Thursday, September 29, 2016

असाही एक जीवनानुभव

भाजी खरेदी करणे हा माझ्या आयुष्यातला अगदी आनंदाचा प्रसंग असतो. तसा मी "खादाड" कॅटेगरीत मोडत असल्याने त्यात माझा स्वार्थही असतोच. पण भाजीबाजारात प्रवेश केल्यानंतर अनेक भाजीविक्रेत्यांकडे ही हारीने मांडून ठेवलेली ताजी भाजी, त्यांचे प्रसन्न अवतार, त्यांच्या रंग, रूप, गुणांमधली विविधता मला अगदी मोहवून टाकते. नागपूरला असताना मी जरी मनीषनगर, त्रिमूर्तीनगर ला रहात असलो तरी दर शनिवारी, रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी पार राजविलास टॉकिजजवळच्या महाल बाजारातूनच आवर्जून भाजी आणत असे. चंद्रपूरला असताना गोल बाजारातून भाजी आणणे म्हणजेही आनंदाचा प्रसंगच. काही काही ठिकाणांशी आपले गोत्र जुळलेले असतात मग त्यांच्या शिवाय दुसरा पर्याय कितीही चांगला असला तरी आपल्याला आवडत नाही.

सांगोल्याला गेल्यानंतर तर आणखी आनंदाची गोष्ट. दर रविवारी तिथे जवळपासच्या खेड्यांतून आणलेल्या ताज्या भाजीचा आठवडी बाजार भरायचा. मस्त "फ़ार्म फ़्रेश" भाजी. वा ! ही भाजी खूप चविष्टही असायची. दर रविवारी सकाळी बाजारातून भाजी आणणे हा सगळ्या घरासाठी एकूणच आनंदसोहळा असे.शिरपूरला दर सोमवारी आठवडी बाजार भरतो. कार्यबाहुल्यामुळे सकाळी बाजारात जाणे होत नाही आणि संध्याकाळी गेलो की बाजार संपण्याच्या तयारीत असतो त्यामुळे आठवडी बाजाराची मजा अनुभवायला मिळत नाही. त्यामुळे मग नेहेमीच्या एक दोन विक्रेत्यांकडूनच नेहेमी भाजी खरेदी होते. त्यातलाच एक अनुभव.

मला स्वतःला भाजी खरेदी करताना खूप घासाघीस करायला आवडत नाही. एखादी गोष्ट खूप महाग वाटत असेल तर ती त्या आठवड्यात खरेदी करायची नाही पण मला त्या आठवड्यात ती गोष्ट खायला हवीच म्हणून मी घासाघीस करत बसत नाही. मी भाजी घेत असताना इतर गि-हाईकांचे संवाद साधारणतः अश्याप्रमाणे ऐकले आहेत.

गि.: अहो, हे  XXXXXX  कसे दिले ?
दु.:    XXX   ला पावकिलो.
गि.: सोनंच विकताय जणू !   XXXXX  ला (साधारणतः अर्ध्या किंमतीत) द्या.
दु.: नाही हो. तेव्हढी तर खरेदीच नाही.
गि.: मग द्या XXXXX    ला. (आता मूळ सांगितलेल्या भावाच्या पाऊणपट किंमत.)
दु.: बरं. (वजन करायला घेतो.)

वजनातही या गि-हाइकाच समाधान होत नाही. " अहो काय एव्हढं काटेकोर मोजताय ? सोनं मोजताय का ? राहू द्या तो टोमॅटो (किंवा बटाटा किंवा वांग ) जास्तीचा. काय बुवा तुम्ही ! " असला संवाद कानावर पडतोच.

 मला नेहेमी प्रश्न पडतो की एखादा टोमॅटो जास्तीचा मिळवून ही गि-हाईक मंडळी काय सुख मिळवत असतील ? खरंतर सोन्याची किंमत कितीही वाढ्ली तरी सणासुदीला सोनाराच्या दुकानांसमोर, पेढ्यांवर निमूटपणे उभे राहून ही मंडळी अव्वाच्या सव्वा भावात सोने खरेदी हूं की चूं न उच्चारता करीत असतील. मग त्यात सोनार किती लुबाडतोय याचा विचार न करता. हीच मंडळी थोड्या जास्त व्याजाच्या आमिषापायी आपली जन्मभराची पूंजी एखाद्या पॉंन्झी कंपनीत अत्यंत आकर्षक स्कीम्स मध्ये गुंतवतात. आणि व्याजाला भुलून मुद्दलाला मुकतात.आताशा फ़ेसबुक आणि तत्सम सोशल मेडीयावर पण "रस्त्यावरच्या विक्रेत्यांशी घासाघीस करू नका ." छापाच्या पोस्टस फ़िरताहेत. आता हे तत्व आम्ही फ़ार पूर्वीपासून अंमलात आणत असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. पण त्या अभिमानाला तडा देणा-या एक दोन घटना अलिकडल्या काळात घडल्यात आणि एक जीवनानुभव मिळाला.

आजवर नागपूरला काय किंवा सांगोल्यात काय, आम्ही ज्या वाहनाने भाजी आणायला जात असू ते वाहन बाजारात नेण्याची सोयच नसायची. आता शिरपूरला आठवडी बाजार वगैरे असा नसल्याने मुख्य रस्त्यावरच्या एक दोन विक्रेत्यांकडूनच आम्ही भाजी घेतो. बर तो रस्ता ही चांगला रूंद वगैरे असल्याने कार त्या दुकानासमोरच उभी करू शकतो आणि तशी ती करतोही. 

भाजीवाल्याकडे आम्ही अजिबात भाव करीत नाही पण त्याच वेळी तीच भाजी भाजीवाला / ली आमच्या या स्वभावाचा अनुभव आल्याने की काय, इतर गि-हाइकांपेक्षा आम्हाला जास्त भाव सांगत असल्याचे आमच्या लक्षात आले. तसे आम्ही त्यांना तोंडावर रंगे हाथ पकडलेही आणि लक्षात आणून दिले. (इतर गि-हाइक भाव विचारताना आम्ही जर तीच भाजी घेत असू तर आम्हाला जास्त भाव सांगितलेला असल्याने दुस-या गि-हाईकाला खुणेने थोडे थांब म्हणून सांगणे किंवा खुणेनेच खरा भाव सांगणे वगैरे, वगैरे.) गरजू किंवा अत्यंत घासाघीस करणा-या गि-हाईकांसाठी त्यांनी घासाघीस केल्यावर भाव कमी करण्याला आमचा कसलाही आक्षेप नव्हता आणि नसेलही पण आम्ही घासाघीस करीत नाही म्हणून मुद्दाम आम्हाला भाव वाढवून सांगणे म्हणजे आम्हाला "घासाघीस न करण्याबाबत" बावळट ठरवणेच होते हे आमच्या लक्षात आले.

नागर जीवनातून ग्रामीण जीवनात गेल्यानंतर जे अनंत जीवनानुभव मिळालेत, धडे आम्ही शिकतोत, त्यातलाच एक.
No comments:

Post a Comment