१९९० च्या दशकात गाड्यांचे रेक्स शेअरींग होत असे. माधवराव शिंदे रेल्वेमंत्री असताना त्यांनी गाड्यांच्या महत्तम वापरासाठी हा निर्णय घेतला होता.
१९८९ मध्ये कराडला गेल्यानंतर कोल्हापूर आणि दादर येथे गाड्यांचे असे शेअरींग होत असेल अशी मला पुसटशी कल्पना यायला सुरूवात झाली होती. तत्पूर्वी नागपूरला येणारी कोल्हापूर-नागपूर महाराष्ट्र एक्सप्रेस ही रात्री नागपूर-दादर सेवाग्राम एक्सप्रेस म्हणून जाते आणि पहाटे येणारी दादर-नागपूर सकाळी नागपूर-कोल्हापूर म्हणून जाते याची कल्पना होती.
संध्याकाळी आलेली गाडी यार्डात गेली की त्यावर "नागपूर-कोल्हापूर-नागपूर" या बोर्डावरचे "कोल्हापूर" पुसून त्यावरच स्टेन्सीलने "दादर" लिहीले जायचे. हा सगळा प्रकार प्रत्येक डब्यांवर तैल रंगात व्हायचा. तैल रंगांचे ओघळ डब्यांवर अव्यवस्थित दिसत. हे रेक्सपण तसे अव्यवस्थित आणि गचाळ असत. जुने डबे. कुशन्स नसलेली शयनयान आसने. (शयनयान आसनांना कुशन्स लावायला सुरूवात १९७९ पासून झाली. मधु दंडवते रेल्वेमंत्री असताना त्यांनी हा क्रांतीकारी निर्णय घेतला होता. त्याआधी बाकडीच असायचीत.) मला आठवतय एकदा १९६९ चा डबा दक्षिण मध्य रेल्वेने या गाडीला जोडला होता. अवातानुकूलीत द्विस्तरीय शयनयान डबा पण गाडीला असायचा. (तो एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्याविषयी आणि त्यातील माझ्या प्रवासाविषयी नंतर कधीतरी लिहीन.)
हा रेक संपूर्ण दक्षिण मध्य रेल्वेचा असे. त्यावेळी पुणे ते कोल्हापूर हा विभाग द.म. रेल्वेच्या अखत्यारीत होता आणि त्यातील अमराठी अधिकारी या गाडीला सावत्र वागणूक द्यायचेत. दादर ते नागपूर एकही किलोमीटर द.म. रेल्वेत न धावता ही गाडी द.म. रेल्वेची होती. त्यामुळे ह्या गाडीकडे लक्षच नव्हते. १९९१ मध्ये इराक युद्ध सुरू झाल्यानंतर इंधन वाचवण्यासाठी भारतीय रेल्वेने काही गाड्या तात्पुरत्या बंद ठेवल्या होत्या. त्यात दादर-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेसचा समावेश होता.
मग ह्या गाड्यांचे नक्की भ्रमण कसे शोधून काढायचे हा मला पडलेला प्रश्न होता. १९९१ पर्यंत कराडमध्ये ब-यापैकी स्थिरावलेला होतो. मित्रांना माझे हे गाड्या बघण्याचे उद्योग माहिती झालेले होते आणि त्यातले काही समानधर्मी मित्रही माझ्या या छंदात सामील झालेले होते. कराडला पी.एल. सोडली तर अभ्यास वगैरे करण्याच्या भानगडीत कुणीही पडत नसे. त्यामुळे जुलैमधल्या एका शुभदिवशी मी हा रिसर्च करण्याचे ठरवले.
त्यासाठी निरीक्षणे म्हणजे गाड्यांचे रेक्स बघून त्यातल्या कोचेसचे नंबर लिहून ठेवायचे. त्यात महाराष्ट्र, सह्याद्री आणि महालक्ष्मी एक्सप्रेस चे निरीक्षण आले. महाराष्ट्रचा प्रश्न नव्हता कारण कोल्हापूरकडे जाताना ही गाडी सकाळी ११.०० वाजता आणि परत नागपूरकडे जाताना सायंकाळी ४.३० वाजता जायची. पण कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी पहाटे ५.०० वाजता, सह्याद्री भल्या पहाटे ३.०० वाजता तर मुंबईकडे जाणा-या गाड्या अनुक्रमे रात्री ११.०० व १.०० वाजता जायच्या. आणि निरीक्षणांसाठी किमान तीन दिवस आणि तीन रात्री तरी ह्या गाड्यांचे रेक्स बघायला हवे होते.
एका दिवशी दुपारी कराड स्टेशनवर गेलो. महाराष्ट्र एक्सप्रेसचे डबे बघितले. लिहून ठेवले. कराड स्टेशन तेव्हा फ़ार आडबाजुला वाटायचे. महाविद्यालयापासून सहा किमी अंतरावर आणि मध्ये फ़क्त उसाची शेती. मनुष्यवस्ती तुरळक. ओगलेवाडी गावाजवळ हे स्टेशन होते. (तेच काच कारखान्यासाठी प्रसिद्ध असणारे ओगलेवाडी. एकेकाळी स्टेशनचे नाव पण ओगलेवाडीच होते.) दुपारी तर मित्रांची सायकल घेवून मस्त फ़ेरफ़टका मारत गेलो होतो. रात्री मात्र हे शक्य नव्हते.
त्यातल्या त्यात सोय म्हणजे कराड वरून स्टेशनला जाणारी रात्री शेवटची शहर बस, महालक्ष्मी एक्सप्रेसच्या अगदी आधी, आमच्या महाविद्यालयावरून जायची. मग त्या बसने प्रवास करीत स्टेशन गाठले. महालक्ष्मी एक्सप्रेसचा रेक नोंदवून ठेवला. महालक्ष्मी एक्सप्रेस रात्री मुंबईकडे रवाना झाल्यानंतर शहरबस पण कराडला रवाना झाली. कराड स्टेशन तसे दिवसभरही सामसूम असायचे. (पु. लं. चा "काही अप्स काही डाउन्स" वाचल्यानंतर तो लेख पुणे-मिरज मार्गामधल्या स्टेशनांना चपखल लागू पडतो याची मला जाणिव झाली.) आता तर मी एकटाच आणि सोबत रेल्वेची काही मोजकी रात्रपाळीची मंडळी होती. सिग्नल्स आता अधिकच गूढ भासायला लागले होते.
तेव्हा कराडचे स्टेशन मास्तर आगस्टीन जोसेफ़ (भला माणूस) सहज फ़ेरेफ़टका मारता मारता माझ्याकडे आले आणि मला विचारले की एव्हढ्या रात्री फ़लाटावर मी का थांबलोय ? मी माझा छंद आणि आजचे थांबण्याचे कारण खरे सांगितले. ते अवाक झाले आणि माझ्या छंदात मदत करण्याचे त्यांनी कबूल केले. मग रात्री मुंबईकडे जाणारी सह्याद्री एक्सप्रेस येइपर्यंत त्यांनी मला "टोकन एक्स्चेंज" ही रेल्वेची अतिशय सुरक्षित सिग्नलींग सिस्टीम समजावून दिली. मध्ये एक मालगाडी गेली तेव्हा प्रात्यक्षिकासहित.
रात्री सह्याद्री एक्सप्रेस मुंबई कडे गेली त्याचेही डबे नोंदवून ठेवले आणि आता मात्र झोप अनावर झाली होती. (तसेही आम्ही लवकर झोपून लवकर उठणा-यांच्या पंथातले. पु.लं.च्या उपदेशानुसार रात्रभर जागून पहाट बघण्याचा अनुभव नाहीच. रेडीमेडच पहाट कायम बघितलेली.) आगस्टीन जोसेफ़ साहेबांना कळले. त्यांनी माझ्यासाठी फ़लाटावरची प्रथम वर्ग प्रवाशांसाठीची खोली उघडून द्यायला लावली. रेल्वेचे इतर कर्मचारी मला मिळणारी व्ही आय पी ट्रीटमेण्ट पाहून जरा चक्रावूनच गेले होते. हातात वही, पेन, गबाळा वेष, झोपाळलेला हा किडकिडीत तरूण कोण एव्हढा टिकोंजीराव लागून गेलाय ? हे त्यांना कळेचना. पण साहेबाची आज्ञा म्हणून त्यांनी त्याचे पालन केले.
पहाटे तीन वाजता कोल्हापूरकडे येणारी सह्याद्री येण्याची घंटा झाल्यावर एक कर्मचारी मला उठवायला आला. पावसाला सुरूवात झाली होती. मस्त पहाट, माझी आवडती गाडी. फ़क्त चहाचा वाफ़ाळता कप नव्हता. (पुढे खूप वर्षांनी "दिल से" त ला शाहरूख खान अश्याच एका पावसाळी रात्री स्टेशनवर वाट पहाताना दिसल्यावर मला त्या रात्री आठवल्यात.)
मग पुन्हा जोसेफ़ साहेबांसोबत गप्पा. ते कुठले तरी केरळ वरून आलेले होते. (त्यावेळी कराडला कार्यरत असलेले सगळेच स्टेशन मास्तर केरळी होते.) त्यांची, त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस वगैरे झाली तोवर पहाटे ५ वाजता कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस हजर. तिचाही रेक बघून लिहून घेतला आणि गावातून येणा-या पहिल्या यष्टी ने महाविद्यालयात रवाना झालो. दुपारी मेस मध्ये दोन घास ढकलून महाराष्ट्र एक्सप्रेस बघायला स्टेशनवर. जुलै महिन्यात लेक्चर वगैरे करणे बहुतांशी जनतेला नामंजूर होते. त्यामुळे दिवसभर स्टेशनवर थांबून जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस बघून पुन्हा वसतीगृहात. रात्री पुन्हा जेवण आटोपून शेवटच्या बसने स्टेशनवर.
३ दिवस आणि ३ रात्री हे व्रत केल्यानंतर जी माहिती जमा झाली त्याचे विश्लेषण केल्यानंतर या गाड्यांचे रेक्स कसे शेअर होतात त्याचा उलगडा झाला. तो मी डायरीत नोंदवून ठेवला.
आता ही माहिती मला रेल्वेतला कुणीही मोठा अधिकारी देवू शकला असता पण मग स्वतः केलेल्या संशोधनाचे आणि त्यातल्या आनंदाचे मोल राहिले नसते. तसही जीवनाच्या प्रवासात "ध्येयापेक्षा प्रवासच जास्त मजेत जगायचा असतो" हे मला पटलेलेच होते.