Friday, February 5, 2016

मनाचे श्लोक - ७मना सर्वथा सत्य सांडू नको रे

मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे

मना सत्य ते सत्य वाचे वदावे

मना मिथ्य ते मिथ्य सोडूनि द्यावे. II १९ II "सत्य हाच एक जीवन जगण्याचा मार्ग" हे भारतीय संस्कृतीतील अनेक दार्शनिकांनी आपल्याला आवर्जून सांगितलेले आहेत. श्री समर्थ त्यांच्यापैकीच एक. सत्य बोललो नाही, वागलो नाही तर जगात ही लबाडी कदाचित चालून जाईल, पण आपल्या आपल्या मनाला सत्य काय असत्य काय ? याची पूर्ण जा्णीव असल्याने मन मात्र कायम बोचणी लावत राहील. कितीही निर्ढावलेला मनुष्य असला तरी सत्य असत्याची बोचणी त्या व्यक्तीच्या मनाला लागतेच. मनाचे निर्ढावलेपण ती बोचणी जगासमोर येऊ न देण्याइतपतच असते. म्ह्णून श्री समर्थ आपल्या मनाच्या निरोगितेसाठी सत्य सदैव धरून राहण्याचा आग्रह करीत आहेत.

जाणीवपूर्वक बुद्धीभेद करत राहण्याच्या आजच्या युगात मिथ्य गोष्टींना पुरस्कृत न करणेही सत्य मांडण्याइतकेच महत्वाचे आहे हे आपल्या लक्षात येईल. आज हे मिथ्य मांडण्यात भली भली मंडळी जाणते, अजाणतेपणी सहभागी झालेली दिसत आहेत. त्यामुळे आपल्या मनाला योग्यायोग्य विवेक, शाश्वत काय, अशाश्वत काय ? याचे यथार्थ ज्ञान आपणच करून त्याप्रमाणे फ़क्त सत्याची कास धरायचे वळण लावायला हवे. एकदा ही जाणीव पक्की झाली की मग इतर जग कुठे चाललय ? आणि बहुसंख्य लोक कुठल्या मार्गावर आहेत ? याची फ़िकीर करण्याचे आपल्याला कारण उरत नाही. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी लिहील्याप्रमाणे

" सत्य असत्याशी, मन केले ग्वाही, मानियेले नाही, बहुमता." अशी मनाची स्थिती होते. मन खंबीर होते.


बहु हिंपुटी होइजे मायपोटी


नको रे मना यातना तेचि मोठी

निरोधे पचे कोंडिले गर्भवासी

अधोमूख रे दुःख त्या बाळकासी II २० IIश्रीशंकराचार्यांनी मनुष्यमात्राला कळवळून विचारलेय की बाबारे " पुनरपी जननम, पुनरपी मरणम " किती दिवस ? जन्म मृत्यूच्या या चक्रातून बाहेर कधीतरी पडणार आहेस की नाही ? श्री समर्थ तोच कळवळा पुन्हा व्यक्त करत आहेत. खरंतर मृत्यू म्हणजे या जीवाची तात्पुरती का होईना, सुटका. (चांगली कर्मे करून आणि ती सर्व ईश्वरार्पण करून मोक्ष मिळाला असेल तर "पुनरपी संसारा येणे नाही.") आणि पुन्हा जन्म म्हणजे या चक्रात पुन्हा अडकण्यासाठी अटक. या जन्मात सगळीच अनिश्चितता. चांगले मार्गदर्शन मिळाले नाही, आजूबाजूची परिस्थिती पोषक नसेल तर, पुन्हा कर्मे करणे आणि त्यांचे चांगले वाईट फ़ळ चिकटवून घेऊन नवीन प्रारब्धाची निर्मीती आणि ते प्रारब्ध भोगण्यासाठी नवीन जन्माची पुन्हा तयारी करणे यातच आयुष्य खर्ची पडेल. श्री समर्थ जन्माची भीषणता दाखवताना आईच्या गर्भातल्या बाळकाचे दुःख आपल्याला वर्णन करून सांगताहेत. खाली डोके आणि वर पाय या अवस्थेत चार पाच महिने पडून राहणे म्हणजे दुःखप्रद अवस्थाच ती. मराठीतले प्रख्यात कवी आणि मराठी गझलचे जनक सुरेश भट आपल्या एका गझलेमध्ये यथार्थ वर्णन करत आहेत. 

" इतकेच मला जाताना, सरणावर कळले होते.
मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते." 


आणि म्हणून आपल्या आर्तामध्ये सुद्धा परमेश्वराला " जन्म मरणाचा फ़ेरा चुकविला " असे मागणे असते.


मना वासना चूकवी येरझारा

मना कामना सांडि रे द्रव्यदारा

मना यातना थोर हे गर्भवासी

मना सज्जना भेटवी राघवासी II २१ IIआणि म्हणून श्री समर्थ आपणा सर्वांना सदैव, अखंड, अक्षय प्रभू श्रीरामांना भेटण्यासाठी या जन्म मरण्याच्या फ़े-यातून बाहेर यायला आवाहन करत आहेत. हे मना, या गर्भवासात पडून राहण्याच्या आणि त्यानंतर जन्माला येऊन पूर्वप्रारब्ध भोगण्याच्या यातना खूप झाल्यात. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी वासनांवर विजय मिळवायला हवाय. वासना म्हणजे केवळ कामवासनाच नव्हे,  तर मला हे हवे, ते नकोच अशी आग्रही भूमिका. ती सुद्धा आपण सोडून द्यायला हवीय. आपल्या संपत्तीबद्द्ल कुटुंबाबद्दल सुद्धा खूप आसक्ती बाळगू नका असे समर्थ सुचवीत आहेत.


हवेनकोपण मनात कायम ठेवून मृत्यू आला तर भलेभले योगी ते भोगण्यासाठी पुन्हा जन्म घेतात असा श्रीमदभगवतगीतेचा दाखला आहे. आणि जिवंतपणीच अशा सर्व वासनांचा त्याग केला तर जीवाला मुक्तीच की हो. काहीही हवय अस नाही, काहीही नकोय असही नाही. मुक्ती मुक्ती म्हणतात ती काय वेगळी असते याशिवाय ? ही अवस्था आपणा सर्वांना प्राप्त व्हावी या साठी श्री समर्थाम्ची धडपड आहे आणि म्हणून आपणा सर्वांना हे उपदेशामृत त्यांनी उपलब्ध करून दिलय.


II जय जय रघुवीर समर्थ II

No comments:

Post a Comment