Monday, October 26, 2015

दक्षिण दिग्विजय : २ (चेन्नई ते मदुराई)

यापूर्वीचा भाग दक्षिण दिग्विजय भाग १

रविवार दि. ३०/११/२००८


मदुराईला जाण्यासाठी आम्ही चेन्नई एग्मोर स्टेशनवर आलोत. दुपारी १२.३५ ला आमची वैगई एक्सप्रेसची आरक्षणे होती. साडेदहाच्या आसपास तिथे पोहोचतो न पोहोचतो तोच आमच्या नवीन बॅगचे हॆंडल तुटल्याचे ध्यानात आले. मग एग्मोर स्टेशनच्या बाहेरच एक नवीन खरेदी झाली. (नागपूरला इतवारीतून, खात्रीच्या दुकानातून, घेतलेल्या नवीन बॅगने ८ दिवसांतच दगा दिला होता पण चेन्नईला घेतलेल्या बॅगने गेल्या ६ वर्षात दगा दिला नाहीये.)

एग्मोर स्टेशन छानच आहे. बहुतांशी तामिळनाडूत मीटर गेज रेल्वेमार्ग होता तेव्हा हे स्थानक मीटर गेजची राजधानी समजल्या जायचे. वीजेवर चालणा-या मीटर गेज लोकल गाड्या फ़क्त चेन्नईतच होत्या. आता गेल्या १० वर्षातील गेज रूंदीकरणामुळे त्या नामशेष झाल्यात. वैगई एक्सप्रेसपण तिच्या मीटर गेज अवतारात या मार्गावरील राणी होती. हिरव्या आणि पिवळ्या अशा आकर्षक रंगसंगतीत ती यायची.


एग्मोर स्टेशनचे हे प्रवेशद्वार.


प्रवेशाच्या कमानीच्या वर असलेली ही कलाकुसर. जुन्या काळच्या वैभवाच्या खुणा अजूनही इथे पुसट होउ दिलेल्या नाहीत.

एग्मोर स्टेशनचे उच्च वर्गाचे वातानुकूल प्रतिक्षालय छान आहे. पण गर्दी फ़ार होती. कशीबशी आम्ही बसायला जागा मिळवली. नोव्हेंबर महिनाअखेर असूनही उकाडा आणि घामटा फ़ार होता. अगदी मुंबईसारखाच. कदाचित जास्त. चेन्नईला खेळताना सगळ्या क्रिकेटर्सना खूप दमायला का होतं ? याचा उलगडा झाला.

फ़लाट ४ वरच्या प्रतिक्षालयात आम्ही थांबलो होतो. गाडी बरोबर वेळेत येणार अशी घोषणा होत होती. पण त्याच बरोबर फ़लाट ४ वर तिरुचिरापल्लीवरून येणारी पल्लवन एक्सप्रेस येणार अशीही बुचकळ्यात टाकणारी घोषणा होत होती. फ़लाट ४ वर जर पल्लवन एक्सप्रेस येणार असेल तर वैगईचा रेक कुठे दुसरीकडे तर लावणार नाही नं ? या भीतीपोटी मी इतर फ़लाटांवरही जाउन एक चक्कर मारून आलो. पण तशी चिन्हे नव्हती. थोडक्यात वैगई एक्सप्रेसला काही अज्ञात कारणांमुळे उशीर होणार आणि आम्ही मदुराईला रात्री २०.३० ऐवजी उशीरा पोहोचणार असे वाटू लागले. प्रथमच त्या शहरात चाललो होतो. माहिती फ़ारशी नाही. भाषेचा प्रश्न होता. मोठमोठ्या हॊटेल्समध्ये जरी इंग्रजी चालणार असलं तरी रिक्षा / टॆक्सी ठरवण्याबाबत काय ? असे प्रश्न डोक्यात रूंजी घालत होते.


चेन्नई एग्मोरची क्षणचित्रे :
१) नागरकोइल-चेन्नई स्पेशल गाडीचा रेक फ़लाट क्र. ६ वर. हा नवीन कोचेसचा रेक होता (सी.बी.सी कपलर्स वाल्या कोचेसचा). तिथेच गोल्डन रॊक शेडचे १६८७९ ड्ब्ल्यु.डी.एम.२ आयडलिंग मोडमध्ये.

२) चेन्नई-काकीनाडा सरकार एक्सप्रेसचे दोन दोन रेक्स फ़लाट २ व ३ वर होते. मी फ़लाट १ कुठे आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि सोडून दिला.

आणि सगळ्या अधीरतेचा अगदी अनपेक्षित अंत झाला. स्वतः विषयीच वाटून गेलं की "अरे, इतकी साधी गोष्ट आपल्या आधी लक्षात कशी आली नाही ?" दुपारी पल्लवन एक्सप्रेस ४ क्र. फ़लाटावर येण्यापूर्वी उलगडा झाला की ह्या गाडीच वैगई एक्सप्रेससोबत रेक शेअरींग आहे. पल्लवन म्हणून तिरूचिरापल्लीवरून येणारी २६०६ लगेचच २६३५ वैगई म्हणून मदुराईला परतते आणि मदुराईवरून सकाळी निघालेली २६३६ वैगई एक्सप्रेस २६०५ पल्लवन म्हणून दुपारी उशीरा तिरूचिरापल्लीला परतते.




प्रवास: सविस्तर


२६०६ पल्लवन एक्सप्रेस, २४ मिनीटे उशीरा म्हणजे १२.२४ ला चेन्नई एग्मोर स्टेशनवर आली. (आपल्या भारतीय रेल्वेने चेन्नई एग्मोरचे चेन्नई एषुंपूर असे मजेशीर नामकरण का केलेय हे नकळे. त्या प्रवासात आम्ही एकमेकांना "एषुंपूर" असे चिडवत असू.) आम्ही लगेचच आमच्या कोचमध्ये बसलोत. ही गाडी फ़ार लोकप्रिय आहे. आमच्या कोचसकट सगळे डबे अगदी पूर्णपणे भरलेत.

येताना 21266 या अरक्कोणम  शेडच्या WAM 4 बुवांनी आणलेली गाडी मात्र परतीच्या प्रवासात  22654 या इरोड शेडच्या   WAP 4बुवांनी ताब्यात घेतली.

एंजिन क्र. 22654  द. रे. इरोड शेड WAP 4

कोच क्र. 94152, द. रे.,  सी - २ कोच, वातानुकुलीत चेअर कार (खुर्ची यान)आसन क्र. ३५, ३६ आणि ३७.

इंटिग्रल कोच फ़ॆक्टरी, मद्रास येथे दि. १९९४ मध्ये  बनविण्यात आलेला WGSCZAC कोच. एकूण ७३ आसने





कोचच्या आत डिजीटल डिस्प्ले होता खरा पण त्यावर पुढील स्टेशन वगैरे माहिती येण्याऐवजी फ़क्त   "Welcome to Indian Railways. Happy Journey" एव्हढीच पट्टी सरकत होती. 

१२.४६ ला गाडी हलली. तांबरम , चेंगलपट्टू अशी चेन्नईची उपनगरीय स्टेशन्स मागे टाकून गाडीने वेग घेतला. आजवर आमच्या www.irfca.org या वेबसाईटवर पाहिलेली ही सगळी स्टेशन्स आज प्रत्यक्ष अनुभवत होतो. या स्टेशनांचे मीटर गेज काळातील वैभव बघितले होते आणि आजही गाडी वेगात पळत होती. चेन्नईच्या बाबतीत मुंबईशी तुलना करायचीच झाली तर चेन्नई सेंट्रल म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस तर चेन्नई एग्मोर म्हणजे मुंबई सेंट्रल.


चेंगलपट्टूवरून मग मात्र तामिळनाडूच्या भातशेतीतून गाडी जोरात निघाली. या गाडीचा रूबाब जाणवत होता. एकमार्गीय लोहमार्गात समोरून येणा-या गाड्या मधल्या स्टेशन्सवर थांबवून ठेवून या गाडीला वाट दिली जात होती. चेंगलपट्टू ते विल्लूपुरम हे १०३ किमी अंतर अक्षरशः विना थांबा या गाडीने ९० मिनीटांत पार केले. विल्लूपुरम पर्यंत विद्युतीकरण झालेले होते. (आता मात्र पूर्ण नागरकोईल स्टेशनपर्यंत पूर्ण विद्युतीकरण झालेले आहे.) विल्लूपुरम स्टेशनपर्यंत बाजूने जुन्या मीटर गेजच्या मार्गाने साथ दिली. मीटर गेजमध्ये विद्युतीकरण झालेला संपूर्ण भारतातील हा एकमेव मार्ग होता. मीटर गेज लोकल गाड्यापण संपूर्ण भारतात फ़क्त चेंगलपट्टू ते चेन्नई एग्मोर याच पट्ट्यात धावत होत्या.





चि. मृण्मयीने मात्र तेव्हढ्या प्रवासात अभ्यासाचा घाट घातला. आमची भाषा आता इथे कुणालाही कळत नव्हती. (असे किमान आम्हाला तरी वाटत होते. खरे खोटे तो वेंकटरमणन च जाणो.) आणि आजुबाजूचा कलकलाट आमच्या आकलनापलीकडे होता. थोडा वेळ मग आमची चिडवाचिडवी चालली. (" माहितीय माहितीय तुमची शाळा किती कडक आहे ते. " वगैरे वगैरे नेहेमीचे पवित्रे झालेत.) त्याप्रसंगानंतर तिची ही रिऍक्शन.

विल्लूपुरमला डिझेल एंजिन लागले. 11171 WDM 3D इरोड शेड. SHF. विल्लूपुरमवरून १५.३३ ला निघालेली गाडी वृंदाचलम, अरीयालूर मागे टाकून कावेरी नदीवरचा केळीच्या बनांत दडलेला मोठ्ठा पूल ओलांडून तिरुचिरापल्ली जं. ला संध्याकाळी आली. दक्षिण भारतातले हे एक मोठे शहर. इथे राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आहे आणि एका चांगल्या संस्थेत तिची गणना होते. इलेक्ट्रीक एंजिनाचा सरासरी वेग ६२.७६ किमी प्रतीतास होता पण डिझेल एंजिनाने ६६ किमी प्रतीतास (६६.७१ किमी प्रतीतास) च्या वर वेग कायम ठेवला होता.

सरतेशेवटी चेन्नई एग्मोर ते मदुराई हे ४९७ किमी चे अंतर ७ तास ५४ मिनीटांत कापून आम्ही रात्री २०.३७ ला मदुराई स्टेशनात दाखल झालोत. मदुराई स्टेशनात चेन्नईला जाणारी २६३८ पांडियन एक्सप्रेस उभीच होती. प्रथम वर्ग वाता्नुकुलीत दर्जाचे २ कोचेस असलेल्या मोजक्या गाड्यांमधली ही एक गाडी. 

रिक्शा ठरवली आणि स्टेशनजवळच एक छानसे हॉटेल पाहिले. 

http://www.tripadvisor.in/ShowUserReviews-g297677-d617934-r39427908-Royal_Court-Madurai_Tamil_Nadu.html

दुस-या दिवशी रामेश्वरमला जाण्याचा बेत आखत झोपी गेलो. 





2 comments:

  1. Good narration Ram sir, You enjoyed it! A traveller's description!!!

    Regards,
    Ramakrishna Naidu!

    ReplyDelete
  2. Good narration Ram sir, You enjoyed it! A traveller's description!!!

    Regards,
    Ramakrishna Naidu!

    ReplyDelete