Saturday, August 19, 2017

असे जीवनानुभव

जीवन हे एक उत्कृष्ट गुरू आहे अस म्हणतात. तुम्हाला ते कायमच काही ना काही तरी शिकवत असते. गेल्या काही वर्षातले दोन अनुभव. एकमेकांपासून फ़ार भिन्न असले तरी यांच्यात समान धागा आहे.

जवळपास गेले पाव शतक मी अध्यापनाचे काम करतोय. मुंबई विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ आणि नरसी मोनजी विद्यापीठ येथे अध्यापन तर शिवाजी विद्यापीठात अध्ययनाचे कार्य पार पडले असल्याने महाराष्ट्रातल्या ५ विद्यापीठांचा हा अनुभव आहे. आजकाल परीक्षांमध्ये पुढल्या किंवा आजुबाजूच्या विद्यार्थ्याचे बघून आपला पेपर लिहीण्यात आपण काही चूक करतोय ही भावना लुप्त होत चाललेली आहे. आम्ही विद्यार्थी असताना हे प्रकार नव्हते असे नाही पण असे करीत असताना एक अपराधीपणाची जाणीव जी मनाला असायची ती आता नष्ट होत चाललेली आहे हे माझ्या लक्षात आलय.शेजारच्या मित्राच्या पेपर मधून बघून लिहीले म्हणजे कॉपी तर नाही ना केली, असा समज अगदी दृढ होतोय आणि त्यांच्याच पीढीचे काही आता शिक्षक झाल्यामुळे अशा एखाद्या घटनेकडे ते पण तेव्हढ्या गांभीर्याने बघत नाहीत हा माझा अलिकडला अनुभव आहे. आपण एखाद्या विद्यार्थ्याला असे बघून लिहीताना हटकलेच तर "जाऊ द्या ना सर. असे प्रकार किरकोळ आहेत." अशा थाटाची सहशिक्षकांची प्रतिक्रिया असते. रमेश इंगळे उत्रादकरांची (तेच ते "निशाणी डावा अंगठा" फ़ेम) "सर्व प्रश्न अनिवार्य" ही याच विषयावरची कादंबरी मला प्रचंड अस्वस्थ करून गेली. जगरहाटीप्रमाणे चालावयाचे म्हणून प्रकरण फ़ारसे ताणून धरत नाही पण मला दुस-याचे बघून लिहीणा-या विद्यार्थांचे कौतुक वाटते. "पुढचा जे लिहीतोय ते अगदी बरोबरच लिहीतोय" हा त्यांचा पुढल्या मित्रावरचा केवढा विश्वास ! आजकाल माणसांचा माणसावरील विश्वास उडत चालला असताना ही असली विश्वासाची बेटे किती आश्वासक वाटतात नाही ? याच अनाठायी विश्वासातून आपण लिहीलेले बरोबर उत्तर खोडून मित्राने लिहीलेले चुकीचे उत्तर असलेल्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी येतात तेव्हा मनोरंजन होते आणि त्या ठिकाणच्या पर्यवेक्षकाची बौद्धिक पातळीही कळते.

आताशा गेल्या चार पाच वर्षात आणखी एक समान प्रसंग अनुभवायला येतोय. कुटुंबियांसोबत काही खरेदीला (विशेषतः साडी खरेदीला) गेलेलो असताना आपण ज्या साड्या, कपडे तात्पुरते निवडून फ़ायनल सिलेक्शन साठी बाजुला करून ठेवायला तिथल्या माणसांना / तायांना सांगतो नेमकी त्यातलेच कपडे, त्यातलीच साडी शेजारी खरेदी करत असलेल्या कुटुंबातल्या गृहदेवतेला आवडलेली असते आणि ती पण त्याच्यावरच आपला हक्क दाखवू पहाते. भगिनीवर्गात हा प्रकार जास्त. मग त्या दुकानातल्या माणसांना त्यांना तो माल आता विक्रीसाठी नाही हे पटवून सांगावे लागते.काहीकाही प्रसंगांमधे तर शेजारचे कुटुंब तर त्यांची खरेदी सोडून आपल्याच खरेदीवर बारीक लक्ष ठेवतायत की काय अशी शंका मला येते. कारण आपल्याला आवडलेली प्रत्येक साडी, प्रत्येक कपडा हा आपल्याला आवडल्यावरदोनच सेकंदांनंतर त्यांनाही आवडला असतो. अशावेळी आपण फ़ार ओशाळले होतो. "आपल्यावर आपल्या या तात्पुरत्या शेजा-यांचा एव्हढा विश्वास म्हणजे आपली उच्च अभिरूची तर नव्हे ?" असा गैरसमज करून आपण आपल्याला आवडता कपडा घेऊन अक्षरशः हसतच बाहेर पडतो. इंदूर, पुणे, महेश्वर, नागपूर, सोलापूर सर्वत्र हाच अनुभव.खरेदीत माझा अनुभव असा आहे की आपल्याला काय हवे याचे स्पष्ट चित्र डोळ्यांसमोर ठेवून जर आपण खरेदीला जात असू तर असे प्रसंग ओढवण्याची वेळ विरळा. पण " बाजारातली आजघडीची सर्वोत्तम वस्तू मी खरेदी करणार " या अट्टाहासाला तितकीशी चांगली वस्तू पदरी पडत नाही हा अनुभव. मग हे असे दुस-यांच्या खरेदीवर डोळा ठेवून "तो ती विशिष्ट वस्तू घेतोय ना, मग ती सर्वोत्तमच असणार" असे वागणे घडते. आजकाल विविध समाजघटकांचा स्वतःच्या बुद्धीमत्तेवरचा, स्वतःच्या निवडीवरचा आणि अनुषंगाने स्वतःवरचाच विश्वास उडत चालल्याची ही दोन्ही उदाहरणे. अगदी भिन्न प्रकृतीची पण समान धागा असणारी. असाही जीवनानुभव.

No comments:

Post a Comment