जन्म : चंद्रपूर.
बालपणी लाडकी मावशी माणगाव जि. रायगड येथे असल्याने दरवर्षीची कोकण भ्रमंती.
पहिली ते बारावी शिक्षण : नागपूर.
इंजीनीअरींग : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड जि. सातारा, कराडला असताना विविध वक्तृत्व स्पर्धा, यूथ फ़ेस्टीवल्स, नाट्यस्पर्धांच्या निमीत्ताने सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांमध्ये भ्रमंती, रात्री बेरात्रीचे प्रवास, लहान लहान गावांतल्या अनंत आठवणी.
नोकरी : १२ वर्षे ऐरोली, नवी मुंबई, पुढली ६ वर्षे : नागपूर आणि आता गेली अडीच वर्षे : सांगोला जि. सोलापूर.
काका, मावश्या, मावसभाउ इ मंडळी औरंगाबादला असल्याने १९८९ पासून मराठवाड्यात भरपूर भ्रमंती.
चंद्रपूरच्या भाजी मंडईत जाउन खरेदी करण्याच्या ओढीइतकीच, सांगोल्याच्या आठवडी बाजारातील भाजी मंडईत गर्दीत जाउन भाजी खरेदी करायला आवडते.
नागपूरला केळीबाग रोड, महाल येथे फ़ेरफ़टका मारण्याचा आनंद आणि ठाण्यात गोखले रोड, राम मारुती रोड इथे फ़िरण्याचा आनंद यात डावे उजवे करता येत नाही.
टेकडी गणपती आणि टिटवाळ्याचा सिद्धीविनायक, दोघांसमोरही उभे राहिल्यावर डोळा भरून दर्शन घेताना , डोळे भरून येण्याची सारखीच अनुभूती.
अमरावतीचा गड्ड्याचा वडा आणि ठाण्याची मामलेदाराची मिसळ दोघांच्या ही चविष्टपणात उजवे डावे करता न येणे.
शेगावला गजानन बाबांवर आपले मायबाप असण्याची जबाबदारी टाकून स्वतः मो्कळे होणे आणि गोंदवलेला ब्रम्हचैतन्य महाराजच आपल्याला मार्ग दाखवून इथपर्यंत आणताहेत ही अनुभूती यात काय फ़रक ?
मुंबई ठाण्याने मला जेव्हढ आपलस केल तेव्हढच नांदेड औरंगाबाद सोलापूरनेही केल. कोणाच्या आपलेसे करण्यामागे फ़टकळ व्यावहारिकता असेल, जीवनाचे ज्ञान चटकन प्राप्त करून देण्याची तळमळ असेल तर कोणाच्या आपलेसे करण्यामागे रांगडेपणा, रूक्षपणा, खरखरीतपणा असेल. त्या खरखरीतपणाच्या आतला ओलावा जाणवायला थोडा वेळ तर द्यावा लागेलच की नाही ?
रिला्यन्स मॉल औरंगाबाद आणि रिलायन्स ट्रेण्डस सांगली या दोन्ही ठिकाणी फ़सवले जाण्याची अनुभूती सारखीच.
वैदर्भीय अष्टविनायक यात्रेइतकच समाधान, एका उन्हाळ्यात शिरपूर जि. धुळे येथे सुरेश खानापूरकर काकांचा अभिनव प्रयोग बघण्यासाठी खास काढलेल्या यात्रेत मिळाल.
गणपतीपुळ्याला सुंदर संध्याकाळी समुद्रावर जी अनुभूती येते ती आणि कराडच्या प्रीतीसंगमावरच्या घाटांवर संध्याकाळी जी अनुभूती येते ती, यात काडीचाही फ़रक नाही.
माहूरला रेणुकेला साष्टांग घालताना डोळ्यासमोर तुळजापू्र, कोल्हापूर आणि वणीच्या सप्तशृंगीच्या मूर्ती आपसूकच तरळून जातात आणि त्यांनाही साष्टांग आपोआपच घडतो. आणि हेच तुळजापूर, कोल्हापूर आणि वणीला होत.
विदर्भ, खान्देश, मराठवाड्याचा आणि कोकण माणदेश आणि मावळचा मी आहे.
जन्माने आणि वागणुकीने पक्का वैदर्भी असलो तरी मनाने पूर्ण महाराष्ट्राचा आहे.