Tuesday, March 25, 2014

दक्षिण दिग्विजय : भाग १ नागपूर ते चेन्नई

नोव्हेंबरच्या अखेरीच्या आठवड्यात हिवाळी सुट्टी घेतली. चि. मृण्मयीच्या शाळेतून कशीबशी आठवडाभरासाठी सुट्टी मिळवली आणि पहिल्या वहिल्या दक्षिण प्रवासासाठी सज्ज झालो. नागपूर ते चेन्नई, चेन्नई ते मदुराई, मदुराई ते रामेश्वरम ते मदुराई, मदुराई ते कन्याकुमारी, कन्याकुमारी ते तिरूवनंतपुरम, तिरूवनंतपुरम ते तिरूपती, तिरूपती ते चेन्नई आणि चेन्नई ते नागपूर असा ८-९ दिवसांचा प्रवासाचा बेत होता. त्यातील नागपूर ते चेन्नई, चेन्नई ते मदुराई, मदुराई ते कन्याकुमारी, तिरूवनंतपुरम ते तिरूपती आणि चेन्नई ते नागपूर अशी रेल्वे प्रवासाची आरक्षणे झाली होती. थांबण्याची आणि इतर प्रवासाची व्यवस्था ऐनवेळी बघू म्हणत आम्ही निघणार होतो.

२९/११/२००८ रोजी नागपूर ते चेन्नई अशी तामिळनाडू एक्सप्रेसची आरक्षणे केलेली होती. या गाडीविषयी मला पूर्वापार फ़ार आकर्षण. चंद्रपूर स्थानकात न थांबता ऐटीत रोरावत निघून जाणारी, ताडाळीच्या फ़ाटकात इटारसी शेडच्या दोन दोन डिझेल एंजिनांच्या मागे झुपकन निसटणारी, लाल पिवळ्या आकर्षक रंगसंगतीच्या डब्यांची (पूर्वीच्या काळी), आणि काळाबरोबर थांबे फ़ार न वाढलेली ही गाडी अत्यंत मस्त  आहे. आजही नागपूर ते चेन्नई या १०९० किमीच्या प्रवासात फ़क्त बल्लारशाह, वारंगल आणि विजयवाडा हे तीनच थांबे ही गाडी घेते.

शनिवार २९/११/२००८.

महाविद्यालयातून घरी आलो. पटापट जेवलो. गाडी उशीरा धावत असल्याचे वर्तमान आंतरजालावरून बघितले. दुपारी १४.२० ला निघणारी गाडी जवळपास १ तास उशीरा धावत होती. न जाणो, एखादे वेळ भोपाळ ते नागपूर या दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात वेळ भरून काढेलही म्हणून दुपारी १ वाजताच घरून निघालो. चि. मृण्मयी तर उत्साहात साडेबारा वाजल्यापासूनच तयार होऊन पाठीवर छोटी सॅक लावून बसली होती. प्रवासात कपडे मोजके घ्यायचे आणि संधी मिळाली की धूवून इस्त्री करून वापरायचे असे ठरल्यामुळे सामानाचे वजन मर्यादित झाले होते. (अतिरिक्त सामान घेतल्यामुळे झालेल्या फ़जितीच्या गजाली नंतर कधीतरी.) तसही स्टेशनवर वेळ काढणे हा माझ्यासाठी  प्रश्न नसून ती एक संधी असते.





चि . मृण्मयीची प्रवासाची जय्यत तयारी

गाडी उशीरा धावतेय हे माहिती असूनही आम्ही लवकरच म्हणजे १३. ४० वाजताच स्थानकावर पोहोचलो. फलाट  क्र. २ वरून तामिळनाडू एक्सप्रेस जाते हा नेहेमीचा अनुभव. तिथे सगळा सावळा गोंधळच होता. दुपारी १२. ३० वाजता चेन्नई ला जाणारी जी . टी . एक्सप्रेस  अजूनही गेलेली नव्हती. २६/११ रोजी झालेल्या हल्ल्यामुळे सर्व रेल्वे स्थानकांवर कडेकोट  सुरक्षा व्यवस्था होती. त्यामुळे सगळ्याच रेल्वे गाड्या उशीरा धावत होत्या.

नागपूर रेल्वे स्थानकावरील काही क्षणचित्रे.



१) फलाट ५ वर ८०३० हावडा-कुर्ला एक्सप्रेस उभी होती. भारतीय रेल्वेच्या लेकुरवाळ्या गाड्यांमध्ये हिची गणना होते. हावडा शेडचे तिचे एंजिन २२२७७ WAP ४ निमूट बाजूला उभे होते आणि एक नवीनच सर्वसाधारण वर्गाचा डबा गाडीला जोडला गेला .



२) पुणे शेडचे डिझेल एंजिन ११२२४ WDM ३D मोकळ्या रांगांमध्ये  निपचित पडून होते. संध्याकाळी १८.३० वाजता इथून निघणाऱ्या नागपूर-पुणे गाडीची  वेळ होईस्तोवर बिचारे  कालच्या झोपेची थकबाकी गोळा करीत असावे. 


दरम्यान चि. मृण्मयी कंटाळली . फ़लाटावर तशीही गर्दी नव्हतीच. आम्ही आमचे सामानाचे डाग एका निवांत जागी ठेवलेत आणि कन्यारत्नाला आणि तिच्या आईसाहेबांना बसायला जागा करून दिली .


३) बरोबर १३. ५५ ला (जवळपास दीड तास उशीरा)  २६१६ अप जी. टी. एक्सप्रेस फलाट २ वर आली. २२२९८ हे इरोड शेड चे WAP  ४ एंजिन तिला ओढत होते. जीटी च्या डब्यांची स्थिती याप्रमाणे.

गार्डाचा डबा-जनरल-जनरल-एच.ए १-ए १-ए २-बी १-बी २-एस १-एस २-एस ३-भोजनयान-एस ४-एस ५-एस ६-एस ७-एस ८-एस ९-एस १०-एस ११-एस १२-जनरल-जनरल-गार्डाचा डबा-पार्सल डबा. (एकूण २५ डबे)
(एच ए.१ = वातानुकुलीत प्रथम वर्ग  + वातानुकुलीत द्विस्तरीय शयनयान, ए १ आणि ए २ = वातानुकुलीत द्विस्तरीय शयनयान, बी १ आणि बी २ = वातानुकुलीत त्रिस्तरीय शयनयान )

४) २६१६ जीटी ने १४.०८ ला प्रस्थान केले आणि १४.११ ला विरुद्ध बाजुने २६१५ (चेन्नई-नवी दिल्ली) जीटी नागपुरात आली. ही मजा रोज २६२१ तामिलनाडू आणि २६२२ तामिलनाडू एक्सप्रेसच्या बाबतीत नागपूरला होते. नागपूर ते नवी दिल्ली हे अंतर १०९० किमी तर नागपूर ते चेन्नई अंतर १०९५ किमी. म्हणजे नागपूर हे दिल्ली-चेन्नईचा मध्यबिंदू. दोन्ही बाजुंनी तामिलनाडू एक्सप्रेस रात्री २२.३० ला निघतात आणि नागपूरला दुस-या दिवशी दुपारी १४.१० वाजता येतात आणि आपापल्या गंतव्य स्थळी तिस-या दिवशी सकाळी ०७.३० वाजता पोहोचतात. गंमतच आहे. आज जी.टी. एक्सप्रेसला उशीर झाल्याने तिने तामिळनाडू एक्सप्रेसची जागा घेतली होती.

५) आम्हाला स्टेशनवर निरोप द्यायला महाविद्यालयातील माझे दोन तरूण सहकारी प्रा. हरीओम खुंगर आणि प्रा. कु. दिशा खंडारे आलेले होते. मग त्यांच्यासोबत एक फोटो सेशन झाले. हरीओम हा माझ्यासारखाच रेल्वेप्रेमी असल्याने तो असेपर्यंत वेळ वेगवेगळ्या गाड्या बघण्यात छान गेला.


हा आम्हा प्रवासी मंडळींचा फोटो. प्रा. किन्हीकर, सौ. किन्हीकर आणि चि. मृण्मयी किन्हीकर. प्रवासात कॆमेरा आणि डायरी हा आम्हा सर्व रेल्वे प्रेमींच्या तयारीचा अविभाज्य भाग असतो 
                                     

आणि हा फोटो चि. मृण्मयीने काढलेला आहे.

६) दरम्यान इतर फ़लाटांवर २८१० हावडा-मुंबई मेल, २९६८ जयपूर-मद्रास एक्सप्रेस, २४४१ बिलासपूर-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस, २८४३ पुरी-अहमदाबाद एक्सप्रेस, २७१३ हैद्राबाद-नवी दिल्ली आंध्रप्रदेश एक्सप्रेस, २१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस यांची ये जा सुरू होतीच. सगळ्या गाड्यांना लालुप्रसादांच्या कल्पनेतले साइड मिडल बर्थस जोडलेले होते. प्रचंड गैरसोयीचे हे बर्थस नंतर काढल्या गेलेत. एका "तुघलकी" योजनेचा योग्य तो शेवट झाला.


आंध्र प्रदेश एक्सप्रेस. नाम फ़लक वैशिष्ट्यपूर्ण. त्यात निळ्या पट्टीने झाकलेल्या भागात कुठल्यातरी गावचे नाव असणार. ते गाव-हैद्राबाद आणि हैद्राबाद-नवी दिल्ली आंध्रप्रदेश एक्सप्रेस रेक्स शेअर करीत असणार. बहुतेक विशाखापट्टणम.

७) दरम्यान काही मालगाड्यांची ये जा सुरू होतीच. त्यातले काही दुर्मीळ योग टिपलेत.



लुधियाना शेडचे ह्या प्रकारातले एंजिन या रंगसंगतीत फ़ार क्वचित दिसते. रेल्वे प्रेमींमध्ये ही रंगसंगती "बार्बी डॉल रंगसंगती" म्हणून प्रसिद्ध आहे.


इरोड (तामिळनाडू) शेडचे ह्या प्रकारातले हे दुर्मीळ एंजिन. या रंगसंगतीत तर फ़ारच दुर्मीळ.

८) दरम्यान १६.३५ झालेत. आमच्या गाडीची उदघोषणा होत होतीच. " थोडेही समय में प्लॅटफ़ार्म नं २ पे आयेगी " हे ऐकून ऐकून कंटाळा आला. गाडी ७०-८० किमी दूर असल्यापासूनच उद्घोषणा सुरू करतात की काय ? असे वाटून गेले. दरम्यान आमची सख्खी सखी १०३९ महाराष्ट्र एक्सप्रेस नागपुरात दाखल झाली. माझ्या एकूण  प्रवासापैकी एक तृतीयांश प्रवास मी ह्या गाडीने केलेला आहे. नागपूर ते कराड या अभियांत्रिकीच्या ४ वर्षातली ही आमची सोबती.

९) शेवटी १६.४० वाजता उत्तरेच्या टोकाला बहुप्रतिक्षित व WAP ४ एंजिनाचा लाल ठिपका दिसायला लागला. हळूहळू तो मोठा मोठा होत आमच्या जवळून जात थांबला. प्रवासाच्या पहिल्या टप्प्याला, उशीरा का होइना, सुरूवात झाली होती. दुस-या दिवशी मदुराई ला जाणारी आमची वैगाई एक्सप्रेस दुपारी १२.३० ला होती त्यामुळे तसे टेन्शन नव्हते.


इरोड शेडचे २२६६५. इरोड शेड हे त्यांच्या एंजिन नंबरांच्या बाबतीत पझेसिव्ह आहे. २२२२२, २२५५५, २२६६६, १११११ हे सगळे स्पेशल नंबर्स त्यांच्याकडे आहेत.

प्रवास: सविस्तर

एंजिन क्र. २२६६५ द. रे. इरोड शेड WAP ४

कोच क्र. ०६०२७, द. रे.,  एच. ए. १, वातानुकुलीत प्रथम वर्ग  + वातानुकुलीत द्विस्तरीय शयनयान, केबीन ए
इंटिग्रल कोच फ़ॆक्टरी, मद्रास येथे दि. १४/१०/२००६ रोजी बनविण्यात आलेला कोच.


कोचच्या अंतर्गत पॅसेजमधील सजावट.


हिवाळ्यात प्रवास करताना ब-याच जणांचा प्रश्न असतो. " हिवाळा असताना ए.सी. कशाला ? " त्याचे हे उत्तर. आतील तापमान हिवाळ्यातही १९ अंशापेक्षा खाली जाणार नाही याची काळजी घेतलेली आहे. बाहेर कदाचित रात्री तापमान ५ अंश ते १० अंश असू शकेल. त्यामानाने आत उबदार असेल. आणि ए.सी. प्रवासाचा सगळ्यात मोठा फ़ायदा म्हणजे आवाज, धूळ इत्यादी नसल्याने प्रवासाचा थकवा कमी होतो.










आम्ही आमच्या केबिनमध्ये स्थानापन्न झालो आणि १६.५६ ला गाडी हलली. अजनी स्टेशनला सिग्नल नसल्याने १ मिनीटांकरिता थांबून मग वेग घेतला. आमच्या केबिनमध्ये आमच्या तिघांशिवाय आमचे सहप्रवासी एक सदगृहस्थ होते. चेन्नई दूरदर्शनचे सहसंचालक होते. दिल्लीला कुठला तरी रिफ़्रेशर कोर्स करून परत कामावर निघाले होते. ( त्यांनी खरंतर नावही सांगितले होते. पण गडबडीत लक्षात राहिले नाही.) चि. मृण्मयी बसल्या क्षणापासूनच प्रवासाचा पूर्ण आनंद घेण्यात मग्न झाली. केबीनमधल्या टेबलावर चित्रकलेची वही काढून चित्रे काढण्याचा घाट तिने घातला. दरम्यान कोचचा मदतनीस आला आणि स्वच्छ अंथरूणे व पांघरूणे आम्हाला देऊन निघून गेला. अर्थात भारतातल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा एका गाडीत सगळ्यात वरच्या वर्गात आम्ही प्रवास करीत होतो त्यामुळे सगळ्याच गोष्टी सर्वोत्तम मिळायला हव्यात ही आमची अपेक्षा अवास्तव नव्हती.

सिंदी रेल्वे पर्यंत (४६ किमी) गाडीने ब-यापैकी वेग पकडला होता पण पुढे पाठवलेल्या मालगाडीने घोटाळा केला. सिंदीत आम्हाला २ मिनीटांसाठी थांबावे लागले. 

मग मात्र तामिळनाडू एक्सप्रेसने तिचे खरे रंग दाखवायला सुरूवात केली. पुढल्याच स्टेशनवर (तुळजापूर जि. वर्धा) त्या मालगाडीला खाडखाड धूळ चारत आम्ही मार्गक्रमू लागलो. सेवाग्राम १७.५९ ला आलो. नागपूर ते सेवाग्राम हे ७६ किमीचे अंतर आम्ही १ तास ३ मिनीटांत कापले होते.  न थांबता दक्षिणेकडे जाणा-या वळणावर गेलो. रेल्वे प्रेमींचे हे वळण खूप आवडते आहे. आमच्या ग्रूपमध्ये या वळणाचे अक्षरश: शेकड्यात फ़ोटो आहे. संपूर्ण गाडी या वळणावर दृष्टीगोचर होत असते.

हिंगणघाट वगैरे झपझप कापून चंद्रपूरलाही (वेळ १९.२७. १९२ किमी अंतर २ तास ३१ मिनीटांत. थोडक्यात मुंबई-पुणे, २ तास ३१ मिनीटांत) न थांबता थेट पहिल्या अधिकृत थांब्यावर (बल्लारशाह) आम्ही थांबलो तेव्हा संध्याकाळचे १९.३८ झालेले होते. मध्य रेल्वेचा कर्मचारीवर्ग बदलून इथे द.म. रेल्वे चा कर्मचारी वर्ग आला. आम्हीही शिदो-या सोडून जेवण करून घेतले. १२ मिनीटांनी १९.५० ला गाडीने बल्लारशाह सोडले. थोडावेळ दारापाशी उभा राहिलो. बल्लारशाह नंतर लगेचच वर्धा नदीच्या पुलावरून आमच्या मामांचे शेत दिसते. लहानपणी शेतात हुरडा खायला गेल्यानंतर तिथल्या मचाणावर चढून दूरवरच्या गाड्या बघणे हा आमचा छंद असायचा. आज गाडीतून शेत दिसतय का हा नॊस्टालजिया जपत बाहेर बघत होतो. पण किर्र अंधार पडला होता त्यामुळे हा बेत सफ़ल झाला नाही.

रात्री नेहेमीप्रमाणे ९-९.३० लाच झोपी गेलो. सहप्रवासी भला होता. त्यानेही केबिनचे दिवे मालवायला कां कूं केले नाही.
रात्री वारंगल येऊन गेले असेल. आमची झोप मोडली नाही. पहाटे पहाटे गाडी ब-याच वेळ थांबली होती. खिडकीचा पडदा बा्जूला करून पाहीपर्यंत गाडी हलली. विजयवाडा स्टेशन होते आणि आनंददायी बाब म्हणजे नागपूरवरून आमच्या डोळ्यांसमोरून आमच्या जवळपास तासभर आधी निघालेल्या २९६८ जयपूर-चेन्नई सुपर एक्सप्रेसला आम्ही ओव्हरटेक करीत होतो. विजयवाड्याला त्या गाडीला बाजूला काढून आम्हाला प्राधान्य मिळालेले होते.

भारतीय रेल्वे हे जसे राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक आहे तसेच ते प्रांतवादाचेही आगर आहे. लुधियानाचे एंजिन कोची ला आणि वडोदरा चे एंजिन मालदा टाउन ला जसे सापडते तसेच आपल्या विभागात आपल्या गाड्यांना प्राधान्यक्रम देण्याची वृत्तीही सर्वत्र बघायला मिळते. मुंबई ते नागपूर हा मध्य रेल्वेच्या अखत्यारीतला प्रवास अगदी दिमाखात प्राधान्याने करणारी विदर्भ एक्सप्रेस नागपूरच्या पुढे दक्षिण पूर्व रेल्वेच्या ताब्यात गेल्यावर गोंदियापर्यंत बापुडवाणा प्रवास करते. जयपूर-चेन्नई सुपर ही भोपाळपर्यंत अगदी राणी असते. नंतर मात्र तिचे संस्थान खालसा होते. हे प्रकार सर्वत्रच अनुभवायला येतात.







रविवार ३०/११/२००८.

सकाळी आमच्या केबीनमधली सर्व प्रवासी मंडळी जागी झाली तेव्हा गाडी गुडूरजवळ पोहोचली होती. पेन्ट्री कार मधून इडली सांबारचा नाश्ता आला. वर चहा ढोसत आम्ही जरा फ़्रेश झालोत. 




गुडूरनंतर मात्र गाडीला फ़ारसा वेग घेण्याची संधी मिळाली नाही. "गुमीडपुंडी" या मजेशीर नावाच्या स्टेशननंतर चेन्नईची लोकल वाहतूक सुरू झाली होती.





आणि सरतेशेवटी ज्या स्टेशनविषयी खूप वाचले होते, ऐकले होते. त्या चेन्नई सेंट्रल स्टेशनला आम्ही पोहोचलोत. सकाळचे १०.०४ वाजले होते. नियोजित वेळेपेक्षा २ तास ३४ मिनीटे उशीरा. सरासरी वेग ६३.९१ किमी प्रतीतास. अतिशय चांगला. स्टेशनच्या आधीच या "जेम्स बॉण्ड" २२००७ साहेबांनी स्वागत केले.


चेन्नईला बाहेर आलो. स्टेशनच्या जुन्या, गॊथिक शैलीतल्या इमारतीचा फ़ोटो काढला.


आटो रिक्षा स्टॆंडपर्यंत आमचे सहप्रवासी (भला माणूस) सोबत होते. त्यांनी तामिळीतून रिक्षावाल्याशी बोलून ३० रूपयांत चेन्नई एग्मोर स्टेशनपर्यंत रिक्षा ठरवून दिला. (परतीच्या प्रवासात चेन्नईच्या रिक्षांचा आम्हाला "चांगलाच" अनुभव आला. ५-७ किमी प्रवासासाठी ७० ते ८० रूपये आम्ही मोजलेत) आमची गाडी दुपारी १२.३० ला चेन्नईवरून मदुराई साठी एग्मोर स्टेशनवरून जाणार होती. प्रवासाचा पहिला टप्पा तर खूप छान आणि आनंदात पार पडला होता.





चेन्नई शहर बस सेवेतल्या काही सुंद-या. रविवार असल्याने गर्दी तशी नव्हती. रस्ते ब-यापैकी मोकळे होते. चेन्नईचे प्रथम दर्शन, निवांतपणामुळे मला आवडले.

(क्रमशः)

8 comments:

  1. Good Narration. Glad you enjoyed you trip!

    ReplyDelete
  2. nice blog...i also have same experience of chennai auto drivers...

    ReplyDelete
    Replies
    1. वा ! छान. चेन्नईच्या ऑटोवाल्यांविषयी आपल्या अनुभवांबाबत अधिक वाचायला आवडेल.

      Delete
  3. Very well amd detailed written. Keep it up.

    ReplyDelete
  4. सर मस्त प्रवास वर्णन, आणी रेल्वेच्या नंबरचे तुमचे ज्ञान थक्क करणारे आहे 🙏

    ReplyDelete