Thursday, March 13, 2014

तीर्थरूप दादा,


तीर्थरूप दादा,

आज १३ मार्च. तुमचा वाढदिवस. आज तुम्ही असता तर तुमचा हा ७१ वा वाढदिवस आपण सगळ्यांनी थाटामाटात साजरा केला असता. तुमची मित्रमंडळी, आपले सगळे नातेवाईक अशा या सगळ्या तुमच्या प्रेमातल्या लोकांना बोलावून एकच दणका उडवून दिला असता. २० वर्षांपूर्वी तुमचा ५१ वा वाढदिवस सुद्धा आपण अभावाच्या परिस्थितीतही छान साजरा केला होता ते आज अचानक आठवले.

पण दादा, तुम्ही अचानकच १७ वर्षांपूर्वी निघून गेलात. आज आपल्याकडले समृद्धीचे दिवस (जे केवळ तुम्ही आमच्यासाठी घेतलेल्या कष्टांमुळे आणि हाल अपेष्टांमुळे आम्हाला दिसताहेत.) पहायला तुम्ही हवे होतात असे राहून राहून वाटतय. तुम्ही तुमच्या स्वभावानुसार हे सगळ खूप एजाॅॅय केल असतत.

आज महेश अमेरिकेत आहे. मी इथे सांगोल्यात (आता शिरपुरला) विभागप्रमुख आहे आणि श्रीकांत (तुमच्यासारखाच चोखंदळपणा बाळगत) नागपुरात आहे. तुम्ही आम्हा सगळ्यांकडे आवर्जून गेला असतात. सगळ्या गोष्टींचा अगदी मनापासून आनंद घेतला असतात.

दादा, तुम्हाला खर सांगू ? तुम्ही गेल्यानंतर खर्‍या अर्थाने आम्हा सगळ्यांनाच या दुनियेची रीत कळायला सुरूवात झाली. "आटे चावल के भाव" कळायला सुरूवात झाली. पितृछत्र हरपणे म्हणजे काय याचा चटका बसला आणि खरच सांगतो. त्या दिवसापासून आजवर हृदयात कुठेतरी तुमच्या अभावाची जाणीव खोलवर रूतून बसली आहे. त्या दिवसानंतर मी खूप मोहरून हसलो आहे किंवा खूप गहिवरून गेलो आहे असे होतच नाही. आनंद, दुःख हे सगळ वरवरचं असतं. 

परवा माझा एक जुना मित्र जवळपास १९ वर्षांनी भेटला आणि लवकरच तो म्हणाला " राम, तू खूपच बदलला रे. पूर्वीसारखा हजरजबाबी, कुणाचीही थट्टा मस्करी करणारा, टोपी उडवणारा राहिला नाहीस. सिरीयस विचार करणारा झालायस." खरंच आहे ते. माझ्या व्यक्तीमत्वातल मी काय गमावल ते मला माहिती आहे. तुमची उणीव कधीही, कशानीही भरून येणार नाही ही जाणीव सतत माझ्या सोबत असते. जगरहाटी पाळावी लागते हे जरी खरं असलं, तरी दादा, " बात नही बनती. "

सतरा वर्षे झालीत तुम्हाला जाउन. सुरूवातीच्या महिन्या दीड महिन्यात मी रात्री रात्री झोपेतून रडत उठायचो ते याच उणीवेच्या जाणीवेमुळे. आजही दादा, वर्षातून एक दोन वेळा, तसाच झोपेतून तुमच्या आठवणींनी अस्वस्थ होऊन उठतो. जगण्यातला सगळा जीव निघून जातो. संसार आहे, कर्तव्य आहेत म्हणून पार पाडावीच लागतात पण दादा,मजा नही आता.

मला आठवतय की तुमच्या ५१ व्या वाढदिवसाला मी तुम्हाला दिलेल्या ग्रीटींगमध्ये "तुमको हमारी उमर लग जाये" अश्या शुभेच्छा दिलेल्या होत्या. त्या ख-या ठरायला हरकत नव्हती. तुमच्याशिवाय रित्या झालेल्या या आताच्या आमच्या आयुष्य जगण्यापेक्षा ते बरं झालं असतं.

"कुणाचेच आईवडील आयुष्याला पुरत नाहीत", "वासांसी जीर्णानी" हे सगळ मला माहिती आहे तरी दादा, हे डोक्याने स्वीकारलय, मनाने नव्हे.

थांबतो. आम्ही सुखात रहावे म्हणून तुम्ही आयुष्यभर धडपड केलीत. त्यामुळे आता आम्ही दुःख केलेल तुम्हाला आवडणार नाही हे मला माहिती आहे. पण दादा, आज सर्व सुखाच्या क्षणांमध्ये " तुम्ही इथे आज हवे होतात " हे आमचे हवेपण संपत नाही त्याला आमचाही नाईलाज आहे.

3 comments:

  1. chan dada...mama kashe hote te athvat nahi amhala pan aai baba tyanchya baddal wa junya aathavanibaddal sangatat tyaweles tyanche vyaktimatv kalte..."JO AVADATO SARVALA TOCHI AAVDE DEVALA"

    ReplyDelete
  2. आई वडिल गेले की आपण जगतो ते सतत ते आपल्यासोबत नसल्याची रुखरुख मनात बाळगून. सारं काही चालू रहातं पण काहीतरी हरवल्यासारखं मन उदासच असतं. छान व्यक्त केल्या आहेत तुम्ही तुमच्या भावना.

    ReplyDelete