Tuesday, March 1, 2016

कटिंग : एक करणे

बालपणी अस्मादिकांचे जावळ फ़ार उशीरा काढण्यात आले. माझ्याहून ३ वर्षांनी लहान असलेल्या धाकट्या भावाचे आणि माझे जावळ काढण्याचा विधी एकाच मांडवात करण्यात आला. आमची मुंजही एकत्रच लागली. त्याकाळच्या मध्यमवर्गीय किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय (हा शब्द १९९० नंतर जास्त चलनात आला. पूर्वी गरीब, श्रीमंत आणि मध्यमवर्गीय असे तीनच वर्ग होते.) समाजात हे प्रकार सरसकट होते. एकंदर काय, वयाच्या चांगल्या चौथ्या वर्षापर्यंत मला चांगली चुट्टी येण्याइतपत केस शिरावर बाळगावे लागलेत. त्याचा निषेध म्हणून की काय मी त्यानंतर बारीक केस ठेवण्याचा परिपाठ ठेवला. तो आजपर्यंत कायम आहे. कळायला लागेपर्यंत (आपली आपली मत फ़ुटून स्वतः सलूनमध्ये जायला लागेपर्यंत) सोबत आमचे दादा (वडील) असायचेत आणि सलूनवाल्याला "बारीक केस काप" अशी तंबी असायची. आमच्या लहानपणी केस वाढवणे म्हणजे " हिरोगिरी करणे " असा समज समस्त पालकांमध्ये रूजू होता की काय न कळे. " केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा. " हा संदेश मी याची देही याची डोळा काही वर्ग खोल्यांमध्ये सुविचार म्हणून लावून ठेवलेला पाहिला आहे. आमच्या वर्गात चौथ्या वर्गापर्यंत गोतमारे म्हणून एक मुलगा होता. त्याचे केस असे कानावर वगैरे येत असत. तो स्वतःला राजेश खन्ना समजायचा. त्यामुळे डोक्यावर केस वाढलेले असणे, विशेषतः कानशिलाशी केसांनी लगट करणे म्हणजे काहीतरी मोठ्ठा गुन्हा केलाय अशी समस्त पालक मंडळींची समजूत होती. आताशा एखाद्या " अर्णव किंवा मिहीर "  ला त्याचे स्मार्ट बाबा सलूनमध्ये नेवून त्याची हेअरस्टाईल वगैरे ठरवताना दिसले की आपल्याला ४० वर्षे उशीरा जन्माला  घातल्याबद्दल त्या विधात्याकडे तक्रार नोंदवावीशी वाटते. तात्पर्य काय की केसांचा जवळपास चकोट म्हणजे सज्जनपणाचे कमाल परिमाण असण्याच्या पीढीत आम्ही जन्म घेतला.


कराडला अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना मात्र आम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा फ़ायदा घेवून अस्मादिकांनी आमच्या मिश्यांवर एव्ह्ढे विविध प्रयोग केलेले होते की " माझे मिश्यांचे प्रयोग " म्हणून एखादे पुस्तक मी सहज लिहू शकतो.

आजवर मी ब-याच शहरांच्या ब-याच सलून्सचा प्रवास करून आलोय. पण आजतागायत एकदा त्या खुर्चीवर बसलो की " बारीक " एव्हढा शब्द उच्चारून सलूनवाल्याच्या हातात आपली डोई ठेवणे एव्हढाच उपचार पाळत आलोय. (बाकी हे आम्ही बोललो नाही तरी एखादा चाणाक्ष सलूनवाला समजेलच. कारण जेव्हढे केस डोईवर ठेवून समस्त जनता सलूनबाहेर पडते तेव्हढे केस डोईवर ठेवून आम्ही कापायला जातो. त्यामुळे बहुतांशी सलूनवाले केवळ भूतदया दृष्टीने आमच्या कडे बघतात. काही अती व्यापारी दृष्टीकोन असलेले सलूनवाले मात्र " आता हा लेकाचा आपल्याकडे पुढला महिना दीड महिना काही येत नाही, धंदा बुडाला " अशा असूया दृष्टीनेही बघतात, तो भाग अलहिदा.) कारण सलूनमध्ये जाऊन त्या कारागिराला केस कापण्याविषयी सूचना करणे, म्हणजे त्या कारागिराच्या कलेचा अपमान आहे असे मी मानत आलो आहे. (उद्या कोणी सोम्यागोम्या येवून मला स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्राविषयी, शिकवायचे कसे याविषयी सांगायला लागला तर मला जेव्हढे अपमानित व्हायला होईल) तेव्हढे अपमानित मला त्या कारागिराला त्याच्या कलेविषयी मार्गदर्शन करून करायचे नसतेच. अहो, उगीच काय काहीतरी ? 

काही काही माणसांचे याबाबतीतले प्रावीण्य वाखाणण्याजोगे असते. खुर्चीत बसण्यापूर्वी आणि बसल्यानंतरही त्या कारागिराला ही मंडळी एव्हढ्या सूचना देत असतात की काही दिवसांनी यांनी शेजारीच आपले दुसरे सलून सुरू करावे असे वाटते. त्यामुळे आजवर फ़क्त " बारीक " एव्हढी सूचना देवून खुर्चीवर बसणे आणि शेवटी डोईवर आहे तेव्हढा ऐवज ठेवून घरी जाणे हे नेमस्त धोरण आम्ही निग्रहाने चालवले आहे.
पण लग्नानंतर मात्र यात थोडा बदल झालाय. आणि कन्यारत्नाला स्वतःची मते फ़ुटू लागल्यानंतर तर फ़ारच बदल अनुभवायला येतो आहे.  हल्ली कटिंग करून घरी परतल्यानंतर सुपत्नी आणि सुकन्या या दोघींच्याही प्रतिक्रियांचा अंदाज घ्यावा लागतो. कधीकधी कौतूक तर कधीकधी दोघीही (राहूल गांधीवर बरसणा-या स्मृती इराणींच्या आवेशात) माझ्यावर तुटून पडतात. एक दोन दिवस " ई........आई, बाबाने अगदी लाज आणलीय, बघ." किंवा " काय हे ? तू काय स्वतःला कॉलेजकुमार समजतोस की काय ? " वगैरे डॉयलॉगबाजी ऐकून घ्यावी लागते. पण सलूनवाल्याचे थोडेसे देवासारखे आहे. तो देईल ते आनंदाने स्वीकारण्यातच समजूतदारपणा असतो. चार दिवस सुखाचे , चार दुःखाचे प्रमाणे चार दिवस सोल्जर कटचे तर चार दिवस मश्रूम कटचे. नाही का ?

1 comment: