Tuesday, May 4, 2021

गोव्यामधले घर कौलारू

 "गोवा" नाव उच्चारले की "बसणार्यांच्या" डोळ्यात एक वेगळीच चमक येते. वाटेल तितके अभक्ष्यखान, अपेयपान करायला मिळणार. अर्ध्या चड्ड्या घालून वाटेल तो धुमाकूळ घालायला मिळणार, मुक्तपणे वावरणार्या परदेशी पर्यटक स्त्रियांचे अंगप्रत्यंग, उच्छृंखल नजरेने, बेशरमपणे, पहायला मिळणार म्हणून गोव्याला जायचे ही आजकालच्या २० ते ४० पिढीची समजूत दिसते.

२० वर्षांपूर्वी मी सुध्दा सपत्निक गोव्याला जायला निघालो तेव्हा ," अरे, तू तर बियरही कधीच पीत नाहीस, मग गोव्यातली फेणी कशी पिशील ? तू तर पक्का शाकाहारी आहेस, मग मत्स्याहारी गोव्यात काय खाशील ?" अशी सूचनावजा धमकी एका आप्तेष्टाने दिली होती. जणू गोव्यात सगळी मंडळी पाण्याऐवजी फेणीच पितात आणि सगळीच मंडळी मत्स्याहारी असतात असा त्यांचा समज असावा.
पण पहिल्या भेटीतच हे गैरसमज गोव्यानेच दूर केलेत. खान्देश आणि विदर्भानंतर इतकी सुंदर पुरणपोळी मला पणजी शहरातच खायला मिळाली. Goan cuisine मधे शाकाहारी प्रकारांचेही वैविध्य भरपूर आहेत आणि शुध्द शाकाहारी भोजन देणारी बरीच उपहारगृहे गोव्यात आहेत हे ज्ञान मला सुखावून गेले.
गोव्यातले समुद्रकिनारे "बेवडेबाजी"त बुडून, जवळजवळ मृतावस्थेत पडून रहायला, नसतात तर त्या भव्य पुळणीवरून तांबट ते सोनेरी रंगांमध्ये बदलत जाणारा सूर्यास्त डोळ्यात साठवायला असतात. समुद्रात अर्धवस्त्र (कधी कधी बेवडेबाजीच्या तारेत विवस्रही) धिंगाणे करण्यात काय मजा येते ? माहिती नाही पण संपूर्ण शुध्दीत आपल्या पायाखालून समुद्राची वाळू घसरताना होणार्या गुदगुल्या वर्णनातीत असतात हे मात्र नक्की. म्युझिक सिस्टीम समुद्रकिनार्यावर लावून दारूच्या नशेत वेडेवाकडे नाचण्यापेक्षा सरत्या रात्री समुद्राची गाज ऐकत त्याच्या विशालतेसमोर नतमस्तक होण्याचा अनुभव आपल्याला अधिक समृध्द बनवतो हा माझा ठाम सिध्दांत आहे.
माझा गोवा म्हणजे सुंदर समुद्रकिनारे, गर्द वनराईचे वैभव, सुंदर घाटरस्ते, भव्य मंदिरे आणि सर्वत्र भरून राहिलेल्या तृप्तीतून अस्सल गोयंकारांच्या स्वभावात आलेली सुशेगाद वृत्ती.
तसे पहायला गेले तर चित्तातले असमाधानही माणसाला बळजबरीने शांत बसवते पण समाधानी माणसाची शांतता त्याला आणि त्याच्या आजुबाजूच्या वातावरणाला अधिक सुंदर बनवते. विविध ललित कलांच्या विकासाला चालना देते. म्हणून गोव्याच्या मातीतून एकापेक्षा एक सुंदर गायक, कलाकार, शिल्पकार भारताला मिळालेले आहेत.
त्यानंतरही गोव्याच्या ओढीने मी दोनदा गोव्यात गेलो. दरवेळी तिथल्या समुद्राला ओढीने भेटायला, तिथल्या वनराईशी जवळीक साधून गप्पा मारायला आणि मंगेशी, शांतादुर्गेसमोर नतमस्तक होऊन गार्हाणे घालायला गेलो. तिथल्या वास्तव्याचा पुरेपूर उपभोग घेतला.



२०१२ च्या नोव्हेंबरमध्ये गोव्याला गेलो असताना, जुने गोवा इथल्या गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासाचा फोटो, आज फेसबुकने दाखवला आणि माझ्या मनात तिथल्या सागराची गाज आणि तिथल्या माडांची साद, गुंजारव घालू लागली. मन पुन्हा भिरीभिरी गोव्यात जाऊन परतले सुध्दा.
"पंछी, नदियाँ, पवनके झोंके" सारखेच माणसाचे मनही अफाट शक्तीचे आहे, नाही ? कुठलीच बंधने, कुठलाच लाॅकडाऊन त्याला अडवू शकत नाही.
- गोव्यातल्या एकूणच सात्विकतेचा, शांतपणाचा चाहता रामभाऊ.

No comments:

Post a Comment