Friday, April 8, 2016

प्रसंग मोहाचा

परवा श्रीक्षेत्र गरुडेश्वरला जातानाचा एक मजेशीर प्रसंग. सकाळी सकाळी आम्ही सर्व कुटुंब गरुडेश्वरला निघालोत. शिरपूर - शहादा - प्रकाशा - तळोदा - अक्कलकुवा - खापर - सागबारा - देढियापाडा - राजपिपला - श्रीक्षेत्र गरुडेश्वर असा एकंदर २२० किमीचा हा प्रवास आहे. २-४ किमीचा अक्कलकुव्याजवळचा रस्ता सोडला तर बाकी रस्ता खूपच छान आहे. गाणी भजने ऐकत मस्त प्रवास चाललेला होता.


सागबा-याजवळ गुजरात राज्याची हद्द सुरू होते. सातपुड्याच्या कुशीतल्या शूलपाणेश्वर अभयारण्यातून हा उरलेला रस्ता जातो. अचानक दोन्ही बाजूंनी छान आवळ्याची झाडे दिसायला लागली. छोटे छोटे बाळ आवळे त्यांना लगडलेले अगदी मोहक होते. आम्ही सगळे आवळा प्रेमी मंडळी आहोत. वर्षाचे ३६५ दिवस रोजच आवळा या ना त्या स्वरूपात आमच्या पोटात जातोच. (उगाच नाही चाळीशी उलटून ४ वर्षे झाली तरी "चाळीशी" अजून डोळ्यांवर चढलेली नाही आणि ९० % केस काळे आहेत. कुठल्याही डायचा कधीही वापर न करता. बाय द वे, मी स्वतः या कृत्रिम केश रंगांचा माझ्या जीवनात कधीही उपयोग करणार नाही. अरे,  वार्धक्यखुणा अभिमानाने डोक्यावर बाळगेन.) त्यानंतर रस्त्याच्या कडेने हे बाळ आवळे वेचणारी आदिवासी कुटुंबेच्या कुटुंबे दिसायला लागलीत. मग एका ठिकाणी न राहवून गाडी थांबवलीच.गाडीत २-३ पिशव्या होत्याच. असेच कुठे काही त्या त्या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण भाजीपाला मिळाला तर घ्यायला असावी म्हणून एक दोन पिशव्या गाडीत असतातच. एक पिशवी घेऊन उतरलो. वेचा सुरू असलेल्या त्या कुटुंबातल्या प्रमुखाकडे गेलो. साधारणतः टोपलीभर आवळे वेचून त्यांनी काढून ठेवले होते. मी त्यांना हिंदीत आवळ्यांचा भाव विचारला. भाषा त्यांना कळत नव्हती. मग तोडक्या मोडक्या हिंदीत संवाद सुरू झाला. एका टोपलीचे त्यांनी ५० रूपये सांगितले. मला तेव्हढे टोपलीभर आवळे नको होते. साधारणतः पाव टोपली मी माझ्या पिशवीत ओतायला सांगितले. खिशातून २० रूपये काढून त्यांना दिलेत.

त्यांनी ते छोटे छोटे आवळे पिशवीत ओतायला सुरूवात केली मात्र ते सर्वच जरा मऊ असल्याचे मला लक्षात आले. मी त्यांना तसे विचारले. पुन्हा भाषेचा प्रश्न. ते म्हणाले मीठा है. बहुत मीठा है. आवळे आणि गोड ? मी त्यांना पुन्हा विचारले " ये आवलाही है ना ? " आणि मग धक्का बसला.

ती मोहफ़ळे होती. अगदी बाळ आवळ्यासारखी दिसणारी, पण लुसलुशीत, मऊ. त्यांच्यापासून मोहाची दारू तयार होत असणार. किन्हीकरांच्या गेल्या २१ पिढ्यांमध्ये कुणीही न पाहिलेली, न चाखलेली. (पुढल्याही २१ पिढ्या याचे पालन करतील असा आजतरी विश्वास आहे.) मी पाल झटकल्यासारखी ती पिशवी परत त्या टोपलीत झटकली. ते आदिवासी कुटुंब आता मात्र आमची फ़जिती पाहून मनमुराद हसायला लागले. आम्हालाही हसे आवरेना. त्या मोकळ्या वातावरणातच त्यांनी परत दिलेले २० रूपये त्यांच्या २ चिमण्या लेकरांच्या हातात खाऊ म्हणून बळेच दिलेत आणि आम्ही मार्गस्थ झालोत.
आमच्याकडे गेले ३ पीढ्या शेती नाही. झाडे आम्हाला ओळखता येत नाहीत. आवळे समजून जर ती मोहफ़ळे आम्ही गाडीत घेऊन गेलो असतो तर काय अनवस्था प्रसंग ओढवला असता याचे चिंतन करीत स्वतःच्या फ़जितीवर हसत उरलेला प्रवास पार पडला.


1 comment: