गाॅगल (कृष्णोपनेत्रः पुलंचा शब्द) आमच्या डोळ्यांवर बर्याच उशीरा आला. ११ व्या वर्गात असताना घरापासून सी. पी. अँड बेरार रवीनगर शाळेपर्यंत बसने जाताना मध्ये अलंकार टाॅकीजवर आमीर खानच्या "कयामत से कयामत तक" सिनेमाचे भलेमोठे पोस्टर लागलेले दिसे. त्या पोस्टरवर अर्ध्यापेक्षा जास्त व्यापून राहिलेला आमीर खानचा गाॅगलधारी चेहेरा अजूनही माझ्या घट्ट आठवणीत आहे.
अर्थात तेव्हा 'कयामत', 'मकसद' वगैरे ऊर्दू शब्दांशी फारसा परिचय झालेला नव्हता. पुलंच्याच भाषेत वर्णन करायचे झाले तर सकाळी साध्या वरणासोबत फोडणीचा भात आणि संध्याकाळी फोडणीच्या वरणासोबत साधा भात खाणार्या मध्यमवर्गीय संस्कृतीतले आम्ही. आमचे क्षितीज विस्तारले, जाणीवा समृध्द झाल्यात जेव्हा आम्ही अभियांत्रिकी शिक्षणासाठी घरापासून ११०० किमी दूर कराडला गेलो तेव्हा. नव्या संस्कृतीतले मित्र, नव्या ज्ञानाची भर, नवीन जाणीवा जगणे यात खरे जीवन जगलो.
बरे, १२ व्या वर्गात घरून शाळेत जायला लूना मिळाली खरी पण तेव्हा असे तोंडनाक गुंडाळून, गाॅगल घालून स्वतःला अती जपत जाणे हे फक्त अतिरेक्यांचे लक्षण होते. बहुतांशी गाडीवरून जाणारी मंडळी आजच्या युगात आहे तसा कसलाही जामानिमा न करता मोकळेपणाने, सुखाने गाड्या चालवीत असत. घरी परतल्यानंतर चेहेर्यावर जमलेली धूळ लक्स (किंवा हमाम) आणि पाण्याचे शिपकारे यांनी नाहीशी होत असे. चेहेर्यावर धूळ जमून त्याची ph बिघडू नये म्हणून चेहेरा विचित्र गुंडाळणे, केसांच्या निगेसाठी केसांनाही असे गुंडाळून वगैरे गाड्या चालविणे असे प्रकार तेव्हाच्या 'सुकांत चंद्रानना' करीत नसत. घरी आल्यानंतर केस विस्कटलेले दिसलेच तर एखादा कंगवा किंवा फणी (ही मिळते का हो आजकाल ?) केसांमधून फिरवून ते नीटनेटके केले जात. पुष्कळ वेळेला मला प्रश्न पडतो आजकाल इतकी चेहेर्याची, केसांची काळजी घेऊनही तरूण पिढीत अकाली केस पांढरे होण्याचे प्रमाण किंवा त्वचेचा पोत बिघडण्याचे प्रमाण वाढते का असावे ? आपण निसर्गापासून स्वतःला खूप तोडून घेतलेय का ?
तात्पर्य काय तर आम्ही चांगले कमावते होईपर्यंत गाॅगल ही तत्कालीन चैनीची वस्तू आमच्या डोळ्यांवर कधी चढलीच नाही. स्वतः कमवायला लागल्यानंतर अनेक गरजेच्याच वस्तू चैनीच्या वाटायला लागतात मग अशा खरोखर चैनीच्या वस्तूचे महत्व आम्हाला कुणी पटवून द्यावे ? आणि त्यांची खरेदी तरी कशी व्हावी ?
लग्नानंतर मात्र अर्धांगिनीच्या आग्रहाखातर एकदोन वेळा गाॅगल खरेदी झाली पण ते वापरण्याची सवय नसल्याने एकदोन वापरांनंतर पडून राहणे, कुठेतरी विसरून येणे हे प्रकार अपरिहार्यच आहेत. मग सुपत्नीनेही माझ्यामागे गाॅगल घालण्याचा हट्ट करण्याचा नाद सोडला. बाकी घराबाहेर पडताना, प्रवासाला जाताना आवर्जून गाॅगल घालणारे आणि तो वर्षानुवर्षे नीट जपून ठेवणारे लोक मला माध्यान्हवंदनीय आहेत. (गाॅगलचा खरा उपयोग माध्यान्हसमयीच की नाही ? म्हणून "प्रातःवंदनीय" सारखे "माध्यान्हवंदनीय". मराठी शब्दभांडारात तेवढीच माझी आपली इवलीशी भर.)
बाकी कोट घातलेला माणूस आणि गाॅगल घालणारी व्यक्ती एकूणच रूबाबदार दिसतात. व्यक्तीचे खांदे मुळातून कितीही पडलेले असलेत तरी कोटाच्या रूंद खांद्यांमधून ते उठावदारच दिसतात. कोट घातलेली व्यक्ती म्हणूनच आत्मविश्वासपूर्ण दिसते. तसेच मुळातले निस्तेज डोळे लपविण्याचे काम गाॅगलव्दारे होते आणि त्या चेहेर्याला एक वेगळीच झळाळी येते म्हणून गाॅगल घातलेली व्यक्ती उगाचच स्मार्ट वाटते. अर्थात ६० आणि ७० च्या दशकातल्या हिंदी सिनेमातल्या नायिका (आणि त्यांचे अंधानुकरण करणार्या काहीकाही मराठी नायिकाही) जेव्हा सव्वा चेहेरा व्यापणारा "अंगापेक्षा बोंगा" गाॅगल घालायच्यात तेव्हा त्या अत्यंत हास्यास्पद दिसायच्यात. त्यातच अगदी ९० च्या दशकातही गाॅगल कपाळाच्या पार टोकांवरून नेऊन केसांवर अडकवून ठेवण्याची एक बेंगरूळ फॅशन सिनेसृष्टीने रूढ करण्याचा प्रयत्न केला खरा पण तो फारसा यशस्वी झाला नाही. या खटाटोपात केसांना लावलेले तेल गाॅगलला चिकटून पुढच्या वेळी घातल्यानंतर समोरचे धूसर दिसणारे दृश्य पाहून स्वतःला मोतीबिंदू झालाय की काय अशी शंका येणे किंवा सर्वसामान्य माणसांच्या धावपळीच्या घडामोडींमध्ये तो गाॅगल निसटून पडण्याची भिती असणे या प्रमुख भीतींमुळे ती फॅशन जनसामान्यांमध्ये लोकप्रिय झाली नाही.
बाकी गाॅगल वापरावेत ते तुंगभद्रेच्या दक्षिणभागात असलेल्या सिनेसृष्टीतील हिरोंनी. थलाईवा रजनीकांतला एकातरी सिनेमात गाॅगलशिवाय आणि त्याच्या गाॅगल घालण्याच्या विशिष्ट स्टाईलशिवाय बघितलेय काय ?
आताशा घरात आमच्या नव्या पिढीच्या समृध्द जाणीवांमुळे आणि आग्रहामुळे घरात मध्येमध्ये गाॅगलखरेदी होते. लाॅकडाऊनदरम्यान आॅनलाईन चष्मे मागवताना "दोन चष्म्यांवर एक गाॅगल फ्री" या योजनेत घरात एकदम चांगल्या कंपनीचा छान गाॅगल आला. घालून बघितला तर खरंच वेगळा वाटला हो. गाॅगल्समध्ये आजकाल उपयुक्त असे "पोलराॅइड" तंत्रज्ञान आलेय आणि त्याचे नक्की फायदे काय ? हे तो गाॅगल घालून बघितल्यावरच कळले हो. यातही म्हणे स्त्रियांनी वापरण्याचे आणि पुरूषांनी वापरण्याचे असा पंक्तीभेद आहेच.
एकूण काय ? "कुठला गाॅगल आपल्याला छान दिसतोय ?" या विचारापेक्षा "कुठल्या गाॅगलमधून आपल्याला छान दिसतेय ?" हा विचार मनात आला की आपली गाडी तारूण्याचा घाट ओलांडून आता पोक्तपणाच्या वळणावरून वृध्दाप्याच्या उताराकडे वाटचाल करायला तयार आहे असे लक्षात घ्यायला हवे आणि त्यानुसार योग्य तो गिअर टाकायला हवा.
- वागण्यातले बाल्य अजून जपून ठेवलेला, मनाने चिरतरूण, वृत्तीने पोक्त आणि विचारांनी वृध्द असलेला "अवस्थातीत" गणेशभक्त, राम प्रकाश किन्हीकर.
No comments:
Post a Comment