Friday, July 13, 2012

झी मराठीचे डोके ठिकाणावर आहे काय ?


अरे ज्या (काडेल) मालिका सर्वसामान्यांना बघायच्या नाहीत आणि ज्या कुणी बघतही नाहीत त्यांच्यातल्या विकृत कृत्यांना (चाबकाचे फ़टके मारणे, पिस्तुलाने आत्महत्या वगैरे) जाहिरातींद्वारे आमच्या माथ्यावर का मारताय ? आता या जाहिराती नको म्हणून आम्ही  "एका लग्नाची दुसरी गोष्ट"  सारखी चांगली मालिकाही पाहणे बंद करायचे की काय ?

सर्व समविचारी लोकांनी असल्या विकृत मालिकांची (सर्वच वाहिन्यांवरच्या) तक्रार करायला हवी. मराठीत दर्जेदार लेखकांचा दुष्काळ पडलाय की काय ? की केवळ हिंदीचे (एकता कपूर फ़ेम) अंधानुकरण ? हा अत्याचार थांबवा.

तुम्हाला मालिका दाखवण्याचं स्वातंत्र्य आहे. जरूर आहे. पण ज्यांना ती मालिका बघायचीच नाही त्यांनाही ते स्वातंत्र्य आहे की नाही ? त्यातला नेमका विकृत भाग जाहिरातींद्वारे, बातम्यांमध्ये खालच्या सरकत्या पट्टीत आम्हाला बघायचा नाही. आता आम्ही पूर्ण वाहिनीवरच बहिष्कार घालायचा की काय ? (त्या सासुचे "चार दिवस" चार हजार झालेत तरी संपत नाहीत म्हटल्यावर हल्ली ई. टी. व्ही. मराठी सर्व सूज्ञ प्रेक्षकांच्या बघण्यातून संपला आहे. तेच झी ला करायचेय की काय ?) कृपया या सगळ्या स्वस्त लोकप्रियतेच्या गिमिक्स थांबवा.

या मालिकांचे विकृत लेखक (त्यांची नावं मालिकेत काम करणा-या कलावंतांना तरी माहिती असतील की नाही कोण जाणे ?), या सगळ्या मालिकांमध्ये स्त्रीच स्त्रीची शत्रू दाखवतात. अगदी १८ व्या १९ व्या शतकातल्या विचारसरणीने छळ वगैरे सविस्तर दाखवतात. याचा तमाम स्त्री संघटनांनी निषेध केला पाहिजे. ब-याच मालिकांच्या लेखिका आणि निर्मात्या स्त्रीच आहेत आणि ह्या मालिका अत्यंत आवडीने (रिपीट टेलिकास्ट सुद्धा) बघणा-या बहुसंख्य स्त्रीयाच आहेत. आपली संवेदनशीलता इतकी मरत चाललीय का की आपल्याला या सर्वांचा निषेधसुध्दा करावासा वाटू नये ?

किती मराठी घरांमध्ये असल्या सासवा, सुना, जावा जावा असतील? काही दिवसांनी सर्वसामान्यांना हेच खरे वास्तव वाटायला लागून असलेच प्रकार घरोघरी घडायला लागलेत तर जबाबदार कोण ? 

खूप दिवसांपासून ह्या चीड आणणा-या विषयावर चिंतन करत होतो. आज अनावर झालंय म्हणून लिहीतोय.

2 comments:

  1. Agdi khara ahe. Lok baghtayt mhanun te dakhawtayt ho. Ani yache parinam already distayt. Arthat te jyanchyawar hotayt tyanchi akkalahi gudghyatch ahe. So nothing to worry. Je whaycha te asha akkal gudghyat asnaryanchach hoil ani te tyanchyasarkhich lok kartil. Apan fakt baghne.

    ReplyDelete
  2. Ekdm barobr. Baryapaiki malika saglya junya vichar sarnichya suruyt.

    ReplyDelete