Wednesday, December 18, 2013

Destination is important; but enjoying the journey is more pleasant

हे वाक्य मी जेव्हा पहिल्यांदा वाचले तेव्हा मला ते मनापासून पटले. जगण्याची किती छान रीत आहे न ही ? खरं म्हणजे टिपीकल मध्यमवर्गीयात जन्मून वाढलेल्या मुलांसाठी असल काही म्हणजे त्यावेळी दिव्यच होते. थ्री इडीयटस सिनेमात दाखवल्याप्रमाणे बालपणापासूनच ध्येय आणि ते गाठण्यासाठी करावे लागणारे परिश्रम याचच महत्व मनात बिंबवल जायच. ते चूक होत अस मी तरी आज का म्हणू ? ध्येयाच्या मागे लागलो नसतो तर आज जीवनात जे काही मिळालय ते प्राप्त झालच नसत. पण एका क्षणी वरील वाक्य फ़ारच पटल. प्रवास एन्जॊय करत जगूयात ना. ध्येय तर येइलच. जातय कुठे ?

साध उदाहरण आहे. एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जायचय. बसमध्ये बसल्या बसल्या झोपलात तरी पोहोचणार आणि आजुबाजुचा, कधी रखरखीत तर कधी मनमोहक, निसर्ग पाहत गेलात तरी पोहोचणारच. मग ही मजा अनुभवत का जाउ नये ? ही प्रवृत्ती मला आवडली. मी स्वतः प्रवास करताना जर नवीन प्रदेशांमधून प्रवास करायचा असेल तर दिवसा तिथून जाणारी बस किंवा रेल्वे निवडतो. रात्रीच्या अंधारात काय पहायच राहून गेलय याची चुटपुट मला सतत लागून राहते.

रामदेवबाबा महाविद्यालय, नागपूर येथे प्राध्यापकी करताना मला एक विचित्रच गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे इथले आठव्या सेमीस्टरचे विद्यार्थी "गेट, जी आर ई" वगैरे परिक्षांचे निमित्त सांगून महाविद्यालयात जवळपास दोन एक महिने अनुपस्थित राहतात. ध्येयासाठी प्रवासाच्या आनंदाला मुकण्याचेच हे उदाहरण झाले. शेवटच्या एक दोन आठवड्यात त्यांना ही जाणीव होते आणि महाविद्यालयीन जीवनाचे उरलेले काही दिवस उपभोगण्यासाठी ते महाविद्यालयात येतात.

आमचे फ़ायनल इयर संपल्यानंतर वसतीगृह सोडून घरी परतायची जेव्हा वेळ झाली तेव्हा कुणीही घरी जायला तयार नव्हते. आमच्या रेक्टरना सांगून आम्ही आमच्या वास्तव्यासाठी एक दोन जादा दिवस मागून घेतलेले होते. त्यांनीही आमच्या भावना ओळखून तशी परवानगी दिलेली होती. शेवटी परत निघण्याच्या वेळेला जी अभूतपूर्व रडारड झाली होती ती मी तर विसरूच शकत नाही. पुन्हा दरवर्षी भेटू वगैरे गोष्टी ठरल्यात. (त्यानंतर सगळेच जण आपापली नोकरी, धंदा, व्यवसायात गुंतल्याने त्या प्रत्यक्षात आल्या नाहीत हा भाग अलहिदा) पण त्या प्रवासाचा हे बंध निर्माण आमच्यात निर्माण झाले होते.

पण ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे साधनाचा मोह पडून साध्याचा विसर पडू देता कामा नये. आपले स्टेशन आले की गाडीची बोगी कितीही मनमोहक असली तरी सोडून उतरावे लागते नाहीतर हा जन्म जन्मांतरीचा प्रवास तसाच सुरू राहील. पण प्रवासाअंती उतरताना मात्र प्रवास केल्याचे समाधान मिळाले की दगदग झाली याचा हिशेब महत्वाचा ठरतो. आता हे समाधान किंवा ही दगदग आपल्या मनोवृत्तीवरच अवलंबून असते. ए.सी. कोच मध्येही दगदगीचा प्रवास आणि आनंदी माणसाला जनरल कोचमध्येही समाधानाचा प्रवास होऊ शकतो.

एका कवीच्या ओळींनुसार

"अखेरच्या वळणावर यावा
मंद सुगंधी असा फ़ुलोरा
थकले पाऊल सहज पडावे
आणि सरावा प्रवास सारा"

प्रवास आनंदात केला असेल, डोळे उघडे ठेऊन, जाणतेपणाने केला असेल तर अखेरच्या वळणावरचा सुगंधित फ़ुलोरा दृष्टीपथात येईल. आणि म्हणूनच ध्येयाकडे वाटचाल करताना प्रवासाचा आनंद घेतलाच पाहिजे.

No comments:

Post a Comment