Wednesday, May 19, 2021

भारतीय रेल्वेचे एक सेवक : WAM 4

 १९७० मध्ये उत्पादनांना सुरूवात झालेल्या आणि १९८३ पर्यंत चित्तरंजन, प. बंगाल येथे निर्माण होत राहिलेल्या भारतीय रेल्वेच्या एका निष्ठावान सेवकाने आपला सेवाकाळ संपवून नुकतीच सेवानिवृत्ती घेतली.


W = Wide Gauge i.e. Broad Gauge { M - Meter Gauge , Z - Narrow Gauge (2 feet 6 inches) and N - Narrow Gauge (2 feet)}


A = A.C. supply traction 15 kV alternating current supply { C - 1500 V DC supply traction. Was existing between Mumbai and Igatpuri and Mumbai and Pune till 2016, D - Diesel locomotive}


M = Fit for Mixed traffic hauling (i.e. Passenger traffic and goods traffic)  {G - Fit for Goods trains , P - Fit for passenger trains, S - Fit for shunting only}


भारतीय रेल्वेत एखाद्या रेल्वे एंजिनाचे सेवा आयुष्य ३० ते ३५ वर्षे असते. मार्च १९७१ मध्ये दक्षिण पूर्व रेल्वेच्या भिलाई शेडमध्ये सेवेत रूजू झालेल्या २०४०० या एंजिनचे नामकरण "रजत आभा" असे केले गेले होते. १३ वर्षांच्या काळात चित्तरंजन एंजिन कारखान्याने एकूण ५०० अशी WAM 4 जातीची एंजिने बांधलीत. ऑगस्ट १९८३ मध्ये शेवटले WAM 4 एंजिन २१३९९ या नंबरने आणि "अनंत" या नावाने मध्य रेल्वेच्या भुसावळ शेडमध्ये रुजू झाले.

१९७१ ते २०१५ पर्यंत या ३८५० हॉर्सपॉवरच्या आणि १२० किमी प्रतितास महत्तम वेगाने धावू शकणा-या या एंजिनांनी आपली सेवा राजधानी, शताब्दी आणि इतर प्रतिष्ठित गाड्यांसाठी दिली. यांची वेगवान धाकटी पिढी (WAP 4) आणि नव्या तंत्रज्ञानाची (3 phase) नवी पिढी आली (WAP 5, WAP 7) आणि यांचे महत्व कमी झाले. आणि जानेवारी २०१९ मध्ये शेवटल्या WAM 4 ला मुख्य मार्गातल्या सेवेतून सेवानिवृत्त केल्या गेले. 

मध्यम वेग आणि मध्यम शक्ती असली तरी या एंजिनांचे वैशिष्ट्य असे की ही एंजिने ज्या शेडमध्ये जायची त्या शेडचा साज अंगावर धारण करायची. भारतभर पसरलेल्या विविध शेडसमध्ये विविध रंगसंगती धारण करून ही एंजिने राहिलीत. आजकालच्या WAP 4 च्या एकसारख्या लालभडक किंवा WAP 7, WAP 5 च्या एकसारख्या पांढ-या रंगांपेक्षा विविध रंगसंगतीची WAM 4 एंजिने पाहणे हे नेत्रसुखद होते. तसेही १९७० आणि १९८० च्या दशकात भारतीय रेल्वे आपल्या गाड्यांनाही वेगवेगळी रंगसंगती देत असे. नंतर सगळ्याच गाड्यांना निळा + फ़िका निळा, नंतर एल एच बी कोचेसचा लाल + चंदेरी, किंवा आजकालच्या "उत्कृष्ट" कोचेसचा पिवळा + काळपट लाल अशी एकसारखी रंगसंगती आली. गाड्यांच्या रंगसंगतीची विविधता हरवली तरी WAM 4 एंजिनांनी ही विविधता जपून ठेवली होती. आता ते पण निवृत्त झालेत.

या निमित्ताने माझ्याकडे असलेल्या काही WAM 4 एंजिनांचे फ़ोटोज आणि माझ्याकडे नसलेल्या पण फ़ोटोंवरून "Autodesk Sketchbook" या ऍपमध्ये माझ्या मुलीने काढलेल्या काही शेडच्या रंगसंगती आपल्या सगळ्यांसाठी सादर.


अजनी शेडकडे WAM 4  एंजिने होती याची कल्पना ब-याच रेल्वेफ़ॅन्सना सुद्धा नाही. १९९५ ते १९९९ काळात २०४६९, २०५२९, २०६०० अशी काही एंजिने अजनी शेडकडे होती. विदर्भ एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, भुसावळ पॅसेंजर या गाड्यांना अजनी शेडची एंजिने लागत असत. अशाच एका प्रवासात विदर्भ एक्सप्रेसने प्रवास करताना, नागपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफ़ॉर्म क्र, ३ वर अजनी शेडच्या एंजिनाचा मी काढलेला फ़ोटो. फ़ोटोत दिसतोय तो माझा धाकटा भाऊ, श्रीकांत प्रकाश किन्हीकर. 



मध्य रेल्वेच्या अजनी शेडच्या एंजिनांची रंगसंगती मध्य रेल्वेच्याच भुसावळ शेडच्या काळपट लाल रंगांपेक्षा दक्षिण पूर्व रेल्वेच्या भिलाई आणि टाटानगर शेडच्या लाल, निळा आणि पिवळा रंगात रंगून जाणारी छान होती. भुसावळ शेडनेही मग नंतर काळपट लाल रंगसंगती टाकून देऊन छान लालचुटूक व क्रीम पिवळा अशी सुंदर रंगसंगती ल्यायला सुरूवात केली होती. पण अजनी शेडचे पेस्टल कलर्स भुसावळ शेडला नाही जमलेत. १९९९ नंतर अजनी शेडची एंजिने भुसावळ शेडला दिल्या गेलीत आणि ती पण नवीन रंगात रंगून गेलीत.


भुसावळ शेडचा मूळ काळपट लाल रंग


भुसावळ शेडची नवीन लाल पिवळी रंगसंगती. हे एंजिन अजनी शेडमधून भुसावळकडे गेलेले आहे.




पहिले WAM 4 एंजिन प्राप्त झालेल्या दक्षिण पूर्व रेल्वेच्या भिलाई शेडने त्यांच्या एंजिनांना भरपूर रंगसंगतीने नटवले. त्यातली एक लाल + क्रीम + निळी रंगसंगती. 



भिलाई शेडचीच एक रंगसंगती निळी आणि क्रीम. याला सगळे रेल्वेफ़ॅन्स आईस क्रीम रंगसंगती असे म्हणायचेत. 


लाल आणि क्रीम रंगसंगती ही सुद्धा भिलाई शेडची जुन्या रंगसंगतींपैकी एक होती.


दक्षिण पूर्व रेल्वेच्याच टाटानगर शेडनेही भिलाई शेडसारखीच लाल + पिवळी रंगसंगती (मध्ये छोटासा निळा पट्टा) अवलंबली होती. टाटानगर शेडकडे तसेही WAM 4  प्रकारची एंजिने एकूण कमीच होती. 


उत्तर रेल्वेच्या गाझियाबाद, पूर्व रेल्वेच्या मुगलसराय आणि पश्चिम रेल्वेच्या वडोदरा शेडसच्या WAM 4 ना एकसारखी रंगसंगती होती. पण वडोदरा शेडच्या एंजिनांवर त्यांचे नंबर्स लिहीण्याची एकदम विशिष्ट अशी पद्धती होती. (Seven Segment Display)


गाझियाबाद किंवा मुगलसराय शेडचे WAM 4.


पूर्व रेल्वेच्या हावडा शेडकडे एकदम मूळ रंगसंगतीतली, भुसावळ शेडसारखी काळपट लाल रंगाची, WAM 4 एंजिने होती.  पण मधला पिवळा पट्टा मात्र थोड्या वेगळ्या प्रकारचा होता.


दक्षिण मध्य रेल्वेच्या विजयवाडा शेडकडे पण अशी काळपट लाल रंगातली WAM 4 एंजिने होती. पण त्यांची वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगती म्हणजे काळपट लाल + निळी रंगसंगती. या स्केचमध्ये दाखविलेले लाल आणि निळे रंग उलटसुलट जागी करूनही जी रंगसंगती येईल त्या रंगसंगतीतही या शेडची एंजिने यायचीत. रेल्वेफ़ॅन्ससाठी मज्जा.


विजयवाडा शेडने त्यांचे काही WAM 4 आणि WAG 5 एंजिनेही गुलाबी आणि चंदेरी रंगांमध्ये रंगविलेली होती. याला रेल्वे फ़ॅन्समध्ये "बार्बी डॉल" रंगसंगती म्हणून ओळखले जायचे. 


पूर्व तटीय रेल्वेच्या विशाखापट्टणम शेडची रंगसंगती नारंगी + पिवळी रंगसंगती. आणखी एक वेगळाच प्रयोग.


मध्य रेल्वेच्या इटारसी शेडचीही लाल + पिवळी रंगसंगती. इटारसी शेडचे नाव हस-या अक्षरात लिहीण्याची यांची लकब एकमेवाव्दितीय होती.


दक्षिण रेल्वेच्या अरक्कोणम शेडचीही पण अशीच लाल + पिवळी रंगसंगती होती. पण सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगती म्हणजे सप्तगिरी रंगसंगती. चेन्नईवरून तिरूपतीला जाणारी सप्तगिरी एक्सप्रेस ही दक्षिण रेल्वेची अत्यंत लाडकी गाडी. या गाडीला हिरवा + पिवळा अशी वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगती होती. अरक्कोणम शेडने या गाडीसाठी लागणा-या काही काही WAM 4 एंजिनांनाही हाच हिरवा + पिवळा रंग दिलेला होता. एंजिन आणि गाडी एकाच रंगाची असण्याचा हा योग मध्य रेल्वेच्या डेक्कन क्वीनच्याही नशिबात एकेकाळी असायचा.

आज ही सगळी एंजिने सेवानिवृत्त झालेली आहेत. काही काही एंजिनांना काही स्टेशन्सबाहेर विशेष रूपाने जतन करण्यातही येईल. काही काही एंजिने रेल्वेच्या संग्रहालयातही जतन करण्यात येतील. गेली ३ दशके प्रवाशांची इमानेइतबारे सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या या रेल्वे कर्मचा-यांना या आठवणीव्दारे मानाचा मुजरा.

- रेल्वेफ़ॅन, राम

No comments:

Post a Comment