दि. २०/१२/२००९. सकाळी ९.०० वाजता
स्थळ : प.पू. बापुराव महाराजांचे घर, एन. १५, रेशीमबाग, नागपूर.
विवेकजी घळसासींची रामकथा सुरू होतेय. निमित्त आहे आमच्या गुरूमाउली प.पू.मायबाई महाराज खातखेडकर यांचा जन्मशताब्दी सोहोळा. व्यासपीठ मोठे सुंदर सजवलेले आहे आणि व्यासपीठावर प.पू. बापुराव महाराज आणि प.पू. मायबाई महाराजांच्या प्रतिमांच्या पायापाशी बसून ही रामकथा ऐकण्याचे भाग्य मला लाभतेय.
खरंतर व्यासपीठावर नागपूरातील प्रथितयश गायिका व उत्कृष्ट प्राचार्या डॊ. स्नेहलताई पाळधीकर त्यांच्यासोबतच डॊ.निताताई झिंझर्डे आणि सौ. माधुरीताई करमरकरांसारख्या दिग्गज गायिका. त्यांच्यासोबत मागे कोरसमध्ये गाणं म्हणण तर सोडाच पण व्यासपीठावर तरी बसावं का? हा प्रश्न मला पडलेला. पण व्यवस्थेचा भाग म्हणून श्री. नानासाहेब(श्री. रमेशराव) खातखेडकरांनी बसायला सांगितलय. (यामागे काहितरी ईश्वरी संकेत होता असं मला आज वाटतय.)
आधी वंदू सदगुरू मायबापा.
प.पू.मायबाई महाराज जन्मशताब्दी सोहोळ्यानिमित्त उदघाटन समारंभासाठी आलेली संत मंडळी व मान्यवर.
सकाळच्या पवित्र वातावरणात स्नेहलताईंचं "श्रीरामचंद्र कृपालु भजमन...." हे गाणं हृदयात रामप्रेमाची ज्योत लावतय. विवेकजींना मी पहिल्यांदाच ऐकतोय. पण त्यांनी बोलायला सुरूवात केली आणि माझाच नव्हे तर त्या सभामंडपात उपस्थित असलेल्या शेकडो भाविकांच्या काळजाचा ठाव घेतला. राम शेवाळकरांसारखी रसाळ आणि प्रासादिक वाणी, जडजंबाल शब्दांचा अभाव, विद्वत्ता प्रदर्शनाचा कुठेही हव्यास नाही, विषयापासून कुठेही भरकटणे नाही, विनोदाचा हव्यास नाही आणि वावडेही नाही. प्रत्येक श्रोत्याचं मन राममय करून टाकताना त्यांच रामकथेवरचं निरूपण सुरू होतं. "मी आज २०१० मध्ये रामकथा कां ऐकावी ?" या प्रश्नाचं उत्तर ते देतायत. आजच्या युगात ही रामकथा आपल्याला काय देणार या प्रश्नाचं सर्वसमावेशक, समर्पक आणि आणि सर्वांना पटेल अस उत्तर ते देतात.
श्रीरामकथेत श्री. विवेकजी.
पहिल्याच सत्रात त्यांनी माझ्या मनाचा ताबा घेतला. त्यांच्यापासून अगदी १० फ़ुटांवर बसून रामकथा ऐकताना, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला वागणं जमेल का? त्यांनी प्रतिपादन केल्याप्रमाणे खर्या अध्यात्मिकतेने आपल्याला जगता येईल कां? हाच विचार मनामधे रुंजी घालू लागलाय. त्यांचं प्रतिपादन असं की "आपण सर्वच आज स्वतःला धार्मिक म्हणवून घेतोय पण धार्मिकतेच्या आचरणासाठी विचारांची बैठक पक्की हवी नाही तर तो धार्मिकतेचा निव्वळ आव होईल. आज आपल्या जीवनाचा बहुतेक भाग, खूप शक्ती, आपण जे नाही ते दाखवण्यात खर्च होतोय."
"बाहर क्या दिखलाईयें, अंतर जपिये राम
कहां काज संसारसे? तुझे धनीसे काम"
त्यांनी सांगितल की किमान अध्यात्मात तरी अकृत्रिम जगा. मोकळं जगा. वर्तमानात जगा. फ़ार भूतकाळात नको, फ़ार भविष्यात नको. त्यांच बोलण मनाला भिडलं. आणि नववर्षात नवीन पद्धतीने जगण्याचा मी संकल्प केला.
भजनानंदात रंगलेल्या भक्त मंडळींचा फ़ेर.
श्रीमद भागवताची दिंडी. २००९. सर्वात समोर असलेले आमचे वासुदेवदादा.
दिंडी नंतर रंगलेला फ़ेर. भागवतधर्माची पताका उंच आहे आणि राहीलही.
आज जाणवतय की २०१० मी तसं जगलो. खूप आनंदी जगलो. भविष्यातल्या संकटांचा खूप आधीपासून बागुलबुवा केला नाही.
(मध्ये एका चॆम्पियन फ़ुट्बॊल खेळाडूची कथा वाचली होती. तो होता हुशार आणि सामन्यापूर्वी त्याचे खूप मनोरथ असायचेत की माझ्याकडे चेंडू आल्यावर मी असा मारेन, तसा मारेन वगैरे वगैरे. पण प्रत्यक्ष खेळ सुरू झाल्यावर मात्र तो त्याच्या स्वप्नरंजनातून बाहेर यायलाच तयार नसायचा आणि विचार कृतीत यायचेच नाहीत. ऐनवेळी एखादा चेंडू त्याच्याकडे गेलाच तर तो त्याच्या मनासारखा खेळू शकायचाच असं नाही. मग त्याने वर्तमानाचा विचार करून खेळायचे ठरवले. मनाशी ठरवले की एकदा चेंडू माझ्याकडे येउ तर दे. माझं पुरेसं प्रशिक्षण झालेलं आहे मी तो ऐन वेळी ठरवेन कसा खेळायचा तो. आणि काय आश्चर्य! त्याचा खेळ सुधारला. केवळ तो वर्तमानात जगायला लागला म्हणून.)
मलाही २०१० ने निखळ आनंद दिला. बहुतांशी वेळ मी वर्तमानात जगलो. जे मी नाही ते दाखवण्याचा हव्यास कमी झाला. चांगलं वाचन झालं. (२०१० मध्ये वाचलेली पुस्तके आणि त्यांचं विचेचन हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. येत्या महिन्याभरातच ते लेखन प्रकाशित करेन)
आणि मग ७ दिवस अश्याच भारलेल्या अवस्थेत रामकथा ऐकल्यानंतर आमच्या श्री वासुदेवदादांनी आम्हा सर्वांच्याच हृदयातली भावना विवेकजींसमोर प्रगट केली की पुढील वर्षी प.पू. मायबाईंच्या जन्मशताब्दी सांगता सोहोळ्याला विवेकजींनीच श्रीमद भागवत कथेचं विवेचन करावं. विवेकजींनीही ही विनंती अकृत्रिमपणे मान्य केली. श्री वासुदेवदादांनीच विचारपूर्वक २५ डिसेंबर २०१० ही तारीख ठरवली.
पण नियती मनुष्यांच्या मनाप्रमाणे वागत नाही याचा प्रत्यय आला. सर्व कार्यक्रमांची नियोजनबद्ध आखणी करून आमचे वासुदेवदादा दि. २२/८/२०१० ला अकस्मात रामनामात विलीन झालेत. आम्हा सर्वांवर दुःखाचा जणु पहाड्च कोसळला. जीवनात रितेपण जाणवायला लागले.
पण श्री. नानासाहेब खातखेडकरांनी धीराने पुन्हा संघटन केले. त्यांच्या डोळ्यातल्या अश्रुंना त्यांनी थांबवले आणि श्रीमद भागवत सप्ताहाचे कार्य हे परमेश्वरी कार्य आहे याची जाणीव त्यांनी सगळ्यांना दिली. अनेक संतवरांचे आशिर्वाद या कार्याला लाभले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे संगीतावहिनींनी पतीवियोगाचे आणि आमच्या प्रमिलामावशींनी पुत्रवियोगाचे दुःख मोठ्या धीराने दडपले आणि भगवतकार्यासाठी अश्रु लपविले.
यावर्षी पुन्हा श्री. विवेकजींच्याच रसाळ वाणीतून श्रीमद भागवत कथा ऐकली. यावर्षी मात्र हक्काने व्यासपीठावर बसलो. त्यांच्या इतक्या जवळ बसून श्रीमद भागवत कथा ऐकण्याचा एक फ़ायदा माझ्या लक्षात एव्हाना आलेला होता तो म्हणजे विवेकजींच्या कथेमधल्या शिस्तीमुळे श्रोत्यांना आपली स्वतःची आसनसिद्धी साधावी लागत असे. कथा ऐकत असताना मध्ये कुठल्याही क्षुल्लक कारणावरून उठणे हा एक कथाविक्षेप आहे अशी सगळ्यांची भावना विवेकजींनी गेल्यावर्षीच दृढ केलेली होती. त्यामुळे मी एकदा व्यासपीठावर बसलो की मग कुठल्याही कारणासाठी उठण्याची शक्यताच नव्हती. (त्यासाठी गाणार्या मंडळींना कोरस हे एक निमित्त होतं. आमच्या साउंड सिस्टीमवाल्या वामनरावांनी आमचे माइक बहुतांशी वेळा बंदच ठेवले असल्याने आमची गाण्यातली झाकली मुठ सव्वा लाखाची राहिली.)
माझ्या चंचल स्वभावाला संपूर्ण श्रीमद भागवत कथा ऐकवण्याची ही महाराजांची योजना मला यावर्षी कळाली. प्रेक्षकांमध्ये बसलो असतो तर कदाचित एखादे वेळी उठण्याचा प्रसंग आला असता पण व्यासपीठावरून उठणे शक्यच नव्हते. सर्व व्याप ताप दूर ठेवावेच लागलेत आणि जाणवलं की हे करताना जगाचं आपल्यावाचून फ़ार अडत नसतं. आपणच उगाच आपल्याला अडकवून घेत असतो आणि गैरसमजुतीत असतो.
२०१० मधील श्रीमद भागवत कथेसाठीचे व्यासपीठ.
आजवर श्रीमद भागवत कथा वाचत होतो आणि ऐकतही होतो पण प.पू. बापुराव महाराज आणि प.पू. मायबाई महाराज भागवतमय जीवन जगले म्हणजे काय? हे यावर्षीच्या भागवत कथेतून कळले. श्रीमद भागवत हे केवळ एक पुराण नसून तो एक परिपूर्ण जीवन जगण्याचा मार्ग आहे याचा बोध झाला. (तशी या संदर्भातली रोकडी प्रचिती यायला डिसेंबर महिन्यात श्रीराम मंदीर वडधामना येथे झालेल्या श्री. शार्दूल शास्त्री तेलंग यांच्या श्रीमदभागवताच्या दशम स्कंध प्रवचनांपासूनच झाली होती.)
श्री.शार्दूल शास्त्री तेलंग श्रीमद भागवताच्या दशम स्कंधावर प्रवचन करताना. स्थळ : वडधामना येथील श्रीराम मंदीर.
दि.२५/१२/२०१० ते १/११/२०११ हे नऊ दिवस आम्ही सगळेच भागवतमय झालो होतो. रात्री झोपतानाही सकाळी सौ. स्नेहलताईंनी गायलेलं मधुराष्टक "मधुराधिपते रखिलं मधुरं" च कानात रुंजी घालत असायच आणि सकाळी उठल्यावर पहिले शब्द तेच आठवायचेत. बरं ही प्रचिती मला एकट्यालाच आलेली नाही तर माझे कुटुंबिय आणि ज्या आप्तमित्रांजवळ मी ही भावना बोलून दाखवली त्या सर्वांना आलेली आहे.
श्री. विवेकजींच्या विविध भावमुद्रा.
१ जानेवारी २०११. दिंडी नंतर चाललेले पाउल भजन आणि रंगलेली भक्त मंडळी. नववर्षाची यापेक्षा चांगली सुरूवात काय असू शकेल?
यावर्षी काही नवीन गोष्टी उमगल्यात. जीवन जगण्याच्या मार्गात त्यांचीही भर २०११ मध्ये घालायची हा निश्चय पक्का झाला.