Thursday, December 13, 2012

याचा विचार गांभीर्याने व्हावा.

एकूणच मी भटक्या प्राणी आहे. भारतात तर भटकलोच आहे  महाराष्ट्रातही  मी फार भटकलेलो आहे. स्वतः ची गाडी घेतल्यानंतर तर या भटकंतीत आणखी भर पडत गेली. गाडी चालवताना मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे रस्त्यावर असलेला चालत्या बोलत्या मृत्युदूतांचा अनिर्बंध वावर.

रस्ता अपघात ही आजकाल आपणा सर्वांच्या अंगवळणी पडलेली गोष्ट झालेली आहे. खरतर हे आपल दुर्दैव आहे. रोजच्या रोज वर्तमानपत्रात यासंबम्धी बातम्या आपण केवळ वाचून सोडून देतो. या अपघातांच्या कारणांचा आपण खोलवर शोध घेतला तर आपल्या लक्षात येईल की ९५ % वेळा अपघात हे  मानवी कारणांमुळे  होतात. यंत्रांचा दोष फक्त ५ % एव्हढाच असतो.

पण मला राहून राहून अस वाटतंय की यातले बरेच अपघात टळू शकतात. आपल्याकडे कायदे चांगले आहेत पण रस्त्यावरचा कायदा राबवणारी यंत्रणा जर पुरेश्या शक्तीने आणि प्रामाणिक हेतूने आपले काम करील तर यातले बरेच अपघात टळू शकतात. अनेक निरपराध प्राण वाचू शकतात. वानगीदाखल ही काही उदाहरणे.



वाहनांना मागल्या बाजूला टेल लाईट्स हवे असा कायदा आहेच. पण या ट्रक सारखे अनंत  ट्रक आज महाराष्ट्रात सर्वत्र फिरताहेत. एकतर यांना टेल लाईटस नसतातच किंवा असलेच तर ते बंद करून रात्री ट्रक चालवले जातात. (मागल्या बाजूचे दिवे बंद ठेवल्याने यांच्या किती बेटरीची बचत होते हे यांनाच माहित. यांचेच काही भाउबंद रात्री समोरच्या दोन दिव्यांपैकी केवळ एकाच दिव्यावर ट्रक चालवण्याचे दिव्य करतात. आणि समोरचा वाहन चालक जवळ आला की त्याचे डोळे दिपावण्यासाठी दुसरा दिवा सुरू करतात. दुरून ही चारचाकी आहे की दुचाकी असा संभ्रम निर्माण होता असतानाच अचानक हा डोळे दिपवणारा प्रकाश हा अपघातांना निमंत्रण देणारा असतो.)

मधल्या काही काळात आर टी ओ ने वाहनांवर चमकत्या रिफ्लेक्टर पट्ट्या सक्तीच्या केलेल्या होत्या. (आजही आहेत.) पण किती जण हा नियम पाळताहेत ? हे पाहणारी यंत्रणा झोपी गेलेली आहे. त्या रिफ्लेक्टर पट्ट्या कायम स्वछ्च ठेवल्या पाहिजेत याबद्दल वाहन मालक आणि चालकां मध्ये जागृती कोण करणार ? 

रात्रीच्या वेळेला असला हा ट्रक रस्त्याच्या कडेला थांबला असेल तर मागून येणाऱ्या वाहनाला न दिसण्याची शक्यता जास्त आहे. अशा वेळी धडक अपरिहार्य आहे.

आजकाल आपले वाहन घेऊन किंवा भाड्याने वाहन घेऊन प्रवासाला निघणारी  बरीच मंडळी आहेत. एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रात्रभर वाहनाचा प्रवास करून दिवस वाचवू म्हणणारी ही मंडळी पाहिली म्हणजे त्यांच्या धाडसाच कौतुक वाटत की मूर्खपणाची कीव येते हे सांगण अवघड आहे. रात्रभर अवघडलेला प्रवास करून सकाळी आंबलेल्या अंगाने दिवसभर काम कसे होईल ? पर्यटनाचा आनंद कसा मिळेल ? याचा विचार ही  मंडळी करत नसावीशी वाटतात. रात्रभर प्रवास करण्यात आपण किती धोका पत्करतोय याची जाणीवच यांना नसते. कितीही चांगला ड्रायव्हर असला तरी शरीर धर्मानुसार त्याला पहाटे झोप येणारच हे गृहीत धरायलाच हवे. ड्रायव्हर ची अपुरी झोप ही सुध्दा बऱ्याच अपघातांचे कारण होत चाललेली आहे.


आता हा ट्रक बघा. 

सिमेंट वाहून नेणाऱ्या या ट्रकला मागल्या एका एक्सलला  दोन चाकेच नाहीयेत. हा ट्रक चांगला वर्दळीच्या मार्गावरून जात होता. कुठल्याही क्षणी  अपघाताला कारण होऊ शकणारा हा ट्रक यंत्रणेला दिसला नाही असे समजणे नुसताच भाबडेपणा नाही तर चक्क मूर्खपणा ठरेल.




या ट्रक ला ना नंबरप्लेट , ना रिफ्लेक्टर, ना टेल  लाईटस. तरीपण हा हमरस्त्यावर आहे हे यंत्रणेचे अपयश नाही का ?



आजकाल ट्रक मध्ये त्याच्या क्षमते एव्हढाच  माल भरला जावा ही अपेक्षा अत्यंत चुकीची आणि अवास्तव समजली जायला लागलीये. १२ आणि १५ टन क्षमतेच्या ट्रक्स मध्ये कमीतकमी २० टन  आणि २० टन क्षमतेच्या ट्रकमध्ये कमीतकमी ३५ टन माल भरलेले हे ट्रक्स आर. टी .ओ. ला दिसत नसतील तर या राष्ट्रात पुरेश्या प्रमाणात नेत्रतज्ञ निर्माण होण्यासाठी देशव्यापी चळवळ उभारली जायला हवी. आकारमाना चाही विचार करता महामार्गावरून जाणाऱ्यां इतर वाहनांसाठी हे ट्रक्स  खूप धोका निर्माण करत आहेत.



एकेकाळी "रस्ता तेथे एस.टी ." हे एस. टी . चे ब्रीदवाक्य होते. आता "रस्ता तेथे (आणि रस्ता  नसेल तेथेही) खाजगी वाहतूक हे ग्रामीण भागातील नेत्यांचे आणि त्यांच्या चाहते कम चमच्यांचे बोधवाक्य झालेले आहे.
काळी पिवळी, अधिकृत, अनधिकृत जीप्स  यांच्यातून त्यांच्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त प्रवाशांची वाहतूक होताना तुम्हा आम्हाला दिसते. फक्त नियंत्रण करणारया यंत्रणेला ती दिसत नाही. यात अनेक आर्थिक हितसंबंध आहेतच आणि खूपश्या ठिकाणी अश्या जीप्स ची मालकी स्थानिक पुढारी / फौजदार  यांचीच असते हे भीषण वास्तव आहे. 

या सर्व बाबींचा मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार होऊन यंत्रणे तर्फे प्रामाणिक प्रयत्न आणि जनजागृती व्हायला हवीये.

Wednesday, December 12, 2012

कृष्णभूमीत ६ : राधेचे गाव - बरसाना


यापूर्वीचा प्रवास

कृष्णभूमीत १ : नागपूर ते नवी दिल्ली

कृष्णभूमीत २ : नवी दिल्लीत

कृष्णभूमीत ३ : आग्रा

कृष्णभूमीत ४ : फ़तेहपूर सीकरी

कृष्णभूमीत ५ : वृंदावन


दि. १३/०५/२०११.

श्रीकृष्ण चरित्र ज्याप्रमाणे श्रीराधेच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे त्याप्रमाणेच कृष्णभूमीची सहलही श्री राधेच्या गावाला, बरसान्याला, भेट दिल्याखेरीज पूर्ण होत नाही. भर दुपारी तळपत्या उन्हात आम्ही सगळे बसने निघालोत. बरसाना हे राजस्थानात आहे. वृंदावनाच्या नैऋत्येला साधारण ३५ किमी वर. पण राजस्थानातल्या या गावी पोचलो तेव्हा वातावरण ब-यापैकी ढगाळ झालेले होते. साधारणतः एका टेकडीवर हा श्रीराधारानीचा महाल आहे. आपल्या बसेस खालीच ठेवून इथल्या वाहनांनी ती अरूंद चढण चढावी लागते. हौशी आणि आत्यंतिक भाविक मंडळींसाठी पाय-या पण आहेत पण इथल्या उन्हाचा गेले दोन तीन दिवस चांगलाच अनुभव घेतल्याने आमच्यापैकी कुणीही तशी इच्छा प्रगट केली नाही.

गड चढून वर गेलो मात्र सगळा शीण विसरायला लावणारा अप्रतिम वास्तुकलेतला नमुना बघायला मिळाला. संपूर्ण राजवाडा हा एक उत्तम वास्तुचा नमुना आहे हे जाणवले. श्री राधेचे हे मंदीर आणि राजवाडा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला आहे. इथले लोक मोठ्या अभिमानाने बरसाना ही व्रजभूमीची राजधानी असल्याचे सांगतात. ते खरेही आहे. वृंदावनातले दैन्य इथे दृष्टीला पडत नाही. सगळे ऋषी, साधू, महात्मे आणि योगी पुरूष जन्मभर ज्याच्या प्राप्तीसाठी तळमळतात, तो बांके बिहारी श्रीराधे साठी वृंदावनावरून इथे येतो. श्रीराधा ही श्रीकृष्णाचे अंतःस्थ प्राण आहे याचा प्रत्यय इथे येतो. सर्वत्र प्रसन्नता अनुभवायला येत असते.








या राजवाड्याच्या सर्वच भिंतींवर श्रीकृष्णचरित्रातील काही छान प्रसंग रेखाटले आहेत. जवळपास ३०० वर्षांनंतरही त्यातले रंग आणि ते प्रसंग आपल्याला मोहवून टाकतात. त्यात भर म्हणजे हे प्रसंग आपल्या व्रज भाषेत अधिक खुलवून रसाळ करणारे एक पंडित आम्हाला गाईड म्हणून लाभले होते. सर्वांनी तिथे छान फ़ेर धरला, फ़ुगड्या खेळल्यात, भजने सुरू झालीत. श्रीराधा आणि बांके बिहारी आम्हाला मोहवून गेलेत, नश्वर जगाचा विसर पाडून गेलेत.






वृंदावनात  राधेच वर्णन श्रीराधा असेच करतात . ही असली नाममुद्रा सर्वत्र, जवळपास सर्वच घरांवर दिसते.




ऐन उन्हाळ्यातल्या दुपारी निष्पर्ण वृक्षावरील पोपटांचा थवा .


व्रज भूमी चे वैशिष्टय असलेले हे मोर . यांचा वावर सर्वत्र  आणि सहज असतो.


आपल्याकडे मे महिन्याच्या सुरुवातीला येणारा आंबा उत्तर भारतात मे महिन्याच्या शेवटी शेवटी येतो.





श्री कृष्णाला प्रिय असलेली तुलसी आणि  तेव्हढेच सुरेख वृंदावन.



इथली नाजूक कलाकुसर पाहून तर आम्ही थक्कच झालोत. अप्रतिम !


श्रीराधा राणीच्या महालातून दिसणारे बरसाना गाव. इथली "लठमार" होळी प्रसिध्द आहे.


संपूर्ण  सहलीत उत्साह टिकवून ठेवणारा आमच्यां तरूण मंडळींचा हा ग्रुप. 


सहलीचे को मेनेजर: श्री. वैभव  गोसावी. यांच्या विशेष टिप्पण्या सहलीत रंग भरायाच्यात.


आमचे सी. ई. ओ. कौस्तुभ खातखेडकर. एम.बी.ए.ची डिग्री घेण्याची यांना काहीच गरज नाही. अगदी लहान वयातच मोठमोठे कार्यक्रम यशस्वीरीत्या कसे आयोजित करावेत याच प्रशिक्षण ते कुठून तरी आधीच मिळवून आलेले  आहेत.






प्रत्यक्ष भागवतकार भगवान वेदव्यासांना ज्या रासक्रीडे ची भूल पडली ती रासक्रीडा चित्रांमध्ये. ही चित्रे कमीत कमी ३०० वर्षे आधी चितारली गेली आहेत.
















बरसाना येथील पौराणिक होळी. सब तो उस्सीके रंग मी रंग गयी हैं. उसे क्यो रंगा रही है  ?


मध्ययुगीन काळातील नागर वैभव. चित्रकाराची गोकुळ मथुरेची कल्पना.


कृष्णकथा आपल्या रसाळ व्रजबोलीत ऐकवणारा तिथला गाईड.








गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. (खट्याळ बाललीला) 











वृंदावनी वेणू कवणाचा माये वाजे?












आहे की नाही गम्मत ? कृष्णभूमीत "बरसाना" कधीही चुकवू नका.