Wednesday, December 18, 2013

संकल्प २०१४

आज अचानक लिखाणाची स्फ़ूर्ती झाली आणि झरझर लिखाण व्हायला लागले. तसे २०१३ मध्ये इथे लिखाण कमीच झाले. 

एका चांगल्या लेखिका मैत्रीणीच्या सल्ल्यानुसार मी माझ्या मनात स्फ़ुरलेले विषय आणि विचार लगेच एका छोट्या डायरीत टिपून ठेवत असतो. पण मग वेळेअभावी त्याचा विस्तार आणि मांडणी राहूनच जाते. या वर्षी लिहीण्यासाठी खालील विषय तयार होते पण विस्ताराला वेळ मिळालाच नाही. आता उरलेल्या २०१३ मध्ये किंवा २०१४ मध्ये हे विषय या ठिकाणी नक्की मांडेन. (हे तुम्हा सगळ्यांना आमीष समजा किंवा धोक्याची घंटा समजा.)

१. कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही. 

२. सांग सांग भोलानाथ

३. माझी दक्षिणस्वारी (दक्षिण भारतातल्या माझ्या प्रवासाविषयी लेखमाला)

४. उत्तररंग (उत्तर भारतातल्या प्रवासाविषयी लेखमाला)

५. एस. टी. दशा आणि दिशा (माझा आवडता विषय)

६. नागपूर शहर वाहतूक- एक चिंतन (१९८३ पासून माझ्या चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय)

७. २०१३ मधील माझी कार-गिरी (कार ने केलेले लांब लांब पल्ल्याचे प्रवास)

इत्यादी इत्यादी. 

बघूयात आता. २०१४ तरी लिखाणाच्या दृष्टीने चांगले जातेय का ते ?

Destination is important; but enjoying the journey is more pleasant

हे वाक्य मी जेव्हा पहिल्यांदा वाचले तेव्हा मला ते मनापासून पटले. जगण्याची किती छान रीत आहे न ही ? खरं म्हणजे टिपीकल मध्यमवर्गीयात जन्मून वाढलेल्या मुलांसाठी असल काही म्हणजे त्यावेळी दिव्यच होते. थ्री इडीयटस सिनेमात दाखवल्याप्रमाणे बालपणापासूनच ध्येय आणि ते गाठण्यासाठी करावे लागणारे परिश्रम याचच महत्व मनात बिंबवल जायच. ते चूक होत अस मी तरी आज का म्हणू ? ध्येयाच्या मागे लागलो नसतो तर आज जीवनात जे काही मिळालय ते प्राप्त झालच नसत. पण एका क्षणी वरील वाक्य फ़ारच पटल. प्रवास एन्जॊय करत जगूयात ना. ध्येय तर येइलच. जातय कुठे ?

साध उदाहरण आहे. एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जायचय. बसमध्ये बसल्या बसल्या झोपलात तरी पोहोचणार आणि आजुबाजुचा, कधी रखरखीत तर कधी मनमोहक, निसर्ग पाहत गेलात तरी पोहोचणारच. मग ही मजा अनुभवत का जाउ नये ? ही प्रवृत्ती मला आवडली. मी स्वतः प्रवास करताना जर नवीन प्रदेशांमधून प्रवास करायचा असेल तर दिवसा तिथून जाणारी बस किंवा रेल्वे निवडतो. रात्रीच्या अंधारात काय पहायच राहून गेलय याची चुटपुट मला सतत लागून राहते.

रामदेवबाबा महाविद्यालय, नागपूर येथे प्राध्यापकी करताना मला एक विचित्रच गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे इथले आठव्या सेमीस्टरचे विद्यार्थी "गेट, जी आर ई" वगैरे परिक्षांचे निमित्त सांगून महाविद्यालयात जवळपास दोन एक महिने अनुपस्थित राहतात. ध्येयासाठी प्रवासाच्या आनंदाला मुकण्याचेच हे उदाहरण झाले. शेवटच्या एक दोन आठवड्यात त्यांना ही जाणीव होते आणि महाविद्यालयीन जीवनाचे उरलेले काही दिवस उपभोगण्यासाठी ते महाविद्यालयात येतात.

आमचे फ़ायनल इयर संपल्यानंतर वसतीगृह सोडून घरी परतायची जेव्हा वेळ झाली तेव्हा कुणीही घरी जायला तयार नव्हते. आमच्या रेक्टरना सांगून आम्ही आमच्या वास्तव्यासाठी एक दोन जादा दिवस मागून घेतलेले होते. त्यांनीही आमच्या भावना ओळखून तशी परवानगी दिलेली होती. शेवटी परत निघण्याच्या वेळेला जी अभूतपूर्व रडारड झाली होती ती मी तर विसरूच शकत नाही. पुन्हा दरवर्षी भेटू वगैरे गोष्टी ठरल्यात. (त्यानंतर सगळेच जण आपापली नोकरी, धंदा, व्यवसायात गुंतल्याने त्या प्रत्यक्षात आल्या नाहीत हा भाग अलहिदा) पण त्या प्रवासाचा हे बंध निर्माण आमच्यात निर्माण झाले होते.

पण ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे साधनाचा मोह पडून साध्याचा विसर पडू देता कामा नये. आपले स्टेशन आले की गाडीची बोगी कितीही मनमोहक असली तरी सोडून उतरावे लागते नाहीतर हा जन्म जन्मांतरीचा प्रवास तसाच सुरू राहील. पण प्रवासाअंती उतरताना मात्र प्रवास केल्याचे समाधान मिळाले की दगदग झाली याचा हिशेब महत्वाचा ठरतो. आता हे समाधान किंवा ही दगदग आपल्या मनोवृत्तीवरच अवलंबून असते. ए.सी. कोच मध्येही दगदगीचा प्रवास आणि आनंदी माणसाला जनरल कोचमध्येही समाधानाचा प्रवास होऊ शकतो.

एका कवीच्या ओळींनुसार

"अखेरच्या वळणावर यावा
मंद सुगंधी असा फ़ुलोरा
थकले पाऊल सहज पडावे
आणि सरावा प्रवास सारा"

प्रवास आनंदात केला असेल, डोळे उघडे ठेऊन, जाणतेपणाने केला असेल तर अखेरच्या वळणावरचा सुगंधित फ़ुलोरा दृष्टीपथात येईल. आणि म्हणूनच ध्येयाकडे वाटचाल करताना प्रवासाचा आनंद घेतलाच पाहिजे.

एका अनोख्या शोधाची चित्तरकथा.



१९९० च्या दशकात गाड्यांचे रेक्स शेअरींग होत असे. माधवराव शिंदे रेल्वेमंत्री असताना त्यांनी गाड्यांच्या महत्तम वापरासाठी हा निर्णय घेतला होता. 

१९८९ मध्ये कराडला गेल्यानंतर कोल्हापूर आणि दादर येथे गाड्यांचे असे शेअरींग होत असेल अशी मला पुसटशी कल्पना यायला सुरूवात झाली होती. तत्पूर्वी नागपूरला येणारी कोल्हापूर-नागपूर महाराष्ट्र एक्सप्रेस ही रात्री नागपूर-दादर सेवाग्राम एक्सप्रेस म्हणून जाते आणि पहाटे येणारी दादर-नागपूर सकाळी नागपूर-कोल्हापूर म्हणून जाते याची कल्पना होती. 

संध्याकाळी आलेली गाडी यार्डात गेली की त्यावर "नागपूर-कोल्हापूर-नागपूर" या बोर्डावरचे "कोल्हापूर" पुसून त्यावरच स्टेन्सीलने "दादर" लिहीले जायचे. हा सगळा प्रकार प्रत्येक डब्यांवर तैल रंगात व्हायचा. तैल रंगांचे ओघळ डब्यांवर अव्यवस्थित दिसत. हे रेक्सपण तसे अव्यवस्थित आणि गचाळ असत. जुने डबे. कुशन्स नसलेली शयनयान आसने. (शयनयान आसनांना कुशन्स लावायला सुरूवात १९७९ पासून झाली. मधु दंडवते रेल्वेमंत्री असताना त्यांनी हा क्रांतीकारी निर्णय घेतला होता. त्याआधी बाकडीच असायचीत.) मला आठवतय एकदा १९६९ चा डबा दक्षिण मध्य रेल्वेने या गाडीला जोडला होता. अवातानुकूलीत द्विस्तरीय शयनयान डबा पण गाडीला असायचा. (तो एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्याविषयी आणि त्यातील माझ्या प्रवासाविषयी नंतर कधीतरी लिहीन.)

हा रेक संपूर्ण दक्षिण मध्य रेल्वेचा असे. त्यावेळी पुणे ते कोल्हापूर हा विभाग द.म. रेल्वेच्या अखत्यारीत होता आणि त्यातील अमराठी अधिकारी या गाडीला सावत्र वागणूक द्यायचेत. दादर ते नागपूर एकही किलोमीटर द.म. रेल्वेत न धावता ही गाडी द.म. रेल्वेची होती. त्यामुळे ह्या गाडीकडे लक्षच नव्हते. १९९१ मध्ये इराक युद्ध सुरू झाल्यानंतर इंधन वाचवण्यासाठी भारतीय रेल्वेने काही गाड्या तात्पुरत्या बंद ठेवल्या होत्या. त्यात दादर-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेसचा समावेश होता.

मग ह्या गाड्यांचे नक्की भ्रमण कसे शोधून काढायचे हा मला पडलेला प्रश्न होता. १९९१ पर्यंत कराडमध्ये ब-यापैकी स्थिरावलेला होतो. मित्रांना माझे हे गाड्या बघण्याचे उद्योग माहिती झालेले होते आणि त्यातले काही समानधर्मी मित्रही माझ्या या छंदात सामील झालेले होते. कराडला पी.एल. सोडली तर अभ्यास वगैरे करण्याच्या भानगडीत कुणीही पडत नसे. त्यामुळे जुलैमधल्या एका शुभदिवशी मी हा रिसर्च करण्याचे ठरवले.

त्यासाठी निरीक्षणे म्हणजे गाड्यांचे रेक्स बघून त्यातल्या कोचेसचे नंबर लिहून ठेवायचे. त्यात महाराष्ट्र, सह्याद्री आणि महालक्ष्मी एक्सप्रेस चे निरीक्षण आले. महाराष्ट्रचा प्रश्न नव्हता कारण कोल्हापूरकडे जाताना ही गाडी सकाळी ११.०० वाजता आणि परत नागपूरकडे जाताना सायंकाळी ४.३० वाजता जायची. पण कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी पहाटे ५.०० वाजता, सह्याद्री भल्या पहाटे ३.०० वाजता तर मुंबईकडे जाणा-या गाड्या अनुक्रमे रात्री ११.०० व १.०० वाजता जायच्या. आणि निरीक्षणांसाठी किमान तीन दिवस आणि तीन रात्री तरी ह्या गाड्यांचे रेक्स बघायला हवे होते.

एका दिवशी दुपारी कराड स्टेशनवर गेलो. महाराष्ट्र एक्सप्रेसचे डबे बघितले. लिहून ठेवले. कराड स्टेशन तेव्हा फ़ार आडबाजुला वाटायचे. महाविद्यालयापासून सहा किमी अंतरावर आणि मध्ये फ़क्त उसाची शेती. मनुष्यवस्ती तुरळक. ओगलेवाडी गावाजवळ हे स्टेशन होते. (तेच काच कारखान्यासाठी प्रसिद्ध असणारे ओगलेवाडी. एकेकाळी स्टेशनचे नाव पण ओगलेवाडीच होते.) दुपारी तर मित्रांची सायकल घेवून मस्त फ़ेरफ़टका मारत गेलो होतो. रात्री मात्र हे शक्य नव्हते.

त्यातल्या त्यात सोय म्हणजे कराड वरून स्टेशनला जाणारी रात्री शेवटची शहर बस, महालक्ष्मी एक्सप्रेसच्या अगदी आधी, आमच्या महाविद्यालयावरून जायची. मग त्या बसने प्रवास करीत स्टेशन गाठले. महालक्ष्मी एक्सप्रेसचा रेक नोंदवून ठेवला. महालक्ष्मी एक्सप्रेस रात्री मुंबईकडे रवाना झाल्यानंतर शहरबस पण कराडला रवाना झाली. कराड स्टेशन तसे दिवसभरही सामसूम असायचे. (पु. लं. चा "काही अप्स काही डाउन्स" वाचल्यानंतर तो लेख पुणे-मिरज मार्गामधल्या स्टेशनांना चपखल लागू पडतो याची मला जाणिव झाली.) आता तर मी एकटाच आणि सोबत रेल्वेची काही मोजकी रात्रपाळीची मंडळी होती. सिग्नल्स आता अधिकच गूढ भासायला लागले होते.

तेव्हा कराडचे स्टेशन मास्तर आगस्टीन जोसेफ़ (भला माणूस) सहज फ़ेरेफ़टका मारता मारता माझ्याकडे आले आणि मला विचारले की एव्हढ्या रात्री फ़लाटावर मी का थांबलोय ? मी माझा छंद आणि आजचे थांबण्याचे कारण खरे सांगितले. ते अवाक झाले आणि माझ्या छंदात मदत करण्याचे त्यांनी कबूल केले. मग रात्री मुंबईकडे जाणारी सह्याद्री एक्सप्रेस येइपर्यंत त्यांनी मला "टोकन एक्स्चेंज" ही रेल्वेची अतिशय सुरक्षित सिग्नलींग सिस्टीम समजावून दिली. मध्ये एक मालगाडी गेली तेव्हा प्रात्यक्षिकासहित.

रात्री सह्याद्री एक्सप्रेस मुंबई कडे गेली त्याचेही डबे नोंदवून ठेवले आणि आता मात्र झोप अनावर झाली होती. (तसेही आम्ही लवकर झोपून लवकर उठणा-यांच्या पंथातले. पु.लं.च्या उपदेशानुसार रात्रभर जागून पहाट बघण्याचा अनुभव नाहीच. रेडीमेडच पहाट कायम बघितलेली.) आगस्टीन जोसेफ़ साहेबांना कळले. त्यांनी माझ्यासाठी फ़लाटावरची प्रथम वर्ग प्रवाशांसाठीची खोली उघडून द्यायला लावली. रेल्वेचे इतर कर्मचारी मला मिळणारी व्ही आय पी ट्रीटमेण्ट पाहून जरा चक्रावूनच गेले होते. हातात वही, पेन, गबाळा वेष, झोपाळलेला हा किडकिडीत तरूण कोण एव्हढा टिकोंजीराव लागून गेलाय ? हे त्यांना कळेचना. पण साहेबाची आज्ञा म्हणून त्यांनी त्याचे पालन केले.

पहाटे तीन वाजता कोल्हापूरकडे येणारी सह्याद्री येण्याची घंटा झाल्यावर एक कर्मचारी मला उठवायला आला. पावसाला सुरूवात झाली होती. मस्त पहाट, माझी आवडती गाडी. फ़क्त चहाचा वाफ़ाळता कप नव्हता. (पुढे खूप वर्षांनी "दिल से" त ला शाहरूख खान अश्याच एका पावसाळी रात्री स्टेशनवर वाट पहाताना दिसल्यावर मला त्या रात्री आठवल्यात.) 

मग पुन्हा जोसेफ़ साहेबांसोबत गप्पा. ते कुठले तरी केरळ वरून आलेले होते. (त्यावेळी कराडला कार्यरत असलेले सगळेच स्टेशन मास्तर केरळी होते.) त्यांची, त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस वगैरे झाली तोवर पहाटे ५ वाजता कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस हजर. तिचाही रेक बघून लिहून घेतला आणि गावातून येणा-या पहिल्या यष्टी ने महाविद्यालयात रवाना झालो. दुपारी मेस मध्ये दोन घास ढकलून महाराष्ट्र एक्सप्रेस बघायला स्टेशनवर. जुलै महिन्यात लेक्चर वगैरे करणे बहुतांशी जनतेला नामंजूर होते. त्यामुळे दिवसभर स्टेशनवर थांबून जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस बघून पुन्हा वसतीगृहात. रात्री पुन्हा जेवण आटोपून शेवटच्या बसने स्टेशनवर.

३ दिवस आणि ३ रात्री हे व्रत केल्यानंतर जी माहिती जमा झाली त्याचे विश्लेषण केल्यानंतर या गाड्यांचे रेक्स कसे शेअर होतात त्याचा उलगडा झाला. तो मी डायरीत नोंदवून ठेवला. 

आता ही माहिती मला रेल्वेतला कुणीही मोठा अधिकारी देवू शकला असता पण मग स्वतः केलेल्या संशोधनाचे आणि त्यातल्या आनंदाचे मोल राहिले नसते. तसही जीवनाच्या प्रवासात "ध्येयापेक्षा प्रवासच जास्त मजेत जगायचा असतो" हे मला पटलेलेच होते.


Wednesday, October 23, 2013

आसनी (आश्विनी) पोर्णिमा

आश्विन पोर्णिमेला विदर्भात आसनीचा सण साजरा करतात. या दिवशी संध्याकाळी प्रत्येक कुटुंबात ज्येष्ठ अपत्याला वाढदिवसाप्रमाणे ओवाळतात. त्या अपत्याला नवीन कपडे भेट म्हणून देतात. 

साधारणतः ८० च्या दशकात या दिवशी संध्याकाळी प्रत्येक घरा-वाड्यांमध्ये भुलाबाइ चा खेळ रंगायचा. एका ठिकाणी शंकर-पार्वतीची (भुलोजी आणि भुलाबाई) च्या पार्थिव मूर्तीची स्थापना व्हायची. (सोवळे वगैरे नाही. गणपतीच्या पार्थिव मूर्तीची होते त्याप्रमाणे साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा पण नाही.) संध्याकाळी लहान मुले आणि आसपासच्या मुली एकत्र येउन भुलाबाईची गाणी म्हणत. 

गाणी मजेदार असत. तत्कालीन किंवा थोड पूर्वकालीन स्त्री जीवनाचे प्रतिबिंब त्या गाण्यात पडलेले दिसायचे. महत्वाची गाणी थोडी आठवतात
" या या भुलाबाई, आमच्या आई, तुमच्या आई, तुमच्या अंगात लाल चोळी, लाल चोळीवर बसला मोर, बसला मोर. बसल्या मोरावर सांडले अत्तर, भुलोजी डॊक्टर घरी नाही, घरी नाही "

" यादवराया राणी रुसूनी बैसली कैसी, सासूरवाशि सून घरात येना कैसी "

" अडकीत जाउ खिडकीत जाउ, खिडकीत होता बत्ता, भुलोजीला मुलगा झाला, नाव ठेवा दत्ता "

" आला माझ्या माहेरचा वैद्य, डोक्याला टोपी जरीकाठी, अंगातला सदरा मखमली "

त्यानंतर प्रत्येक घरातून खिरापत यायची. ही खिरापतही रहस्य असायची आणि कुठल्या डब्यात काय हे ओळखण्याचा आणि त्यासाठी क्ल्यु म्हणून तो खाद्यपदार्थ असलेला डब्बा वाजवून त्या घरातील सदस्य इतर सगळ्यांना तो पदार्थ ओळखायला लावायचा. त्यासाठी दुपार पासूनच मोर्चे बांधणी सुरू व्हायची. आपल्या घरातल्या स्वयंपाकघरापर्यंत कुणी पोहोचू नये मात्र आपण काही ना काही कारण काढून दुस-यांच्या स्वयंपाकघरातले गुपीत माहिती करून घ्यायची धडपड चालायची. खूप मजा यायची आणि त्यातच रात्री ती खिरापत आणि आटवलेले दूध पिउन कोजागिरीची सांगता व्हायची.

त्या वेळी दूध एव्हढ्या मुबलक प्रमाणात उपलब्ध नसायचे. सकाळी उठून दूध केंद्रावर रांगा लावाव्या लागयच्या. कोजागिरीच्या आधी दोन तीन दिवस शासकीय दूध योजनेतून कोजागिरी निमित्त ज्यादा दूध उपलब्ध होणार असल्याची बातमी चक्क वर्तमानपत्रांमध्ये यायची आणि आपल्याला जर त्यादिवशी ज्यादा दूध लागणार असेल तर त्या केंद्र प्रमुखाला तशी दोन दिवस आधी सूचना आणि आदल्या दिवशी आठवण करून द्यावी लागायची.

पण एव्हढ करून जी मजा यायची ती आज मुबलक दूध उपलब्ध असताना, भरपूर साधनं असताना येत नाही हे खरंय. माणसं हरवलीयत. माणसा माणसातल्या नातेसंबंधांची, त्यातल्या अकृत्रिम बंधांची मजा हरवलीय अस प्रामाणिकपणे वाटतय.

Wednesday, August 7, 2013

चारधाम यात्रा. नक्की काय ?

मला आठवतय आमच्या बालपणी चारधाम यात्रा म्हणजे बद्रीनाथ-जगन्नाथ पुरी-रामेश्वर-व्दारका अशी कल्पना होती. आद्य शंकराचार्यांनी भारतीय एकात्मतेसाठी देशाच्या चारही कोप-यांमध्ये चार धामांची प्रतिष्ठापना केलेली होती. ही यात्रा करायला गेल्यावर आपोआप आपले भारत भ्रमण होउन भारताची खरी ओळख आपल्याला होत असावी.

प्रभू रामचंद्रांच चरित्र आपण लक्षात घेतल तर त्यांनी भारताची बांधणी उत्तर-दक्षिण केलेली आपल्याला दिसते. अयोध्या ते रामेश्वर असा हा दक्षिणोतर विभाग रामांच्या प्रभावाखाली आजही आहे. तर भगवान गोपालकृष्णांनी भारत पूर्व पश्चिम बांधला. व्दारका ते प्रागज्योतिषपूर (गुवाहाटी) असा त्यांचा प्रभाव आहे.

१९९० च्या दशकात पर्यटन उद्योगाचा जो विकास झाला आणि त्यातूनच अचानक चार धाम म्हणजे बद्रीनाथ-केदारनाथ-गंगोत्री आणि जमनोत्री अशी एक सुपीक कल्पना बाहेर पडली. चार धाम यात्रा करण्यामागचा खरा हेतू मागे पडला.

आत्ता उत्तराखंडात जो विनाश झाला त्यानंतर "चार धाम यात्रा आता कमीत कमी ३ वर्षे तरी होणार नाही" असले मथळे प्रकाशित व्हायला लागल्यानंतर सहजच मन मागे गेले आणि मूळ कल्पना काय हे तपासून पहायला लागलो.

भारतीय रेल्वे ओखा (व्दारका)- रामेश्वर अशी एक व्दिसाप्ताहिक गाडी चालवतेय आणि ओखा - पुरी ही आठवड्यातून ५ दिवस जाणारी गाडी. पण इतर ठिकाणांसाठी गाड्या नाहीत. रामेश्वर-वाराणसी ही एक साप्ताहिक गाडी आहे पण ती रामेश्वर-ऋषीकेश अशी असायला हवी होती. खरंतर ऋषीकेश-पुरी, ऋषीकेश-ओखा आणि पुरी- रामेश्वर गाड्या चार धाम एक्सप्रेस म्हणून सुरू व्हायला हव्यात.

Thursday, January 31, 2013

पुन्हा नागपूर-२


यापूर्वीचा प्रवास येथे  वाचा.


नागपूरला ३ दिवस कसे भुर्र्कन उडून गेले कळलच नाही. अखेरच्या दिवशी संध्याकाळीच प.पू. महाराजांकडे आणि भालेकरांकडे सर्वांचा निरोप घेतला. परतताना औरंगाबादला श्री. रवीदादा व सौ. अनुवहिनी पिंगळीकरांकडे मुक्काम करायचा ठरला होता त्यामुळे नागपूर ते सांगोला हा थेट प्रवास नव्हता. आम्ही नागपूरात एक मुक्काम जोशींकडे करावा अशी श्री. प्रमोदराव व सौ. मनिषाताईची इच्छा होती. धामणगावला माझ्या आयुष्यातली पहिली नौकरी करताना मी प्रमोदरावांकडेच रहायला होतो. त्यांच्या अकृत्रिम आणि परम स्नेहपूर्ण वागण्याने जावई-शालक  संबंध मैत्रीत बदलले होते. त्यांचा आग्रह मोडवेना. आणि मनिषाताई व प्रमोदरावांच्या आग्रहाखातर त्यांच्याकडे एक मुक्काम करायचे ठरले. 


दि. ५/१/२०१३.

सकाळी उठायला ५ वाजलेत. काल रात्री गप्पा मारत झोपायला तब्बल साडेबारा झालेले होते. तस लवकर निघायच टेन्शन नव्हत पण पहाटे लवकर निघाल तर झपझप अंतर कापल्या जात हा माझा अनुभव असल्याने मी पहाटे निघायला उत्सुक होतो. आम्ही आवरेपर्यंत प्रमोदराव अगदी सकाळी सकाळी आमच्यासाठी बालाजीनगरची दुकाने धुंडाळून ब्रेड घेउन आले. आईच्या मायेने मनिषाताईने जबरदस्तीनेच सॆंडविचेस करून बांधून दिलीत. आवराआवर करून निघायला सात वाजलेत.

नागपूरला आणखी एका ठिकाणी थांबायचा निर्णय आम्ही कालच घेतला होता. माझ्या गुरूमाउली परम पूजनीय मायबाई महाराजांच्या नित्य पूजनीय पादुका बालाजी नगरलाच श्री. श्रीपाददादा तेलंगांकडे असल्याचे कालच कळले होते. नागपूर सोडताना महाराजांच्या घरून तर निघालो नाही पण नागपूरबाहेर पडताना मायबाईंचा निरोप घेउन निघू म्हणून आम्ही सरळ जवळच  राहणा-या श्रीपाददादांकडे गेलोत.


आधी वंदू सदगुरू मायबापा

श्रीपाददादांकडून निघायला सकाळचे ०७.२३ झालेत. परतताना नागपूर-अमरावती-अकोला-खामगाव-चिखली-जालना-औरंगाबाद हा पारंपारिक मार्ग घेण्याचे ठरले होते. दिवाळी २०११ मध्ये परतताना जालना ते खामगाव या मार्गाने वैताग आणला होता. पण नुकतेच या मार्गाचे नूतनीकरण झाल्याची वार्ता श्री. नानासाहेब खातखेडकरांनी दिली. मग त्या मार्गानेच जाण्याचा निर्णय घेतला.


अमरावती रोड नेहेमीप्रमाणे छान होता. नागपूर-अकोला जलद बस. आम्ही लगेच ओव्हरटेक केला.



नागपूर ते अमरावती सुंदर रोड



आता मला सांगा, अशा रस्त्यांवरून प्रवास करायला कुणाला आवडणार नाही ? (१५० किमी साठी एक १०० रूपयांच्या आसपास टोल भरून.)



एस.टी. बस ने खाजगी बसला केलेला ओव्हरटेक ही सर्व एस. टी. प्रेमींसाठी अभिमानाचीच बाब असेल नाही कां ? शिव ट्रॆवल्स कंपनीच्या बसला आपल्या लाल बसने केलेला ओ्व्हरटेक.


नागपूरची एस. टी. मध्यवर्ती कार्यशाळा मधल्या काळात लेलॆण्ड गाड्यांच्या बांधणीत गर्क होती. त्या ५०० गाड्यांपैकी ब-याच गाड्या विदर्भाच्या विविध डेपोंमध्ये अजूनही सुखाने नांदत आहेत. वास्तवीक विदर्भ म्हणजे टाटा गाड्यांचे माहेरघर पण वैदर्भीय उदारतेमुळे लेलॆण्ड गाड्यांनाही त्यांनी उदार आश्रय दिला. त्यातलीच ही एक गाडी. दर्यापूर डेपो. अमरावती विभाग. नागपूर जलद दर्यापूर.




फ़ार जुना रूट. अकोट-रामटेक. रामटेक डेपोची बस.

तळेगाव (शामजीपंत) पर्यंत झकास प्रवास झाला. तळेगावला नवीनच सुरू झालेल्या श्रीसूर्या ग्रूपच्या रेस्तरॊच्या बाहेर आम्ही थांबलो. निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी. नागपूर ते तळेगाव १०२ किमी अंतर (शहरातली वाहतूक, टोल नाके वगैरे धरून) आम्ही अवघ्या १०० मिनीटांत पार केले होते. सौ. मनीषाताईने न्याहारी बांधून दिलेली असल्याने खाण्यापिण्याचा प्रश्न नव्हता. लगेच निघालोत. (तळेगाव : ०९.०३ -- ०९.०७)



नागपूरवरून निघालेली सकाळची पहिली बस. नागपूर-मेहेकर.

तळेगाव सोडल्यावर मात्र आपण टोल का भरलाय ? अस राहून राहून वाटायला लागल. चौपदरी रस्त्याचे दोन पदर दुरूस्तीचे निमीत्त दाखवून बंद करण्याची रस्ता बांधणी कंपनीची चलाखी कळायला लागली. अमरावती पर्यंत हाच त्रास. कधी उजवीकडला तर कधी डावीकडला रस्ता धरून आम्ही अमरावती गाठले. अमरावती शहराचा बायपास खूप मोठ्ठा आणि खूप कंटाळवाणा आहे म्हणून शहारातूनच जाण्याचा निर्णय घेतला.



एम.एच. ४० / वाय सिरीजची दिसलेली सकाळची पहिली बस. अकोला-वरूड. अमरावती शहरात.




खरंतर ही औरंगाबाद-अमरावती बस. पण अमरावती शहरात दाखल होण्यापूर्वीच ड्रायव्हरने मार्ग फ़लकाची बाजू बदललेली होती. ही बस लगेच निघणार यात शंका नव्हती.



 अमरावती महापालिकेची स्वतःची वाहतूक व्यवस्था आहे. काही निवडक मार्गांवर त्यांना चांगला प्रतिसाद आहे. एकंदर नागपूर महापालिकेच्या गलथान आणी घाणेरड्या वाहतूक व्यवस्थेपेक्षा खूप बरी.


दारव्हा अमरावती. साधारण सेवेची बस. एकेकाळी लाल पिवळ्या रंगात असणा-या ब-याच बसेस प्रत्येक डेपोने परिवर्तन बसेसच्या पूर्ण लाल रंगात रंगवल्या आहेत. त्यातलीच ही एक.


 अंबड-अमरावती. हा रूट मात्र मी पहिल्यांदाच पाहिला. अमरावती शहरात सकाळी १०च्या सुमारास दाखल होणारी ही बस अंबडवरून भल्या पहाटे निघाली असणार.


बडनेरा रेल्वे स्टेशन ते अमरावती मार्गावर धावणारी अमरावती महापालिका सेवेतली ही बस. ह्या मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे.


यवतमाळ-अमरावती. १०० किमीच्या ह्या मार्गावर भरपूर बसेस धावतात.



अकोला-तुमसर. खूप जुना रूट. अकोल्यावरून नागपूरकडे येणारी सकाळची पहिली बस.



ओ हो ! बुलढाणा डेपोची नवीन बस. वाय ५०४७. बुलढाणा डेपोच्या बसेसचे दर्शनीय भाग असे पोपटी रंगाने रंगविले असतात. नवीन अमरावती रेल्वे स्टेशनजवळ.


नागपूरला तीन दिवसात खूप धावपळ झाली होती. मित्र, नातेवाईक या सगळ्यांना भेटण्याचा आनंद तर होताच शिवाय माझ्या जुन्या महाविद्यालयातील कामांसाठीही बराच वेळ द्यावा लागला होता. रोज रात्री गप्पांनी रंगवताना झोपायला साडेबारा एक तर ठरलेलाच. त्यातही प्रसाद भालेकर सारखा गप्पिष्ट असेल तर मग दीड काय आणि  दोन काय .

सौ. वैभवीला या धावपळीची जाणीव झाली. निघण्याआधी सौ. वैभवी मला म्हणालीदेखील की राम, तुला खूप श्रम झालेले आहेत. त्यात उद्या आता ड्रायव्हिंग. मी तिला मोठ्या आत्मविश्वासाने सांगितल की ड्रायव्हिंगमध्ये सगळा श्रमपरिहार होउन जाइल. आणि खरच तस झाल. नागपूर ते अमरावती तीन तासात थकल्याची वगैरे भावना अजिबात नव्हती. मजेत गप्पा मारत न्याहारी करत प्रवास चालला होता.

बडनेरा मागे पडल्यानंतर रस्त्याच्या कडेला संत्री विकणारी मंडळी बघून गाडी थांबवली. सांगोल्यात आणि औरंगाबादेत द्यायला भरपूर संत्री घेतलीत. तिथे संत्र्यांचा रस प्यायलोत आणि अर्धा ड्झन संत्री आम्हीच फ़स्त केलीत. (बडनेरा : १०.३४ -- १०.४४)

पुन्हा नवीन उत्साहाने निघालो. संत्री गोड होतीच. चि. मृण्मयी संत्री खाण्यात दंग झाली. अर्थात आम्हीही त्यात सामील होतोच.




वाहवा ! वाहवा ! वाशिम-नागपूर जलद बस आणि नवी कोरी. डोळ्यांचे पारणे फ़िटले.




यवतमाळ-अमरावती निम आराम सेवा. ऎण्टोनी, मुंबई येथे बनवल्या गेलेली बस. स्वतःच्या कार्यशाळा उत्तम बस बांधू शकत असताना एस. टी. काही बसेस ए.सी.जी.एल, गोवा आणि काही बसेस ऎण्टोनी, मुंबई यांच्याकडून बांधून घेण्यामागे काय  "अर्थ" दडलाय ? हे एस. टी.चे उच्च अधिकारीच जाणे.

अकोल्याला आलो तेव्हा दुपारचे सव्वा बारा वाजले होते. पाच तासांपेक्षाही कमी वेळात २५० किमी अंतर आम्ही कापलेले होते.

खेर्डा फ़ाट्यानंतर अकोल्यापर्यंत रस्ता दुपदरीच आहे आणि वाहनांची संख्या मात्र भरमसाठ. ओव्हरटेकींग करताना खूप कौशल्य दाखवाव लागत. मनःशांती ठेवावी लागते. त्यामुळे अकोला बासपास घेण्याचा आम्ही निर्णय घेतला. लांबचा असला तरी शहरातली वाहतूक त्यामुळे टाळली जाणार होती.

अकोला ते खामगाव रस्ता हा तर अपघातांचा बादशहाच. त्यामुळे अगदी सावधपणे गाडी चालवत खामगाव गाठले. मध्येच बाळापूरनंतर शेगाव फ़ाटा लागला तेव्हा आपोआप शेगावकडे पाहून गजानन माउलीला वंदन केले आणि लगेच मार्गस्थ झालोत.





जळगाव जामोद-अकोला. जळगाव डेपोने फ़ार जुनी बस पाठवलीय हा विचार माझ्या मनात डोकावून गेला एव्हढच.



आधीच अरूंद रस्ता. त्यात अवजड यंत्रसामुग्री वाहून नेणार वाहन. पुढून येणारे वाहन. आणि भरीस भर म्हणून रस्त्यातच जाणा-या मेंढ्या. ड्रायव्हिंग कौशल्याची कसोटी.


बुलढाणा-अमरावती. पुन्हा जुनी बस.

खामगावला आलो तेव्हा दुपारचा पाउण वाजला होता. थोडेसे धास्तावतच आम्ही खामगाव-चिखली-जालना रस्त्याकडे वळलोत. पहिला १०-१५ किमी चा रस्ता पश्चात्तापाचा होता. कुठून या रस्त्यावर आलो ? असे वाटेवाटे पर्यंत चांगला रस्ता लागला. अगदी जालना-मेहेकर-कारंजा इतका चांगला नसला तरी ब-यापैकी होता. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे टोल कुठेच नव्हता. खरे-तारकुंडे आणि कंपनीकडे या रस्त्याचे बांधकाम आहे. गेली काही वर्षे हा इतका का रखडावा ?  हे नकळे. अमडापूरला आलो तेव्हा दुपारचे १३.५२ झालेले होते. थोडा वेळ उगाचच थांबलोत व ५ मिनीटांनी १३.५७ ला निघालोत. ३४२ किमी कापले होते आणि ताण कुठेच नव्हता.





औरंगाबाद-यवतमाळ बस. ह्या बसच्या निमित्ताने  इ.स. २००१ च्या मार्च मध्ये सौ. वैभवीच्या कायद्याच्या अंतिम परीक्षेसाठी केलेला मुंबई नागपूर प्रवास आठवला आणि अंगावर काटाच आला.

अगदी ऐनवेळी आम्ही निघालो होतो. मुंबई-यवतमाळ चिंतामणी ट्रॆवल्सची बस बंद पडल्याने येवल्यालाच रात्री उतरून रस्त्यातल्या मुंबई-औरंगाबाद या रॊयलच्या बसने सकाळी औरंगाबाद. तिथे अजिबात न थांबता एस. टी. च्या औरंगाबाद-यवतमाळ बसने अकोला. तिथून दुपारी आणखी एका खाजगी बसने नागपूर आणि रात्रभर नागपूरात मुक्काम करून धुळवडीच्या दिवशी सकाळी मोठ्या जिकीरीने एक खाजगी बस मिळवून गाठलेले चंद्रपूर. हे सगळ सगळ आम्हा दोघांनाही आठवल. आत्ता हसू आल. पण त्यादिवशी तंतरलेली होती.


नागपूरवरून निघतानाच आम्ही दोघांनीही जेवण चैत्रबन ढाब्यावर करायच ठरवल होत. त्याविषयी मी खूप ऐकल होत. गेल्या २०,२२ वर्षांपासून औरंगाबाद-नागपूर, पुणे-नागपूर हा प्रवास होतो आहे. पण सर्व खाजगी बसेस आणि एस. टी.,  चैत्रबनच्या अगदी शेजारीच असलेल्या मधुबन ढाब्यावर थांबायच्यात. चैत्रबनला कधीच नाही. २०११ च्या दिवाळीनंतर औरंगाबाद नागपूर हा प्रवास स्वतःच्या गाडीने करायचे ठरवल्यावर चैत्रबनचा थांबा घ्यायच आम्ही ठरवलंही होत पण जालना-राजुर-देउळगाव मार्गाने आल्यामुळे ते थोडक्यात हुकल. आज मात्र अगदी पक्कच होत.

चिखली नंतर रस्ता अधिकच छान झाला आणि नागपूरपासून ४१७ किमी अंतर कापून आम्ही देउळगाव राजा गावाबाहेरच्या चैत्रबनला थांबलो तेव्हा दुपारचे १५.३१ झाले होते. जवळपास ८ तासांहून अधिकचा प्रवास. कुठेही मोठा थांबा न घेता.

चैत्रबनविषयी एक विशेष लेखच लिहावा लागेल. तसा एक लेख लोकसत्तेत आलेला आहे आणि श्री. विवेकजी घळसासींनीही एक लेख लिहीलेला आहे. हे दोन्ही लेख लॆमिनेट करून काउंटर जवळ लावलेले आहेत. अत्यंत कल्पकतेने इथली अंतर्गत सजावट केलेली आहे आणि एक विशिष्ट दृष्टीकोन ठेउन हा धाबा चालवला जातोय, गेली कित्येक वर्षे. इथे मद्यपान व धूम्रपानाला बंदी आहे. अतिशय सात्विक वातावरण. (म्हणूनच इथे अनेक खाजगी बसेस आणि एस.टी. थांबत नसाव्यात.) नम्र सेवक वर्ग आणि तत्पर सेवा. इथे आल्यावरच माणूस तृप्त होउन जातो. आणि अन्नाची चव तर अतिशय सात्विक. यापुढे प्रत्येक वेळी नागपूरला गाडीने जाताना आणि येताना इथेच थांबण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी एकमताने घेतला.



बसण्यासाठी केलेली कल्पक व्यवस्था.


या भिंतीवर लावलेल्या वचनांमधून ढाबा मालकांचा दृष्टीकोन आणि रसिकता प्रगट होते.











असल्या एखाद्या झोपडीवजा जागेत बसून अस्सल गावठी मेन्यू (भाकरी पिठले, किंवा भाकरी भरीत) हाणायला काय मजा येइल नाही ?









हा दृष्टीकोन त्या धाबामालकांचा खरोखरच आहे.

























जेवण झाल्यानंतर बाहेर बागेत असलेल्या झोपाळ्यावर आम्ही सगळेच रंगून गेलो. इथून निघूच नये अस वाटाव इतक सुंदर वातावरण. व्यावसायिकता जपताना कुठेही कौटुंबिक टच हरवू नये ही काळजी घेतल्याचे जाणवत होते.

निघावस वाटत नव्हत पण निघण तर भाग होत. बरोबर १ तासांचा विश्राम करून आम्ही १६.३१ ला चैत्रबनमधून निघालो तो पुन्हा इथे येण्याची खूणगाठ बांधूनच.

पुन्हा जालना मार्गे निघालोत. यावेळी मात्र जालना बायपास घेतला. संध्याकाळ जशी जवळ येत होती तसे जालना-औरंगाबाद रस्त्याच्या कडेला असणा-या रसवंत्या खुणावत होत्या. मग एका ठिकाणी उसाचा रस प्यायला थांबलोत. (बदनापूर : १७.२५ --- १७.३६)

एव्हाना औरंगाबादवरून श्री रवीदादा व सौ. अनुवहिनींचे फोन्स यायला सुरूवात झाली होती. श्री रवीदादांकडे पोहोचलो तेव्हा ५०२ किमी झाले होते आणि घड्याळ १८.२८ झाले होते.



नागपूर ते औरंगाबाद प्रवासाच आधल्या दिवशी केलेलं नियोजन. बदल ऐनवेळी झालेत.


औरंगाबादला दादा आणि वहिनींसोबत गप्पा नेहेमीप्रमाणे गप्पा रंगल्यात. दादांचे "लवकर झोपा रे. उद्या पुन्हा प्रवास आहे. आजच्या प्रवासाने थकला असाल." हे मध्येमध्ये सुरू होतच. काही काही नाती ही अशीच अकृत्रिम जिव्हाळ्याची असतात त्यातलच माझ हे एक नातं. शेवटी लवकरच म्हणजे रात्री १० वाजता झोपलोत.

०६/०१/२०१३.

 आज लवकर उठलोत खरे पण आवरून निघायला ८.३० झालेच. वहिनींचा  जेवणाचा, हुरडा पार्टीचा आग्रह मोडून आम्ही निघालो. निघण्यापूर्वी त्यांच्या हातचे नवीन प्रकारचे मस्त मेथीचे पराठे खाल्लेत. गप्पा मारता मारता निघायला चक्क ०९.३२ झालेत की.

आज काय, उरलेलं ३५० किमी अंतरच पार करायचं होतं आणि संध्याकाळपूर्वी सांगोल्यात पोहोचायच होत त्यामुळे निवांत होतो. औरंगाबाद-नगर रस्त्याला लागलो. रविवारमुळे की काय रस्त्यावर गर्दी तशी कमी होती.







औरंगाबाद शहर बस सेवेची विशेष बांधलेली एस. टी. ही शहर बस सेवा महापालिकेकडे होती. अकोला इथल्या कुठल्या तरी ऒपरेटरला ती चालवायला दिलेली होती पण ते आव्हान त्याला पेलल नाही. अर्धवट सेवा टाकून आणि बरेच प्रश्न (कामगारांचा वगैरे) तो चालता झाला मग एस. टी. ने ही सेवा चालवायला घेतली. नागपूर शहरही त्याच मार्गाने जाणार अस दिसतय.


बाबा पेट्रोल पंपाच्या चौकात दिसलेली हंस ट्रॆव्हल्सची ए.सी. स्लीपर कोच. बहुतेक औरंगाबाद-इंदोर असावी.


नेवासा डेपोची औरंगाबाद-शिर्डी बस. 


एम.एच. ४० / वाय ५१३५. नागपूरला बनलेली नवीन बस. पुणे जलद अकोट. १० वाजता औरंगाबादला असलेली बस पुण्यावरून नक्कीच पहाटे ५.०० किंवा ०५.३० ला निघाली असली पाहिजे. ह्या मार्गावर मी पाहिलेली ही पहिलीच बस.


त्यापाठोपाठच पुणे-अमरावती निम आराम. ही सुद्धा पहाटराणीच असली पाहिजे.



                   पुणे-जामनेर-बोदवड. पहाटे पहाटे पुण्यावरून निघणारी,खान्देशाशी संपर्क साधणारी बस.



श्रीरामपूर-गंगापूर बस. गंगापूर डेपोची जुनी पण छान बस. ओल्ड इज गोल्ड म्हणतात ते उगाच नाही.

गोदावरी नदी ओलांडली आणि "गोदावर्याः दक्षिणे तीरे" आलोत. एका मानववंश शास्त्रज्ञाच्या मतानुसार महाराष्ट्रीयन देशस्थ संस्कृती ही गोदावरीच्या उत्तर आणि दक्षिण तीरावर जन्माला आलेली आहे. आर्यांहूनही ती प्राचीन आहे. म्हणूनच महाराष्ट्रात गोदावरी नदीला सर्वत्र फ़ार महत्व आहे अगदी गंगे इतकच. नाशिक मध्ये तर गोदावरीचा उल्लेख "गंगा" म्हणूनच होतो. "गंगेवर गेलो होतो." किंवा "गंगाघाटावर पाणीपुरी खाल्ली." असा उल्लेख सर्वसामान्यही करतात. महाराष्ट्रीय आणि काही तैलंगी पूजा विधानांमध्ये "गोदावर्याः उत्तरे/दक्षिणे तीरे, रेवा: दक्षिणे तीरे" असा उल्लेख संकल्पात असतोच. तो उत्तर भारतात दिसत नाही. म्हणजे विंध्य पर्वताच्या दक्षिणेला (नर्मदा नदीच्या दक्षिणेला) गोदावरी नदीच्या उत्तर आणि दक्षिण तटावर आर्यांपेक्षा एक वेगळी संस्कृती नांदत होती असे समजले पाहिजे. गोदावरीने अनेक हजार वर्षे आपल्याला जगवले आहे या कृतज्ञ भावनेने तिच्यात पाहिले. मौनानेच नमस्कार केला आणि येताना ठरवल्याप्रमाणे श्रीक्षेत्र दत्त देवगड चा फ़ाटा घेतला.

औरंगाबाद-नगर हमरस्त्यापासून ५ किमी आत हे अतीव सुंदर देवस्थान आहे. प्रवरा नदीचा रमणीय काठ या देवस्थानाला लाभला आहे. औरंगाबाद ते देवगड ६२ किमी.

तिथे उतरताना आम्ही कॆमेरा घेउन उतरलो खरे पण तिथली नितांत रमणीयता आणि त्या पवित्र सात्विक वातावरण अनुभवण्यात आम्ही गर्क झालोत. निसर्गाचा फोटो काढता येइल पण त्यातल्या निरवतेचा मात्र स्वानुभवच घ्यायला हवा. खूप छान ठेवलेल देवस्थान आणि खूप उदात्त वातावरणात जवळपास ५५ मिनीटे आम्ही होतोच. इथले वर्णन केवळ अशक्यच. प्रत्येकाने स्वतः येउन अनुभवण्याजोगेच हे ठिकाण आहे. (श्रीक्षेत्र दत्त देवगड : १०.४४ --- ११.३७)




पुणे-औरंगाबाद एस.टी.ची शिवनेरी वोल्व्हो.

पुन्हा औरंगाबाद-नगर हमरस्त्यावरून वाटचाल सुरू झाली. येताना वेळ कमी असल्याने फ़ूडमॊल २४ x  ७ मध्ये चि. मृण्मयीला कॆलिडोस्कोप व इतर काही खरेदी करता आली नव्हती ती यावेळी झाली. वडाळ्याच्या फ़ुड मॊल मध्ये पुन्हा १५ मिनीटे थांबलोत. (अंतर ८२ किमी. १२.०० --- १२.१५). चि. मृण्मयीची खरेदी होइपर्यंत तिथे थांबलेल्या काही सुंद-यांनी माझ्यासाठी मॊडेलिंग केले.



दापोडी कार्यशाळेने बांधलेली नवीन गाडी. परतूर-पुणे.


सकाळी सकाळी एरंडोलवरून निघालेली एरंडोल-पुणे.


पुणे औरंगाबाद निम आराम



परतूर-पुणे, पुणे-औरंगाबाद परिवर्तन आणि एरंडोल-पुणे. रॆम्पवॊक साठी.


आता म्हणावी तशी भूक जरी लागली नव्हती तरी नगर नंतर सांगोल्या पर्यंत २२५ किमी काही खास ढाबा नाही हे माहिती होत. म्हणून नगरच्या आधीच जेवण करून घेउ अशी टूम निघाली.नगरआधी एका छान ढाब्यावर थांबलो. खेडेगावचा फ़ील देणार वातावरण इथेही होत. इथेही आम्ही जेवण आणि मुख्यत्वे वातावरण एन्जॊय केल. औरंगाबाद सोडल्यापासून बरोबर १०० किमी झाले होते. निघण्याची इतकीशी घाई नव्हती. निवांत जेवण झाले. (१२.३३ --- १३.३५)





ढाब्यावर बागडत असलेले ससे. चि. मृण्मयीला हे जनावर सहसा पहायला मिळत नाही त्यामुळे ती हरखून गेली.



बसण्यासाठी असलेली ही राजेशाही व्यवस्था.






सुंदर व शांत परिसर.







जेवण झाले मात्र मग एका अनामिक ओढीने निघालो. संध्याकाळ होण्याआधी सांगोला गाठायच होत.


नगरला मिलीटरी भागातून जाताना दर्शनी भागात ठेवलेला एक रणगाडा.


पंढरपूर-नाशिक बस. करमाळ्याजवळ.

करमाळा-टेंभूर्णी रस्त्याने मात्र परतताना अंत पाहिला. साखर कारखान्यात जाणा-या, ऊस वाहून नेणा-या, शंभरएक बैलगाड्या रस्त्याची एक बाजू अडवून संथपणे चालल्या होत्या. समोरून आणि आमच्याही बाजूने वाहनांची रांग लागली होती. थांबलो असतो तर नक्कीच तास दीडतास मोडला असता. मग शेजारच्याच कच्च्या रस्त्यावरून खडकांमधून गाडी घातली. निघालो खरे पण सांगोल्याला पोहोचेपर्यंत गाडी पंक्चर तर होणार नाही ना याची मनात सतत धास्ती बाळगावी लागली.

टेंभूर्णी, पंढरपूर रस्ताने सांगोल्याजवळ येतोय न येतोय तोच सतीशचा फ़ोन आला. आपण एखाद्या गावी जातोय तिथे कुणीतरी आपण येण्याची वाट बघतय याची जाणीव किती सुखद असते नाही ? त्या आनंदातच आपण गेले पावणेचार तास सतत ड्रायव्हिंग करतोय आणि गेले २४६ किमी थांबलोच नाही याची जाणीव होत नाही.

परतताना ५० किमी जास्त लागलेत. एकूण छान प्रवास. गाडी घेऊन आपण जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ शकतो हा आत्मविश्वास देणारा.