पूर्वरंग:
खूप दिवसांपासून भांब देवी ला जाण्याचे मनात होते. बरीच वर्षे या देवस्थानाचे व्यवस्थापन किन्हीकरांकडे होते. मला आठवते मी १९९८ च्या आसपास कारंजाला गेलेलो असताना श्री. अशोककाकांनी मला त्यांच्या बजाज एम.८० वर भांब देवी ला नेले होते. २ ओक्टोबरला हा योग पुन्हा जुळवून आणायचे ठरले. चि. श्रीकांत (धाकटा भाऊ) आणि चि. सौ. अश्विनी ला विचारले, ते पण तयार होते. रविवारी सकाळी ६.०० वाजता नागपूर सोडायचे ठरले.
२/१०/२०११.
सकाळी पावणेचारला आम्ही उठलो खरे पण मलाच बरे वाटत नव्हते. आवरून निघायला पावणेसात झालेच. ६.५३ ला घरून निघालोत. देवनगरवरून चि. श्रीकांत , चि.सौ. अश्विनी आणि चि. रेणुकाला घेतले आणि निघालो तेव्हा चक्क ०७.०३ झाले होते.
चि. रेणुकाच्या बोबड्या बोबड्या बोलांनी मजा येत होती. खेळायला तिची ताई चि. मृण्मयी आणि तिची काकू सौ. वैभवी होत्याच. गाडी चालवताना फ़ार वेळ मागे वळून पाहता येत नसल्यामुळे तिची काही मस्ती मी बघायला मुकलो. फ़क्त श्रवणावरच समाधान मानत रिलायन्स च्या गॆस पंपावर गाडी थांबवली (०७.२८--०७.३०). १८ किमी अंतर २१ मिनीटांत. आजकाल नागपूर ते बुटीबोरी हा रस्ता ६ लेन्स चा असूनही वाढत्या वाहतूकी मुळे अपूरा पडायला लागलाय. दोन तीन वर्षांपूर्वी ह्या रस्त्यावरून तुफ़ान वेगाने जाण्यात जी मजा होती ती आता राहिली नाही. जरा कुठे ६०-७० ची स्पीड गाठतोय न गाठतोय होच अडथळा येतो आणि पुन्हा दुस-या तिस-या गियर पासून सुरुवात करावी लागते.
बुटीबोरी मागे टाकून आम्ही वर्धेच्या दिशेने लागलो तेव्हा वाहतूक त्या मानाने कमी झाली होती पण रस्त्याची हालत खराब झाली होती. दोन वर्षांपूर्वी हा रस्तापण छान होता. खडकी, केळझर ला जायला खूप मजा यायची.
खरंतर हा नागपूर-वर्धा-कारंजा(लाड)-मेहेकर-सिंदखेड राजा-औरंगाबाद-शिर्डी-सिन्नर-घोटी-मुंबई जाणारा राष्र्टीय महामार्ग म्हणून विकसीत होणार होता. नितीन गडकरी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनीच पुढाकार घेऊन ह्या रस्त्याचे नियोजन व बांधकाम केले होते. नागपूर ते मुंबई हा रस्ता एका सरळ रेषेत जातो. उगाच अमरावती-अकोला-धुळे-नाशिक हा लांबचा पल्ला टाळला जातो आणि जवळपास १५० किमी अंतर वाचतं. शिवाय मुंबई आग्रा महामार्गावरचा ताणही कमी होतो. पण माणसांसारखी रस्त्यांचीपण नशीबे असावीत. १९९९ मध्ये भाजप-सेनेचे सरकार गेले आणि या रस्त्याला सावत्रपणाची वागणूक मिळायला सुरूवात झाली ती आजतागायत. विदर्भाला मिळणा-या सापत्न वागणुकीचा आणखी एक बळी.
वर्धा बायपास वरून थोडा वेळ यवतमाळ रस्त्याला लागून आम्ही या महामार्गावर उजवीकडे वळलो. आता रस्ता थोडा बरा होता. दहेगाव स्टेशनच्या बाजुने जाताना आमच्या सहप्रवाशांना केळकरांच्या राजमलाई आणि बोरकुटाची आठवण झाली पण झपझप अंतर कापायचे म्हणून आम्ही थांबायचे टाळले.
पुलगाव बायपास घेऊन नाचणगाव मार्गे आम्ही खातखेड्याला पोहोचलो तेव्हा ०९.३१ झाले होते.(९५ किमी २ तासात). खातखेडला आमचे गुरू महाराज श्री. बापुराव महाराज खातखेडकर यांची शेती आहे आणि लगतच त्यांची कुलस्वामिनी जगदंबा हिचे मंदिर आहे. मी आणि श्रीकांतने ह्यापूवी इथे दर्शन घेतले आहे पंण आमच्या दोघांच्याही सौभाग्यवती यापूर्वी इथे कधीच आलेल्या नव्हत्या. अनायासे आम्ही नवरात्रात बाहेर पडलो होतो मग जगदंबेचे दर्शन आणि सौ. वैभवी व सौ. आश्विनीचा ओटी वगैरे भरण्याचा कार्यक्रम पार पडला. दरम्यान श्रीकांत आजुबाजूच्या शेतांमध्ये शिरला होता आणि खायला शेतातल्या ताज्या मिरच्या शोधत होता.
खातखेडची तू अंबाबाई.
प.पू. बापुराव महाराजांची शेती, खातखेड.
नवीन फोटोग्राफर- मृण्मयी.
जगदंबा माता की जय.
माझा प्रवासातला विश्वासू साथीदार- माझी वॆगन आर.
राम आणि मृण्मयी.
चि. श्रीकांत, अश्विनी व रेणुका.
खातखेडलाच आम्ही थोडी पोट्पूजा आटोपली. निघालो तेव्हा सकाळचे १० वाजले होते.
रस्ता आता छान होता. ८०-९० ची स्पीड सहज गाठता येत होती. देवगाव-सुलतानपूर मार्गे कारंजाला गुरूमंदिरात पोहोचलो तेव्हा ११.५४ झाले होते.(१०३ किमी १ तास ५४ मिनिटांत, सरासरी ५४ चा वेग. ठीक)
गुरूमंदिरात हातपाय धुतानाच एका गृहस्थांनी आम्हाला बोलावले आणि प्रसाद घेऊनच जा असा आग्रह केला. श्रीकांतला नवरात्राचे उपवास होते त्याने थोडा इनकार करताच त्याला त्यांनी जास्तच आग्रह केला. अर्थात प्रसादाचा अव्हेर करणे आम्हाला शक्यच नव्हते.
मंदिरात शिरता शिरता आरती सुरू झाली होती. खरंतर गुरूंची प्रसन मूर्ती आम्हाला अजून दिसू शकत नव्हती पण ती दिव्य स्पंदने जाणवली. आपण गुरूमूर्तीकडे तोंड करून उभे असताना आपल्या पाठीमागे नाना महाराज तराणेकर आणि इतर समकालीन श्रेष्ठ गुरूभक्तांच्या तसबिरी आहेत. आपण इथपर्यंत पोहोचण्यामागे श्री. नानाच आहेत ही भावना उचंबळून आली आणि डोळे पाणावलेत. मन अगदी हलके झाले. हीच तर गुरूकृपा आहे.
आरती संपली. तीर्थ प्रसाद प्राशन करून थोडा वेळ आम्ही नामसंकीर्तन केले आणि प्रसादगृहाकडे प्रस्थान ठेवले. महाराजांच्या कृपेचा दिव्य प्रसाद ग्रहण करून येणारी तृप्ती रोजच्या भोजनात येणे अशक्यच.
तृप्त मनाने आणि पोटाने कारंजा सोडले तेव्हा १३.२४ झाले होते. तिथल्याच एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून घेतले आणि धनज मार्गे भांब देवी कडे निघालो. हा रस्ता ग्रामिण भागातला होता त्यामुळे अरुंद रस्ता, खाच-खळगे हे होतेच पण आजुबाजूला छान हिरवीगार शेते आणि त्यात कापायला आलेली कणसे, भाजी वगैरे दिसत होती. विदर्भावर निसर्गाने भरपूर कृपा केलेली आहे. काळी कसदार जमीन ही एक जमेची बाजू आहे. शेतक-याला जर सिंचनाची साथ मिळाली तर तो काय करू शकतो हे या भागातल्या शेतक-यांनी दाखवून दिले आहे. एका शेतात भरपूर फुलकोबी (फ़्लॊवर) दिसल्या. आम्ही गाडी थांबवली. शेतकरी तिथेच होता. त्याला विनंती करताच तो त्या शेतात उतरला आमच्यासाठी भली मोठी पाच-सहा फ़्लॊवर घेऊन आला. आम्ही त्याली दिलेले पैसे त्याने घेतले नाहीत.
भांबदेवीला पोहोचलो तोवर दुपारचे १४.२६ झाले होते. मी १९९८ मध्ये पाहिलेले भांब आणि आत्ताचे भांब यात कल्पनातीत फ़रक पडलेला होता. संस्थानसुद्धा खूप विकसीत झालेले होते आणि नवरात्रांमुळे भाविकांची बरीच गर्दी होती.
गर्दीतच दर्शन घेतले. सौ. आश्विनी आतापर्यंत फ़क्त पाण्यावरच होती. तिने आत्ता थोडा फ़लाहार केला आणि आम्ही १४.५१ ला आमच्या मुक्कामाकडे निघालो.
रेणुका श्रीकांत किन्हीकर
खेर्डाफ़ाटा येइपर्यंत पुन्हा ग्रामीण रस्ता आणि नंतर एन.एच.६ ला लागलो. हा रस्ता पण छान झालाय. अमरावतीला बायपास करून सतत ८०-९० च्या वेगात निघालो. मागची प्रवासी मंडळी झोपी गेलेली होती. बाजुच्या सीटवर श्रीकांतलापण झोप येत असावी पण तो झोपला मात्र नाही. गाडी चालवताना मला बाजूचा सहप्रवासी झोपला तरी काही फ़रक पडत नाही. गाडी चालवायला मला प्रचंड म्हणजे प्रचंड आवडतं. आणि सहसा मी स्वतः रात्री ९ नंतर गाडी चालवतच नाही. मला ज्या प्रदेशातून आपण प्रवास करतोय तो प्रदेश पूर्ण पाहण्याची खूप आवड आहे त्यामुळे रेल्वे प्रवासाचे नियोजन करताना सुद्धा मी दिवसभर प्रवास आणि रात्री मुक्काम असा प्रवास करतो. हॊटेलचा खर्च वाढतो खरा पण आपण पंजाबातून प्रवास करतोय आणि तिथली हिरवीगार "सरसोंकी खेती" आपण अंधारात मिस करतोय ही जाणीव किती दुःखदायक आहे!
तळेगावला दुपारी १६.५३ ला पोहोचलो. (१०१ किमी २ तास ३ मिनीटांत. सरासरी ४९ चा वेग). आता मागे बसलेल्या पासिंजरांची झोपबीप झाली होती. चहा घेण्यासाठी थांबण्याचा आग्रह झाला. नवीनच झालेल्या आणि खूप किर्ती ऐकलेल्या ’बात आणि बॊल ’ मध्ये आम्ही थांबलो.
क्रिकेटवर असलेले हे थीम रेस्टॊरंट. आवडले.
नागपूरपासून जर हे थोडं अधिक जवळ असतं तर बहार आली असती. आत्त्ताही मजा आलीच. ती पूर्ण मजा उपभोगून चहा नाश्ता घेऊन आम्ही निघालो तेव्हा १७.४८ झाले होते. चि. मृण्मयी आणि चि. रेणुका तर यायलाच तयार नव्हत्या. कसेबसे त्यांना गाडीत घेतले आणि निघालो.
उरलेले ९७ किमी कापून घरी यायला १९.३० झालेत. (९७ किमी १ तास ४२ मिनीटांत. सरासरी वेग ५७ किमी. प्रतितास. अमरावती-नागपूर रस्ता खरच खूप छान झालाय). समाधानी दिवस, सर्वार्थाने.