Sunday, February 4, 2018

श्रीतुकोबांची गाथा - ६



अवघा तो शकुन, हृदयीं देवाचे चरण ॥
येथें नसतां वियोग, लाभा उणें काय मग ॥
संग हरिच्या नामाचा, शुचिर्भूत सदा वाचा ॥
तुका म्हणे हरिच्या दासां, शुभकाळ अवघ्या दिशा ॥

विसावे शतक हे विज्ञानाचे आणि एकविसावे ते तंत्रज्ञानाचे म्हणून ओळखले जाते. दररोज नवनवीन शोध लागताहेत. मनुष्य जीवनाला सुकर सोपे बनविणारे तंत्रज्ञान आज सर्वत्र परिचित आणि रूढ झालेले आहे. त्याचसोबत आज दूरदर्शन, फ़ेसबुक व्हॉटसऍप समाजमाध्यमांचा सुळसुळाट झाला आहे. या माध्यमांव्दारे विज्ञानाचा प्रचार प्रसार कितपत होतो ते ठरवणे जरी कठीण असले तरी त्यातून अंधश्रद्धेचा प्रचार आणि प्रसार भरपूर होतोय हे तरी नक्की. गेल्या ३० वर्षांपूर्वी फ़ारशा प्रचलित नसलेल्या मुहूर्त, शकून अपशकून, दिशाशास्त्र, फ़ेंगशुई, वास्तूशास्त्र, कसले कसले तांत्रिक तोडगे यांनी आज अगदी धुमाकुळ घातलाय. आणि एखादी गोष्ट वारंवार मनावर बिंबवली गेली की त्यावर समाज विश्वास ठेवतो या गोबेल्स प्रचारसुत्रानुसार आपण त्या सर्व भाकड उपायांवर विश्वासही ठेवायला लागतो.

४०० वर्षांपूर्वी श्री तुकोबा काय म्हणताहेत ते बघा. ज्याच्या हृदयात परमेश्वराचे चिंतन सतत आहे त्याला कसला शकून आणि कसला अपशकून ? त्या भक्ताला भगवंताचा वियोगच घडत नाही मग त्याला मिळणा-या लाभात काय बरे कमी होईल ? जो आपल्या आराध्य दैवतापासून विभक्त नाही तो भक्त अशीही एक व्याख्या भक्ताची केली जाते.

ज्या भक्ताची वाचा सतत हरीनामाच्या उच्चारात आहे त्याला अधिक शुचिर्भूतता, सोवळे ओवळे काय शिकवायचे ? तो सदाच शुचिर्भूत अवस्थेत आहे. सदाच सोवळा आहे. आणि म्हणूनच श्रीतुकोबा कळवळ्याने सांगताहेत की बाबांनो, ख-या भगवत्भक्ताला कुठलाही काळ हा शुभकाळच आहे. आणि सगळ्या दिशा शुभच आहेत.ते सांगताहेत की बाबांनो, भगवंताच्या भक्तीसाठी किंवा कुठल्याही चांगल्या हेतूने करण्याच्या कार्यासाठी अनुकूल मुहूर्त, दिशा इत्यादी पाहत बसू नका. चांगले कार्य करा. सगळेच शुभ आहे.

आज आपण या समाजमाध्यमातून आपल्यावर होणा-या अंधश्रद्धेच्या मा-यातून बाहेर येण्यासाठी मोठ्या निर्धाराने श्रीतुकोबांचा हा उपदेश आचरणात आणायला हवा आहे.

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
जय तुकोबा माऊली.

प्रा. राम प्रकाश किन्हीकर  (०४०२२०१८)  

No comments:

Post a Comment