मला आठवतय आमच्या बालपणी चारधाम यात्रा म्हणजे बद्रीनाथ-जगन्नाथ पुरी-रामेश्वर-व्दारका अशी कल्पना होती. आद्य शंकराचार्यांनी भारतीय एकात्मतेसाठी देशाच्या चारही कोप-यांमध्ये चार धामांची प्रतिष्ठापना केलेली होती. ही यात्रा करायला गेल्यावर आपोआप आपले भारत भ्रमण होउन भारताची खरी ओळख आपल्याला होत असावी.
प्रभू रामचंद्रांच चरित्र आपण लक्षात घेतल तर त्यांनी भारताची बांधणी उत्तर-दक्षिण केलेली आपल्याला दिसते. अयोध्या ते रामेश्वर असा हा दक्षिणोतर विभाग रामांच्या प्रभावाखाली आजही आहे. तर भगवान गोपालकृष्णांनी भारत पूर्व पश्चिम बांधला. व्दारका ते प्रागज्योतिषपूर (गुवाहाटी) असा त्यांचा प्रभाव आहे.
१९९० च्या दशकात पर्यटन उद्योगाचा जो विकास झाला आणि त्यातूनच अचानक चार धाम म्हणजे बद्रीनाथ-केदारनाथ-गंगोत्री आणि जमनोत्री अशी एक सुपीक कल्पना बाहेर पडली. चार धाम यात्रा करण्यामागचा खरा हेतू मागे पडला.
आत्ता उत्तराखंडात जो विनाश झाला त्यानंतर "चार धाम यात्रा आता कमीत कमी ३ वर्षे तरी होणार नाही" असले मथळे प्रकाशित व्हायला लागल्यानंतर सहजच मन मागे गेले आणि मूळ कल्पना काय हे तपासून पहायला लागलो.
भारतीय रेल्वे ओखा (व्दारका)- रामेश्वर अशी एक व्दिसाप्ताहिक गाडी चालवतेय आणि ओखा - पुरी ही आठवड्यातून ५ दिवस जाणारी गाडी. पण इतर ठिकाणांसाठी गाड्या नाहीत. रामेश्वर-वाराणसी ही एक साप्ताहिक गाडी आहे पण ती रामेश्वर-ऋषीकेश अशी असायला हवी होती. खरंतर ऋषीकेश-पुरी, ऋषीकेश-ओखा आणि पुरी- रामेश्वर गाड्या चार धाम एक्सप्रेस म्हणून सुरू व्हायला हव्यात.