Sunday, May 2, 2021

एकेका भौगोलिक विभागांची विविक्षित शब्द्संपदा.

 प्रत्येक भौगोलिक विभागाची जशी खाण्यापिण्याची वैशिष्ट्ये असतात तशी भाषेतल्या अत्यंत विविक्षित शब्दांच्या वापराचीही वैशिष्ट्ये असतात.

चंद्रपूर जिल्ह्यात जसे टुटुमाईच्या शेंगा, टेंभर, (चिक्कूसारखे एक फळ), चारं हे खाणे वैशिष्ट्यपूर्ण आहे, तसेच
"मल्लारमाडी" (बावळट व्यक्ती)
"सोंगाडमल्ली" (वयाला न शोभणारी वेषभूषा, केशभूषा, रंगभूषा करणारी, थोडक्यात "सोंग" करणारी व्यक्ती. हा शब्द बहुतांश वेळा भगिनीमंडळच एकमेकींविषयी बोलताना वापरत असतात.)
"मेंगुळणे" (अतिशय अशक्त / आळशी व्यक्ती)
गलंग (गणंग व्यक्ती)
दंडार (खरेतर कोकणातल्या 'दशावतारा'सारखा हा इथल्या झाडीपट्टीतला नाट्यप्रकार. पण खूप कटकट्या व्यक्तीला उद्देशूनही हा शब्द वापरतात. "आली पाय थे दंडार. आता घंटाकभराची निचिंती." अशा अर्थात हा शब्द जास्त वापरतात.)
हे सुध्दा बोलीभाषेतले विविक्षित शब्द आहेत.
आणि हो, हे शब्द उच्चारण्याची शैलीही विविक्षितच आहे. केवळ ताडोब्यातले वाघ पहाण्यापुरते चंद्रपुरात येणार्यांना तो अर्थ, तो उच्चाराचा लहेजा जमणारच नाही.
त्यासाठी चंद्रपूर शहरात तटबंदीच्या आत बालाजी वाॅर्ड, विठ्ठल मंदीर वाॅर्ड, बिंबा वाॅर्ड, समाधी वाॅर्ड किंवा तटाबाहेर रामनगर, तुकूम किंवा बंगाली कॅंप इथे एखादा उन्हाळा अंगावर घ्यावा लागेल.
जगात इतरत्र "अमक्यातमक्याने इतके पावसाळे पाहिलेत" असे वय मोजत असतील बहुतेक,
पण चंद्रपुरात एखाद्या माणसाने किती उन्हाळे पाहिलेत यावर वय मोजतात.
- महाराष्ट्राच्या पार त्या टोकाच्या बांद्यावरी (हा ही खास चंद्रपुरी प्रत्यय. चंद्रपुरी माणूस "भद्रावतीला" जात नसतो, तो "भांदकावरी" जाऊन येतो.) प्रवास आणि वास्तव्य करून मनाने चांदेकरच (अस्सल चंद्रपुरी माणूस 'चंद्रपूर'पेक्षा 'चांदा' हाच शब्द जवळचा मानतो) राहिलेला रामूभैय्या चांदेवाले.

1 comment: