Tuesday, January 8, 2019

भाई : एक समृद्ध चित्रपटानुभव.

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु.ल. देशपांडे यांच्या जीवनावर "भाई" चित्रपट येणार म्हटल्यावर खूप उत्सुकता वाढली होती. ४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला पण आमचा मुहुर्त आज लागला. चित्रपट संपवून बाहेर येताना एक विलक्षण अनुभव नागपूरच्या "के सरा सरा" चित्रपटगृहात आला त्यानेच कळले की हा चित्रपट जनतेच्या किती मनात घुसून राहिलाय तो. चित्रपटात असे दृश्य आहे की कुमारजी, वसंतराव आणि भीमसेन जोशींच्या अचानक झालेल्या एकत्र मैफ़ेलीत भाई पेटी वाजवताहेत आणि सुनीताबाई व चंपूताई गाणे ऐकताहेत आणि गाण्याचे सूर पार्श्वभूमीत असतानाच भाईंची भूमिका करणारा सागर देशमुख पडद्यावर येऊन चित्रपटाचा पुढला भाग ८ फ़ेब्रूवारीला येणार असल्याचे सूचित करतो आणि रूढार्थाने चित्रपट संपतो. 


संगीत वाजत असतानाच काळ्या पडद्यावर श्रेयनामावली सरकत राहते. प्रेक्षकांपैकी एकही उठत नाही. जणू ही मैफ़ील संपूच नये असेच सगळ्यांच्या मनात. शेवटी सगळे संपते मग प्रेक्षागृहात टाळ्या वाजतात आणि जड मनाने प्रेक्षक उठतात. एखाद्या चित्रपटाला असा कर्टन कॉल मिळालेला मी पहिल्यांदा पाहिलय. ही सगळी मंडळी ८ फ़ेब्रूवारीची उत्कंठेने वाट पाहणार हे नक्की. मांजरेकर तुम्ही जिंकलत. हा भाग आणखी दोन तास असता तरी चालल असत. आता पुढचा भाग छान तीन साडेतीन तासांचा येऊ देत. किंवा पुलंच्या विराट साहित्यकार्यासाठी असेच पाच भाग येऊ देत.या चित्रपटाच सगळ्यात मोठ्ठ बलस्थान म्हणजे याच योग्य कास्टिंग. आजवर मी पुलंच मूळ "वा-यावरची वरात" (व्हीडीओत) पाहिलय. नंतर दिलीप प्रभावळकरांनी केलेल वा-यावरची वरात बघितलय आणि अरूण नलावडेंनी केलेल ही पुलंच्या साहित्यकृतीवरच नाटक बघितलय. पण प्रभावळकरांविषयी पूर्ण आदर बाळगून (नलावडेंविषयी तर काही लिहावसही वाटत नाही. अक्षरश: पाट्या टाकल्या होत्या त्या नाटकात. असह्य होऊन २००३ मध्ये गडकरीला आम्ही नाटक अर्धवट सोडून बाहेर निघालो होतो.) मला म्हणावस वाटत की सागर देशमुखने साकारलेले पुल हे वास्तवाच्या सगळ्यात जवळ जाणारे होते. पेस्तनजींच्याच शब्दात सांगायच म्हणजे "साला काय पुल केलाय ! एकदम हंड्रेड पर्सेंट. खरे पुल पण असे नाहीत." विनोद सोडा पण खरोखर सागर देशमुख तुम्हाला मानाचा मुजरा. तुम्ही किती बारीक अभ्यास केलाय पुलंचा. व्वा ! त्याला तोड नाही.

एखाद्याविषयी पूर्ण माहिती असताना त्याच्या आयुष्यावरच्या चित्रपट लोकांना एव्हढा खिळवून ठेवतो हे पुलंच्या विविधरंगी, बहुआयामी लोभस व्यक्तीमत्वाच जेव्हढ यश तेव्हढच दिग्दर्शकाच आणि कास्टिंग डायरेक्टरच पण. आश्विनी गिरींची "लक्ष्मीबाई देशपांडे" (पुलंची आई), इरावती हर्षेंची "सुनीताबाई" बारीकसारीक हावभावांसकट खुललीय. स्वानंद किरकिरेंचे "कुमार गंधर्व" आणि अजय पुरकरांचे भीमण्णा एकदम जमून गेलेत. वसंतरावही झकास जमून गेलेत. ऋषीकेश जोशींनीही  "रावसाहेब" समजून साकारलेत. पण विद्याधर जोशींनी "अंतू बर्वा" समजून न घेता घाईघाईत सादर केल्याचे वाटून गेलेत. पण पुलंच्या मूळ अंतुबर्वातच एव्हढा दम आहे की विद्याधर जोशी पण चालून गेलेत.

मांजरेकर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. पुलंच्या साहित्याचे शिवधनुष्य पेलेलेत हो. यापूर्वी हे शिवधनुष्य "पुल : अमृतसिद्धी " यात मंगला गोडबोले आणि स.ह देशपांडेंनी पेलले होते. मांजरेकर मराठी जनता तुमची ऋणी आहे. आता "आहे मनोहर तरी" पुन्हा वाचल तर सगळे संदर्भ नव्याने कळतील.
भाई तुम्ही जिवंत असताना तर आम्हाला भारून टाकल होतच पण मृत्यूनंतरही १९ वर्षांनी पुन्हा आमची छोटी छोटी आयुष्य समृद्ध करण्याची ताकदही तुमच्यात आहे याचा आज पुन: प्रत्यय आला. ज्या कोणी तुम्हाला "जीवेत शरद: शतम असा आशिर्वाद दिला असेल त्याचा आशिर्वाद खरा ठरला म्हणायचा. १९१९ ला जन्म घेतलेले तुम्ही हे नश्वर शरीर त्यागून गेलात तरी १०० वर्षांनी आमच्या सगळ्यांमध्ये तुम्ही आहातच की. 

व्वा ! वर्षाची सुरूवात ग्रेट झाली.


No comments:

Post a Comment