Monday, May 10, 2021

"सगुण चरित्रे, परम पवित्रे, सादर वर्णावी"

 श्रीपादश्रीवल्लभ चरित्र सारामृत, श्रीगुरूचरित्र, श्रीगजाननविजय किंवा आपल्या सदगुरूंचे चरित्र वर्णन करणारा ग्रंथ यासारखे प्रासादिक वाङमय नित्यनेमाने वाचन करणार्या आणि त्यांची पारायणे करणार्या सदभक्तांचा नेहमीचा अनुभव.

पहिल्या पारायणात ढोबळमानाने चरित्रातल्या गोष्टी कळतात. नंतरच्या पारायणांमध्ये हळूहळू त्या ग्रंथाशी तादात्म्य पावता येते. आणि चरित्रकथा जरी पाठ झालेल्या असल्यात तरी त्यांच्यामागचे तात्पर्य कळायला लागते.
अधिकवेळा पारायणपाठ झाला तर त्या चरित्रकथांमधला, संतांच्या सहज वागण्याबोलण्यामागील उपदेश माझ्या स्वतःच्या जीवनात मी कसा अनुभवू शकेन ? याची आस साधकाला लागते.
आणि संतचरित्रांचे वैयक्तिक आयुष्यात हळूहळू परिशीलन करणार्या साधकांनी जर ग्रंथांचे पारायण सुरूच ठेवले तर त्या ग्रंथातील शब्दचैतन्याचा साधकांना अनुभव येतो. ग्रंथातील शब्दचैतन्य आणि विश्वातले मूलचैतन्य यांच्यात अभेद नसल्याचा अद्वैतानुभव साधकांना येतो.
परम पूजनीय नाना महाराज तराणेकर म्हणायचे "रोज नवे नवे वाचू नये. वाचलेलेच वाचावे. म्हणजे त्यातून नवानवा अर्थ कळत जातो."
संतांच्या वचनांचा अनुभवच घ्यावा लागतो. नुसते शब्द लक्षात ठेवलेत तर कधीकधी त्यांच्यातल्या गूढाचे आकलन होईल, न होईल. पण निश्चयी आणि चिकाटी ठेवणार्या साधकाला त्या वचनांचा स्वतःच्या आयुष्यात अनुभव नक्की येईल आणि श्रीखंड्याने स्वस्थळी (व्दारकेला) निघून गेल्यानंतर संतश्रेष्ठ एकनाथमहाराजांना झालेल्या शोकाचे निवारण करताना "तुज मज नाही भेद, केला सहज विनोद" म्हणून जो अव्दैतानंदाचा अनुभव दिला होता, अगदी तसाच अनुभव सर्व संतांचा आणि विभूतींचा येईल. आणि हाच या प्रासादिक ग्रंथांनी आपल्याला दिलेला प्रसाद. सर्वसामान्य जीवनापासून सतत उन्नत होत जात शेवटी असामान्यत्वाची उंची गाठता येणे हा खरा प्रसाद, हे खरे परिवर्तन.
यात चमत्कार वगैरे काही नाही. "देऊळ बंद" मध्ये स्वामी समर्थ म्हणतात तसे, "Its just science, just science."
- वैयक्तिकरित्या या सर्व अनुभवांचा प्रवास जरी केलेला नसला तरी, एखादा मार्ग चालता चालताच, ध्येय गाठल्यानंतर तिथे काय असू शकेल ? याचा आराखडा ज्या बर्याच वाटसरूंच्या मनात उमटत असतो, त्यातलाच एक भोळा आणि प्रामाणिक वाटसरू, सदगुरूचरणरज राम.

No comments:

Post a Comment