Monday, February 7, 2011

फ़लाट्दादा फ़लाट्दादा

मी पहाटे उठून फ़िरायला जाणाऱ्यांच्या पंथातला आहे. पहाटे फ़िरायला जाणं यासारखं दुसरं सुख नाही. पहाटे उठावं आणि संथपणे, रेंगाळत फ़िरायला जावं.(फ़क्त मऊमऊ दुलईचा आणि उबदार पांघरूणाचा मोह दूर सारावा लागतो.) अनेक विलोभनीय कल्पना, विधात्याची विलोभनीय कलाकुसर अशी पहाटेसच दृष्टीपथास येते.

ब्लडप्रेशर, हार्टट्रबल, मधुमेह या किंवा तत्सम कारणांसाठी सक्तीने फ़िरणं वेगळं आणि मनमोकळं, वाट फ़ुटेल तिकडे, विचार नेतील तिकडे, भटकणं वेगळं. बऱ्याचदा भटकता भटकता लक्षात येतं की आपण चक्क स्टेशनावर आलेलो आहोत.

धामणगाव सारख्या छोट्या फ़लाटांच पहाटेच सौंदर्य काही औरच असतं. स्टेशनावरच्या ट्युबलाईटच्या दुधाळ प्रकाशात फ़लाट कसा न्हाऊन निघालेला असतो. चहाची टपरी तेव्हढी उघडी असते बाकी फ़लाटावर कुणीही नसतं. कायम फ़लाटावरच वास्तव्याला असलेला, चिंध्यांची गोधडी लपेटून झोपलेला एखादा भिकारी, गळणारा नळ आणि एखादच दुडक्या चालीचं कुलंगी कुत्रं. बस्स ! कधीमधी रात्रभराच्या जागरणाने झोप अनिवार झालेली एखादी मालगाडी पेंगुळल्यासारखी उभी असते. हे असलं विलक्षण दृष्यमिश्रण मला फ़ार आवडतं. फ़लाट विलक्षण जिवंत असतो. मी त्या फ़लाटाच्या प्रेमातच पडतो.



बाकी असल्या फ़लाटांचा थाट कुणीही चटकन प्रेमात पडावं असाच असतो. व्याप छोटा, आवाका छोटा आणि "दिलही छोटासा." बोरीबंदर, भुसावळ, अलाहाबाद, नागपूरसारख्या मोठ्या फ़लाटांचं तसं नाही. सदैव ते आपले घाईत असतात. मोठमोठ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसारखी यांच्याही दैनंदैनीतली पंधरा न पंधरा मिनिटांची वेळापत्रकं  तयार असतात. सुरुवातीला मलापण बोरीबंदरचा फ़लाट असाच विलक्षण परका वाटला होता. नंतर हळूहळू जाणवलं की, फ़लाटाच्या व्यस्त वेळापत्रकाशी आपलं वेळापत्रक जुळलं की आपली गोत्रंही जुळतात. त्याच्या वेगाशी आपण एकदा जुळवून घेतलं की आजवर थोडासा ’आखडू’ वाटणारा हा फ़लाट एकदम उबळ येऊन एखाद्या जुन्या म्हाताऱ्याप्रमाणे आठवणी सांगत बसेल असं वाटतं. रोजची आपली चढण्या-उतरण्याची जागा निश्चित झाली की मग उगाचच त्या जागांविषयी, त्या फ़लाटाविषयी आपल्याला ममत्व वाटू लागतं. त्यालाही कदाचित वाटत असणार.

फ़लाटाचेही विलक्षण पैलू असतात. आवडत्या व्यक्तीला निरोप द्यायला फ़लाटावर जावं, गाडी सुटल्यावर निरोपासाठी हात हलवावे, हृदये भरून यावीत. अशावेळी परतताना पावलांच्या जडपणाइतकाच फ़लाटांचाही सुन्नपणा जाणवतो. वाटतं आता तो कधीही कंटाळून उठून आपल्या घरी निघून जाईल. तोच फ़लाट एखाद्याच्या स्वागतासाठी कसा प्रफ़ुल्लीत होवून जातो. मग अशावेळी त्या फ़लाटावरची धूळ, गर्दी, घाम इत्यादी गोष्टी पायघड्यांसारख्या वाटायला लागतात.



ब-याचदा नाटकांच्या तालमींनंतर आम्ही निघतो. पाय आपसूकच फ़लाटाकडे वळतात. रात्रीची सगळीकडे सामसूम असते. "चाय जरा कडक और गरम" अशी प्रेमळ ताकीद चहावाल्याला असते. सिग्नलचे हिरवे लाल तांबारलेले डोळे अधिकच गूढ भासत असतात. वाफ़ाळलेले चहाचे कप हातात येइपर्यंत आम्ही आमच्या नाट्यचर्चेत रंगून गेलेलो असतो. फ़लाटही आमच्यात सहभागी असतोच. अशावेळी एखादी गीतांजली धाड्धाड करत धूळ उडवत जाते. चर्चेत व्यत्यय आलेला फ़लाटालाही आवडत नाही.अवेळी आलेल्या पाहुण्यांच्या आलेल्या रागासारखा त्याला राग येतो पण पुन्हा शांत झाल्यावर गप्पा रंगतात.



जीवन तरी दुसरं काय आहे?

जन्म आणि मृत्यू या दोन टर्मिनल मधला प्रवासच.! विधात्याने नेमलेल्या, स्वतः निवडलेल्या विविध मार्गावरून वाटचाल करत असताना मध्येच काही फ़लाटांवर उतरावं लागतं, दुसऱ्या गाडीची वाट बघत थांबाव लागतं आणि मृत्यूच्या टर्मिनस वर उतरावं लागतं. प्रवास संपतो. उरतात फ़क्त पाणावलेल्या पापण्या आणि गहिवरून त्यात दाटलेल्या आठवणी ! फ़लाटाच्या उरातील या अनंत आठवणींना वाचा फ़ोडण्यासाठीच मर्ढेकरांनी फ़लाटालाच विचारलं असावं

"फ़लाटदादा फ़लाटदादा,बोला की वो तुमी"


(हा लेख दै. तरूण भारत नागपूर मध्ये दि. ०९/०२/१९९५ रोजी प्रकाशित झालेला आहे)

photo courtesy: www.irfca.org (Indian Railways Fan Club)

4 comments:

  1. धामणगाव प्लॅटफॉर्मवर पाणी थंड व गोडसर मिळत असे .घाईघाईत उतरुन पाणी आणल्याचे आठवते.

    ReplyDelete
  2. रामराया तुमचे लेख वाचतांना सी आणी डी ब्लॉक ची चर्चा सत्रे आठवतात. असेच लिहित रहा

    ReplyDelete