Monday, April 26, 2021

एका रेल्वेफ़ॅनच्या स्वप्नपूर्तीची कथा.

 पु ल म्हणतात "ज्या म्हणून पोराला गाडीची शिट्टी, त्याचा तो लाल हिरवा बावटा, इंजिनाची कुक, इंजिन ड्रायव्हरची ती झुकून इंजिनाबाहेर बघण्याची ऐट, दुरून  येणार्‍या किंवा दूर जाणार्‍या गाडीचा धूर या गोष्टींची भुरळ पडली नाही ते पोर वायाच जाणार्‍यांपैकी आहे , म्हणून ओळखावे." आपल्यापैकी प्रत्येकाला बालपणी "रेल्वे" या विषयाची आवड, कुतुहल, भुरळ ही असतेच.

स्वामी विवेकानंदांनी जसे "Every soul is potentially divine" म्हटलेय,  तसेच मला वाटत की "Every Indian is a railfan in disguise." 

कारण तसे नसते तर दरवेळी नवीन इंजिन जोडण्याच्या किंवा काढण्याच्या वेळेला फलाटावर किमान १५ च्या गणसंख्येची गर्दी तो सोहळा पहायला जमली नसती.

बालपणीचे आमचे कुतूहल, आवड, भुरळ हे आम्ही तरूणपणी आणि आता पोक्तवयातही जपून ठेवली. कराडला अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकायला असताना नागपूर ते कराड हा १०९५ किमी चा आणि २५ तासांचा मोठ्ठा रेल्वेप्रवास ही आमच्यासारख्या रेल्वेफ़ॅनसाठी पर्वणीच होती. त्यात कराडचे (त्यावेळेसचे) चिमुकले स्टेशन आणि तिथे आमचा वावर हा गोष्टीही रेल्वेफ़ॅनिंगच्या पथ्यावर पडणा-या होत्या.

कराडला सुटी संपवून कॉलेजमध्ये रूजू होण्यासाठी जाताना आणि कराडमधून परीक्षा संपवून सुट्ट्यांसाठी परत विदर्भात येताना आम्हा सगळ्यांची एकच सखी होती. ती म्हणजे महाराष्ट्र एक्सप्रेस. या गाडीला तेव्हा कराड स्टेशनातून परत येताना फ़क्त १२ बर्थसचा कोटा होता. आम्ही एका वर्षातच ३६ वैदर्भिय विद्यार्थी आणि एका दिवशी दोन वर्षांच्या परीक्षा संपलेल्या असायच्या त्यामुळे एकूण ८० च्या आसपास विद्यार्थी आणि बर्थसची उपलब्धता १२ च. मग आमच्यापैकी उत्साही मंडळी साताराला टीटीई बदलण्यापूर्वी, कोल्हापूर कोट्यातले रिकामे असलेले अधिकचे बर्थस पदरात पडतात का ? म्हणून प्रयत्नात असायचीत. त्यातून महाराष्ट्र एक्सप्रेसचे डबे म्हणजे आतून एकमेकांना जोडलेले (vestibuled) असे नसत. प्रत्येक डबा स्वतंत्र. त्यामुळे कराडवरून निघाल्यावर मसूर, तारगाव, कोरेगाव या स्टेशनांवर उतरून, प्लॅटफ़ॉर्मवर धावत धावत शोध घेत टीटीईंना गाठणे हा आमच्यापैकी उत्साही मंडळींचा कार्यक्रम असे. परीक्षा आटोपलेल्या असत. त्याचा ताण संपलेला असे. घरी जायचय म्हणून अपार खुशी मनात असे. अशा उत्साही वातावरणात स्वतःसाठी आणि आपापल्या मित्रांसाठी अशी धावपळ करण्यात आम्हाला आनंद वाटे.

१९९० ची दिवाळी. आम्ही सगळेच विद्यार्थी दिवाळीसाठी नागपूर आणि विदर्भात निघालेलो होतो. यावेळी टीटीईंकडे बर्थ मागताना त्यांनी एक बर्थ टू टायर मध्ये दिला होता. हा नॉन एसी टू टायर बरं का. महाराष्ट्र एक्सप्रेसला हा जुन्या धाटणीचा डबा, एस - ८ म्हणून त्यावेळी लागायचा. साधारण १९९२ पर्यंत त्या गाडीला हा डबा लागलेला मी पाहिलाय. या डब्ब्याची धाटणी अशी की खाली बसण्यासाठी म्हणून सर्वसाधारण (General) डब्याप्रमाणे बाकडी असत. एका कंपार्टमेंटमध्ये (bay मध्ये) त्यावर दिवसाच्या वेळी १० प्रवासी बसू शकायचे. (४ + ४ मुख्य कंपार्टमेंटमध्ये आणि १ + १ साईड बर्थवर) आणि रात्रीच्या वेळी वरच्या बर्थसवर ३ प्रवासी झोपू शकायचे ( १ + १ मुख्य कंपार्टमेंटमध्ये आणि १ प्रवासी साईड अप्पर बर्थवर). सगळ्या (बसण्याच्या आणि झोपण्याच्या) जागांसाठी आरक्षण आकार लागत असे. खाली बसण्यासाठी सर्वसाधारण वर्गासारखी (General Class) नुसती बाकडीच असत पण वरच्या बर्थवर झोपण्यासाठी मात्र बर्थसवर कुशन्स दिलेले असत. मधू दंडवते १९७८ च्या जनता सरकारमध्ये रेल्वेमंत्री झाल्यानंतर त्यांनी "दुस-या वर्गाच्या शयनयान डब्यांनाही कुशन्स देण्याचा एक अतिशय स्तुत्य निर्णय घेतला होता. त्यामुळे आमचे हे नॉन एसी टू टायर डबे जरी १९६९ ते ७५ या कालावधीत बनलेले असले तरी कुशन्स मात्र वरच्या बर्थना असत. तात्पर्य काय ? तर हा नॉन एसी टू टायर डबा जनरल सारखाच असल्याने त्यातून प्रवास करायला कुणी प्रवासी फ़ारसे तयार नसत.

आम्हा मित्रांमध्ये एक बर्थ यावेळी नॉन एसी टू टायरचा मिळालेला होता. रेल्वेच्या नवनवीन अनुभवांना सामोरे जाण्याची माझी कायम तयारी असल्याने मी त्या बर्थवर जाण्याचे ठरविले. पुण्यापर्यंतचा वेळ इतर मित्रांसोबत एस - ५ , एस - ६ या कोचेसमध्ये गप्पा गोष्टी, फ़राळ जेवणात काढून पुण्याला आपल्या कोचमध्ये जाण्याचे मी ठरवले. त्यावेळी गाडी पुण्याला रात्री १०.०० वाजता यायची आणि तब्बल ४० मिनिटांचा थांबा घेऊन, अनेक नवीन कोचेस जोडून, पुढल्या प्रवासाला निघत असे. त्यामुळे त्या दिवशीही मी आमची जेवणे वगैरे आटोपून फ़क्त एक पांघरूण घेऊन पुणे स्टेशनवर माझ्या एस - ८ कडे (नॉन एसी टू टायर) निघालो. त्या डब्यात सर्वसाधारण वर्गासाखीच गर्दी खालच्या स्तरावर असल्याने मी माझी कपड्यांची आणि पुस्तकांची बॅग एस - ५ मध्येच मित्रांच्या बॅगसोबत बांधून ठेवली आणि झोपण्यासाठी आवश्यक असे फ़क्त एक पांघरूण घेऊन एस - ८ मध्ये शिरलो. एस - ५ मध्ये आम्ही सगळ्या मित्रांनी आमच्या ७ - ८ बॅग्ज, दोन मुख्य बर्थसच्या मधल्या पॅसेजमध्ये, एकात एक एका लांब साखळीत गुंफ़ून त्याला एक कुलूप लावले. साखळी आणि कुलूप ही माझी संपत्ती होती. कुलूप लावल्यानंतर आपसूकच ती किल्ली माझ्या खिशात गेली. कुणालाही त्यात वावगे वाटले नाही. कुणी विशेष लक्ष द्यावे अशी ती घटना नव्हतीच मुळी.






 


पुण्याहून गाडी सुटली. एस - ५ / ६ मध्ये माझी मित्रमंडळी आणि एस - ८ मध्ये एकटा असलेला मी झोपेची आराधना करू लागलो. नवीन अनुभव होता. मी वरच्या बर्थवर झोपलो होतो खरा पण माझ्या बे मध्ये खाली इतर ८ मंडळी मात्र बसूनच आपापला प्रवास करीत होती त्यामुळे पिवळे पिवळे दिवे मालवले गेलेच नव्हते. वरच्या बर्थवर झोपणा-याच्या अगदी डोळ्यांवर भगभगीत पिवळा प्रकाश पाडणारे ते दिवे मालवा असे सांगणार तरी कुणाला ? खाली बाकड्यांवर बसून प्रवास करणारी सगळी मंडळी गप्पांच्या मूडमध्ये होती. झोपायला त्यांना वावच नव्हता. मग त्यांनी वरच्या तिघांची सोय का बघावी ? त्या विचारातच रात्री दौंडनंतर मला झोप लागली असावी.

पहाटे पहाटे कोपरगावला जाग आली. आता मनमाड आले की पुन्हा दिवसभर बसण्यासाठी मित्रमंडळींमध्ये एस - ५ / एस - ६ मध्ये जाऊन बसण्याचा बेत काल रात्रीच पक्का झाला होता. या कोचमध्ये फ़क्त झोपण्यापुरता मी पाहुणा होतो. त्यामुळे मी उठलो. पांघरूणाची घडी वगैरे केली. खाली बसलेली मंडळी आता एकमेकांच्या खांद्यांचा आधार घेत झोपलेली होती. महाराष्ट्र एक्सप्रेसने पुण्यावरून येताना मनमाड स्टेशन एकदम कधीच येत नाही. मनमाड स्टेशन बाहेरच्या मोठ्ठ्या वळणावर गाडी १०-१५ मिनीटे उभी ठाकते. भुसावळकडून मुंबईकडे किंवा उलट दिशेने एखादी मालगाडी मनमाड स्टेशन सोडते किंवा मनमाड स्टेशनात येते आणि मग कुठे महाराष्ट्र एक्सप्रेसला मनमाड स्टेशनात घेतात. महाराष्ट्र एक्सप्रेसला थेट मनमाड स्टेशनात घेतले तर रेल्वेच्या नोकरीत तो फ़ाऊल धरतात असेही मी ऐकून आहे. खरे खोटे मनमाड स्टेशन मास्तर आणि भुसावळचे डिव्हीजन कंट्रोलरच जाणोत.

त्यादिवशीही महाराष्ट्र एक्सप्रेस अशीच मनमाड स्टेशनच्या आऊटर सिग्नलला उभी होती. मनमाडला उतरायचय आणि आपल्या एस. ५ / एस - ६ मध्ये जायचय या इराद्याने मी सुद्धा डब्याच्या दारात उभा होतो. मनमाडच्या सिग्नलची वाट पहाता पहाता माझ्या मनात "तो" विचार चमकला आणि तो अंमलात आणण्याचा मी निर्धार केला.

प्रत्येक रेल्वे फ़ॅनचे एक स्वप्न असते. एकदा तरी रेल्वेच्या एंजिनातून प्रवास करायला मिळावा. आमचे साहित्यिक दैवत असलेल्या पुलं नी ही एकदा मिरज - बेळगाव मीटर गेज (तत्कालीन) मार्गावर एंजिनातून प्रवास करून आपली ही हौस भागवून घेतली होती. आम्हालाही ती उत्सुकता. तेच स्वप्न डोळ्यात.

गाडीने शिरस्त्याप्रमाणे मनमाड स्टेशन गाठले. मी उडी मारून एस - ८ कडून थेट एंजिनापर्यंत पोहोचलो. पुण्यावरून मनमाडपर्यंत एक crew (लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट ) गाडी घेऊन येतात आणि मनमाड ते भुसावळ दुसरा crew असतो. त्या पहिल्या crew members ची दुस-या crew members सोबत चर्चा, आवश्यक कागदांचे हस्तांतरण वगैरे झाले आणि मी दुस-या crew  मधल्या ड्रायव्हर साहेबांशी संपर्क साधला. त्यांना सरळ शब्दात माझी एंजिनमधल्या प्रवासाची तीव्र इच्छा सांगितली. त्या काळी अतिरेकी हल्ले, नक्षलवादी उपद्रव इत्यादी फ़ारसे प्रचलित नव्हते त्यामुळे त्या भल्या माणसाने लगेच माझी इच्छा मान्य केली आणि "माझी ड्युटी भुसावळपर्यंत आहे. तिथपर्यंत चला सोबत" म्हणत मला एंजिनमध्ये प्रवेश दिला.

पुणे शेडच्या 17158 नंबरच्या WDM 2 जातीच्या त्या एंजिनमध्ये शिरताना माझी अवस्था अगदी भारवल्यासारखी झाली होती. परमेश्वराच्या प्राप्तीनंतर योगीजनांची अशीच अवस्था होत असेल, कदाचित. काय बघू आणि काय नको ? अशी माझी अवस्था झाली होती. भांबावून गेलो होतो. शरीरावर रोमांच उठले होते. माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता. हे एंजिन Short Hood Front (छोटी बाजू पुढे. डिझेल एंजिनमध्ये ड्रायव्हर केबिन ही मधोमध कधीच नसते. केबिनमध्ये बसल्यावर एकाबाजूचे हूड लांबचलांब तर दुसरे हूड कमी लांबीचे असते.) अशा प्रकारात या क्षणी होते. पुण्याहून निघताना हे Long Hood Front असणार आणि दौंडला उलट बाजूने लागताना Short Hood Front  झाले असणार. त्यामुळे समोरचा रेल्वे ट्रॅक मला अगदी स्पष्ट दिसू शकणार होता. ही आणखी मजा.

निघण्याची वेळ झाली. आमचे को पायलट काका गार्ड साहेब यांच्या सिग्नल्सची अदलाबदल झाली. मनमाड होम आणि डिस्टंट सिग्नल आपले लाल तांबारलेले डोळे मिटून हिरव्या, आर्द्र दृष्टीने आमच्याकडे बघत होते. आमच्या पायलट काकांनी ब्रेक लिव्हर सोडला आणि हळूहळू गाडीचा वेग वाढू लागला. प्रथम वर्षाला असताना Basic Electrical Engineering विषयात series motor  व parallel motor चा फ़रक सरांनी समजावून सांगितलेला होता. पाठ करून जसाच्या तसा परीक्षेत लिहूनही टाकला असेन कदाचित पण आत्ता त्या लोको पायलट काकांनी "गाडी स्टेशनातून निघताना टॉर्कसाठी लागणा-या सिरीज मोटर्स आणि वेग पकडल्यानंतर ऍक्सीलरेशनसाठी लागणा-या पॅरेलल मोटर्स हा फ़रक सोदाहरण समजावून सांगितला. पटकन कळला. आज इतक्या वर्षांनंतरही तो जसाच्या तसा लक्षात आहे. 

सकाळी सूर्योदयाची वेळ. सूर्याच्या दिशेनेच छोटीछोटी स्टेशन्स लीलया मागे टाकीत आमची महाराष्ट्र एक्सप्रेस ताशी ९० किमी प्रतितास वेगाने मार्ग आक्रमू लागली. एंजिनमध्ये बसल्यानंतर जाणवणा-या विशेष आंदोलनांची महती काय वर्णावी ? डब्यात न जाणवणारे हिसके इथे प्रकर्षाने जाणवतात आणि त्या हिसक्यांमध्येही आपले काम अगदी डोळ्यात तेल घालून करणा-या रेल्वे crew विषयी अपार कृतज्ञता मनात दाटून येते. अनंत भावनांचे तरंग मनात घेऊन माझा हा पहिलावहिला एंजिनप्रवास सुरू होता. समोरून येणारी थंड हवा अंगाला बोचत होती पण त्याक्षणी तिचा गारवा जाणवण्याइतका मी देहावर नव्हतोच. (संध्याकाळी नागपूरला पोचल्यानंतर अंगात जो थंडीताप भरला तो उतरायला तीन दिवस लागले. त्या तापाची बीजे सकाळी ९० किमी प्रतितास वेगाने अंगावर झेललेल्या त्या गार वा-यांमध्ये होती हे फ़ार उशीरा कळले.) माझा हा पराक्रम माझ्या मित्रांना कळला असेल तरी का ? की राम एस - ८ मध्येच आहे अशी त्यांची भावना होऊन ते निवांत असतील ? हा ही एक विचार मनात पिंगा घालू लागला होता. नांदगाव स्टेशनात गाडी थांबली तेव्हा मी को पायलट काकांच्या खिडकीतून तोंड बाहेर काढून प्लॅटफ़ॉर्मवर लांबवर कुणी मित्रमंडळी दिसतायत का ? याचा अंदाज घेत होतो. नांदगाव अगदी २ मिनिटांचा थांबा. गाडी लगेच हलली आणि मी पुन्हा एकदा एंजिनप्रवासाच्या स्वर्गसुखाचा आनंद घ्यायला लागलो.

इकडे एस - ५ मध्ये काय हलकल्लोळ झाला (त्याची कथा आमच्या मित्रांनी मला नंतर ऐकवली होती.) मनमाड स्टेशनवरून गाडी निघाल्यानंतर एस - ५ मधली माझी मित्रमंडळी माझी वाट बघू लागली. मी फ़ार लोकप्रिय होतो वगैरे अशातला भाग नाही. रात्री पुणे स्टेशन येण्यापूर्वी आमच्या ज्या सगळ्या बॅग्ज आम्ही एकमेकांत गुंफ़ून त्यात साखळी आणि कुलूप लावले होते त्याची किल्ली माझ्याकडे होती. आमच्या वर्गातल्या धुळ्याच्या चंदू देशमुखला चाळीसगावला उतरायचे होते. त्याचीही बॅग त्या साखळीत अडकल्याने तो आणि इतर मंडळी माझी अगदी चातकासारखी वाट बघत होते. मनमाड सोडल्यानंतर बराच वेळ मी न आल्याने चर्चा सुरू झाली. मी अजूनही एस - ८ मध्ये झोपूनच असलो पाहिजे अशी काही मित्रांचे समजूत होऊन पुढल्या स्टेशनवर ती मंडळी एस - ८ कडे जाण्यास सिद्ध झाली होती. डबे एकमेकांशी आतून जोडलेले नसल्याने त्यांना नांदगाव स्टेशनची वाट बघणे क्रमप्राप्त होते. नांदगाव स्टेशनात गाडी थांबताच प्लॅटफ़ॉर्मवरून ती मंडळी धावत एस - ८ मध्ये येऊन मला उठवणार होती. 

नांदगाव स्टेशन सोडल्यावर शशांक चिंचोळकरने (माझ्या रूम पार्टनरने) "राम कदाचित एंजिनमध्ये तर जाऊन नसेल बसला ?" अशी शंका सगळ्यांसमोर व्यक्त केली. कधीतरी रूममध्ये गप्पा मारताना माझ्या या स्वप्नाविषयी मी त्याच्याशी सविस्तर चर्चा केलेली होती. त्यामुळे त्याने ही शंका व्यक्त केली. त्यामुळे नांदगाव स्टेशन आल्यावर आमच्या मित्रांपैकी काही मित्रांनी एंजिनकडे धाव घेण्याचे ठरवले. आमचा एस - ५ एंजिनपासून ११ वा होता. त्यामुळे या मंडळींना बरीच दौड मारावी लागणार होती. आणि झालेही तसेच. एंजिनपासून ४ थ्या डब्यापर्यंत ही मंडळी येईपर्यंत गाडी सुटली आणि या सगळ्या मंडळींना एका जनरल कोचमध्ये तात्पुरते घुसावे लागले होते. पुढले स्टेशन होते - चाळीसगाव. चंदूला तिथे उतरायचे होते. त्याची बॅग साखळीत अडकलेली. साखळीची किल्ली माझ्याजवळ आणि मी या सगळ्या गदारोळापासून निर्लेप एंजिनमध्ये प्रवासाचे आपले बालपणापासूनचे स्वप्न साकार करतोय.

चाळीसगाव स्टेशन आले. मी पुन्हा एंजिनातून प्लॅटफ़ॉर्मच्या दिशेने डोके काढून माझ्या मित्रांना माझ्या सुखाची कल्पना तरी आहे का ? या विचारात. एव्हढ्यात काही मित्र माझ्याकडे पळत येताना मला दिसलेत. (चाळीसगावला बिचारे जनरल डब्यातून उतरून धावत धावत एंजिनपर्यंत पोहोचले होते.) त्यांच्या चेहे-यावर मला पाहून फ़ारसा आनंद झालेला मला दिसला नाही. दोघे तिघे नुसते "किल्ली... किल्ली" असेच ओरडत पोहोचले. मी विजयी चेह-याने त्यांच्याकडे पाहत, माझ्या स्वप्नपूर्तीची त्यांनी दखल घ्यावी या विचारात असताना "अबे, चंदूची बॅग आपल्या साखळीत फ़सली आहे. किल्ली दे लवकर XX" अशी उग्र भाषा ऐकून मला सगळ्या घोटाळ्याचा उलगडा झाला. मी त्वरेने खिशातील किल्ली त्यांच्याकडे फ़ेकली आणि "चंदू चाळीसगावच्या प्लॅटफ़ॉर्मवर उतरलेला दिसल्याशिवाय मी गाडी पुढे जाऊ देत नाही" अशी ग्वाहीही आमच्या पायलट काकांच्या वतीने देऊन टाकली. पायलट आणि को पायलट काका कदाचित माझ्या फ़जितीकडे, आगाऊपणाकडे पाहून मनातल्या मनात हसतही असतील.

पण ही सगळी मंडळी परत एस - ५ मध्ये गेलीत. साखळीतून चंदूची बॅग मोकळी झाली. चंदू चाळीसगावच्या प्लॅटफ़ॉर्मवर सुखरूप उतरला. थोडे पुढे येऊन त्याने माझ्या नजरेच्या टप्प्यात येऊन ऑल वेल चा थम्ब्स अप केला आणि आमच्या एंजिनातून लांब हॉर्न ऐकू आला. गाडीने सर्व सुखरूप झाल्यावरच चाळीसगाव सोडले.

पायलट व को पायलट काकांसोबत भुसावळला उतरलो. एक नवा आणि आयुष्य़भरासाठीचा अनुभव घेऊन. पायलट आणि को पायलट काकांचे अनंत वेळा, खूप मनापासून आभार मानलेत. आणि एस - ५ कडे वळलो. मित्रांना माझ्या स्वप्नपूर्तीचा आनंद झाला होता. सगळ्यांनी हसत हसत त्यांच्यावर मनमाड ते चाळीसगाव या प्रवासात गुदरलेले प्रसंग कथन केलेत. मैत्रीत भरपूर शिव्याही खाल्ल्यात पण दिवस आनंदाचाच होता हे नक्की. शेवटी एका रेल्वे फ़ॅनची अंतिम स्वप्नपूर्ती त्या दिवशी झालेली होती.

तो दिवस, तो प्रवास, ते एंजिन माझ्या स्मृतीपटलावर कायमचेच कोरले गेलेले आहे. आज ३१ वर्षांनंतरही त्यातला क्षण आणि क्षण मला आठवतो. माझ्यातल्या रेल्वेफ़ॅनला जगवतो. मला १८ वर्षांचा तरूण करून जातो.

- रेल्वेफ़ॅन राम प्रकाश किन्हीकर

Monday, April 12, 2021

एका (कधीही न पाहिलेल्या) स्वप्नाचा शेवट.

जीहाल मस्किन मै कुन ब रंजिस,

बेहाल हिजरा बेचारा दिल है.

सुनाई देती है जिस की धडकन,

तुम्हारा दिल या हमारा दिल है.


इ. स. १९८५ मध्ये आलेल्या गुलामी ( लिहीताना Ghulami. बाकी हे हिंदी फ़िल्लमवाले कुठल्याकुठल्या कुडमुड्या ज्योतिष्यांचे ऐकून स्वतःच्या आणि सिनेमांच्या स्पेलिंगमध्येही जो घोळ घालतात तो एका निराळ्या लेखाचा विषय आहे.) सिनेमातले हे गीत. तेव्हा आम्ही चांगले ८ व्या ९ व्या वर्गात होतो. ब-यापैकी हिंदी - संस्कृत शिकलेले होतो. पण तरीही यातले फ़क्त "सुनाई" , "तुम्हारा" , "हमारा" आणि "दिल" या चार शब्दांचे अर्थ आम्हाला त्याकाळी उमजत होते. बाकी शब्दांच्या बाबतीत आम्ही अक्षरशः अडाणी होतो. आणि या बाकी शब्दांचे अर्थ, ३५ वर्षांनंतर, आजही कळत नाहीत. मग कसे आमच्या हृदयात बॉलीवूडमध्ये हिरो वगैरे बनण्याची स्वप्ने उमटणार ? एक स्वप्न उमलण्यापूर्वीच त्याची अशी हत्या झाली तर काय त्या भयंकर शब्दांना ओवाळायचय ? 

बाकी बॉलीवूडमध्ये जा्वे असे वाटणारी आमची शरीरयष्टी नव्हती आणि घरचे वातावरणही नव्हते. आमचे वजन वयाच्या २५ व्या वर्षांपर्यंत ४० किलोग्रॅमचा आकडा ओलांडू शकले नव्हते. त्यामुळे हिरो सारखी पर्सनॅलिटी वगैरे करणे हे आमचे दूरदूरपर्यंत स्वप्नही नव्हते. आमच्या बालपणी सगळेच हिरो विपुल केशसंभार बाळगीत पण आमच्या घरी आमच्या केसांविषयी "कटिंग करायची तर लोकांनी विचारले पाहिजे काय रे परवाच मुंज झाली का ? इतके बारीक केस हवेत, असे धोरण. "केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा, ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा" हा उपदेश नुसता आमच्या शाळेच्या भिंतींवर टांगला होता असे नव्हे तर आमच्या पालकांच्या आणि शिक्षकांच्या अगदी मनावर कोरला गेला होता. त्यामुळे होईवरचे केस कान झाकेपर्यंत वाढवणे वगैरे थेर आम्हाला करायला मिळणे शक्यच नव्हते. (बाकी ते असे कान झाकणारे केस, तो बेलबॉटम पॅंट वगैरे घालून ते बच्चन, विनोद खन्नादि महानायकही त्याकाळी अगदी बेंगरूळ दिसायचेत हं. त्यांच्यापेक्षा घट्ट पांढरी पॅंट, चमचमणारा पांढरा शर्ट आणि त्यावर चकचकीत पांढरे शूज घालणारा जितेंद्र किंवा मिथून थोडेतरी सुसह्य व्हायचेत.) 

आमच्या बालपणी "मायापुरी" नामक बॉलीवुडला वाहिलेले आणि फ़क्त हेअर कटिंग सलूनमध्येच वाचायला मिळणारे एक नियतकालिक होते. मी कुणाच्याही घरी मोठ्या हौसेने "मायापुरी" चे सबस्क्रीप्शन घेतलेले पाहिले नाही. त्याकाळी कुठले नियतकालिक कुठे वाचल्या गेले पाहिजे याबद्दल लोकांच्या भूमिका अगदी स्पष्ट होत्या. जसे आज "नवाकाळ, पुण्यनगरी, संध्यानंद" (शेवटचा "द" पूर्ण म्हणायचा नाही बरका, नुसते आपले "संध्यानं") वगैरे दैनिके मुंबईच्या लोकलच्या प्रवासातच आणि शेजारच्याच्या पेपरात डोके खुपसून सामूहिक वाचली गेली तरच मजा येते. मुंबईतल्या कुठल्याही मल्टिनॅशनल कंपनीच्या ऑफ़िसमध्ये ही दैनिके वाचत बसलेले साहेब पहायला मिळणे अती विरळा.


 

त्या मायापुरीत ब-याचदा बॉलीवुडचा हिरो होण्यासाठीच्या Basic Qualifications (आपल्याच मनाने) छापलेल्या असत. त्यात त्या हिरो / हिरॉईनला वाहन चालवता येणे, घोड्यावर बसता येणे वगैरे आवश्यक आहे असे वर्णन असायचे. आमच्या बालपणी एकमेव वाहन म्हणजे आमची सायकल. स्कूटर वगैरे आयुष्यात बरीच उशीरा आली आणि कार चालवता येऊ लागली तोवर आमच्या अपत्यांची बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्याची वेळ येऊन ठेपली होती. बरे घोड्यावर बसणे म्हणजे काय संकट आहे हे घोड्यावर बसल्याशिवाय कळत नाही. आमच्या बालपणी, एका लग्नात, असेच एक नाठाळ घोडे उधळल्यामुळे, वरातीतल्या नवरदेवाची काय बिकट अवस्था झाली होती याचे आम्ही साक्षीदार होतो. (तो नवरदेव बिचारा लग्नापूर्वी मारूतीरायाच्या दर्शनाला जाताना असे घोडे अचानक उधळल्यामुळे घोड्याच्या मानेला घट्ट मिठी मारून बसला होता. ती वरात मंगल कार्यालयात परत येईपर्यंत त्याच्या जिवात जीव नव्हता. म्हणून आमच्या लग्नातही आम्ही घोड्याऐवजी मित्राच्या गाडीत बसून मारूतीरायाच्या दर्शनाला जाणे निवडले होते. लग्नानंतर ब-याच वर्षांनी बायकोमुलीसोबत चिखलद-याला फ़िरायला गेलो असताना घोड्यावर बसण्याचा योग आला खरा. घोडेही बिचारे गरीब होते पण १५ मिनिटांच्या छोट्याशा स्वारीतही "हे प्रकरण आपल्याला झेपणारे नाही" याची कल्पना आली होती. थोडक्यात काय ? कार चालवणे आणि घोडेस्वारी करणे या दोन्ही गोष्टी अजिबातच येत नसल्याने (मायापुरी निकषांनुसार) आम्हाला बॉलीवुड प्रवेश मिळणार नव्हताच.

पण तरीही आमच्या घरी नाट्य, नकलांची परंपरा होती. माझे आजोबा कै. श्री. राजाभाऊ किन्हीकर विदर्भातले प्रख्यात नकलाकार होते. त्याबद्दल त्यांना शासकीय पेन्शनही मिळत असे. गणेशोत्सवात, दुर्गोत्सवात संपूर्ण दिवसचे दिवस ते "बुक्ड" असत. संपूर्ण विदर्भभर त्यांचा नकलांचा दौरा असे. त्यामुळे त्या परंपरेत आम्हीही अगदी पहिल्या वर्गापासून नाटके, नकला या क्षेत्रात पदार्पणकर्ते झालो होतो. त्याची पुढली पायरी म्हणजे बॉलीवुडमध्ये पदार्पण असे कदाचित झाले असते पण या भयानक उर्दूमिश्रित हिंदी शब्दांनी आमच्या स्वप्नांना बालपणीच सुरूंग लावला. "मकसद" हे सिनेमाचे नाव म्हणजे सिनेमा कशावर आहे ? याचा अंदाज लागेना हो. मराठीत "अबकडई" नावाचे एक नियतकालीक निघे. तसेच हे (एकमेकांशी अजिबात संबंध नसलेले) शब्द जोडून काहीतरी वेगळेपणा करण्याची त्या निर्मात्याची इच्छा असेल असे समजून आम्ही तो सिनेमा बघायला गेलो होतो. तसेच आणखीही सिनेमे म्हणजे "दीदार - ए - यार", "अफ़साना" वगैरे. उर्दू शब्द कळायची सोयच आमच्या बालपणी सोय नव्हती हो. आणि घरचे वातावरण काय विचारता ? "आप जैसा कोई मेरी जिंदगीमें आये, तो बाप बन जाये" हे गाणे आमच्या बालपणी आम्ही निरागसपणे म्हणत असताना आईने कानाखाली जाळ काढल्याचे अजूनही स्मरते. (तरी हे इतके उघड उघड अश्लील गाणे सिनेमात कसे ? हा प्रश्न आमच्या पौगंडावस्थेत आम्हाला पडल्याचेही बारीकसे स्मरते हो.) त्यात "बाप" नही "बात" शब्द आहे या सत्याचे आम्हाला फ़ार उशीरा आकलन झाले. त्याकाळी टेपरेकॉर्डर, रेडिओ सर्रास सगळीकडे नसल्याने कानावर पडलेली गाणी साठवून ठेवावी लागत. त्यातल्या शब्दांची उठाठेव, चिरफ़ाड करण्याइतपत ते गाणे ऐकायला मिळतच नसे.

बरे ते शब्द मनापर्यंत पोहोचायला त्या शब्दांचा अनुभव तर यायला हवा ना ? कधीही पंजाबात न गेलेल्या आणि तिथल्या ग्रामीण जीवनाशी मनापासून समरस न झालेल्या जीवाला, "औनी-पौनी यारियाँ तेरी बौनी-बौनी बेरियोँ तले, चप्पा चप्पा चरखा चले" या ओळींचा अर्थ कसा कळायचा ? शब्दांचा अनुभव यायला हवा. श्रावणातल्या अशाच एका पावसाळी सकाळी, डेक्कन एक्सप्रेसने, मुंबईवरून पुण्याला येताना घाटात एका बोगद्यातून बाहेर आल्यानंतर अचानक दिसलेल्या दृश्याने पाडगावकरांच्या "पाचूच्या हिरव्या माहेरी, ऊन हळदीचे आले" या ओळींची प्रतीती देणारा देखावा काही मिनीटेच का होईना बघायला मिळाला होता. तशी शब्दांची अनुभूती यायला हवी तर त्यांच्यावर प्रेम जडेल. नाहीतर "शब्द बापुडे केवळ वारा..." अशी अवस्था व्हायची. शब्द लिहीणा-याने ते ग्रेटच लिहीलेत पण ते समजण्यासाठी आपल्याला त्यांची अनुभूती तर यायला हवी ना ?





गुलझार वगैरे सारख्यांची गीते ऐकायची आणि समजावून घ्यायची म्हणजे "उर्दू - मराठी शब्दकोश" च जवळ घेऊन त्यातल्या संदर्भानुसार चालण्यासारखे होते. पुल म्हणतात तसे "धर शब्द की कर त्याची चिरफ़ाड". या गदारोळात त्यातल्या संगीताचे रसग्रहण कधी करायचे ? चाल कधी गुणगुणायची ? एकंदर कठीणच मामला होता. मग गायकाचा टीपेचा हिंदकळणारा सूर कानात साठवायचा ? की "बादलो में सतरंगिया बोंवे, भोर तलक बरसावे" चा अर्थ शोधायचा ? या दुविधेत आम्ही सापडायचोत. आधीच मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या चार भाषा शिकत असल्याने केवळ बॉलीवूड प्रवेशासाठी  हे ऊर्दू वगैरे शिकायला आमची अजिबातच तयारी नव्हती. त्यामुळे आम्ही बॉलीवुड प्रवेशाच्या (कधीही न केलेल्या) विचारांचा त्याग केला आणि (कधीही न पाहिलेल्या) एका स्वप्नाचा शेवट झाला.

- स्वप्नवेडा प्रा. राम प्रकाश किन्हीकर