिने अजनीला भौगोलिक रित्या जवळ असलेल्या भिलाई शेडच्या एंजिनांसारखी रंगीबेरंगी असायचीत. ही एंजिने लाल, आकाशी निळा, पिवळा अशा छान पेस्टल रंगांमध्ये असायचीत. ही एंजिने विदर्भ एक्सप्रेसशिवाय नागपूर - दादर सेवाग्राम एक्सप्रेस, नागपूर - कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस, नागपूर - भुसावळ पॅसेंजर आणि नागपूर -इटारसी / आमला पॅसेंजर गाड्यांना लागायचीत.

 

WAM 4 या जातीच्या एंजिनांच्या रंगसंगतीवर लिहीलेली पोस्ट इथे.

विदर्भ एक्सप्रेस: वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगती आणि प्रवासाची आठवण.

हा तत्काळ कोच अगदी एंजिनाला लागून असायचा. त्याच्या मागे गार्ड आणि पार्सलचा कोच, त्यामागे दोन जनरल कोचेस आणि मग गाडीचे इतर कोचेस सुरू व्हायचेत. गाडीतले एसी आणि शयनयान कोचेस आतून एकमेकांना जोडलेले असत पण तेव्हा जनरल कोचेस, गार्ड आणि पार्सल कोच एकमेकांना आतून जोडलेले नसत. तशी सोय त्यावेळेसच्या कोचेसना नव्हती. आजकाल ती सोय झालेली आहे. म्हणून मग हा तत्काळ कोच इतर गाडीपासून एकटा असायचा. आणि एंजिनाच्या अगदी मागे असल्याने कुठल्याही स्टेशनला प्लॅटफ़ॉर्मच्या अगदी एका टोकाला उभा रहायचा. तिथे पाणी किंवा इतर खाद्यपदार्थ विक्रेते फ़ारसे उपलब्ध नसायचेत आणि मग प्रवाशांची थोडी गैरसोय व्हायची. विदर्भ एक्सप्रेसला कधीही पॅन्ट्री कार कोच लागला नाही. (खरेतर लावायला हरकत नव्हती. पण विदर्भ, सेवाग्राम, दुरंतो या कुठल्याच नागपूर - मुंबई गाडीला रेल्वे पॅन्ट्री कर का देत नाही ? हा एक प्रश्नच आहे.) आणि तसा पॅन्ट्री कार कोच लागला असता तरी हा तत्काळ कोच इतर गाडीला आतून जोडलेला नसल्याने त्या पॅन्ट्री कार वाल्यांचीही पंचाईतच झाली असती.


हा कोच इतर कोचपासून वेगळा असण्याचा एकमेव फ़ायदा असा होता की या कोचमध्ये मोजून ७२ बर्थसवर ७२ च प्रवासी असायचेत. तत्काळ कोचमध्ये विना आरक्षण बसणा-यांसाठी रेल्वेने भारी दंड लावलेला होता त्यामुळे बरोबर जेवढे बर्थस तेव्हढेच प्रवासी असायचेत. तत्काळ मध्ये तेव्हा आर ए सी, वेटिंग लिस्ट वगैरे भानगड नसायचीच. त्यामुळे बरोबर ७२ प्रवासी आणि सुखाचा प्रवास असा आनंद असायचा. तेव्हा तत्काळ रिझर्वेशन हे गाडीच्या उगम स्थानापासून ते गंतव्य स्थानापर्यंत (म्हणझे विदर्भ एक्सप्रेससाठी नागपूर ते मुंबई असे असल्याने) सगळा कोच हा नागपूरपासूनच पूर्ण भरलेला असे. त्यामुळे मधल्या कुठल्या तरी स्टेशनवरून चढणारे / उतरणारे नाहीत. रात्री बेरात्री कोचमध्ये येऊन आपले बर्थस शोधताना लाईट्स लावणारे नाहीत. रात्री बेरात्री कोचमध्ये आल्यानंतर इतर सगळे प्रवासी झोपले असतानाही आपण झोपण्यापूर्वी थोड्या गप्पा मारून इतरांची झोपमोड करणारे प्रवासी नाहीत. त्यामुळे हा प्रवास सुखकर व्हायचा. आताच्या नागपूर - मुंबई दुरंतो एक्सप्रेसमध्ये होतो तसा. 


त्यादिवशी आमचा हा तत्काळ कोच वेगळाच होता. बाकी सगळ्या कोचेसना आतून पांढ-या रंगांवर फ़ुलाफ़ुलांचे डिझाईन असलेल्या प्लायवूडसची पॅनेल्स असायचीत. आमच्या ह्या कोचला मात्र आतून राखाडी रंगाची आणि फ़ायबर प्लॅस्टिकची पॅनेल्स लावलेली होती. अशा प्रकारची पॅनेल्स लावलेला दुसरा कोच मी आजवर बघितलेला नाही. 


न भूतो न भविष्यति असा कोच, विदर्भ एक्सप्रेसची दुर्मिळ अशी रंगसंगतीआता दुर्मिळ झालेला तत्काळ विशेष असा कोच आणि आता नाहीसे झालेले अजनी शेडचे WAM 4 एंजिन असा त्रिस्तरीय दुर्मिळ योग या प्रवासाने दिला होता.


- हळूहळू स्वतःच म्हातारा आणि दुर्मिळ होत जाणारा रेल्वेफ़ॅन प्रा, वैभवीराम प्रकाश किन्हीकर.





Sunday, November 12, 2023

दुर्मिळ ते काही... (६)

 यापूर्वीचे लेख


दुर्मिळ ते काही ... (१)


दुर्मिळ ते काही ... (२)


दुर्मिळ ते काही ... (३)


दुर्मिळ ते काही ... (४)


दुर्मिळ ते काही ... (५)


महाराष्ट्र एस. टी. च्या बस बांधणी कार्यशाळांमध्ये नेहेमीच्या बसगाड्यांच्या बांधणीबरोबरच कधी कधी शहर बस सेवेसाठी विशेष बसेसचीही बांधणी होते. बहुतेक वेळेला ही शहर बसची बांधणी ती ती कार्यशाळा रेग्युलर बस बांधणी थांबवून निम आराम किंवा स्लीपर बसेस वगैरे बांधत असेल तर त्या काळात होते हे सुद्धा माझ्या निदर्शनास आलेले आहे.


शहर बस सेवेच्या दोन दारे असलेल्या विशेष बसेस MTD, MH-31 / 90XX, MH-12 / F 3XXX, MH - 31 / AP 94XX, MH - 14 / BT 10XX या सिरीजमध्ये झालेली आपल्याला आढळते. यातल्या MTD सिरीजमध्ये १९८२ साली भारतात झालेल्या एशियाड गेम्ससाठीच्या विशेष एशियाड बसेसची बांधणी झाली होती. MH-31 / 90XX, MH-12 / F 3XXX आणि MH - 31 / AP 93XX या सिरीजमध्ये इतर निम आराम बसेसची बांधणी झाली होती. MH - 14 / BT 11XX सिरीजमध्ये १२ मीटर टाटा चेसिसवर निम आराम बसेसची बांधणी झालेली आपल्याला दिसून येईल.


याच MH - 14 / BT 10XX सिरीजमध्ये मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी (पुणे) येथे शहर बस सेवेच्या काही विशेष बसेसची निर्मिती झाली होती. यातल्या ब-याचश्या बसेस सांगली - मिरज शहर बस सेवेसाठी दिल्या गेल्या होत्या. अशीच एक बस पंढरपूर आगारात दिल्या गेलेली होती. 


शहर बस सेवेची बस शहरापासून २५ - ३० फ़ारफ़ार तर ५० किमी अंतरासाठी वापरल्या गेल्याचे उदाहरण आहे. पण २०१३ च्या नोव्हेंबर महिन्यात आम्ही नागपूर ते सांगोला हा प्रवास मार्गे अमरावती - कारंजा (लाड) - मेहेकर - देऊळगाव राजा - जालना - छत्रपती संभाजीनगर - देवी अहिल्यानगर - करमाळा - टेंभूर्णी - पंढरपूर मार्गे करीत असताना हा दुर्मिळ योग दिसला. पंढरपूर आगाराने त्यांच्या शहर बस सेवेसाठी असलेली ही बस पंढरपूर - नगर या १८० किलोमीटरच्या जलद मार्गावर पाठवलेली होती. 





शहर बस सेवेची बस १८० किलोमीटरच्या मार्गावर दिसण्याचे हे एक दुर्मिळ उदाहरण.


- प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Friday, January 20, 2023

दुर्मिळ ते काही - ५

 यापूर्वीचे याच मालिकेतील लेख.

दुर्मिळ ते काही - १

दुर्मिळ ते काही - २

दुर्मिळ ते काही - ३

दुर्मिळ ते काही - ४


भारतीय रेल्वेत साधारण WDM 2, WDM 3A, WDM 3D किंवा WDG 3 या प्रकारची जी डिझेल एंजिने असतात त्यात लोको पायलट एंजिनाच्या एका बाजूकडेच असतात. लोको पायलट केबिन पासून एंजिनांची एक बाजू जास्त लांबीची तर एक बाजू थोडी कमी लांबीची असते. आम्ही रेल्वे फ़ॅन्स त्यांना अनुक्रमे Long Hood व  Short Hood म्हणून ओळखतो.



                      This is the Loco with  Short Hood Front (SHF mode). 


This is the Loco with  Long Hood Front (LHF mode).

साधारण 1978- 1979 च्या आसपास डिझेल लोकोमोटिव्ह कारखाना, वाराणसी येथून विशिष्ट प्रकारचे Short Hood असलेली फ़क्त काही एंजिने बाहेर पडलीत. लोको पायलट ची दृश्यमानता अधिक व्हावी या दृष्टीने हा प्रयोग झाल्याचे कळते. पण काही कालावधीत लोको पायलट्स नी जुनी एंजिने आणि ही नवीन एंजिने यांच्या दृश्यमानतेत फ़ारसा फ़रक नसल्याचा फ़ीडबॅक दिला असावा. मग अशा प्रकारच्या एंजिनांचे उत्पादन थांबवण्यात आले. एका एंजिनाचे आयुष्य साधारण 35 वर्षे असल्याने 2013 - 2014 पासून ही एंजिने दिसणे हळूहळू बंद होत गेले. आता तर ही एंजिने फ़क्त रेल्वे संग्रहालयातच दिसू शकतील.


This is the Short Hood in normal shape 

AND


This is the Short Hood in "Jumbo" shape.


                                  This is the Short Hood in "Jumbo" shape.

28 नोव्हेंबर 2013 आम्ही सोलापूर - पुणे महामार्गावरून दौंड कडे वळून श्रीक्षेत्र सिद्धटेक येथे जात होतो. मध्येच रेल्वे फ़ाटक लागले. रेल्वेप्रेमी असल्याने मार्गातले फ़ाटक बंद असले की वैताग न वाटता ती आम्हाला फ़ोटो / व्हिडीयो वगैरेंसाठी पर्वणी वाटत असते. याहीवेळी मी गाडीखाली उतरून कॅमेरा सज्ज केला. दौंडकडून दोन डिझेल एंजिने एक BTPN रेक (इंधन तेल घेऊन येणा-या वॅगन्स) घेऊन येताना दिसलीत. जवळ आल्यानंतर पहिला धक्का बसला ती म्हणजे दोन्ही एंजिनांचे Long Hood पुढे होते. आणि आणखी जवळ आल्यानंतर पुढचा धक्का बसला तो म्हणजे दोन्ही एंजिने जम्बो प्रकाराची होती. जम्बो प्रकारचे एक एक एंजिन दिसणेच जिथे दुर्मिळ तिथे दोन दोन जंबो एंजिने एकसाथ दिसणे म्हणजे दुर्मिळातली दुर्मिळ घटना होती. 


गुंतकल शेड (दक्षिण मध्य रेल्वेची) ही दोन जम्बो एंजिने बहुधा पुण्याजवळच्या लोणी येथून इंधन घेऊन वेगात दक्षिणेकडे निघालेली होती.


संपूर्ण व्हिडीयो इथे. 


- इहलोकीच्याच नव्हे तर परलोकी नेणा-या प्रवासालाही कधीही न वैतागणारा रेल्वेफ़ॅन राम.