Monday, May 31, 2021

नागपूरच्या नावावर चा भारतीय रेल्वेतला आणखी एक विक्रम

आपल्या नागपूरच्या नावावर भारतीय रेल्वेत आणखी एक विक्रम नोंद केलेला आहे.
"सर्वात कमी अंतर कापणारी, दररोज धावणारी, पॅसेंजर गाडी"

१९७० च्या दशकापासून १९९४ पर्यंत "नागपूर - अजनी" अशी फक्त ३ किमी अंतर धावणारी पॅसेंजर गाडी होती. नागपूरच्या फलाट क्र १ वरून ही छोटीशी ३ डब्यांची गाडी सकाळी १० वाजता सुटायची. अजनी यार्डात काम करणारे बहुतांशी रेल्वे कर्मचारी या गाडीत असायचेत. आम्ही कराडला जाण्यासाठी फलाट क्र. २ किंवा ३ (क्वचित ४ किंवा ५ ही) वर उभ्या असलेल्या महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये बसण्याच्या गडबडीत असायचो तर ही बया प्रतिष्ठेच्या फलाट १ वरून कोळसा एंजिनामागे झुकझुक करीत ऐटीत निघून जायची.

अजनी स्टेशनवर अगदी पूर्वेला (अजनीकडून मेडिकलकडे जाणार्या रस्त्यावर पूर्वेकडे जायला रस्ता पूल ओलांडल्यावर डावीकडे वळणार्या रस्त्याला लागून) एक छोटासा फलाट होता. अजनीला पश्चिमेकडे तेव्हा २ च फलाट होते. ही गाडी नागपूर स्टेशन सोडल्यानंतर १२ सिग्नलच्या पुलापासून (तोच तो मोक्षधाम जवळचा दगडी आर्च पूल) अनेक सांध्यांना ओलांडत औलांडत १० मिनिटांत हा ३ किमी चि प्रवास संपवून अजनी यार्डातल्या पूर्वेकडच्या या स्पेशल फलाटावर जात असे.
परतताना संध्याकाळी ५.४० च्या सुमारास हीच ३ डब्यांची गाडी त्याच रेल्वे कामगारांना घेऊन नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर परतत असे.

हिला स्वतःचे ३ जनरल डबेही नसत. पहाटे नागपूरला ५.५५ ला येऊन रात्री १०.१० पर्यंत निवांत विसावा घेणार्या सेवाग्राम एक्सप्रेसचे ३ जनरल डबे ही गाडी दिवसा हक्काने वापरत असे. डब्यांवर एस टी बसप्रमाणे खडूनेच नागपूर - अजनी - नागपूर असे लिहील्या जात असे.

तर अशी या विक्रमी, सगळ्यात कमी अंतर कापणार्या, नागपुरी गाडीची कहाणी.

- नागपूरचा अभिमान असलेला रामभाऊ किन्हीकर.

(सोबतचे छायाचित्र प्रातिनिधिक) 




IRFCA data

2 comments: