Sunday, October 16, 2016

एक मुक्त चिंतन : अरिजीत सिंग, जॉय मुखर्जी, विश्वजीत वगैरे .....

घरी रिलायन्सचे जिओ आल्यापासून आम्हा सर्वांची मौज सुरू आहे. सांगोला आणि आता शिरपूरला असल्यामुळे मधल्या काळात काही चांगले चित्रपट बघायला आम्ही मुकलो होतो. ती माझी हौस मी जिओ सिनेमावरून पुरी करून घेतली. सौभाग्यवती आणि सुकन्या दोघींनाही सिनेमाच्या गाण्यांच वेड. त्यां ते वेड जिओ म्युझिकवरून पूर्ण करताहेत. आजकाल कुठे जवळपास बाहेर जायच असेल तर गाडीत म्युझिक सिस्टीम ऐवजी मोबाईल वर जिओ म्युझिकच सुरू असत.आज असेच आम्ही फ़िरताना चि. मृण्मयीने मोबाईलवर अरिजीत सिंगची गाणी लावली होती. मला वैयक्तिक रीत्या "अरिजीत" हे नाव खूप आवडत. 


अरींवर म्हणजे शत्रूंवर विजय मिळवणारा तो अरिजीत ही माझी त्या शब्दाची व्युत्पत्ती. गाण जरा श्रवणीय वाटल म्हणून मी आवाज वाढवायला सांगितला. सुकन्या फ़िरकी घेण्याच्या मूडमध्ये होती. ती म्हणाली, " बाबा, तुला जर या पिक्चरच नाव सांगितल तर तू हे गाण ऐकणारच नाही." हा मात्र अन्याय झाला.  आता ही गोष्ट खरीय की काही काही सिनेमे मला अजिबात आवडत नाहीत. घरी टी व्ही वर सुरू असले तर मी तत्काळ चॅनेल बदलतो. एकवेळ मी डी. डी. ओरिया वर ओडीशी नृत्ये पहात बसेन पण असले सिनेमे अजिबात नाही. 

मी म्हटल, "कुठला ग हा सिनेमा ?"
तिने उत्तर दिल की "एबीसीडी २"

मला हे असल्या पकाऊ सिनेमांबद्दल आणि त्यातला तथाकथित नृत्यांबद्दल प्रचंड तिटकारा आहे. अरे काय ते गणपतीच गाण ? काय त्याचे शब्द ? काय ते दिव्य नृत्य ? काय त्या छोट्या छोट्या मुलांना खालून वरच्या थरांवर फ़ेकणे ? (बाय द वे सुप्रीम कोर्टाने जशी दहीहंडीतल्या थरांवर बंदी आणली तशी असल्या गाण्यांमधल्या छोट्या मुलांच्या फ़ेकाफ़ेकीवर बंदी आणली असती तर किती बर झाल असत नाही ? आणि ते दळभद्री झी सिनेमा वाले त्यांच्या बहुतांशी अवॉर्डस फ़ंक्शनमधे ही असलीच दरिद्री गाणी व त्यावर तसल्याच दरिद्री नटांची नृत्ये दाखवतात, असो.) सगळच दिव्य.
 

पण हे गाण खरच श्रवणीय होत. मनात विचार आला की हा सिनेमा हिट का नाही झाला ? {तसा एबीसीडी २ हा काही हिट सिनेमा नव्हे. पूर्वी वर्तमानपत्रांमध्ये "हाऊसफ़ुल्ल गर्दीचा २० वा आठवडा" वगैरे वाचायला मिळाल की सिनेमा हिट असावा अशी आम्ही खूणगाठ चित्ती बांधत असू. (अशा गाठी बांधून बांधून चित्ताच अगदी गाठोड झालय बघा.) हल्ली एखादा सिनेमा अगदी ४ आठवडे जरी टॉकीजवर असला तरी तो सुपरहिट ठरतो म्हणे. त्या व्यवसायातल अर्थकारणच पुरत बदललय. ओव्हरसीज राईटस, म्युझिक अल्बम्स वगैरे मधूनच निर्मात्याचा पूर्ण पैसा वसूल होत असेल तर मग क्षुद्र मायबाप प्रेक्षकाला कोण विचारतोय ? तो थियेटरपर्यंत आला काय आणि न आला काय ? सारखच.} 

पूर्वीच्या काळी तर नुसती गाणी हिट होती म्हणून विश्वजीत, जॉय मुखर्जी, राजेंद्रकुमार सारख्या सुमार दर्जाच्या नटांचे सिनेमे तुफ़ान चालत. आज हे भाग्य टायगर श्रॉफ़, श्रद्धा कपूर, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्टसारख्यांच्या वाट्याला का येऊ नये ?

चिंतनातून लक्षात आल की अस व्हायला चित्रपटनिर्मात्यांचीच धोरणे कारणीभूत आहेत. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच महिन्याभरापासून सर्व म्युझिक चॅनेल्सवर, एफ़. एम वर त्यांची गाणी वाजवून वाजवून ते त्या प्रेक्षकाची सिनेमा बघण्याची प्रेरणाच कमी करून टाकतात. पूर्वी श्रवणीय गाण्यांसाठी थियेटरपर्यंत जाव लागे. रांग लावून तिकीटे हातात पाडून सिनेमा बघावा लागे. आता सगळच तुमच्या घरापर्यंत, मोबाईलपर्यंत आलय. मग कोण कशाला मुद्दाम थियेटरपर्यंत जाईल ? 

आजकाल थियेटर्स तशीही पिकनिक स्पॉटस आणि सेल्फ़ी स्पॉटस झालीयत. एखाद्या नवीन निघालेल्या मॉलमध्ये आपण गेलो नाही तर "आपण डाउनमार्केट ठरू की काय ?"  या भीतीमुळे लवकरात लवकर तिथे जाउन, त्यातलाच एखादा टुकार सिनेमा पाहून, " Enjoying movie @ XXX  " स्टेटस अपलोड करत (मनात उगाच पैसे वाया गेल्याचा फ़ील लपवत), घरी परतण्याइतके आपण ’तयार’ झालोय. मग "चार दिवस जॉय मुखर्जी चे चार दिवस टायगर श्रॉफ़चे" म्हणायला आपली हरकत नाही. (दोघेही सारखेच "बायले" दिसतात.) 

पण ते चार दिवसही या आजकालच्या ठोकळ्यांच्या वाट्याला येत नाहीत हा बदलत्या काळाचा महिमा म्हणायचा का ?


No comments:

Post a Comment