Friday, September 1, 2023

कृतज्ञतेची अपेक्षा

समजा आपण एखाद्या बँकेत खूप मोठी रक्कम भरली. तिथल्या कॅशियर ने ती रक्कम मोजली आणि आपल्या खात्यात ते पैसे जमा केले. आता आपण तिथल्या त्या कॅशियर कडून किंवा त्या बँकेच्या मॅनेजर कडून कृतज्ञतेची अपेक्षा ठेवू का ? नक्कीच नाही. त्यांनी त्यांचे त्यांचे नेमून दिलेले काम केलेले आहे. आणि आपण भरलेल्या रकमेबद्दल बॅंक आपल्याला व्याजाच्या रूपाने मोबदला देत राहणार आहे. त्यामुळे आपण तिथे ठेवलेल्या मोठ्या रकमेबद्दल तिथल्या कर्मचाऱ्यांनी आपल्याबद्दल कृतज्ञता वगैरे व्यक्त करावी ही आपली अपेक्षा नसते आणि नसावी ही.


मग या जगात वावरताना आपण एखाद्या व्यक्तीला मदत करून एखादे छोटे मोठे पुण्यकर्म करतो, तेव्हाही हा हिशेब आपण त्या मोठ्या बॅंकर वर का सोपवीत नाही ? तो सर्वव्यापी सर्वसाक्षी बँकर आपल्या कर्माची नोंद घेईल आणि त्याचे मुद्दल व व्याज आपल्याला योग्य त्या वेळेवर परत करेल हा विश्वास आपल्याला का नाही ? आपण ज्या व्यक्तीला मदत केली त्या व्यक्तीकडून कृतज्ञतेची अपेक्षा का बाळगतो ?तो तर त्या एका मोठ्या सिस्टीमचा भाग आहे. त्याने कृतज्ञता व्यक्त केली काय किंवा न केली काय ? आपले पुण्यकर्माचे काम आपण सुरूच ठेवायला हवे, नाही काय ?

थोडा आणखी खोल विचार केला तर लक्षात येईल की व्यावहारिक जगात बॅंकेकडून आपण मुद्दल आणि व्याज परत मिळण्याची अपेक्षा करतो खरे पण आध्यात्मिक जगात त्या मोठ्या बॅंकरकडून आपण केलेल्या पुण्यसंचयाबद्दल त्याच्याकडून काही परताव्याची अपेक्षाही करू नये. हा मनुष्यजन्म आपल्याला किती जन्मांनंतर मिळाला हे आपल्याला ठाऊक नाही. गेल्या कुठल्या कुठल्या जन्मात किती पापकर्मे करून आपण कर्ज करून ठेवलेय हे आपल्याला कधीच कळणार नाही. मग आज केलेले पुण्यकर्म हे आपण ठेवत असलेली ठेव नसून आपले मागील जन्मीचे कर्ज फेडतोय ही भावना का नसावी ?

सत्वगुणें मारावे रज आणि तम,
मारा सत्वाने सत्व पूर्ण

याचा हाच अर्थ असावा बहुतेक.

- सात्विकतेकडे वाटचाल करीत असताना सात्विकतेचेही ओझे होऊ नये याची काळजी घेणारा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर. 

2 comments: