Friday, March 27, 2015

मजवीण तू मज...समर्थांच्या अनेक रचनांपैकी ही माझी एक अत्यंत आवडती रचना. चौपदीत प्रभू रामचंद्रांकडे मागणी करताना समर्थ " कोमल वाचा, विमल करणी,प्रसंग ओळखी, बहुजनमैत्री, बहुत पाठांतर, संगीत गायन, आलाप गोडी, सावधपण, सज्जनसंगती " वगैरे सगळ मागतात. पण त्यातल शेवटच्या चौपाईतल मागण मला फ़ार आवडून जात. " मजवीण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम "

परमेश्वराच्या आणि भक्ताच्या नात्यातली उत्कटता म्हणजे आत्मनिवेदन आणि अनन्यशरण जाणीव. " भगवंता मला दुसरं कुणी नाही फ़क्त तूच आहेस." ही जाणीव भक्ताच्या मनात प्रगाढ झाली की आपोआपच त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते, नेत्र पाझरायला लागतात. आजवरचे सगळे प्रसंग आठवून तोच आपला सांगाती होता ही खूण मनोमन पटते आणि जीवनाचा बहुतांशी काळ नश्वर सुखाच्या मागे धावण्यात आपण व्यर्थ घालवला याच्या जाणीवेने दुःख होते.

पण याही पेक्षा उत्कट अवस्था या चौपदीत समर्थांची झाली आहे. प्रभू रामचंद्रा मला जगाच्या दृष्टीने या सगळ्या चांगल्या, पावन आणि सात्विक वृत्तीची वाढ करणा-या गोष्टी तर तू देच पण त्याहूनही तुझी भक्ती करत असताना कुणीतरी "मी" ही भक्ती करतोय याची जाणीव तू पुसून टाक. तुझ्या भक्तीआड माझी मी पणाची जाणीव अजिबात येउ देउ नकोस. मी नाहीच फ़क्त तूच आहेस अशा प्रकारचा अनुभव मला दे. ही भक्तीची उत्कटता मला दे.

"संत दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले" असं म्हणतात ते किती खरं आहे नं ? माझ्या ज्ञानोबामाउलीने एका विरहिणीत " भेट देउ गेले तव मी ची मी एकली" हा अनुभव आपणा सर्वांसमोर विशद केला होता ना ? त्या पांडुरंगाला भेटायला जाणा-या भक्ताला हा अद्वैतानुभव आला आणि समर्थ तेच श्रीरामांना मागताहेत 
"मजवीण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम"

आपण सर्वही भक्तीचा हा मार्ग चालताना या उत्कटतेप्रत पोहोचू. स्वतःला भगवंतासमोर सादर करताना " मै नही, तू ही " ही उत्कट अवस्था सगळ्यांना प्राप्त होवो हेच त्या श्रीरामरायाला साकडे घालतो.


- मन्मथनाम संवत्सर, श्रीरामनवमी शके १९३७ (२८/०३/२०१५)

2 comments:

  1. Very beautiful and touching. Jai ShriRam

    ReplyDelete
  2. सुंदर ...उत्कट भाव.

    ReplyDelete