टुकार मराठी मालिका आणि मिळेल तिथून सर्वकाही फ़ुकट ओरबाडून घेण्याची वृत्ती या दोन महत्वाच्या गोष्टींमुळे नव्वदोत्तर मराठी मध्यमवर्गीय समाजाचा -हास झाला असे माझे निरीक्षण आहे.
१. ज्या घरातील वृद्ध मंडळी बाल गोपाळांना " लवकर निजे, लवकर उठे " चे फ़ायदे सांगण्याऐवजी स्वतःच जर रात्री ११, ११.३० पर्यंत टुकार मालिका (दुपारी रिपीट टेलीकास्ट पुन्हा हं) पहात बसत असतील तर मग नातवंड पब मध्ये जातात म्हणून ओरडण्याचा अधिकार गमा्वून बसणारच. माझे मित्र श्री सचिन मधुकर परांजपे यांच्या प्रमेयाप्रमाणे तद्दन (टाकाऊ) मराठी मालिकांमधील निगेटिव्ह स्पंदनांचा परिणाम घरातील वातावरणावर होतोच. त्यातच ही मंडळी एकच भाग, तो कितीही टुकार का असेना, वारंवार पहातात आणि त्यातल्या आभासी वास्तवालाच खरे मानतात. एकाहून एक मूर्ख मराठी निर्माते आणि त्याहून मूर्ख लेखक हिंदी मालिकांची भ्रष्ट नक्कल करत, सॅडिस्ट पद्धतीच्या मालिकांचे प्रमोशन करत असताना त्यांना आपण आश्रय देतोय नव्हे तर त्या प्रवृत्तींना हळूहळू आपल्या मनात आणि पर्यायाने घरात जागा देवून आपल विश्व नासवतोय हे लक्षात घेत नाहीत. नातवंडांकडे लक्ष नाही, कुणाच छान झालेल बघवत नाही या सर्वांना कारण आपण ह्या आभासी जगाला दिलेला आश्रय हे त्यांना कळतच नाही. एव्हढच काय तर कुठे प्रवासात किंवा आपण कुणाकडे बाहेरगावी पाहुणे म्हणून गेल्यावर त्यांच्या सोयी गैरसोयींचा विचार न करता आपण आपले हे घाणेरडे व्यसन जोपासतोय याची शुद्ध नाही. यातून मानसिक समाधान तरी कुठल्या स्तराच मिळत ? आणि त्या प्रकारच्या वेळ घालवण्यात गंमत तरी काय ? याचा मी खूप गांभीर्याने विचार करत असतो.
ज्या समाजात आजी आजोबांचा मायेचा स्पर्श नसल्याने पाळणाघरं वाढतात त्याच समाजात वृद्धाश्रम वाढतात हे वास्तव आहे. आम्ही बघितलेले आमचे आजी आजोबा असे नव्हते पण ते सुख आमच्या मुला, नातवंडांना मिळेल याची अजिबात हमी नाही. पूर्णच्या पूर्ण समाजाने आपली विचारशक्ती आणि गती या अती तद्दन गचाळ मालिकांपायी गमावली हे आपण कधी लक्षात घेणार ?
२. आमच्या बालपणी रेशनच्या दुकानांवर (स्वस्त धान्य दुकान) खुल्या बाजारापेक्षा कमी दरात धान्य, खाद्यतेल वगैरे मिळत असे पण घरची परिस्थिती कशीही का असेना, मध्यमवर्ग सहसा रेशनच्या दुकानातून साखर खरेदीच्या पलिकडे खरेदी करत नसे. धान्याचा दर्जा हे एक कारण होतच, पण गोरगरीबांसाठी असलेल्या योजनेतून आपण कसे आणायचे ? ही भावना आणि आपण दोनवेळ का होईना, पोटभर जेवू शकतोय ही भावना ते पदार्थ आणण्यासाठी आड यायची. आज समाजातल्या उच्च मध्यमवर्गीयात सुद्धा जिथून मिळेल तिथून ओरबाडून घ्यायची वृत्ती वाढीला लागली आहे. मग " सरकार आमच्या जातीला काहीतरी सवलती देतंय का ? मग असल्या योजनांमधून थोडंफ़ार घेतल तर काय बिघडल ?" असली लंगडी सबब पुढे केली जाते. मग मित्र मंडळींमध्ये फ़ुकट पार्टी देणारा लोकप्रिय होतो. त्याने तो पैसा कुठल्या का मार्गाने मिळवला असेना त्याचे सोयर सुतूक आपल्याला नसत.
बरंच लिहीण्यासारखं आहे पण थांबतो. आपल्या आजूबाजूच्या या परिस्थितीचा नक्की विचार कराल ही अपेक्षा.
चातुर्मास जवळ येतोय. अशावेळी या मालिका चार महिने बघायच्या नाहीत असा जरी नेम बापांनो तुम्ही केलात तरी आम्हाला घरच्या घरी विठ्ठल भेटेल.
बरंच लिहीण्यासारखं आहे पण थांबतो. आपल्या आजूबाजूच्या या परिस्थितीचा नक्की विचार कराल ही अपेक्षा.
चातुर्मास जवळ येतोय. अशावेळी या मालिका चार महिने बघायच्या नाहीत असा जरी नेम बापांनो तुम्ही केलात तरी आम्हाला घरच्या घरी विठ्ठल भेटेल.
मागणं लई नाही ... लई नाही... लई नाही