Saturday, September 29, 2012

एक अनिष्ट प्रथा


आजकाल आपण फ़ारच इंग्रजाळलेले झालेले आहोत. त्यांच्या ब-याच प्रथा आपण आता निमूटपणे स्वीकारल्या, नव्हे पूर्णपणे अंगिकारलेल्या आहेत. आता वाढदिवसाला जर केक कापला नाही तर आपल्याला तो वाढदिवस साजरा केल्यासारखा वाटतच नाही.

याच वाढदिवसाबद्द्ल आजकालचे माझे एक निरीक्षण. गेल्या साधारण दोन अडीच वर्षात मी बघत आलोय की केक कापला रे कापला की त्या केकला ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या तोंडाला फ़ासण्याची जणू स्पर्धाच सुरू होते. तोंडाला फ़ासण्यासाठी वेगळे केक्स बाजारात मिळतात की काय नकळे ? पण जी वस्तू खाण्यासाठी आपण आणतोय त्या वस्तूची अशी नासधूस मनाला पटत नाही. बरं ही प्रथा इंग्रजांकडून आलेली आहे म्हणावे तर तसा संदर्भ मला तरी मिळाला नाही. (जाणकारांनी तो लक्षात आणून दिल्यास मी आभारी राहेन.)


हे एक प्रातिनिधिक छायाचित्र. असले हिडीस प्रकार आजकाल शिकल्या सवरल्या लोकांमध्ये फ़ार बघायला मिळतात. अर्धा देश दुष्काळात होरपळत असताना खाण्याच्या गोष्टीची अशी नासधूस मन अस्वस्थ करून जाते.

बरं, हे फ़क्त तरूणाइतच आहे असे नाही चांगल्या चांगल्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहोळ्यात सुध्दा हा प्रकार होताना दिसतोय. आपण एखाद्या व्यर्थ आणि वाईट प्रथेला किती लवकर बळी पडतोय हेच यावरून सिध्द होतं.

काही वर्षांपूर्वी, लग्न मंडपात मंगलाष्टकं संपली रे संपली की वधू आणि वराच्या मागे उभ्या असलेल्या त्यांच्या अतिउत्साही मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांनी त्यांना उचलून धरण्याचा एक आचरट प्रकार सर्रास दिसत होता. माझा एक मजबूत शरीरयष्टीचा मित्र त्याच्या मागे उभ्या असलेल्या या पाप्याच्या पितरांनी उचलून घेता घेता बोहोल्यावरच पडला आणि ऐन लग्नात अनावस्था प्रसंग ओढवला होता. खरचटण्यावरच निभावलं म्हणून ठीक आहे पण सहजीवनाची अशी विचित्र सुरूवात झाली. सुदैवाने समाजाच्या सामूहिक शहाणपणामुळे हे असले प्रकार आता पूर्णपणे थांबले किंबहुना तुरळक होताना दिसतात.

ज्यांना कुठलाही आधार नाही असल्या अनेक अनिष्ट प्रथांना आळा बसावा ही काळाची गरज आहे.

1 comment:

  1. पूर्ण सहमत. पैशांचा माज असतो हा सगळा आणि अर्थातच काहीसा अनाकलनीय बावळटपणा!

    ReplyDelete